Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️सायली

आज खूप वर्षांनी शिल्पा आपल्या माहेरी आली होती. उदास, भकास, एकाकी घर पाहून तिला खूप भरून आलं. “किती चैतन्य होत घरात! आई -तात्या असताना. ते गेले आणि घरचं वातावरणचं बदलून गेलं. ऋषभ दादा नोकरीसाठी अमेरिकेला गेला आणि लग्न करून तिथेच सेटल झाला. या धक्क्याने आई आजारी पडली आणि काही दिवसातच सगळ्यांना सोडून निघून गेली. तेव्हा तात्या खऱ्या अर्थाने एकटे पडले. आमच्या घरी राहायला चला म्हणून त्यांना किती विनवण्या केल्या आम्ही, पण आईच्या आठवणीत त्यांनी इथेच राहणे पसंत केले.”

आई गेल्यानंतर अगदी सहा महिन्यातच दादाने ‘वारस ‘म्हणून तात्यांकडे सारी इस्टेट मागितली. तसा साऱ्यांना धक्काच बसला.
तेव्हा शिल्पाचा नवरा तिला म्हणाला, “आपल्याकडे गडगंज इस्टेट आहे. आपल्याला काही कमी नाही. तू काही माहेरच्या इस्टेटीवर हक्क दाखवू नकोस. ऋषभला सारं हवं आहे तर घेऊ दे त्याला. तू सोडून दे तुझा हक्क.”
तेव्हा शिल्पाला आपल्या नवऱ्याचा किती अभिमान वाटला!

आजच्या काळात असा विचार कोण करतो? उलट माहेरहून पैसा आणण्यासाठी तगादा लावणारे, आपल्या बायकोला त्रास देणारे कितीतरी नवरे आजूबाजूला पाहण्यात येतात.

मग तात्यांनी खुशालीने सारी इस्टेट ऋषभच्या नावावर करून दिली आणि वर्षभरातच तात्या सर्वांना सोडून गेले. शिल्पाचे माहेर आता खऱ्या अर्थाने तुटले. तिला वाटले.. “दादा -वहिनी इथे राहत असते, तर कदाचित आज माझे माहेर जिवंत असतं. हक्काने माहेरी चार दिवस राहायला, आपल्या बालपणीच्या ,आई- तात्यांच्या आठवणीत काही काळ का होईना, रमायला मिळाला असत.

खरं तर आई- तात्यांच हे जाण्याचं वय नव्हतंच. पण नियतीपुढे कोणाचे काय चालणार? दोघांनी किती कष्टातून हे घर उभं केलं. तात्यांचे संस्कार, शिकवण आम्ही कधीच विसरणे शक्य नाही आणि आई..आई कायम हसतमुख असायची. आल्या -गेल्यांच सारं काही व्यवस्थित करायची. आम्हा दोघांना कित्ती प्रेम दिलं तिने! पण दादाला ते स्वीकारता नाही आलं. आईची माया वहिनीने दिली असती का? माहीत नाही! पण आठवणींच्या सहवासात थोडा काळ भटकायला तरी मिळालं असतं.”

शिल्पाने थरथरत्या हाताने घराचे कुलूप उघडले. सारं समान अगदी जिथल्या तिथेच होत. आईचे मऊ मऊ साड्यांनी भरलेले कपाट, स्वयंपाकघरातील भांडी, तात्यांच्या पेटीतला खजिना.. तिच्या मनात अनेक आठवणी फेर धरून नाचू लागल्या. आपल्या बाळपणीचा काळ, मित्र -मैत्रिणी, आईने हाताला धरून शिकवलेला स्वयंपाक, मग लग्न, नंतर आपल्या मुलाचा, अभिषेकचा जन्म.. किती सुखद आठवणी!

ऋषभ दादा घरात असूनही कोणाचाच नसायचा. एकटाच स्वतःच्या जगात जास्त रमायचा. काहीतरी नवीन शिकण्याची ओढ असायची त्याला आणि अभ्यासाची आवडही खूप होती.

दादा शिकून अमेरिकेत सेटल झाला. मात्र आई -तात्यांना “तिकडे या” असे कधीच म्हणाला नाही तो. नंतर अचानक लग्न करून त्याने सर्वांनाच धक्का दिला. आई आणि तात्या गेल्यानंतर दादा आणि वहिनी दोघेही कसेबसे चार दिवस इथे राहून गेले. तेवढाच काय तो वहिनीचा सहवास लाभला. तिच्या स्वभावाचा अंदाज लागलाच नाही कधी.

इकडे नातेवाईक म्हणू लागले, “बायकोच्या नादाने ऋषभने सारी इस्टेट आपल्या नावावर करून घेतली.”
आता खरे -खोटे देवच जाणे. तात्या गेल्यानंतर एका वर्षांनी वहिनीने या घराची किल्ली कुरियरने पाठवून दिली आणि सोबतच हे लांबलचक पत्र.
वहिनी म्हणाली “ताई तुमच्या माहेरच्या किल्ल्या तुमच्या हवाली करत आहे. आजपासून या घरावर तुमचा हक्क तेवढाच , जेवढा ऋषभचा.
मी त्याला किती समजवायचा प्रयत्न केला, हे घर ताई आणि तू, तुम्हा दोघांच्याही नावावर करून घे. माहेर म्हणजे मुलीचे हक्काचे ठिकाण. हक्क सोडला म्हणून माहेर सुटते का? आणि आई -तात्यांच्या माघारी आपणच नको का तिचे माहेरपण साजरे करायला?”

शिवाय आई -तात्यांच्या माघारी लग्न केल्याचा वहिनीला पश्चातापही होत होता. म्हणून तिने त्याबद्दल माफीही मागितली.
याचा आनंद मानावा की दुःख, हेच शिल्पाला कळत नव्हतं. तिला हे रिकाम घर नको होत, तर आपल्या हक्काची, मायेची माणसे हवी होती.

या घटनेनंतर वहिनी शिल्पाला नियमित फोन करू लागली. सारखी परदेशी बोलवू लागली. हे पाहून शिल्पा सुखावली.
लवकरच शिल्पा आणि वहिनीची गट्टी जमली. हळूहळू मनातल्या सगळ्या गोष्टी दोघी एकमेकींशी शेअर करू लागल्या. ऋषभही नकळत यात सामील होऊ लागला.

बरेच दिवस वहिनीचा फोन नाही म्हणून शिल्पा अस्वस्थ झाली. तिने फोन लावून पाहिला, पण उचलला नाही म्हणून काळजी करू लागली.

अचानक एक दिवस वहिनीचा फोन आला, “आम्ही लवकरच भारतात परत येत आहोत. अगदी कायमचे.”
शिल्पाला खूप आनंद झाला. तिने माहेरचे घर अगदी छान सजवून घेतले. दादा -वहिनीच्या स्वागतासाठी.

लवकरच दादा -वहिनी आले. माहेरचे घर भरून गेले. वहिनीच्या प्रेमळ, शांत स्वभावाने दुरावलेले नातेवाईकही हळूहळू घरी ये- जा करू लागले.

शिल्पा आता हक्काने माहेरी जाऊ लागली. मात्र दादा -वहिनीच्या कुठल्याच निर्णयात तिने कधी भाग घेतला नाही, लुडबूडही केली नाही. शिल्पाची ना कसली अपेक्षा होती, ना कुठलाही मान हवा होता, ना हक्क.
तिला केवळ आपले हरवलेले माहेरपण गवसल्याचा आनंद मनात खूप खूप साठवायचा होता, इतकंच.

=============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *