Ritbhatmarathi

Search
Close this search box.

mangala gauri information in marathi:

“श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात कुठुनी ऊन पडे…

हासरानाचरा जरासा लाजरा

सुंदर साजिरा श्रावण आला…”

अशी बालकवी, कुसुमाग्रज व इतर कवी, गीतकारांनी लिहिलेल्या विविध कविता, गीते श्रावणातील स्रुष्टीसौंदर्याचे वर्णन करतात.

श्रावण महिन्यात न्हातीधुती स्रुष्टी गाभुळलेली असते. नववधुसारखी सलज्ज झालेली असते. पावसाचं रौद्र रुप,विजांचं तांडव कमी झालेलं असतं. या रिमझिम पावसाळी वातावरणात बरीच व्रतवैकल्यं केली जातात. महादेवाच्या आराधनेसाठी श्रावणी सोमवार हे व्रत केलं जातं. मंदिरातनं भजऩ,किर्तनं होत  असतात.

माता पार्वती शिवशंभूच्या प्रेमात पडली होती व त्याच्याशी विवाह व्हावा म्हणून तिने घोर तपश्चर्या केली, उपवास केले. या माता पार्वतीचा आदर्शं डोळ्यासमोर ठेवत श्रावण महिन्यातील दर मंगळवारी नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीचे व्रत करतात. लग्नानंतरची पहिली मंगळागौर माहेरी साजरी करण्याची प्रथा असून नंतरच्या चार सासरी साजऱ्या करतात.

उद्देश: माता पार्वतीसारखे जन्मभर अहेवपण लाभावे, पतीची सर्व संकटांतून मुक्तता व्हावी या हेतूने नववधू मंगळागौरीची पूजा करते. पुजेला लग्न होऊन पाच वर्षे झाली नाहीत अशा स्त्रियांना बोलावतात.

श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवारी सकाळी चौरंगाला चार बाजूंना केळीचे खांब बांधून मखर करतात. मखर  पानाफुलांनी सजवतात.

मंगळागौर पुजणारी नवविवाहित सकाळी स्नान करून,कोरे वस्त्र किंवा धुतलेले वस्त्र लेवून पुजेस बसते.   चौरंगावर गौरीच्या मूर्तीची स्थापना करते. गौरीशेजारी शंकराची पिंडी ठेवते. चौरंगाशेजारी पाटा-वरवंटा ठेवते.  भटजींना बोलावून षोडषोपचार पूजा करतात.

पुजेला नवविवाहितांना बोलावलेले असते. पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी देवीची आरती करतात. एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात, प्रसाद वाटतात. पुजेसाठी बोलावलेल्या बायका एकत्र मुक्याने जेवतात. जेवणानंतर तुळशीचे पान खायची प्रथा आहे. सवाष्णींना काहीतरी(बांगड्या, कंगवा,..) सौभाग्यवस्तूचे वाण देण्याची प्रथा आहे.

अन्नपूर्णा देवीची धातुची मुर्ती, अक्षता, हळद, कुंकु, एक नारळ, कापड, बुक्का, गणपतीसाठी सुपारी, अत्तर,जानवे,केळी, पंचाम्रुत, दुधाचा नैवेद्य,सोळा काडवाती,दोन वस्त्रे,सोळा प्रकारची पत्री, पाच खारका, पाच सुपाऱ्या,पाच बदाम,पाच सुक्या खोबऱ्याच्या वाट्या,अक्षता.

ज्या घरी मंगळागौर पुजतात त्या घरातून सवाष्णींना हळदीकुंकवासाठी बोलावणे धाडले जाते. हळदकुंकू,विड्याची पाने, सुपारी हे सवाष्णीस देऊन तिच्या हातावर साखर ठेवतात व गव्हाने तिची ओटी भरतात.रात्रीच्या जेवणासाठी वाटली डाळ, लाडू, करंज्या,चकल्या पोळ्या, उसळ करतात. साऱ्या सख्या शेजारणींना भोजनास बोलावतात. रात्री परत मंगळागौरीची आरती करतात.
रात्रभर मंगळागौरीसमोर गाणी गातात, एकशेदहा प्रकारचे खेळ खेळतात, उखाणे म्हणतात. जागरण करतात.

सकाळी उठल्यावर स्नान करून मंगळागौरीस दहीभाताचा नैवेद्य दाखवितात व पुन्हा मंगळागौरीची आरती करतात. मंगळागौरीवर अक्षता टाकून तिचे विसर्जन करतात. 

जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।। रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।

मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।। तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।

पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।। 
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।। 
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।।

साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।

डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।

न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।

सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।

लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।मागुती परतु‍नीयां आली। देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।

आषाढी एकादशीचे महत्व आणि माहिती

जेजुरीचे खंडेराया माहिती आणि इतिहास नक्की वाचा (jejuri khandoba)

मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी केले जाते. असे शक्य नसल्यास इतर कोणी मंगळागौर व्रताचा थाट मांडला असल्यास तिच्या घरी जाऊन तिच्यासोबत व्रताचे उद्यापन करता येतं.

पुण्याहवाचन ठेवण्याकरिता होमहवनासाठी भटजींना बोलावतात. त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. आई वडिलांना वाण दिले जाते. मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे. तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू किंवा वड्या घालून देण्याची पद्धत आहे.  आईला वाण म्हणून यामध्ये एकसर (काळेमणी आणि सोन्याचा मणी) जोडवी, कूंकू, कंगवा आरसा असे दिले जाते. वडिलांना उपरणे, शर्ट, धोतर, टोपी देतात.

एक आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी आपल्या पत्नीसोबत रहात होता.त्या उभयतांना मुलबाळ नव्हतं. त्यांच्या दारात एक भगव्या कफनीतला, रुद्राक्ष माळा गळ्यात ल्यालेला, सर्वांगाला भस्म फासलेला गोसावी आला.

त्याने अल्लख असा पुकारा केला. वाण्याची बायको भिक्षा देण्यास बाहेर आली खरी पण तिच्याकडे पहात गोसावी म्हणाला की तो निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही. असे दोनतीनदा घडले. वाण्याच्या बायकोला फार वाईट वाटायचे. तिने वाण्यास सविस्तर सांगितले. वाणी म्हणाला,”गोसावी येतोयसा दिसताच दाराआड लप व त्याला सुवर्णभिक्षा दे.”

पतीने सांगितल्याप्रमाणे ती दाराआड लपली व गोसावी येताच तिने त्याला सोन्याची भिक्षा घातली.
गोसावी वाण्याच्या पत्नीवर रागावला व तुला कधीच मुलबाळ होणार नाही असा शाप दिला. वाण्याच्या बायकोने गोसाव्याचे पाय धरले, याचना केली तेंव्हा गोसाव्याने उ:शाप दिला. म्हणाले,”तुझ्या नवऱ्यास सांग. निळ्या घोड्यावर बैस. निळी वस्त्रे परिधान कर. रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण. देवीचे देऊळ लागेल. देवीची प्रर्थना कर. ती तुला पुत्रप्राप्तीचा वर देईल.”

वाण्याच्या पत्नीने घडलेली सारी हकीगत वाण्यास सांगितली.

वाणी निळी वस्त्रं लेवून, निळ्या घोड्यावर स्वार होऊन रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ होतं, हिरेजडिताचे खांब, माणकांचा कळस , आत देवीची मूर्ती होती. वाण्याने देवीची मनोभावे  पूजा केली. देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. वाणी म्हणाला, देवी, माझ्याकडे घरदार आहे, गुरंढोरं आहेत, धनसंपत्ती आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दु:खी आहे.

देवी म्हणाली,” तुझ्या सेवाभावामुळे मी  तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. मी तुला पुत्र देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल.”

वाण्याने विचारांती अल्पायुषी पुत्र मागितला. देवी म्हणाली,” माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खावयास दे.”

वाणी मागल्या बाजूस गेला.  गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तों आपल्या मोटेंत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळां झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरीं आला, बायकोला खाऊं घातलं, दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला.

मुलगा दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. ‘काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं’ असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. कांहीं दिवसांनीं मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊं लागले.

जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं कांहीं मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हां ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाहीं. मग मी तर तिची मुलगी आहे.”

हें भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशीं भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे
इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आई-बापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू; म्हणून धर्मशाळा पाहूं लागले.

मामा-भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरजं लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजविलं. दोघं झोपी गेलीं.

मुलीला देवीनं दृष्टांत दिला, अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्‍यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे ! तिनें सर्व तयारी केली. दृष्टान्ताप्रमाणे घडून आलं. कांहीं वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली आंगठी दिली. पहांटेस उठून ताट घेऊन बिर्‍हाडीं गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.

दुसरे दिवशी काय झालें ? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईल वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रींची लाडवांची व अंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सांपडतो? नंतर त्यांनीं अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडों लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा अचानक जागा झाला, त्यावेळी त्याने आपल्या मामाला सांगितले की, “मला अशा प्रकारचं स्वप्न पडलं.”

मामा त्याला म्हणाला, “आता हे ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाही.”

दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव-यानं अंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला.

भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिचीच कृपा.” सासर आणि माहेरची सर्व माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं.

जशी मंगळागौरी देवी तिच्यावर प्रसन्न झाली, तशी ती तुम्हा आम्हांवर होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, हीच देवाची प्रार्थना करा. अशी धर्मराजाला श्रीकृष्णानं सांगितलेली ही कथा साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

अशी ही कहाणी सर्व उपस्थित सवाष्णींना ऐकवण्यात येते. आपले सौभाग्य मंगळागौरीच्या कृपेने अखंड राहो अशीच प्रार्थना या कथेतून करण्यात येते.

बसफुगडी,फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, वटवाघूळ फुगडी,साळुंकी, गाठोडे, टिपऱ्या, गोफ, सासूसूनभांडण,अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड,घोडा असे एकशेदहा प्रकारचे खेळ खेळले जातात.

सध्याही नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात. गाणी गाण्यासाठी ज्ञात गायिकांना बोलावतात. मंगळागौरीचे खेळ खेळणारी मंडळे बोलावतात. नटतात, थटतात,नववारी नेसतात, खेळ खेळतात, परंपरा जपतात, आपसातला स्नेह व्रुद्धिंगत करतात.

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *