Ritbhatmarathi

Search
Close this search box.

दोन वर्षांपूर्वी एका कीर्तनाला जाण्याचा योग आला, कीर्तन खूपच प्रेरणादायी होत अगदी स्फुरण संचारेल असं होत, महाराजांनी सांगताना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आणि जगण्याचा मार्गही सांगितला महाराजांची वेषभूषाही तितकीच वाखाणण्यासारखी होती, पांढरेशुभ्र धोतर त्यावर सोनेरी काठ, खांद्यावर उपरणे आणि डोक्यावर पटका…. असा वेष कीर्तनकारांचा होता अर्थातच आपण स्वतः स्वच्छतेचं महत्त्व सांगतोय म्हंटल्यावर स्वच्छ आणि टाप-टीप असलंच पाहिजे ना…तब्बल दोन तासांनी महाराजांच्या कीर्तनाची सांगता झाली..आणि सगळ्या आया-बाया एका बाजूने आणि पुरुष मंडळी एका बाजूने असा जाण्याचा क्रम चालू होता, मी संपूर्ण कीर्तनाच्या सभामंडपात नजर फिरवली…सगळीकडे कागदांचे तुकडे,कुठे चिखलाने बरबटलेले चप्प्पल दिसले, कुठे बांगड्यांच्या काचा सापडल्या असा कचरा पूर्ण मंडपात दिसला…

घरी गेल्यानंतर मनात विचारांनी काहूर माजलं,’अरेच्या…! आपण कीर्तनात केवढं स्वच्छतेचं महत्त्व ऐकलं…पण कचरा उचलण्यासाठी मात्र कुणीच आलं नाही असं का ? असा प्रश्न सहज मनात आला आणि मनात पटकन संत गाडगेबाबा आठवणीत आले.  गाडगे बाबा स्वच्छतेचं महत्त्व जरूर पटवून द्यायचे पण स्वतः पुढाकार घेऊन सगळं गाव स्वछ करायचे.  हेच तर समाजप्रबोधनाचं गमक आहे.  पहिले स्वतःपासून सुरुवात करायची, मगच दुसऱ्यांकडून कामाची अपेक्षा करावी..पण आत्ताचे सगळे संत लोक आपल्या कपड्याला घाण लागू नये म्हणून झटत असतात, गाडगेमहाराजांची राहणीच मुळात साधी होती, शिवाय उच्च विचारसरणी होती…त्यांनी स्वेच्छेने साधी राहणी स्वीकारली होती…. आजच्या पांढरपेशा समाजासाठी साधी राहणी म्हणजे गम्मतच वाटेल…! गाडगेमहाराजांच्या वेषभूषेबद्दल सांगायचे झाल्यास एक हातात झाडू, दुसऱ्या हातात फुटलेल्या मडक्याचे खापर…. त्याच खापराने ते पाणी पित असे. एका कानात फुटक्या बांगडीची काच,अंगावर गोधडीवजा कपडे त्याला वेगवेगळे चिंधी लावलेल्या असा त्यांचा वेष असे.

गाडगे महाराज ज्या गावात कीर्तन करत त्याच गावात ते कीर्तन झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवत असे आणि स्वतः स्वच्छतेसाठी पुढाकार घेत असे, ‘आपण फार मोठे संत आहोत,आपण का बरं हातात झाडू घ्यायचा ? का बरं स्वच्छता करायची ?’ असा विचारही त्यांच्या मनात येत नसे..! आपलं उभं आयुष्य त्यांनी गोर-गरिबांची सेवा करण्यात घालवले,अंध आणि पांगळ्या लोकांना औषधोपचार करणं असं सामाजिक कार्य ते करत असे. एक थोर समाजप्रबोधनकार म्हणूनही लोक त्यांना ओळखतात.

सगळे साधू संत निघून गेलेले आहेत आणि आता उरले ते फक्त चपातीचोर म्हणजेच ढोंगी लोकांचा आता सुळसुळाट झालाय असं ते कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असे, ‘ तीर्थी धोंडपाणी, देव रोकडा सज्जनीं ‘ असे ते म्हणत याच स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास असे म्हणता येईल..कि दगड धोंड्यांमध्ये लोक देव शोधत बसले आहेत ,देव तर माणसात आहे….. त्यांच्या हृदयात आहे पण लोकांना त्याचा विसर पडलाय. गाडगेमहाराजांचे समाजसुधारणांची एक गुरुकिल्लीच आहे ती अशी –

भुकेलेल्याना                             –            अन्न

तहानलेल्याना                           –            पाणी

उघड्या-नागड्याना                    –           वस्त्र

गरीब मुलं आणि मुलींना             –          शिक्षण

बेघरांना                                  –             आसरा

रोगी,अंध आणि पंगू                   –          औषधोपचार

बेकारांना                                 –           रोजगार

मुक्या प्राण्यांना,पशु पक्षी             –        अभय

गरीब तरुण तरुणींचे                  –         लग्न

दुःखी आणि निराश लोकांना        –        हिंमत

हेच तर ते प्रबोधन करताना पटवून सांगत असे . यालाच तर रोकडा धर्म म्हणतात हीच तर खरी भक्ती आणि देवपूजा आहे. ‘सिम्ह्णाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात आणि गाडगे बाबाना पाहावे कीर्तनात’ .

आत्ता काही भोंदू महाराज अडाणी लोकांना सल्ले देतात कि कोंबडा कापा, बकरं कापा यावर कीर्तनातील गाडगे महाराजांची एक वर्हाडी भाषेतील कविता मांडावीशी वाटते-

‘काय करून ऱ्हायला रे ?’

‘न्हायी जी नवस फेडून राहिलो, म्या म्हन्ल माह पोरग ठीक झालं की कोंबड कापीन !’

‘अरे कोंबड कुनाच लेकरू हाय ?’

‘देवाचच लेकरू हाय !’

‘आन तूह लेकरू ?’

‘माह व्ह्य ना जी !’

‘आन तू कोनाचा रे ?’

‘मी माह्या बापाचा न जी !’

‘म्हन्जे शेवटी कोनाचा ?

‘देवाचं लेकरू !’

‘मंग तूह लेकरू बी देवाचच न ?

‘हो जी !’

सारांश – काय करताय तुम्ही ? देवाचाच बकरू कापताय,कोंबडा कापताय, कोणासाठी तर आपल्याला देव  प्रसन्न व्हावा म्हणून….. अहो देवाचाच बकरा कापताय…. कोंबडा कापताय….  आपलं मुलं म्हणजे देवाचीच मुलं आहे ना….  मग कापा आपल्या मुलाला असं केलं तर देव खरंच प्रसन्न होईल का याचा विचार करा….

खरंच अशा शब्दात ते पटवून देत कि लोकांची हिम्मतच होत नसे बकरे आणि कोंबड्या कापायची. खरंच असे गाडगे महाराज आत्ता आपल्यात असायला  हवे  होते कारण करोना, डेंग्यू यासारखे दुर्धर आजार पसरले आहेत याच कारण एकच सगळीकडे घाणीचं साम्राज्य  पसरलं आहे…. तुम्ही म्हणताल कि करोना आणि घाणीचा काय संबंध आहे…. संबंध आहे….

मागच्या महिन्यात मला एका हॉस्पिटलला जायचा योग आला….आता ह्या करोना काळात हॉस्पिटलची पायरीपण चढू नाही वाटत पण घरी एकाची तब्येत बिघडली आणि मला जावं लागलं त्यामुळे योगचं म्हणा…..हॉस्पिटल मध्ये गेल्यावर तिथलं दृश्य पाहून डोकंच फिरलं….हॉस्पिटल असूनही येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी तर होतीच पण “सोशल डिस्टंसिन्ग” चा आता पत्ताच नव्हता…. बहुतेक लोकांनी मास्क लावला नव्हताच आणि त्यात भर म्हणजे काही लोकं हॉस्पिटलच्या लिफ्ट मध्ये…..किंवा हॉस्पिटल च्या आवारात तंबाखू खाऊन अजूनही  थुंकत होते  जेव्हा कि त्याच हॉस्पिटल मध्ये कोविड सेन्टर सुद्धा होते…..आज भारतात करोना इतका पसरला आहे…. आपण सिस्टिमला दोष देतो पण काही अंशी ह्याला आपण सुद्धा जबाबदार नाही का…..नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आपल्या हातात आहे….

असं दृश्य पाहिलं कि मला जपानची आठवण येते….काही वर्षे मी कामानिमित्त जपानला होते….तिथे मला मेट्रो मध्ये किवा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी काही लोकं मास्क लावलेले दिसायचे. तेव्हा मला कळायचे नाही कि काही लोकांनी मास्क का लावलेला असायचा थोडी चौकशी केल्यावर कळलं कि कुणालाही थोडं फार व्हायरल इन्फेक्शन झालं कि ती लोकं मास्क लावतात जेणेकरून दुसऱ्यांना त्याचा संसर्ग होऊ नये….. आणि ती लोकं स्वेच्छेने नित्यनियमाने वर्षानुवर्षे  ह्याचं पालन करत आली आहेत….आणि म्हणूनच जपान किंवा इतर देशांनी आज करोनाला हरवून त्याचा फैलाव नियंत्रणात आणला आहे….

लक्षात ठेवा आपला देश स्वच्छ ठेवणे आणि आपली संस्कृती जोपासणे सर्वतोपरी आपल्याच हातात आहे….त्यामुळे कुठेही घाण करू नका आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करा….एक दिवस आपणही करोना फ्री होऊ….

ज्ञानदेवे रचिला पाया,तुका झालासे कळस असे म्हणत असे पण तिथून पुढचे कार्य खऱ्या अर्थाने सिद्दीस नेण्याचे काम मात्र संत गाडगे महाराज यांनी केले आहे म्हणून महाराष्ट्रातील संत शिरोमणी म्हणून त्यांचा उल्लेख केलं जातो. चला तर मग गाडगे बाबांचा आदर्श ठेवून कामाला लागू आणि लवकरच करोना फ्री होऊ.

© RitBhatमराठी

फोटो साभार – गूगल

डिस्क्लेमर – वाचकांना एक नम्र विनंती, हा लेख समाजप्रबोधन कसे करावे किंवा कसे असावे याचा विचार मनात ठेऊन लिहिला गेला आहे, कुठल्याही सांप्ररदायाला किंवा संप्रदायाच्या भावना दुखावण्याचा लेखिकेचा उद्देश नाहीय वाचकांनी याची नोंद घ्यावी.

===================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories