Ritbhatmarathi

Search
Close this search box.

लग्नयोग भाग दुसरा(अंतिम भाग)

मामा म्हणाला,”अनन्याचं लग्न ठरल्यात जमा आहे. दोघं कशी गुलुगुलू बोलत होती.”
“तुझं आपलं काहीतरीच हं मामा,”अनन्या लाजून म्हणाली. सदुभाऊ आत येत म्हणाले,”आजचा दिवस खरंच चांगला आहे. अनन्याचं लग्न ठरल्यात जमा आहे. आशुला नोकरी लागली. सगळं कसं मनासारखं होतंय.
अनन्या खरंच सागरमधे हरवून गेली होती. स्वप्नातसुद्धा तिला सागर दिसू लागला होता.

चार दिवस होऊन गेले तशी सागरची आई म्हणाली,”सागर,तुझा होकार कळवायचा ना. अरे,ती मंडळी वाट पहात असतील. अशा बाबतींत उशीर करु नये.”

सागर आईजवळ बसत म्हणाला,”होकार आहेच माझा पण..”

“पण काय..हे बघ सागर देवाच्या दयेने आपल्याकडे सारं काही आहे. जे नसेल ते आपण मिळवू. मित्रांच्या नादी लागून एखादी मागणी नको ठेवूस.”

“तसं नाही गं आई. मला म्हणजे माझं म्हणजे मी..कसं सांगू तुला..”

“सागर,अरे असा चाचरतोयस कशाला. स्पष्ट काय ते बोल बघू.” सागरच्या आईने सागरला दटावलं.

“आई गं,मला आधी अनन्या खरंच आवडली होती. पण, ती तिची बहीण..आश्विनी..त्या आश्विनीला पाहिलं नि मन म्हणालं..सागर हीच तुझी चॉइस..बास आई अजून काही नको विचारुस आता. आश्विनीचा गोल चेहरा,तिचे ते घारे डोळे,पिंगट केस..तीच दिसतेय सारखी डोळ्यासमोर मला. म्हणून, गप्प होतो मी.”

“असा प्रॉब्लेम आहे तर. तू नको काळजी करुस. तुझ्या मनासारखंच होईल बघ. तुला आश्विनी पसंत पडलेय नं मग आपण तसं कळवू त्यांना.”

“पण आई मी आश्विनीशी लग्न केलं तर अनन्याची प्रतारणा केल्यासारखं,तिच्यावर अन्याय केलासारखं होईल.” सागर चिंतीत स्वरात म्हणाला.

“सागर,अरे चांगली सुशिक्षित, सुसंस्कारी माणसं आहेत ती. आपलं म्हणणं ती नक्कीच समजून घेतील..आणि रहाता राहिला अनन्याचा विषय..तिच्यासाठी मी स्थळ शोधायला सुरुवात करते. तिचं लग्न लागलं की तुझ्या मनातली अनाठायी बोचही नाहिशी होईल.”

“आई गं,किती चांगली आहेस तू,” म्हणत सागरने आईचे दोन्ही हात धरुन तिला गोल फिरवलं. तितक्यात अनन्याचा मामा तिथे गेला. मायलेकांचं न्रुत्य पहात तो दारातच उभा राहिला. “किती चांगल्या घरात पडणार आहे अनन्या!”तो मनाशीच म्हणाला. थोड्याच वेळात अनन्याचे मामा आल्याचं त्यांच्या लक्षात आलं तशी सागरची आई किचनमधे गेली. तिने त्यांना पाणी आणून दिलं.

“गोड बातमी ऐकायला कान आतुर झालैत वहिनी,” अनन्याचा मामा म्हणाला..”मग होकार समजायचा नं”
चहाचा कप त्यांच्या हाती देत सागरची आई म्हणाली,”हो होकारच कळवायचा आहे पण अनन्याबाबत नव्हे तर आश्विनीबाबत.

“हे कसं शक्य आहे!” मामा चिंतीत स्वरात म्हणाला.

“अहो,भाऊ समजून घ्या. सागरच्या मनात आश्विनीच भरलेय.” मामाने कसाबसा चहा नरड्याखाली ढोसला व ढुंगणाला पाय लावून मालतीताईच्या घरी पळाला.

आज मामा काहीतरी सकारात्मक बातमी घेऊन आला असणार..असं अनन्याला वाटलं..नव्हे तिची पक्की खात्री होती. सगळ्यांचे कान त्याचं बोलणं ऐकायला आतुर झाले होते. त्याच्या तोंडून ब्र ही निघेना तशी मालतीताई पुढे झाली..”काय असेल ते स्पष्ट सांग भाऊ,”असं ती म्हणाली.

“पाहुण्यांडून होकार आलाय पण..”

“पण काय..अरे बोल ना..का उगा जीव टांगणीला लावतोस!”

“पाहुण्यांनी आपल्या आशुला पसंत केलंय. सागरला आशु आवडलेय..अनन्या नव्हे.”

हे ऐकताच अनन्या शेजखोलीत पळाली. उशीत डोकं खुपसून ती खूप खूप रडली. चारेक तास ती आतल्या खोलीतच होती. शेवटी मन खंबीर करत तिने डोळे पुसले. जे सुख आपल्या नशिबात नाही ते आपल्या बहिणीला तरी मिळतय. तिचं तरी वेळेत लग्न होईल, असं मनाला समजावत तिने खोलीचं दार उघडलं.

तिन्हीसांज झाली होती. देव्हाऱ्यात सांजवात तेवत होती. तोंड धुवून अनन्या देवाच्या पाया पडली. तिने ज्योतीकडे पाहिलं. त्या तेवणाऱ्या स्थिर ज्योतीप्रमाणेच तिचं मनही आता स्थिर झालं होतं.

आई तिला समजवण्यासाठी पुढे आली. तिने डोळ्यांनीच आईला सांगितलं,”आई,मी सावरलेय. तू नको काळजी करुस.” खरंच परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते.
इकडे खालच्या वरच्या मजल्यांवर बातमी पोहोचली की अनन्याला पहायला म्हणून आलेल्या मुलाने आश्विनीला पसंत केलं.

आश्विनीला जातायेता काहीजणी विचारु लागल्या,”तू खरंच करणार का त्या मुलाशी लग्न पण मग तुझ्या ताईला कसं वाटेल नं.” खरंच, हे असं घडेल हे आश्विनीला वाटलंच नव्हतं. आश्विनी पेचात सापडली होती. तसा सागरचा फोटो तिने पाहिला होता आणि जिजू म्हणून तो तिला आवडला होता पण फासे उलटे पडले होते. आशु अगदी गप्प गप्प झाली होती.

“आशु,अगं बोल नं काहीतरी. काय सांगू त्या पाहुणेमंडळींना? कळवू नं तुझा होकार. अगं नवऱ्यामुलात नाव ठेवायला कणभरही जागा नाही. तुला पसंत केलंय त्याने. आशु मी तुझ्याशी बोलतेय..” आश्विनीची शून्य प्रतिक्रिया पाहून मालती डाफरली तसं आशुने तोंड उघडले.

“आई गं पण ताई..अनुताईच काय!”

“देवाच्या मनात कधी असेल तेंव्हा माझं लग्न होईल आशु किंवा मी दादाआईंचा मुलगा बनून राहीन त्यांच्यासोबत पण तू या स्थळाला माझ्यामुळे नकार दिलास तर मला खूप वाईट वाटेल आशु.” आपल्या ताईचं बोलणं ऐकून आशुने तिला गच्च मिठी मारली. थोरल्या लेकीचा समंजसपणा पाहून सदुभाऊंचे डोळे भरुन आले.

आशुचं लग्न थाटामाटात झालं. वरपक्षाने उगाच सदुभाऊंना तोट्यात पाडलं नाही. मंडळी खरंच सज्जन होती. आशु सासरी जाऊन जुनी झाली. सासूबाई आशूवर फार माया करायच्या. त्यांना मुलगी नसल्याने आशुलाच त्या त्यांची मुलगी मानू लागल्या.

सदुभाऊंनी आपल्या ऐपतीप्रमाणे जावयाचा व व्याह्यांचा मानपान केला होता. नाही म्हंटलं तरी थोडी तंगी आली होती पण अनन्याने त्यांची चिंता वेळीच ओळखली. अनन्या नोकरी करत असली तरी आशुच्या लग्नात सदुभाऊंनी अनन्याच्या सेविंगला हात लावला नव्हता. अनन्याने मात्र आता ओव्हरटाईम करायला सुरुवात केली होती.

सदुभाऊंच्या अनुपस्थितीत ती आईला घरखर्चासाठी,वाणसामानासाठी पैसे द्यायची व सदुभाऊंशी याबाबत काही बोलू नकोस म्हणून सांगायची. सदुभाऊ घरखर्चासाठी जे पैसे देत त्याची अनन्याने पोस्टात आरडी काढली होती.

इरावती दहावीची परीक्षा पास झाली. छान गुण मिळाले. अनन्याने चांगले किलोभर पेढे आणले. इरा चिनूला सोबत घेऊन सगळ्या रहिवाशांना पेढे वाटून आली. अनन्याने इरासाठी दोन चुडीदार आणले. आशुही नवऱ्याला सोबत घेऊन इराचं अभिनंदन करायला आली.

छोले,पुरी,गुलाबजामचा बेत होता. रात्री छान गप्पा रंगल्या. सागर शेजघरात निजायला गेला तशी पाठोपाठ आशुही गेली. अनन्याला किती बोलायचं होतं तिच्याशी! लग्नानंतर दोनेक महिन्यांतच आशुच्या तब्येतीत बराच फरक पडला होता. लग्न तिला मानवलं होतं. लहान बाळ बाळसं घेतं तसं तिच्या शरीराने बाळसं घेतलं होतं.

रात्र झाली तशी सारी झोपली. शेजघरातून मात्र मंद हसण्याचा,लाडीक बोलण्याचा आवाज येत होता.

अनन्याची झोप चाळवली. ती किचनमधे पाणी पिण्यासाठी गेली तेंव्हा तिला आशु व सागरचं लाडीक बोलणं स्पष्ट ऐकू आलं.

आशुच्या चुड्याची किणकिण, खाटीचा आवाज..अनन्याला कसंतरीच झालं. ती लगबगीने बाहेरच्या खोलीत गेली. तिच्या अंगावर काटा आला होता. तिचा ऊर धपापत होता.

आपलाही सागरसारखा सखा असावा नि त्याच्यासोबत रात्र जागवावी असे विचार तिच्या मनात फिरुन फिरुन येऊ लागले. रात्रभर ती तळमळत होती.

मालतीला लेकीची तगमग कळत होती पण ती तरी बिचारी काय करणार! सकाळी अनन्या ऑफिसात जायला तयार व्हायचं म्हणून शेजघराजवळ गेली तर दरवाजा आतून बंद होता. तिने हळूहळू दार ठोकवलं पण काहीच उत्तर येईना, तेवढ्यात कोथिंबीर आणायला गेलेली मालती आत आली.

“अनन्या,अगं लक्ष कुठे असतं तुझं. ते बघ शोकेसच्या कप्प्यात तुझे कपडे काढून ठेवले आहेत.” अनन्या ड्रेस घ्यायला वळली.

“अगं आई, माझी जरनल राहिलीय. मला पुर्ण करायचीय. सबमिशन आहे माझं,” इरावतीचं हातपाय आपटणं सुरु झालं.

“एवढीच गरजेची होती तर काल का नाही बाहेर घेऊन ठेवलीस. पाहुणामाणूस आलाय घरात. उगाच तमाशा नको. इरा तुला ठाऊक नाही..नवरा बरा तर बरा नाहीतर..”

“नाहीतर काय गं..” इराने विचारलं.

“अगं,सासरवाडीला जरा काही कमीजास्त झालं तर बायकोला मागाहून दहादा ऐकवतील.” मालती म्हणाली.

इतक्यात दार उघडून आशु बाहेर आली. तिच्या
सिल्कच्या गाऊनकडे, सुटलेल्या वेणीकडे अनन्याचं लक्ष गेलं. पारोशा आशुच्या देहातील रसरशीतपणा,चेहऱ्यावरचं समाधान,त्रुप्तता बरंच काही सांगून गेलं.

“अशी काय बघतैस माझ्याकडे अनुताई,” आशुने हसतहसत विचारलं तसं एखाद्या नवख्या चोराची चोरी पकडली जावी आणि तो घाबरावा तशी ती चपापली.

“ए आशुदी,मी जाऊना आत. माझी जरनल राहिलीय गं.”

“थांब बाई, आधी पांघरुण घालते सागरच्या अंगावर. कसाही झोपतो आडवातिडवा.”  असं म्हणत आशु लगबगीने आत गेली. रात्री कधी दोनच्या नंतर झोपलेल्या सागरच्या चेहऱ्याकडे पहाताना ती स्वत:शीच हसली. पायाखालची रजई तिने त्याच्या अंगावर पांघरली व इराला म्हणाली,”इरा,घे बाई तुझी जरनल.”

“आशु निघते गं मी,” अनन्याने बाहेरुनच आवाज दिला.

बसमधे तिला विंडोसीट मिळाली. वाऱ्यामुळे केस भुरुभुरु उडत होते.

ती मात्र आपल्याच विचारांत होती..’लग्नानंतर किती बदललेय नं आशु.

कॉटनचाच गाऊन हवा असायचा तिला. रंगही गुलाबी,आकाशी असे फिके. नि आजचा तो तिचा सिल्कचा गाऊन..

तिच्या देहाचा रेखीवपणा अधिकच सुस्पष्ट करणारा,अंगाला बिलगलेला..चेहऱ्यावरचा टवटवीतपणा..

मी इर्षा करतेय का तिची?

छे! आशुला हे सुख मिळतय त्याचा मला खूप आनंद आहे पण तरी रुखरुख आहेच मनाला..माझ्याच नशिबात का नाही हे.सुख!”

“ओ मिस थोडं सरकता का?”

आवाज येताच अनन्या भानावर आली. अगदी सहा फुट उंचीचा, किंचीत सावळा तरुण किंचीत हसून तिच्याशी बोलत होता. त्याच्या दाट मिशीतून त्याचे दात चकाकत होते.

अनन्याने ओढणी सावरुन घेतली न् सरकली पण तिचं मन मात्र त्याच्या मिशीत गुंतलं त्याचबरोबर त्याच्या सभोवताली दरवळत असलेला तो कुठलासा उन्मादक सेंट..अनन्याने निग्रहाने खिडकीकडे मान वळवली.

“मिस, त्याचं काय आहे की मी या भागात नवीन आहे. मला जरा समाजकल्याण ऑफिसचा स्टॉप आला की सांगता का?”

“हो ना का नाही.” अनन्या कशीबशी बोलली..पुन्हा मिशीतून त्याचे दात लकाकले.

समोरच्या सीटच्या हँडलवर तो बोटांनी तबला वाजवत होता..कसलंस गाणं गुणगुणत होता.

क्याडबरी कंपनी..कंडक्टरने बेल वाजवली तसे काही प्रवासी उतरले..एकदोन वर चढले.

पुढचा स्टॉप तुमचा. अनन्या म्हणताच तो माणूस उभा राहिला.

“चला पुढे सरका..पुढे..”कंडक्टर ओरडताच तो पुढे सरकला. अनन्याही त्याच्या पाठोपाठ जाऊन उभी राहिली.

खाली उतरताच  तो म्हणाला,”अहो, इथून पुढे कसं जायचं..खरंच ठाऊक नाही मला कसं पुढे जायचं ते.”

अनन्या म्हणाली,”चला, मी तिकडेच चाललेय. आय मिन तिथेच ऑफीस आहे माझं.”

दोघं लिफ्टमधून वरती गेले. अनन्या तिसऱ्या मजला येताच बाहेर पडली. त्याने मिशीत हसून थँक्यू म्हंटलं..त्याचं ऑफिस चौथ्यामजल्यावर..समाजकल्याण विभाग. नुकताच बदली होऊन आलेला इथे.

मुंबईतल्या या चकाचौंद दुनियेत इतकी सालस मुलीही असते..तो स्वत:शीच हसत म्हणाला. आईला पसंत पडेल अशीच आहे पण एवढी नोकरी करणारी..आधीच सेटींग झाली असेल.

अनन्या तिच्या कामात गढून गेली. आता रोज जातायेता तिचीत्याची भेट होऊ लागली.

त्याचं ते ठेवणीतलं मिशीतलं हसू, तिला आवडू लागलं..

पण ती विचार करायची,”यांच तर लग्न झालंसुद्धा असेल. सगळ्यांच नशीब माझ्यासारखं थोडीच असतं.”

मधे आठवडा गेला..

अनन्याला तो मिशीवाला हसरा चेहरा दिसलाच नाही. ती अस्वस्थ झाली.

बरं नसेल का त्यांना?

तू पण काय अनन्या, नावही विचारलं नाहीस त्यांचं.

रात्री तिने विचार केला..पक्कच केलं की तिसऱ्या मजल्यावरच्या ऑफिसमधल्या युगंधरा केणीला विचारायचंच.

मधल्या ब्रेकमधे तिला युगंधरा कँटीनमधे दिसली..दोघींचं तोंड भरुन हाय हेलो झालं..मग अनन्याने पाटी सरकवली..”अगं तुमच्या ऑफिसात नवीनच आलेत ते..”

“कोण गं..”

“अगं ते गं ते मिशीवाले..”

“युगंधरेला हसूच फुटलं.”

“हसतेस काय अशी. ते नै का मिशीतल्या मिशीत हसतात..”

“अच्छा..अमोल..अमोल सातपुते नाव त्यांचं.”

“दिसले नाहीत गं हल्ली..”

“त्यांना ताप आलाय..असं ऐकलं..तुला गं कशाला चौकशी..”

“युगा, प्लीज एड्रेस देशील त्यांचा..”

“अगं पण कशाला? ते ना तुझ्या ऑफिसातले ना नात्यागोत्याचे..एकदम पत्ता वगैरे.”

“माणुसकी..माणुसकीखातीर मला आपलं वाटतय भेटून यावं एकदा.”

“बरं बरं देते..चालू राहू दे तुझी माणुसकी.” असं म्हणत तिने अनन्याला पत्ता शेअर केला.

रविवारी सकाळीच अनन्या  निघाली..आईला सांगितलं..मैत्रीण आजारी आहे. तिच्यासाठी घेऊन जाते.

करीरोडला स्टेशनला लागूनच जुन्या बिल्डींगमधे दुसऱ्या मजल्यावर त्याची खोली होती..म्हणजे सध्या तरी भाड्याने रहात होता.

अनन्या गेली तेव्हा दार उघडच होतं..अमोलची आई तांदूळ पाखडत होती. एका खाटीवर पांघरुण घेऊन कोणतरी झोपलं होतं..अनन्याने कयास केला..अमोलच असावा.

“कोण पायजे बाय तुला?”

“अमोल सातपुते इथेच रहातात ना. त्यांना बरं नाहीसं कळलं म्हणून..”

“ये गं..आत ये..हा बघ माझा अम्या..अंगात ताप कितीय बघ पण डॉक्टरकडे जायला मागत नाही. मीच औषधं आणून आणून देते. एवढा घोडा झाला तरी इंजेक्शनला घाबरतो.”

“अनन्याला हसूच आलं..चला आपण घेऊनच जाऊ यांना दवाखान्यात.” असं म्हणत तिने अमोलच्या डोक्यावरचं पांघरुण काढलं व त्याच्या कपाळाला हात लावला..अंग चांगलच तापलं होतं.

अनन्या म्हणाली,”आई, तुम्ही डॉक्टरांचा पत्ता द्या. मी बोलवून आणते.”

थोड्याच वेळात अनन्या डॉक्टरांना घेऊन आली.

“डॉ. सुई ..सुई नको,” करणाऱ्या अमोलच्या दंडावर डॉक्टरांनी गोडगोड बोलत सुई टोचली.

त्यानंतर अमोल सातपुते बरे होईस्तोवर अनन्या नियमित त्यांच्याकडे जाऊ लागली.

असंच एकदा अनन्या गेली असता..अमोल बाहेर गेले होते. ती अमोलच्या आईशी बोलत बसली.

अमोलची आई म्हणाली,”पुढच्या दोन बहिणींची जबाबदारी होती याच्यावर. ती पार पाडेपर्यंत याचं लग्नाचं वय निसटून गेलं. सूनमुख पहायचं भाग्य नाही माझं म्हातारीचं.”

“असं का म्हणता आई..माझ्यासारखी एखादी आवडेल का तुम्हाला?”

अमोलच्या आईने अनन्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं..नि बरंच काही ओळखलं..

“उद्याच येते, सांग तुझ्या वडिलांना. मुलगी बघण्यासाठी नव्हे..ठराव करण्यासाठी.”

“आई पण अमोल..त्यांना पण मी पसंत पडायला हवी ना.”

नुकताच दारात पाऊल ठेवत असलेला अमोल, अनन्याकडे बघत मिशीतल्या मिशीत हसला.

“फक्त नारळ न् मुलगी द्या आम्हाला..दागिने वगैरे आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे घालू तिला..तुम्ही त्यासाठी कर्ज वगैरे काढायच्या भानगडीत पडू नका,” अमोलच्या आईने निक्षून सांगितलं.

अनन्याची आई तिच्या गालावर हात फिरवत म्हणाली,”अनन्या,उशिरा का होईनात. देवमाणसं भेटलीत तुला.”

उशिरा का होईना लग्नाच्या बेडीत दोन हळवी मनं अडकणार होती.

अंतरपाटाच्या आडून दोघं एकमेकांना पहात होते. गालांवर निर्व्याज हसू नि ओठी गाणे रुणझुणत होते..

स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा

(समाप्त)
–सौ.गीता गजानन गरुड.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *