Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सौ. गीता गजानन गरुड

अविनाश निनावेशी माझं हे दुसरेपणाचं लग्न. खरं तर राजन माझा पहिला नवरा अपघातात अकाली मरण पावल्यानंतर मला दुसरं लग्न करावसं वाटतच नव्हतं. मी माझ्याभोवती राजनच्या आठवणींचा घट्ट कोष विणत होते. त्यातच रमून जायला आवडायचं मला. दु:ख पण एका विशिष्ट मर्यादेनंतर आवडू लागतं. काय हे मनाचे खेळ ना!

आमची दोघांची गुडिया, तेंव्हा असेल चारेक वर्षांची. श्रावणात झाली म्हणून श्रावणी नाव ठेवलं होतं आम्ही दोघांनी. राजनला तर मुलगीच हवी होती. मला कुशीत घेऊन माझ्या केसांत बोटं फिरवत अनुरागाने म्हणायचा,”अगदी सेम तुझ्यासारखी दिसणारी बेटी हवीय मला.”

मग मी लटकेच रागात विचारायचे,”का बरं मुलगा का नको?”

मग तो माझं नाक ओढत म्हणायचा,”नयन, तू किती लाड करतेस माझे! अगदी अश्शी तुझ्यासारखी दिसणारी,तुझ्यासारखी माया करणारी बेटी दिलीस की धन्य पावलो बघ मी. मुलाचं काही खरं नसतं. बरे तर बरे नाहीतर धाडतात व्रुद्धाश्रमात. बेटीच्या डोळ्यात बापासाठी चार आसवं तरी जमा होतात. बेटी आईप्रमाणे काळजी घेते बापाची.” यावर मी परत काही उत्तरणार तोच तो माझे कोरीव ओठ त्याच्या मांसल ओठांनी बंद करे..अगदी श्वास गुदमरेल इतकं जवळ घेई मला नि मग त्याला भान येई माझ्या पोटात वाढणाऱ्या अंकुराचं मग डोळ्यात अपराधीपणाचा भाव आणत बाजुला होई. मग मीच त्याचा मांसल दंड माझ्या मानेखाली घेई. तो गरगरणाऱ्या पंख्याकडे बघत म्हणे,”ही बेटी बाहेर आली नं नयन की थोडी वर्ष तू माझी मग दोनेक वर्षांनी पुन्हा तू गर्भार रहाणार त्यावेळी मात्र तुझ्या उदरी बेटा असेल, माझ्यासारखा दिसणारा.”

मी राजनच्या गळ्यातल्या चैनीत बोटं गुरफंटत म्हणे,”सगळंच कसं ठरवतोस रे तू! तू म्हणतोस तसंच होईल कशावरनं? कशावरनं या पहिल्याच वेळी मला जुळं होणार नाही!”

या माझ्या प्रश्नावर तो थोडासा विचलित झाला होता मग माझ्या डोळ्यात बघत,माझ्या ओटीपोटावर बोटं फिरवत म्हणाला होता,”हे नऊ महिने तरी ही जागा फक्त माझ्या बेटीची आहे. विभागून नकोच. तिला मुक्त संचार करुदेत तुझ्या उदरात.”

नऊ महिने राजनने एखादं नाजूक फुल जपावं तसं मला जपलं. त्यावरुन सासूबाईंची धुसफूस मला मागून सहन करावी लागायची.

सासूबाई म्हणायच्या,”जगात काय याच्याच बायकोला पहिलंवहिलं मुल होणारै? आम्हाला मुलं झाली नाहीत का? एक ना दोन पण राजनचं आईच्या भुणभुणीकडे लक्षच नसायचं. तो स्वतः जातीने मला दूध गरम करुन आणायचा. प्यायला लावायचा. घरी स्वत: काजू,बदाम,पिस्ते,विलायची कुटून तयार केलेला दुधाचा मसाला तो नेहमी माझ्या मगात मिसळे.

माझं बाळंतपण सुरळीत पार पडेल की नाही याची माझ्यापेक्षा त्यालाच जास्त काळजी होती. सासूबाई नुसत्या बोटं मोडायच्या. हे असे अतिलाड करणं, बाहेर जोडीने फिरायला गेलं की माझ्या किंचीत पुढे सरलेल्या कंबरेला त्याच्या दणकट दंडाने वेढून चालणं त्यांना आवडत नसायचं. त्यांना कसं कळायचं? अहो, ही निनावे मंडळी या आळीत गेली चाळीस वर्ष राहिलेली. सगळ्यांच्या परिचयाची शिवाय सासूबाईंचा स्वभाव बोलका त्यामुळे त्यांच्या ओळखी अंमळ जास्तीच.

संध्याकाळी त्या आल्या त्या धुसफुसत, स्वैंपाकघरातली भांडीही दीन झाली. त्यांचे पार्श्वभाग आपटून आपटून दुखू लागले. सासऱ्यांनी बाहेरुनच अगदी मवाळ सुरांत म्हंटलं,”जरा सबुरीने. उशिरा जेवायला मिळालं तरी हरकत नाही.”

यावर सासूबाई त्यांच्या वस्सकन अंगावर आल्या. गल्लीत सगळी लोकं खिदळताहेत लेकाच्या वागण्यावरुन नि तुम्ही भले मलाच सबुरीने घे सांगताय. जगात का कोणाला बायका नाहीत? का त्या पोटुशी रहात नाहीत?याचीच काय ती पद्मिनी. बरं पद्मिनी तर पद्मिनी घरी पावलं दाबतोस तेवढी पुरे. बाहेर आणि कशाला रंग उधळायचे!”

“काय एवढं केलं तरी काय त्याने? त्या जुहू बीचवर नैतर त्या हँगिंग गार्डनला न्यायला हवी तुला. कायकाय चाळे चालतात तिथे.” सासरे हसतहसत म्हणाले.

लाटणं घेऊन तरातरा बाहेर येत त्या म्हणाल्या,”तिथे अनोळखी लोकांत मुके घेत बसत असतील..ना लाजा न काजा. हरि हरि.पण मी निक्षून सांगते..निनावेंची या परिसरात एक पत आहे..असले थिल्लर चाळे चालणार नाहीत.” अर्थात हे सगळं राजनच्या अपरोक्ष. राजनच्या समोर नुसतंच धुमसणं.

श्रावणीचा जन्म होताना माझं बरंच ब्लिडींग झालं. डॉक्टरांनी दोघातली एक वाचेल म्हणून सांगितलं तेंव्हा मात्र त्याने माझ्या बायकोला वाचवा अशी गळ घातली होती.

पाषाणासारख्या कठोर वाटणाऱ्या सासूबाई मला ओटीमधे न्हेताना स्ट्रेचरला धरुन माझ्या गालांवरनं हात फिरवत पटापटा माझे मुके घेत होत्या,”खूप बोलले गं राणी तुला. कधी तोंडातनं ब्र काढला नाहीस. उलट बोलली नाहीस. सगळं हसण्यावारी न्हेत राहिलीस. वाट बघतेय तुझी बाहेर. तू नक्की येणारैस. आता कधीकधी नाही बोलायची मी माझ्या बाळीला.” त्यांच्या गालांवरुन सरसर वहाणारी ती आसवं पुसण्यासाठी मी उठायचा प्रयत्न केला पण जमेना मला.

भुलीचं इंजेक्शन मणक्यात दिल्यानंतर मी खरंच झोपी गेले. माझा डोळा उघडला तेंव्हा डॉक्टर बाजूला उभे होते. राजन त्याच्या गुलाबी बेटीला खेळवत होता नि सासूबाई माझ्या केसांवरनं हात फिरवत होत्या. मी शुद्धीवर आलेली पाहून त्यांनी पटापटा माझे मुके घेतले. माझी नयन ती म्हणत माझी अलाबला काढली.

गावावरनं माझी आई आली. आई, सासूबाई दोघी तैनातीला असतानाही राजनचा कुणावर विश्वास नव्हता. बेटीने रात्रीचं जरा कुंssकुं केलं की माझ्याआधी हा उठून तयार. तिचं ओलं दुपटं बदलायचा परत सुती दुपट्यात गुंडाळून माझ्या मांडीवर ठेवायचा. दूध काय ते त्याला देता येत नव्हतं म्हणून नाहीतर तेही केलं असतं त्याने.

श्रावणी झाल्यानंतर दोन वर्ष अगदी अगदी सुखात गेली. सासूबाई फारच मवाळ झाल्या होत्या कारण राजन पहिल्यासारखा माझ्याभोवती पिंगा घालत नसायचा तर श्रावूला घेऊन फिरवायचा,तिच्याशी लाडे लाडे बोलायचा. मी जरा डोळे मोठे केले की श्रावू खालचा ओठ बाहेर काढून डोळ्यांत पाणी आणायची.

श्रावूच्या शाळेच्या पहिल्या दिवशी मला खरंच भरुन आलं होतं पण माझ्याहीपेक्षा हळवा झाला होता तो राजन. मीच मग त्याला समजावत राहिले होते. श्रावू एकदिड महिन्यात शाळेत रुळली. नुसती रुळलीच नाही तर तक्रारीही आणू लागली. पक्की वांड झाली होती. कोणी तिच्या मनाविरुद्ध वागलं तर अस्सा चिमटा काढायची. एकदा तर बाईंनाच चिमटा काढला. मग मात्र चांगलेच फटके दिले होते मी तिला. मी श्रावूला मारु लागली की राजनला त्रास व्हायचा पण तो कधी आमच्या दोघींमधे दोघीतल्या एकीची बाजू घ्यायला येत नसायचा. गुपचुप हात चोळत बसायचा.

त्यादिवशी सकाळपासनंच मुसळधार पाऊस होता. मी श्रावणीला शाळेत पाठवलं नव्हतं नं राजन, मी अर्जंट आहेत ती कामं हातावेगळी करुन येतो असं सांगून बाईक घेऊन बाहेर पडला. थोड्याच वेळात आभाळ अधिकच अंधारुन आलं. काळ्या ढगांनी आच्छादून गेलं. ढोलताशा वाजवावा तसे ढग एकमेकांवर आदळू लागले. सुसाट्याचा वारा सुटला. जमिनीवरली पानं इकडेतिकडे गोलगोल फेर धरु लागली. धुळीचं साम्राज्य पसरलं.

माझ्या नि सासूबाईंच्या जीवाची नुसती घालमेल..आतबाहेर, आतबाहेर करुन पावलं वळू लागली. दुपार झाली तरी चुलीत आग घालावीशी इच्छा नव्हती नि बातमी अंगणात आली..चारेक जुनीजाणती माणसं पावळीला येऊन बसली. दबक्या आवाजात बोलू लागली. खाकरुन एकाने साद घातली. सासऱ्यांना बसतं करत ती वाईट बातमी सांगितली. पाण्याच्या झोतासंगे राजनची बाइक नाल्यात वाहून गेली होती. नाल्याचं ते लालतांबडं पाणी माझ्या डोळ्यासमोर आलं. त्यात ती बाईक,माझा राजन..मी आक्रोश केला. माझ्या सासूबाईना फिट आली होती. त्यांना दोनचार बाया कांदे लावत होत्या.

एकेक दिवस युगासारखा जात होता. प्रत्येकजण येऊन सहानुभूती दर्शवून जात होता. सासूबाई माझ्यासाठी सावरल्या. मला नवऱ्यावरनं बोलणाऱ्या त्या आतून मात्र फारच हळव्या. माझे मुके काय घ्यायच्या. मला बळे बळे खिमटीभात खाऊ घालायच्या.

सहाएक महिने झाले नि दु:ख बोथट होऊ लागलं..म्हणजे ते होतच गाठीला बांधलेलं पण त्याची धार कमी झाली एवढंच काय ते.
मी स्वतःला कामात गुरफटून घेतलं. सासूबाईंना माझी अवस्था पहावत नव्हती. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा जीवलग,तिच्या पोटचा गोळा असा क्षणार्धात काळाने ओढून न्हेला होता. श्रावणी हळूहळू बाबाच्या नसण्याला सरावली. लहान मुलं पटकन विसरतात खरं.

सासूबाईंची मावस बहीण आपल्या नातवाला घेऊन आली होती. त्याच्या आईला आमच्या जवळच्या इस्पितळात एडमिट केलं होतं. बिचारीला कसलासा पोटाचा आजार होता.

अविनाश निनावे..हाच तो सासूबाईंच्या मावस बहिणीचा मुलगा. अगदी अगदी राजनला लपवावा नि याला त्याच्या जागी उभा करावा असा. तशीच धिप्पाड छाती,उभट कपाळ, धारदार नाक, तेजस्वी डोळे, बोलण्याचालण्याची ढबही थोडीफार सारखीच.

खरंतर अविनाशने बायकोची आशा सोडली होती. सलग दोन वर्ष अंथरुणाला खिळलेल्या त्या जीवाला तो कंटाळला होता. तिचं माहेरचं कुणी नव्हतं..जे मोजके होते ते आपणहून लांब झाले होते. शेवटची आशा म्हणून एक शस्त्रक्रिया करायची डॉक्टर सांगत होते. पाचेक लाख खर्च येणार होता. आतापावेतो दोन लहान शस्त्रक्रिया झाल्याच होत्या. त्यांचा काहीच रिझल्ट नव्हता.

कदाचित त्या म्रत्युशय्येला चिकटलेल्या जीवालाही कळत असावं काहीतरी..त्याने पैसै गोळा करण्याची वेळच येऊ दिली नव्हती. त्याआधीच कार्यक्रम आटोपला होता.

नंदन पाचवीत होता. त्याची उन्हाळी सुट्टी म्हणून मी त्याला माझ्याकडेच ठेवून घेतला. आईविना पोर ते. मला फार कळवळा यायचा त्याचा. नंदन नि श्रावणीची छान दोस्ती जमली.

जून महिना सरायच्या आत दोघी बहिणीबहिणींनी आपापसात बोलणी करुन अविनाशशी माझं लग्न ठरवलं. मी नाहीच म्हणत होते पण सासूबाई काकुळतीने म्हणाल्या,”पोरीला बाप हवा गं नयन. नाही नको म्हणूस..निदान माझ्यासाठी.” सासूबाईंचा शब्द मोडू नाही शकले. .नि अविनाश निनावेची धर्मपत्नी झाले.

या नव्या सासूबाईही स्वभावाने फार मायाळू होत्या. पहिल्या सुनेच्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे झरझर झरू लागायचे. नंदन मला आई म्हणू लागला. श्रावणीचं इकडच्या शाळेत एडमिशन घेतलं.

सख्खी बहीणभावंडं जशी दोघंजणं शाळेत जाऊयेऊ लागली. नंदनदाशिवाय श्रावूचं पानही हलत नव्हतं. मी पुरेपूर पत्नीसुख अविनाशला देत होते. आलंगेलं बघत होते. घर सांभाळत होते. नंदन मागेल ते त्याला खाऊ घालत होते पण पण अविनाश..अविनाश माझ्या श्रावणीशी अलिप्त वागे. ती मारे बाबा बाबा करत त्याच्याशी लगट करु पहायची पण तो बेमालूमपणे तिला बगल देऊन तिथूनं छू होत असे.त्याने कधीही तिचा भरवण्याचा हट्ट पुरा केला नाही.

नंदनचे मात्र फार लाड करायचा तो. माझी स्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली होती. मी असताना माझ्या श्रावूला पोरक्यासारखी वागणूक मिळत होती. कधी कधी तिच्या मांडीला चिमटेही दिसत. खुणांना पहाताच माझ्या लक्षात येई हे अविनाशचं काम. एकदा तर ते नख बादलं..पस झाला. इंजेक्शन्स, गोळ्या, सतरा भानगडी. मग मात्र मी तोंड उघडलं, विचारलं त्याला,”एखादी विनापाश बघायची होतीस. माझ्या पोरीला का छळतोयस असा.”

“यावर त्याचं म्हणणं होतं,”ती बारासाडेबारापर्यंत निजत नाही. तू जवळ असताना मला उपाशी रहावं लागतं म्हणून मग..”

“म्हणून तू किमचे काढशील..असा फांजाळशील तिला!”

“हे बघ नयन. मला माझं अपत्य आहे. मी पत्नीसुखाला पारखा झालो होतो, जे तुझ्या रुपात मिळतय म्हणून मी आपल्या लग्नाला होकार दिला. अर्थात, तुझी श्रावणी इथे बिनधास्त राहू शकते पण माझ्या ह्रदयात नाही.”

त्या रात्री मी राजनच्या आठवणीत रात्रभर रडले होते. मीही केलंय ते सावरायचं म्हणून संसार करत होते पण नंदन मात्र माझा जीव की प्राण बनला होता. अविनाशने श्रावणीला दूर लोटलं म्हणून मी त्याचा राग नंदनवर मुळीच काढणार नव्हते. दोन्ही मुलांना मी मायेच्या पदराखाली वाढवत होते.

अविनाशचं बाहेरचं खाणंपिणं वाढलं होतं. माझ्यातला इंटरेस्ट संपत चालला होता त्याचा.त्याने मुळी माझ्यावर प्रेम केलंच नव्हतं. पहिलीवर तरी केलं होतं का त्याचं तोच जाणे पण मी तरी त्याच्या तोंडून कधी पहिलीची आठवण ऐकली नव्हती. तिच्या वियोगाने तो व्याकूळ झालेला पाहिला नव्हता कधी. लग्न म्हणजे फक्त शारिरीक व्यवहार असावा त्याच्या मते. त्याच्यासारख्या माणसाला मनाने एखाद्यावर प्रेम करणं जमलंच नसतं.

पण हल्ली एक बदल होताना दिसत होता अविनाशमधे. पुर्वी येताजाता श्रावणीवर खेकसणारा,संधी मिळताच तिला बोचकारणारा तो श्रावणी वयात येत होती तसतसा तिच्याशी गोड बोलू लागला होता. ती मागेल ते ड्रेसेस तिला घेऊन देत होता. श्रावणीही अविनाशशी अधिक मोकळेपणाने बोलू लागली होती. अगदी लांडे,फाटके कपडे घालू नको म्हणून माझी तिला तंबी असतानाही अविनाश ते आणून देतो म्हणून तो तिला अधिक जवळचा वाटत होता.

मला हे सारं थोडंबहुत सुखावणारं होतं पण नंदन ..नंदन आजकाल फारच वैतागलेला ,चिडलेला दिसायचा. बरोबर जेवतही नव्हता. विचारलं तर त्याला नीटसं सांगताही येत नव्हतं.

सासूबाई जाऊन दोन वर्ष उलटली होती. घरात मीच असायचे. दुपारी श्रावणी कॉलेजमधनं यायची.

एकदा माझ्या आधीच्या सासूबाईंना बरं नव्हतं म्हणून त्यांना बघायला गेले होते.तशा बऱ्या होत्या पण एकटं एकटं वाटायचं त्यांना. मी त्यांच्या आवडीची शिरापुरी करुन दोघांना खाऊ घातली. त्यांच्या औषधगोळ्यांविषयी डॉक्टरांशी बोलले. सासूसासऱ्यांना नमस्कार केला. त्यांनी परत येताना नंदन व श्रावणी दोघांना घेऊन ये, बघावसं वाटतय असं सांगितलं. मीही हळवी झाले. भरलेल्या कंठाने त्यांना हो म्हणाले नि निघाले.

घरी पोहोचायला साडेचार वाजले. घरातून कसलेसे आवाज येत होते. बेल दाबली तर कुणी दार उघडेना. दार लोटलेलंच होतं. मी ढकललं फक्त. बघते तर अविनाश एका कोपऱ्यात पाय दुमडून भेदरलेला..नंदन त्याला झोडझोड झोडत होता. टेनिसचं रेकेट, खराटा काय मिळेल त्याने हाणत होता.

मी..मी अंगावर धावून गेले नंदनच्या. त्याच्या हातात आता पट्टा होता चामड्याचा. मी तो काढून घेतला नि त्याच्यावर हात उगारणार इतक्यात आतून रडण्याचा आवाज. हो माझी श्रावूच रडत होती. तिचा फाटका टॉप, अनाव्रुत्त उरोज मला पहावेना.

“आई गं तो बाप नव्हे..माणसाच्या रुपातला हैवान..गोड बोलून अंगलटीला आला. माझा टॉप क्षणार्धात फेडला त्याने पण तितक्यात नंदनदा कसा देवासारखा आई माझा नंदनदा माझा भाऊ माझा देव..आई त्याला नको गं मारुस.” मी तिला दुसरा टॉप घालायला दिला. तिची पुस्तकं बेगेत कोंबली. इकडच्या सासूबाईंचा फोटो सोबत घेतला फक्त. नंदनला म्हंटलं..चल नंदन जाऊ आपण इथून दूर कुठेतरी. जाताना त्या हिंस्त्र प्राण्यावर पचकन थुंकून उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवलं.

परत आले मी राजनच्या घरी गरजेपुरतं वडिलधाऱ्यांनी जोडून दिलेलं ठिगळ उसवून पण येताना त्यातलं रेशम मात्र घेऊन आले. माझा नंदन,माझी श्रावू दोघांना दारात पाहून माझ्या सासूबाईंना कोण आनंद झाला. सासरेही आरामखुर्चीवरुन उठले नि या या म्हणू लागले.

आता सुखाने नांदतेय मी राजनच्या छताखाली. तिकडच्या सासूबाईंचा फोटो इकडच्या सासूबाईंनी पदराने पुसून भिंतीवर लटकवला आहे. आयुष्याची गणितं सरळसोप्पी नाहीत तरी उमेद नं हारता प्रत्येक टक्क्याटोणप्यातून काहीतरी शिकून माझ्या मायेच्या माणसांच्या आधाराने पुन्हा उभी रहातेय, नदीकाठच्या लव्हाळीसारखी.

(समाप्त)

©️®️सौ.गीता गजानन गरुड.

================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *