Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

चित्रे काकू खूप खूषीत होत्या. कारणच तसं होतं. चित्रे काकूंना कामवाल्या बाईने एक गुपित सांगितलं होतं जे ऐकून चित्रे काकूंना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. तळमजल्यावरच्या अनन्याचं लग्न मोडलं होतं, नवऱ्यामुलाने लग्नात गाडी मागितली होती. अनन्याच्या वडिलांनी नवऱ्यामुलाच्या वडिलांसमोर गयावया केली होती.

अनन्याचे वडील सदूभाऊ हे सेवानिवृत्त पोस्टमन होते. अनन्याच्या पाठीवर दोन बहिणी होत्या. त्याही चारेक वर्षात लग्नाच्या वयात येणार होत्या. सदूभाऊंची पुंजी अगदीच तुटपूंजी होती.
अनन्याला शेजारच्या चिंटूने हळूच येऊन बाहेर चाललेला तिच्या लग्नासाठीचा व्यवहार सांगितला तसं अनन्याच्या आईने चिंटूवर डोळे वटारले. अनन्याला साडी नेसवण्यासाठी आलेल्या चिंटूच्या आईने त्याच्या पाठीत एवढ्या जोरात धपाटा घातला होता की त्या आवाजाने अनन्याच्या काळजात धस्स झालं.

चिंटूने मात्र अनन्याताईसाठी तो मार चुपचाप सहन केला. नेहमी आईने मार दिल्यावर भसाड्या आवाजात दोन मजले दणदणवणारा चिंटू ओठ गच्च मिटून राहिला.
“पण ताई,हुंडा घेणं अथवा देणं दोन्ही गुन्हा आहे नं,”अनन्याच्या धाकट्या बहिणीने इरावतीने तिची शंका मांडली. “म्हणजे आमच्या अभ्यासाच्या पुस्तकात..”
इरावतीच्या बोलण्याला मधेच छेद देत मालती म्हणजे अनन्याची आई म्हणाली,”अगं,ते पुस्तकातलं ज्ञान पुस्तकात हो. व्यवहारात भेटवस्तूंच्या,सोन्यानाण्याच्या रुपात हुंडा घेतातच. कसं काय होणार तो वरचाच जाणे. तिघीजणी उजवायच्या आहेत. कोण चेन,अंगठी मागतं तर कोण गाडी. कुठून बरं आणायचा एवढा पैसा! तो कुबेर तरी भेटायला हवा होता. त्याच्यापुढे पदर पसरला असता मी माझ्या लेकींसाठी.” मालतीकाकू डोळ्यातलं पाणी पदरानं टिपत म्हणाल्या.

तेवढ्यात चिंटू हळूच बाहेरच्या खोलीत जाऊन आणखी एक बातमी घेऊन आला. स्वतःच्या आईकडे दुर्लक्ष करत एखाद्या शुरवीरासारखा अनन्याताईपुढे उभा राहून म्हणाला,”अनुताई, सदूकाका पाहुणेमंडळींना सांगताहेत की आमची अनन्या म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे,अन्नपूर्णा आहे. सालस आहे,हुशार व बुद्धिवादी आहे. एकदा तिला पाहून घ्या. कमळासारखं सुंदर मुख आहे माझ्या लेकीचं.”

“मग काय म्हणाले ते?” मालतीकाकूंनी विचारलं.
“नवरामुलगा म्हणाला,मला रुपाशी काही देणंघेणं नाही.  गाडी देणार असाल तरच मुलीला पाहीन नाहीतर अजून चार ठिकाणी बोलावणं आहे आम्हाला.”
चिंटूचं हे बोलणं ऐकून मालतीकाकूंना घामच फुटला. त्या मटकन खाली बसल्या. बेसावध असल्याकारणाने किचनच्या कडप्प्याचं टोक त्यांच्या कपाळाला लागलं नि त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली.

इरावतीने आईला पाणी पाजलं. अनन्याने साडी सोडून ठेवली. नेहमीच्या विटक्या गाऊनवर बाहेर गेली. नवऱ्यामुलाकडे पहात, त्याच्या वडिलांकडे पहात म्हणाली,”तुमच्या घरात कदाचित मुलगी नसेल त्यामुळे तुम्हाला मुलीच्या आईवडिलांच्या भावनांची किंमत नाही. तुम्ही मुलगी पहायला आला नाहीत तर गाडी घेण्यासाठी पेसे देणारा एखादा मुलीचा बाप हेरायला आला अहात. मुलीच्या स्वभावाशी,तिच्या गुणांशी तुमचं काही देणंघेणं नाही. माझे वडील कर्जबाजारी होऊन तुमची इच्छा पुरी करतील पण मी तसं होऊ देणार नाही. मी बाजारात विकायला ठेवलेली एखादी वस्तू नाही. तुमच्यासारख्या भावनाहीन माणसांशी आम्हांला संबंध प्रस्थापित करायचे नाहीत. तुम्ही जाऊ शकता. मला तुमचं स्थळ नापसंत आहे.”

नवऱ्यामुलाचे वडील म्हणाले,” मुली,तुझ्या तोंडाला काही लगाम आहे की नाही. किती हा उद्धटपणा. उद्या मिरी वाटशील सासरच्यांच्या डोक्यावर.”

सदूभाऊ म्हणाले,”चूक झाली हो तिची. तुम्ही दुर्लक्ष करा तिच्या बोलण्याकडे. मी समजावतो तिला. माझं ऐकेल ती. मी बघतो गाडीचं तुमच्या.”

नवरामुलगा म्हणाला,”काही नको. झाला तेवढा अपमान पुरे झाला. अशा छप्पन मुली भेटतील मला. हिलाच काय सोनं लागलय!”

“चालते व्हा,”अनन्या कडाडली. तिच्या डोळ्यांत अक्षरश: अंगार दिसत होता.

पाहुणे निघून गेल्यावर चिंटूने व इरावतीने टाळ्या वाजवल्या. सदुभाऊ मात्र,”हे काय केलंस पोरी. पहिल्याच कार्यक्रमाला नाट लागली.आता पुढची स्थळं कशी यायची!” असं डोक्यावर हात ठेवून म्हणाले.

“सदूभाऊ,अनन्याने जे केलं ते तुमच्या संस्कारांचंच फळ आहे. लहानपणापासून तिला निडरपणाचे,प्रामाणिकतेचे धडे दिलेत.किती छान संस्कार रुजवलेत मुलींमधे! लग्नाच्या बाजारामधे या संस्कारांना किंमत नसेल कदाचित पण म्हणून या संस्कारांची किंमत कमी होत नाही. अनन्याला अगदी सुयोग्य वर मिळेल बघा.” चिंटूची आई अनन्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.

चित्रेकाकूंना अनन्याच्या घरी फिसकटलेल्या बोलणीची अगदी खडानखडा माहिती कामवाल्या गंगूने पुरवली तसं चित्रेकाकूंनी तिला शंभर रुपये बक्षिसी शिवाय स्पेशल चहा व मस्का खारी दिली. चित्रेकाकूंच्या पोटात ही गोष्ट मावत नव्हती पण दुपारची सगळ्यांचीच घरं बंद असल्याने त्याही कशाबशा लवंडल्या. कधी एकदा पाच वाजताहेत नि खालच्या बागेत बसून सगळ्या सख्या शेजारणींना तिखटमीठ लावून ही फिसकटलेल्या बोलणीची गंमत सांगतेय असं त्यांना झालं. केस विंचरुन लांबसडक केसांचा त्यांनी शेपटा घातला. किरमिजी रंगाची साडी नेसल्या नि भरभर खाली जाण्यासाठी निघाल्या.

“काय काकू, आज कोणाची बातमी!” मोठ्या आवाजात चिंटूने विचारलं..अगदी गालाजवळ दोन्ही तळहात घेऊन..भोंग्यासारखं ..तसं त्याच्यासोबतची शाळकरी मुलं फिदीफिदी हसू लागली. मुलीतर फुटून फुटून हसत होत्या. चित्रे काकूंना चिंटूचा भयंकर राग आला. चिंटूवर दातओठ चावत त्या म्हणाल्या,”चिंट्या, तुला नं मेल्या संस्कारच नाहीत. कसलं वळण ते लावलंच नाही तुला आयशीने. माझी थट्टा करतोस होय. त्यापेक्षा अभ्यासात लक्ष घाल जरा. त्यात दिवे लाव काय ते!” काकूंच बोलणं ऐकताच चिंटू नरमला पण ग्यालरीत बसलेले दिगूअण्णा वर्तमानपत्रात बघत वाचनाचा आविर्भाव करत म्हणाले..मिरची झोंबली हो. अरारा जाळच.” दिगूअण्णांचं बोलणं ऐकून पोरं पुन्हा फिदीफिदी हसली.

चित्रेकाकू मात्र दिगूअण्णांकडे दुर्लक्ष फेकून मारत आपल्या कामासाठी तरातरा निघाल्या. दहा पावलं चालल्यासारखी करुन थकल्याचा आविर्भाव करत त्या ठरलेल्या बाकड्यावर जाऊन बसल्या. हळूहळू साताठ शेजारणी त्यांच्याभोवती गोळा झाल्या.

“किती गं बाई उकडतय घरात. जरा बाहेर वाऱ्याला येऊन बसलं की बरं वाटतं.”चित्रेकाकूंनी चर्चेला आरंभ केला.

“आम्ही बाई एसी घेणार आहोत यंदा,” गोगलेवहिनी म्हणाल्या.
“एसी घ्यायचा तर तो हिंवाळ्यात. उन्हाळ्यात अशा वस्तूंचे भाव चढे असतात.” चित्रेकाकूंनी असं म्हणताच गोगलेवहिनी म्हणाल्या,”अहो, आमच्या सुनेचे वडील घेऊन देणार आहेत. आम्ही नकोच म्हणत होतो. आम्हाला हे असं पाहुण्यांकडून घेणं वगैरे आवडत नाही पण आमचा किरीट म्हणाला,तिच्या वडिलांना हौस आहे तर घेऊदे. नाही घेतलं तर त्यांना वाईट वाटेल.”

“खरंच सोन्याच्या पावलांनी आलेय हो तुमची सून नाहीतर त्या सदूभाऊंच्या मुली..स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारुन कसा घ्यायचा तो त्या पोरींकडून शिकावं. अतिहुशार समजतात स्वतःला.”

“सदूभाऊंच्या मुली नं, जरा फॉरवर्डच आहेत त्या. काय केलं त्यांनी सांगा तरी,” बोभाटकर वहिनी म्हणाल्या.
चित्रेकाकूंनी कामवालीने सांगितलेला सगळा व्रुत्तांत अगदी तिखटमीठ लावून उपस्थित बायकांना सांगितला व सरतेशेवटी म्हणाल्या,”आपल्यातच ठेवा हं हा विषय. कोणाला सांगू नका. आपल्याला काय करायचंय लोकांच्या घरातलं.”

तशा गोगलेवहिनी म्हणाल्या,”छे बाई. आम्ही कशाला जातोय कुणाला सांगायला. पण मी म्हणते, पोरीच्या जातीने कसं मर्यादशील असावं. बरं हिच्या पाठच्यांची लग्न व्हायची आहेत. पहिलीचं लग्न ठरवताना विघ्न आलं तर पाठच्यांच कसं व्हायचं?”

चित्रे काकू गोगलेवहिनींची री ओढत म्हणाल्या,”अनन्याला एक अक्कल नाही पण तिच्या आईला समजू नये! आईने धाक दाखवावयास नको का पोरींना आणि तो पारसकरांचा चिंटू हल्ली जास्तच चहाटळपणा करु लागलाय. तो त्यांच्या घरीच पडलेला असतो सदानकदा. चिंटूच्या आईला समजायला नको! बरं लहानमोठ्यांचा मान ठेवणं नाही. मघा माझ्याकडे बघून काहीबाही बोलत होता,अगोचर कारटा.”

बोभाटकर काकू म्हणाल्या,”ती अनन्या मला काही धडातली वाटत नाही. लाली काय न् नेलपेंट काय..तिचं तिनं जमवलं असेल बाहेरच्या बाहेर..सदूभाऊंना दमडी खर्च न करता रेडीमेड जावई मिळेल बघा.”

गोगलेवहिनी म्हणाल्या,”रेडीमेड नातू नाही आणून दिलान म्हणजे झालं.” गोगलेवहिनींच्या बोलण्यावर सगळ्या खूसुखूसू हसल्या. चित्रेकाकूंचे यजमान येताना दिसताच त्या सख्या शेजारणींची मैफिल पांगली.

चित्रेकाकूंनी दिवाबत्ती केली. चित्रे काकांना चहापाणी दिलं व सोबत चघळण्यासाठी अनन्याचा विषय सांगितला. चित्रेकाका सोसायटीची बीलं काढण्यासाठी पिल्ल्यांकडे गेले. तिथे इतरही सदस्य जमा होते. चित्रे काकांनी अनघाचा विषय चांगला तिखटमीठ लावून मित्रमंडळींत सांगितला. सोसायटीभर बातमी पसरली.

सदुभाऊ बाजारातून येत असताना बोभाटकर त्यांना भेटले. बोभाटकरांनीच त्यांना चहाची ऑफर दिली. चहा घेता घेता बोभाटकर म्हणाले,”काय मग,कुठवर आलं अनन्याच्या लग्नाचं. आमच्या नंदूबरोबरची नं अनन्या म्हणजे सत्तावीशीची होईल यावर्षी. मुलींची लग्न कशी लवकर उरकून मोकळं झालं पाहिजे. आम्हाला मुलगी नाही म्हणून निर्थास्त आहोत आम्ही. तुम्ही मात्र जोरात प्रयत्न करा. चारदोन विवाहमंडळांत नाव नोंदवा.”

बोभाटकर आपली इतकी आगत्याने चौकशी करताहेत हे पाहून सदूभाऊंना बरं वाटलं. सदुभाऊंनी बोभाटकरांकडे त्यांचं मन मोकळं केलं,”चालू आहेत हो प्रयत्न. कधी पत्रिका जुळत नाही तर कधी नवऱ्यामुलाच्या अवास्तव अपेक्षा. नोकरदार मुलगी हवी असते बऱ्याचजणांना.”

बोभाटकर म्हणाले,”अनन्याची नोकरी कन्फर्म झाली नं.”

“हो तर गेल्या महिन्यातच कन्फर्मेशन लेटर मिळालं तिला.” सदुभाऊ मान हलवत म्हणाले.

“पण मंगळ आहे म्हंटल्यावर बाकी सारे गुण गौण ठरतात.”

“अहो मंगळ..कुणी सांगितलं तुम्हाला..” सदुभाऊ जवळजवळ ओरडलेच.

“मला आपलं ते गाढवेंनी..”बोभाटकरांनी चाचरत म्हंटलं नि बिल देऊन तिथून सटकले. सदुभाऊ मात्र बराच वेळ तिथे डोकं गच्च धरुन बसले. थोडं स्वतःला सावरताच कसेबसे तिथून निघाले. त्यांचा उतरलेला चेहरा अनन्याच्या लक्षात आला. आईवडिलांचं बोलणं तिने आतून ऐकलं. आपल्यामुळे आईवडिलांना सतराजणं उपदेशाचे डोस पाजताहेत हे लक्षात येऊन तिला फार वाईट वाटलं.

ती सदुभाऊंना म्हणाली,”दादा,तुम्ही मला माझ्या पायावर उभं रहाण्याइतकं सक्षम बनवलंत. अरेला का रे करायची धमक आईने माझ्या मनात जागवली. लग्न होणं हेच आयुष्याचं एकमेव उद्धिष्ट नसतं दादा. मला समजून घेणारा मुलगा भेटला तरच मी लग्न करेन. पण,तुम्ही मात्र जीवाला घोर लावून घेऊ नका. तुमची तब्येत बिघडली म्हणजे..”

सदुभाऊंना थोडं का होईना अनन्याचं म्हणणं पटलं. आपल्या मुलीच्या समजूतदारपणाचं त्यांना कौतुक वाटलं. मध्यंतरी अजून एक स्थळ येऊन अनन्याला पाहून गेलं. त्या मुलाला अनन्याची उंची कमी वाटली. त्याच्या घरात सगळ्या उंच बाया..त्यात अनघा शोभून दिसणार नाही म्हणून मुलाने नकार कळवला.

“काय अनन्याच्या आई, अनन्याच्या डोक्यावर यावर्षी तरी अक्षता पडणार की नाही! बाशिंगबळ जडच दिसतय अनन्याचं” अनन्याची आई जरा घराबाहेर पडली की शेजारणी तिला एखाद्या भक्षावर कावळे टोची मारतात तशा टोचू लागल्या.

” वय उलटून जातंय हो पोरीचं. त्या भिंगारदिवे वहिनींच्या पुर्णिमेचं लग्न ठरलंसुद्धा. तुमच्या अनन्यापेक्षा तीन वर्षाने लहान नाही का पुर्णिमा. बाकी भिंगारदिवे वहिनींनी जावई छान पटकावला. पायलट आहे म्हणे शिवाय धाकट्या लेकीचंही पुर्णिमेच्या धाकट्या दिराशी लग्न जमवताहेत..सगळं कसं झट की पट.”ही अशी बोलणी येताजाता कानावर आदळून अनन्याच्या आईला डोकेदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला.

अनन्याला दिवसेंदिवस अपराध्यासारखं वाटू लागलं. ज्या घरात जन्म झाला त्याच घराला आपण ओझं झालो आहोत अशीही भावना तिच्या मनात येऊ लागली. बघताबघता दोन नंबर आश्विनीही पंचवीसीची झाली.

अजुनपर्यंत सातेक स्थळांनी अनन्याला नापसंत केलं होतं. कोण बघायला येणार असलं की साडी नेसून नटूनथटून तयार होण्याचा तिला आता खरंच उबग आला होता. चेहऱ्यावरची तारुण्य सुलभता जाऊन चेहऱ्यावर एक प्रकारचा पोक्तपणा आला होता.

अनन्याची आई नेहमी पाहुणे यायचे झाले की आश्विनी व इरावतीला किचनमधे बसवून ठेवायची. त्यादिवशीही तसंच केलं होतं. पाहुणेमंडळी वसईहून अनन्याला बघायला येणार होती. अनन्याच्या मामीच्या नात्यातली असल्याने अनन्याचे मामा,मामीही आदल्या दिवशीच येऊन थांबले होते. आपल्या भावाच्या सासरची माणसं म्हणून अनन्याच्या आईने सदुभाऊंना पाहुणेमंडळींसाठी ढोकळा,समोसे,चमचम व फरसाण आणायला पाठवलं होतं. साजूक तुपातला शिरा बनवला होता.

मामा अनन्याला म्हणाला,”अनु बेटा तू बघच, हे स्थळ फायनल. यानंतर तुला असं शोपीससारखं उभं रहावं लागणार नाही.” अनन्याला मामाचं बोलणं ऐकून खरंच बरं वाटलं कारण हा मुलगा तिच्यापेक्षा दीड वर्षाने मोठा होता. तिने त्याचं प्रोफाइल चाळलं होतं. त्याचा देखणा चेहरा, बोलके डोळे..तिला फारच भावले होते. अजुनपर्यंत जी जी मुलं पाहिली त्यांत हा उजवा होता. अनन्या मनोमन देवाकडे प्रार्थना करत होती.

पाहुणेमंडळी आली. सदुभाऊंनी त्यांचं यथोचित स्वागत केलं. चिंटू येऊन बसलेला होताच. नवऱ्यामुलात नाव ठेवायला तीळमात्रही जागा नव्हती. डाळिंबी रंगाच्या साडीत अनन्या खूप गोड दिसत होती. साडीवरील सोनेरी बुट्टे छान चमकत होते. अनन्याने बसलेल्या मंडळींना शिरा दिला.

एकदोन प्रश्न विचारल्यावर नवऱ्यामुलाची आई म्हणाली,आम्हाला तुमची अनन्या सून म्हणून पसंत आहे. पण शेवटी त्या दोघांची पसंती महत्त्वाची. त्यांना एकांतात बोलूदे.

अनन्या व नवरामुलगा दोघं शेजेच्या खोलीत गेले. दोनचार मिनिटं शांततेत गेली..मग दोघांनी एकत्र बोलण्यास सुरुवात केली..मी काय म्हणते..मी काय म्हणतो..दोघांच्या तोंडून एकाच वेळी बाहेर पडलं. दोघं मनापासून हसले. नवरामुलगा सागर याने अनन्याला त्याच्या शिक्षणाबद्दल,जॉबबद्दल माहिती दिली. अनन्यानेही मोकळेपणाने त्याच्याशी गप्पा मारल्या. अनन्याला सागरचा स्वभाव खूपच आवडला.

सदुभाऊंनी हाक मारताच दोघं बाहेर आले. इकडच्यातिकडच्या गप्पा रंगल्या. इतक्यात दारात कुरियरवाला आला. कुरियर आश्विनीच्या नावचं होतं. तिची सही आवश्यक होती. मालतीला पेच पडला..हिला बाहेर पाठवायचं तरी कसं पण नाविलाज होता. त्यांनी आश्विनीला बाहेर जाऊ दिलं. आश्विनीने सही केली व पाकिट फोडलं. ते अपॉइंटमेंट लेटर होतं. एका नामांकित कंपनीमधे स्टेनो टायपिस्ट म्हणून तिची निवड झाली होती.

आनंदाच्या भरात आश्विनीने गिरकी घेतली. चिंटूही नाचू लागला. ती दोघं क्षणभर हॉलमधे पाहुणे बसलैत हे विसरुन गेली. आईने जोरात आवाज देताच आश्विनी भानावर आली. उपस्थित मंडळींना सॉरी म्हणत ती आतल्या खोलीत गेली.

सदुभाऊंनी मग आश्विनीच्या नोकरीसंबंधित त्रोटक माहिती पाहुणेमंडळींना दिली. चार दिवसांत निरोप कळवतो असं सांगून पाहुणेमंडळी जायला निघाली. सागर दिसेनासा होईस्तोवर अनन्या बेडरुमच्या खिडकीतून त्याच्याकडे एकटक पहात होती.
इरावतीने हळूच अनन्याताईचा शेपटा ओढला तेंव्हा ती भानावर आली.

मामा म्हणाला,”अनन्याचं लग्न ठरल्यात जमा आहे. दोघं कशी गुलुगुलू बोलत होती.”
“तुझं आपलं काहीतरीच हं मामा,”अनन्या लाजून म्हणाली. सदुभाऊ आत येत म्हणाले,”आजचा दिवस खरंच चांगला आहे. अनन्याचं लग्न ठरल्यात जमा आहे. आशुला नोकरी लागली. सगळं कसं मनासारखं होतंय.
अनन्या खरंच सागरमधे हरवून गेली होती. स्वप्नातसुद्धा तिला सागर दिसू लागला होता.

चार दिवस होऊन गेले तशी सागरची आई म्हणाली,”सागर,तुझा होकार कळवायचा ना. अरे,ती मंडळी वाट पहात असतील. अशा बाबतींत उशीर करु नये.”

(क्रमश:)

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

पोटची पोर आईवडिलांना अतिप्रिय असते..पण तिच्या लग्नाचं वय उलटून जाऊ लागलं की मात्र आईवडील हवालदिल होतात. मुलगीच कशाला मुलाच्याही बाबतीत असंच होतं..अशावेळी मदतीचा हात दुरापास्त पण टिंगलटवाळी करणारेच अधिक असतात.अनन्याचं होईल का सर्व सुरळीत? असेल का तिच्या कुंडलीत लग्नयोग..भेटेल का तिला मनाजोगता साथीदार? का कोणा सोम्यागोम्याच्या हाती हात द्यावा लागेल? जाणून घ्यायचंय नं..नक्की वाचा अंतिम भाग..लग्नयोग.

==========================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *