Ritbhatmarathi

Search
Close this search box.

लॉकडाऊन (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा _जाने_२२”

©️®️ प्रज्ञा कुलकर्णी

खिडकीच्या कडाप्पावर पाय टाकून खुर्चीवर बसला होता तो! बराचवेळ! हातातल्या सिगारेटच्या थोटूकाशी नुसताच चाळा चालला होता.विचार करुन करुन डोक्याची चाळण झाली होती आणि त्यात भर म्हणून बायकोची अखंड किरकिर !
             त्याचे अस्ताव्यस्त केस सारखे खाजत होते….हे चाळीस-बेचाळीस दिवस आणि त्याआधीचे जवळजवळ पंधरा दिवस कात्री लागली नव्हती केसांना!लॉकडाऊन! “च्यामायला या कोरोनाच्या…..! जगणं हराम करुन टाकलंय या कोरोनानं!” मनातल्या मनात दोन-चार ठेवणीतल्या शिव्या हासडल्या त्यानं त्या कोरोनाला!दुसरं काय करु शकत होता तो!
            खिडकीतून दिसणारा रस्ता निर्मनुष्य होता.’काय? बघायचं काय खिडकीतून सालं? पथ्याला उरलेल्या चार-दोन झाडांची सळसळ?” तो जास्तच वैतागला.
            बायकोनं खिडकीच्या कडाप्पावर निमूटपणे चहा आणून ठेवला.जाताना आधीचे दोन कप घेऊन गेली.बोलत नसली तरी हालचालीतला त्वेष जाणवत होता.
            ती आली आणि गेली.पण तिच्या अशा न बोलून रागराग करण्यानं तो नेहमीसारखाच बेचैन झाला.त्याच्या डोक्यात नव्याच विचारांचं काहूर माजलं!तिचा अव्यक्त राग आणि हे असं कोरडेपण खरंतर त्याच्या सवयीचं! लगेच उमगतं त्याला!
           “मला नाही तर कोणाला उमगणार म्हणा..?”तो आधीच्या विचारांपासून थोडासा भरकटला..”लग्नाआधीपासून बायकोची कित्येक रुपं पाहत आलोय मी! चांगली कॉलेजात जाणारी मुलगी! बी.ए. चं पहिलं वर्ष झालं होतं! रुपानंही अगदी सुंदर नसली तरी चारचौघींत उठून दिसणारी! आणखी प्रयत्न केले असते तर अजून चांगलं स्थळ पदरी पडलं असतं! पण असं असूनही माझ्यासारख्या सडाफटिंग माणसाशी लग्न करायला तयार झाली. तिच्या काकांच्या आणि वडिलांच्या भांडणात……तिच्या भाषेत ‘भाऊबंदकी’त यांचं जमीनजुमला,वाडा सारं काही गेलं!होती-नव्हती ती पुंजी कोर्टकचेऱ्यांवारी गेली आणि हिचे वडील जणू देशोधडीला लागले.दोन मुलींची आधीच लग्न झालेली पण हिच्यावेळी परिस्थिती फारच वाईट ! धुमधडाका सोडा पण साधं २५ माणसांत मुलीचं लग्न लावून द्यायची ऐपत उरली नव्हती तिच्या वडिलांची! येणाऱ्या बऱ्या स्थळांना पहिल्यांदा ‘नारळ आणि मुलगी देतो.करुन घेणार का?’ म्हणून विचारायचे तिचे बाबा !”
          माझंही तसंच काहीसं! लग्नाआधी तीनेक वर्षांपूर्वी मी इथे पुण्याला आलो होतो.ठिकठिकाणी धडका खात कसाबसा बी.कॉम झालो होतो.इथं आल्या आल्या पहिल्यांदा आण्णानं दिलेल्या पैशांतून एक सेकंडहॅंड सायकल घेतली होती- नोकरीसाठी वणवण करताना उपयोगी पडेल म्हणून! पण वणवण भटकूनही मनासारखी नोकरी काही मिळेना! जिथं मिळायची तिथं रोजच्या गरजा भागवण्याइतकाही पैसा सुटायची चिन्हं नव्हतीच! पण तरीही त्यातल्या त्यात बरं ठिकाण बघून सुरुवात केली!
          एक दिवस असाच विचार करत बसलो होतो.परिस्थिती सुधारण्याची आशाच सोडली होती.निराशेनं घेरलं होतं.’पुन्हा गावाकडं जावं काय?’चा भुंगा डोक्याला लागला होता.इतक्यात वाड्यातल्या माझ्या भाड्याच्या खोलीशेजारी राहणारा गण्या त्याच्या एक मित्राला घेऊन आला…’अन्या ह्याला सायकल पाहिजेय रे आजचा दिवस! बाहेर तासांवर भाडं लावतात सायकलीसाठी…‌तुझी देतोस का आजचा दिवस? तसाही तू घरीच आहेस आज….हवंतर थोडंसं भाडं घे…म्हणजे दुकानवाल्यांपेक्षा कमी घेतलंस तर त्याचाही फायदा आणि तुझाही”…….हो नाही करता करता मी गण्याच्या दोस्ताला सायकल दिली.त्यानं आणखी चार जणांना सांगितलं आणि तिथून पुढं माझ्याकडं सायकल भाड्यानं मागायला येणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढायला लागली.माझी नोकरी रडतखडत चालूच होती.सायकलचं भाडं म्हणजे त्यात भर!
              मग थोडं डोकं चालवलं. घरची काटकसरीची सवय होतीच…पैसे साठवून आणखी एक जुनीच सायकल विकत घेतली.सुट्टीदिवशी घरी बसून ती गंज आलेली सायकल रंगवून नव्यासारखी चकचकीत केली.
               त्यानंतर दोन-दोन सायकली भाड्यानं जायला लागल्या.
               एकेदिवशी वाड्यातल्या टिपणीस आजी मोरीत पाय घसरून पडल्या.त्यांना बसणं-उठणं-जमिनीवर झोपणं झेपेना.टिपणीस आजोबा माझी एकुलती एक कॉट मागायला आले.जुन्या बाजारातून घेतली होती ती कॉट मी! आठ दिवसांपूर्वीच!पैसे साठवून!…… आजपर्यंत मी जमीनीवर चटई अंथरुनच झोपायचो.सवय होती मला.मी टिपणीस आजोबांना देऊन टाकली ती कॉट….आजी बऱ्या होईपर्यंत किंवा अगदी तुम्ही नवी खरेदी करेपर्यंत वापरा म्हटलं! टिपणीस आजोबा हसत हसत ती कॉट घेऊन गेले……भाड्यानं!
               हळूहळू मी याच व्यवसायात जम बसवला.मोठ्यामोठ्या कार्यक्रमांना लागणारी स्वयंपाकाची भांडी, खुर्च्या,जेवणाची टेबलं, माईक आणि म्युजिक सिस्टीम,लग्नात नवरीमुलीसाठी वापरतात ती डोली, पाहुण्यांसाठी गाद्या-गिर्द्या-अंथरुणं, मोठ्ठे मोठ्ठे पंखे ……थोडक्यात सुईपासून डी.जे.च्या पॉवर सप्लायपर्यंत सऽगऽळं!…माझ्याकडं उपलब्ध नसेल-शिल्लक नसेल तर विकत आणून पुरवतो-इकडचं तिकडे फिरवतो पण धंदा आणि गिर्हाइक सोडत नाही.धाकट्या पोरानं अलिकडंच फोटोग्राफी चा व्यवसाय चालू केलाय.पुण्यात नाव आहे आपलं..जबरदस्त जम बसलाय!म्हणजे…..बसला होता”…….विचार करता करताच तो चपापला.
               पण जम बसवण्यात बायकोचा सिंहाचा वाटा आहे.नोकरी सोडून मी धंद्यात नशीब आजमावायला लागलो तेव्हा याच वाघिणीनं सकाळ-संध्याकाळ चाळीस लोकांना डबे पुरवून घर चालवलं….एकमार्गी! माझा जम बसेपर्यंत ‘तुम्ही किती पैसे मिळवता?’ ची चौकशी नाही…त्याउलट…”धीरानं घ्या!सगळं मनासारखं होईल’चं टॉनिक! रात्री-अपरात्री ‘सामान गाड्यांमध्ये चढवणं-उतरवणं-तपासून घेणं’ सगळीकडे बरोबरीनं राबते ती…तिच्या ‘बायको’पणामुळं इथंवर आलोय!या एवढ्या मोठ्या सोसायटीत फ्लॅट- चारचाकी गाड्या- धंद्यासाठी भलंमोठं गोडावून….एवढं सोपं नाहीये!!
            परवाच खाजगी फायनान्स कंपनीकडनं पंच्याण्णव लाख रुपयांचं कर्ज घेतलं आणि वरचे पाच लाख सेंव्हींगचे घालून एक कोटी रुपयांची जागा घेतलीय..धंद्याचं सामान ठेवायला…धाडस करून!सप्टेंबर महिन्यात मोठ्ठी वास्तूशांत केली.पै-पाहुण्यांची पंगत वाढली.महिन्याला दीडलाख रुपये हप्ता जातोय! तिच्याशिवाय शक्यच नव्हतं हे धाडस !आमच्या गावाकडचे सगळेच तिला माझी भाग्यलक्ष्मी म्हणतात!”भाग्यलक्ष्मी!’ त्यानं स्मितहास्य केलं.त्याचं ते स्मितहास्य गूढ होतं.दुसऱ्या कोणालाच त्याचा अर्थ कळाला नसता.
           तसंतर माझं भाग्य उजळायला माझ्या आयुष्यात खूप जणांनी हात दिलाय मला….बापाच्या माघारी मोठ्या भावानं तळहाताच्या फोडासारखं जपलंय ….अजूनही जपतो तो! आण्णा…माझ्यापेक्षा दहाएक वर्षांनी मोठा..कुठलीही अपेक्षा न करता सतत माझ्यावर माया उधळत असतो तो!महापूरात घर वाहून जाओ अथवा वणव्यानं ऊसाचं शिवार जळून राख होओ…त्यानं कधीच माघार घेतली नाही! आम्ही इकडे खोऱ्यानं पैसा ओढतोय म्हणून त्यानं पै’च्या अपेक्षेनं मला फोन केला नाही.तुटपुंज्या उत्पन्न स्त्रोतावर त्यानं गावाकडची संकटं गावाकडंच थोपवून धरलेत. आजपर्यंत! वर गावाकडची माया आमच्यासाठी राखून ठेवतो.
         बापाच्या राज्यात गडगंज होतं…..पण बाप म्हणजे तुकारामांचा अवतार! बरचंसं सत्कार्याला गेलं-थोडंथोडकं वाचलं! उरलं ते घेऊन आणि अब्रू राखून आण्णा आमच्यासाठी बरंच झुंजला.
         संकटाला शिंगावर घ्यायला आण्णा डरत नाही…तो फक्त अब्रूला भितो!
        दहा-बारा वर्षा़पूर्वीची गोष्ट!हातात पैसा खेळायला लागला तशी माझी चैनीची वृत्ती वाढली होती…. गावकडच्या सत्या पाटलानं मला बारमध्ये बघितलं आणि गावाकडं जाऊन आण्णाला सांगितलं.झालं.आण्णानं मला फोन करुन डोळ्यांत पाणी काढलं.म्हणाला … ‌’तुकारामासारख्या बापाला याद कर! धंद्यातल्या चढउताराचा ताण होत असंल तर गावाकडच्या देवळात नवरात्रीत नवरात पाळ! नऊ दिवस तिथंच देवळात राहिलं की आपोआप टवटवीत होशील.वर्षभर काळजी नाई!तेबी जमत नसंल तर गावाकडं शेतात रहा आठवडाभर पन परत दारुला शिवू नको.ऐकशील नव्हं?”…..आण्णानं स्वतः उपाशी राहून माझं पोट भरलंय!त्याचा शब्द मोडणं मला या जन्मात तरी शक्य नाही! त्याचं ते भावनिक होणं बघून मी दारू सोडली.’
              आण्णाच्या आठवणीनं तो आतनं किंचित हालला.त्यांनं हातातलं सिगारेटचं थोटूक खिडकीतून खाली भिरकावून दिलं.दूर कंपाऊंड वॉलच्याही पुढे जाऊन पडलं ते.आण्णाला कसलंच व्यसन आवडत नाही.माळकरी आहे तो!कुणापुढं हात पसरणं हा खरंच त्याचा धर्म नाही.
               मागच्या वर्षी आईच्या श्राद्धाला गेलो तेव्हा, मी…स्वत:हून सातबारावरचं माझं नाव कमी करुन घेतलं.मी हे काम करतोय हे त्याला खरंच कळलं नाही.सगळं झाल्यावर त्याला समजलं तेव्हा माझ्यावर जरा आरडाओरडा केला त्यानं…पण मी ऐकतच नाही म्हटल्यावर गप्प बसला तो.
               कुठं जमीन-कसली जमीन-किती जमीन यातलं काही मला ठाऊक नाही.ती कसायला मी तिथे जात नाही… यापुढे जायची दूरदूरपर्यंत शक्यता नाही.करु काय मी त्या सातबारावर नाव ठेवून?
               पण या गोष्टीमुळं बायको मात्र जाम बिथरली.’अडीनडीला चारदोन हजार देत होतात ते ठीक होतं …जमीनजुमले सोडायला आपण काही शाहू महाराजांचे वंशज नाही आहोत’ हे बायकोचं मत! हां…..बायकोशी चर्चा करायलाच हवीच होती मी,इतका मोठा निर्णय घेण्याआधी! पण नाही केली कारण तिचं उत्तर आणि तिचे पूर्वग्रहदूषित ‘भाऊबंदकी’चे विचार माहिती होते मला.म्हणून मुद्दाम नाही विचारलं.
               आजपर्यंत हजारदा समजावलंय मी तिला…सांगून-सांगून थकलोय की  ‘बाई सगळेच भाऊ-भाऊ वैरी नसतात….तुझ्या बाबा-काकांसारखे! आणि कृपा करुन तुमची जावा-जावांची स्वयंपाकघरातली भांडणं तिथंच मिटवत जा…त्यांना मोठं करून गोकूळासारखं कुटुंब गिळणाऱ्या जावांसारख्या जावा होऊ नका तुम्ही दोघी ….आणि तुम्हाला तुमच्यात जुळवून घ्यायचं नसेल तर आम्हा भावंडांच्या मध्ये  तरी ती ‘कुंकू-टिकली’सारखी भांडणं आणू नका…! तुम्ही तुमच्या भावंडांवर जीव टाकता,त्यांच्यावर प्रेम करता तसं ते आम्हालाही करु द्या’
             मुळात ना आण्णा वाईट आहे, ना आण्णाची बायको वैनी वाईट आहे….ना आमची भाग्यलक्ष्मी वाईट आहे! पण या तिघांमध्ये काय गुंता आहे हे आजवर खूप विचार करुनही कळलं नाही मला.यापुढे विचार करणारच नाहीये मी या गोष्टीचा! हल्लीहल्लीच हाताखाली आलेलं पोरगं मला शिकवत होतं परवा…..ज्या प्रश्र्नांची उत्तरं शोधून सापडत नाहीत ते प्रश्र्न म्हणे टाळून सुटतात! असेलही! मीही हेच करुन बघायचं म्हणतोय!
              विचार करण्यासारखे,एनकेन प्रकारे सोडवण्यासारखे बरेच प्रश्न आहेत माझ्यापुढे! त्यात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कर्जाचा हप्ता!
             पुण्यात दहा मार्चपासूनच कोरोनाची भीती शिरलीय.त्यामुळं मार्चमधल्या जवळजवळ सगळ्याच राजकीय सभा,लग्नसमारंभ‌,धार्मिक कार्यक्रम,जेवणावळी ….. सगळं सगळं गडगडलं!…..साहित्यासाठी घेतलेली अॕडव्हान्सपण परत द्यायला लागली लोकांना!
              आपण भारतीय लोक….रुपयातल्या पाच पैशांची पुरचुंडी मागे ठेवतोच.तशी थोडीफार पुंजी होती.त्यात मार्चचा हप्ता आणि घरखर्च ओढून काढला.एप्रिलमध्येपण ओढाताण करुन बसवलं सगळं……पण आता गाठीचा पैसा संपलाय! फायनान्स वाले थांबायला तयार नाहीत..अर्थात एखाद्या महिन्यात मागं पुढं चालतं! पण मे महिन्याच सोडा…जून मध्ये धंदा चालू होईल कुणी सांगावं?
             
कोरोनावरची लस जोपर्यंत बाजारात येत नाही तोपर्यंत पब्लिक गर्दीला घाबरणार हे नक्की! त्यामुळं माझा धंदा केव्हा रुळावर येईल याची खात्री देणं आता प्रत्यक्ष परमेश्वरालाही कठीण!
                 बरं ही सारी भीती ओकू कोणासमोर? कोण आहे माझं…… बायको? तेच तर करु नाही शकत…आजकाल कर्जाच्या हप्त्याचा विषय निघाला तरी घरात चक्रीवादळ चालू होतं….शेवटी विषय गावाकडच्या जमीनीवर जाऊन पोचतो आणि त्याच्यापुढे आण्णावर! मला एक कळत नाही….काय चूक आहे त्याची? जमीन तर मी त्याच्या नावावर केली!त्याने थोडीच हट्ट केला-भांडण केलं-धमकावलं?? काय केलं?
                 पण आमच्या बायकोचा त्याच्यावर राग आहे !मी त्याच्याशी फोनवर बोलतानाही ती मागे मागे असते माझ्या! मी काय बोलतो- कसं बोलतो लक्ष ठेवून असते! कोमलचं- माझ्या पुतणीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात….त्यात पण तिला फारसा रस दिसत नाही….तिच्या लग्नाची सगळी चर्चा आण्णा माझ्याशी करतो याचा आमच्या भाग्यलक्ष्मीनं काढलेला अर्थ म्हणजे…..त्यांना लग्नासाठी खुर्च्या-टेबलांपासून नवरीमुलीच्या डोलीपर्यंत सगळं काही फुकट वापरायला मिळणार ना…. माझ्याकडून! म्हणूनच ते मला सगळं काही उलगडून सांगतात! असा अर्थात तिचा भ्रम!
                  परवा पण असंच झालं! आण्णाचा फोन आला. सांगत होता….कोमलचं लग्न आता घरच्यापुरतंच होईल! आपण घरचे आठ-दहा जण आणि त्यांच्याकडचे सात-आठजण! घरीच वैनी जेवणखाण बघेल म्हणाला! ….विहीरीकडच्या पाच गुंठ्यांत ‘आलं’ केलं होतं…ते तसंच पडून आहे म्हणून सांगत होता.”लॉकडाऊनमुळं सगळा माल शेतातच शिल्लक पडलाय..केळी पिकून काळ्या ठिक्कर झाल्यात…’हापूस’ला स्पेशल रेल्वेची सोय आणि केळीचं नशीब असं फुटकं! माझ्या घामावर पोसलेल्या केळीची गोडी हापूसपेक्षा कमी हाय व्हय??..वाहनांची सोय नाही-बाजारपेठ नाही-शेतकऱ्याचं हाल आहे बाबा” असं म्हणताना त्याचे डोळे डबडबले…मला इथूनचं जाणवलं त्याचं गहिवरलेपण!
                काहीतरी समजावायचं म्हणून मी बोललो…”आण्णा….सगळीकडे हेच चाललंय सध्या.तू मनाला लावून घेऊ नको! आपल्याला दोन वेळचं जेवण मिळतंय यात आनंद मानायचा.बाहेर परप्रांतीय मजूर-फेरीवाले बघ….काम नाही-पैसा नाही म्हणून उपाशी दिवस ढकलतायंत! अन्न पाण्याला मोताद आहेत लोक….तेवढी वेळ आली नाही आपल्यावर यात समाधान मानायचं!आता माझंच बघ……हप्ताच दीडलाख रुपयाचा आहे! दोन महिने कसंबसं ढकलंलं…आता कुठनं आणू पैसा…??”…..बोलता-बोलताच मी चपापलो! त्याला सांगायलाच नको होतं मी! बॅंका़च्या हप्त्याची आणि तो नाही भरला तर होणाऱ्या बेअब्रूची त्याला जाम भीती आहे! त्यात हे तर खाजगी फायनान्स! तो बिथरणारच….!
               ” म्हणजे थोडं मागं-पुढं होणार हे धरूनच चालायचं आपण आण्णा!! एक मिनीट थांब हं…..अभीला देतो फोन…तो काहीतरी बोलणार आहे बघ”….विषय बदलून मी फोन माझ्या थोरल्या मुलाकडं दिला.
                 अभीचा मित्र गोव्याला कुठल्यातरी फार्मा कंपनीत आहे.त्या मित्राचा नंबर का काहीतरी दिला त्याने आण्णाला!  पुढं काय बोलणं झालं ते ऐकायला मी तिथं थांबलो नाही.
                 मी तिथून वळताना पाहिलं तर आमची भाग्यलक्ष्मी आमच्या मागेच घुटमळत होती.मी त्याला पैसे वगैरे देणार नाहीये हे कळलं तेव्हा तिने पुसटसा टाकलेला निश्वास कानांवर पडला माझ्या! हलकासा!
                 बायकोचं हे असं आणि आण्णाला बॅंकेच्या हप्त्यांची भीती…..पोरं अजून अजाण..‌मित्र म्हणावेत तर ते त्यांच्या त्यांच्या आर्थिक-मानसिक विवंचनेत!एकूणच….कोणासमोर मन मोकळं करावं…धीर मिळवावा असं कोणीच नाहीये सध्या! मानसिकरित्या आतून कोलमडलोय मी…पण दाखवता येत नाही! संकटाला टक्कर द्यायचीय हे तरी खरं!”
                  हातातल्या कपातला चहा संपला होता.
                  ‘डोक्यात इतकं काहूर माजलं पण उपयोग काय? हे तर एरंडाचं गुर्हाळ’….म्हणत कंटाळून तो उठणारच होता इतक्यात त्याचा फोन व्हायब्रेट झाला.त्याच खुर्चीवर ऐसपैस बसूनच त्यानं फोनवर झगझगणारं नाव पाहिलं….आण्णाचाच होता फोन!
टेलिपथी टेलिपथी म्हणतात ती हीच की काय? त्याला सहजच वाटून गेलं!…..’हा आण्णा …शंभर वर्षे आयुष्य तुला….बोल……”मी सुरवात केली.
‘आण्णा’ हा शब्द ऐकून नेहमीप्रमाणे श्रोत्यांनी उपस्थिती लावलीच!
‘आरे काही नाही….ते ब्यांकेच्या हप्त्याचं काय केलं वं तू?….” आण्णाने सरळ मुद्द्यालाच हात घातला.
“काय करणार…..सध्या एवढा पैसा नाहीच आहे शिल्लक! मँनेजरबरोबर बोलून घ्यावं म्हणतोय! मुदत घेईन मागून!….राष्ट्रीयकृत बँकांनी आधीच मुदत वाढवून दिलीय लोकांना… आपण फायनान्स कंपनीकडून घेतलंय ना कर्ज ! त्यामुळं आपल्याला सवलत नाहीये! बघू आता काय होतंय! ….तू नको काळजी करु! मी करीन काहीतरी सोय!”…..मी त्याला समजून सांगायचा केविलवाणा प्रयत्न केला! माझी भीती …..माझा निद्रानाश यातलं काहीच त्याला समजू द्यायचं नव्हतं मला.
“अभिनं दिलेल्या नंबरवर फोन केल्यावर आपल्याकडचं आलं चांगल्या किमतीला गेलं……कोरोनामुळं आल्याला मागणी हाय….कंपनीच्या गाडीनं माल त्यांच्या खर्चानं उचलून नेला.आज सकाळीच! पैशे पण चुकत्ये केले.बावीभोवतीच्या तुळशीच्या पत्री आणि उरलेल्या केळी पण बऱ्या सौद्यानं उजवून टाकल्या त्याच लोकाना….!
पैसा सुटलाय बऱ्यापैकी… कोमलच्या लग्नाला जेवणावळीसाठं पन्नास हजार राखून ठेवलं होतं….त्येची आता गरज लागणार नाही! सगळं मिळून लाखावर पंचवीस हजार होतील!…तेवढं तर तेवढं! ब्यांकेत भरुन टाक! कधी घिऊन येऊ पैशे?…..तू सांगशील तेव्हा येतो!” काबाडकष्ट उपसून हाताची पोटाची गाठ बांधणारा आण्णा वर्षभराची बिदागी मुलीच्या लग्नाची रोकड माझ्यासाठी सैल हातानं खर्चणार होता…बोलतच सुटला होता तो.
त्याचं बोलणं ऐकून पुरुषासारखा पुरुष मी …. आतून गदगदलो.
मी काहीच बोलत नाही हे बघून आण्णा बोलू लागला….”अरे एकाच आईबापाची लेकरं आपण….पाठीला पाठ लाऊन जन्मलो! एकामेकांचा आधार आपणच नको व्हायला?…पैसा काय आज माझ्याकडं-उद्या तुझ्याकडं!!”….माझा कोंडलेला अस्फूट हुंदका बाहेर पडला.माझ्या डोळ्यांनी पापण्यांची मर्यादा सोडली.
सव्वा लाख माझ्यासाठी फार मोठी रक्कम नव्हती.दुनियादारी करुन उभे केले असते मी सव्वा लाख….!पण असा सैल हाताचा आणि बळकट मनगटाचा लाखात एक भाऊ मला लाभला या कृतार्थ भावनेचे होते ते दोन कढत अश्रू….!
“नको रे आण्णा…..सगळे पैसे मला देऊन तू काय करशील वर्षभर?….आपण बघूया दुसरा मार्ग…” मी गदगदून उत्तरलो.
“भावजी ….आयुष्यभर तुम्ही किती जीवापाड माया लावली आम्हाला…माझ्या पोरांना !.आपलं जगणं तुमच्या धंद्यावानीच हाय की! दिलेली वस्तू नगाला नग मोजून घ्यावीच लागती…वस्तू दिल्याशिवाय ती परत येणार नाई नि पैसा सुटणार नाई! तुमची-आमची माया बी अशीच बघा.. मोजून दिली होती तुम्ही आम्हाला असं समजा….ती तेवढीच- नाई नाई जरा जास्तीचीच परत घ्यावी लागंल तुम्हाला एक ना एक दिवस! कारण दिल्याघेतल्याशिवाय माया नि अमानत वाढत नसती.खरं हाय नव्हं?.” आण्णाच्या फोनवरून वैनी बोलत होती…..!
मी मूक झालो.‌क्षणात देवाघरी गेलेली माझी आई माझ्या डोळ्यांसमोर तरळली.तिचं वाक्य माझ्या मनाचा तळ ढवळून गेलं.
पाठीमागे उभी राहून सारं ऐकणारी आमची भाग्यलक्ष्मी न सांगताच सारं काही समजली होती……तिचे निर्बंध गळणारे डोळेच त्याची साक्ष देत होते.प्रश्न सव्वा लाखाचा नव्हताच.ते बायकोच्या एका सोन्याच्या डागात चार वेळा जमा झाले असते! पण प्रश्न सव्वा लाखांत दडलेल्या त्यागाच्या तयारीचा होता!
डोळे पुसतच आमची भाग्यलक्ष्मी पुढे झाली…”खरंय वहिनी…. दिल्याघेतल्याशिवाय माया आणि अमानत वाढत नाही.आता मायेची अमानत तुम्ही द्याल आणि मग आम्ही!चक्र चालूच ठेवायचं आहे!
कोमलच्या लग्नाच्या आधीच चार दिवस येतो आम्ही सगळेजण…आणि यावेळी चुलीवरचा स्वैपाक शिकते हं मी! तुम्हाला एकटीला नाही राबवणार!सगळं दोघी मिळून नेटानं करु! आपली पोरं आहे ती.. लाडाची….!”
त्यांचं पुढचं बोलणं माझ्या कानात शिरलं नाही.मला फक्त इतकंच कळलं….बाहेरच्या लॉकडाऊन मुळं मनामनातलं कित्येक वर्षांचं लॉकडाऊन उठलं होतं! कायमचं!

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *