Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“साहवेना अनुराग नको रे कान्हा, साहवेना अनुराग…” एकीकडे मोठ्याने मोबाईल वर सुरु होते. दुसरीकडे मेघा रविवारची सकाळी अगत्याची कामे उरकत होती. मेघा.. एक तीस वर्षांची तरुण अविवाहित मुलगी. मुळची अहमदनगरची पण मुंबईतल्या mnc कंपनीत नोकरी करत असल्याने सध्या मुंबईच्या वन बी. एच. के. फ्लॅट मध्ये एकटीच राहत होती. वडील शेतमजूर असल्याने लवकरच graduation पूर्ण करून तिने नोकरी करण्याचे ठरवले आणि मुंबईची वाट धरली.

आई वडील आणि लहान भाऊ गावीच होते. लहान भावाचे इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण करण्यात आणि घराला हातभार लावण्यात मेघाने स्वतःचे आयुष्य खर्ची केले. कधी स्वत:च्या लग्नाचा विचार केला नाही, पण घरच्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नव्हते. 

महिन्याकाठी भावाचा फक्त पैसे ट्रान्सफर झाले असा फोन यायचा किंवा आईचा एखाद्या नातेवाईकांच्या कार्यक्रमाबद्दल सांगायला. याउपर तिच्याशी कुणाला देणंघेणं नव्हतं. गाणी आणि बातम्या हेच तिचे सोबती होते.

ती कामं आवरत असताना दरवाज्यावर टकटक झाली. पटकन गाणे थांबवून तिने दार उघडले तर समोर एक कुरळ्या केसांचा, तांबूस डोळे असलेला गोरापान तरुण तिच्या दारापाशी उभा होता. त्याला बघून मेघा थोडा वेळ का असेना जगच्या जागीच उभी राहिली. त्यात त्याच्या हनुवटीवरची खळी त्यात भर टाकत होती. तो जवळपास तिच्याच वयाचा किंबहुना तिच्यापेक्षा किंचित वयाने मोठा असावा.

त्या तरुणाने स्वतःहून बोलायला सुरूवात केली, “हॅलो कुणी आहे का घरात..??माझं नाव अमोल गिरासे… मी ह्या समोरच्याच फ्लॅट मध्ये नवीन राहायला आलोय.. फ्लॅट नंबर 204… मला तुमची जरा मदत हवी होती. Actually मला इथल्या पाण्याची वेळ ठाऊक नाही. आणि अजून सामान लावायचं काम सुरू आहे. मला ही बाटली भरून पाणी देता का प्लीज प्यायला..??”

“का नाही..? या ना आत. तसं पाणी अर्ध्या तासाने येईल. रविवारी जरा उशिराच पाणी येतं. तुम्ही बसा. मी आणते पाणी.. चहा घ्याल? ” तिने आपसूक विचारले.

“नाही आता नको.. आता एकच बाटली पाणी भरून द्या. मला तशी कॉफी आवडते. सायंकाळी येतो प्यायला. येऊ ना..?” त्याने जरा त्याच्या बिनधास्त शैलीत विचारले.  तिला काही क्षण काय बोलावे काहीच समजत नव्हते. पण ती बोलली, “नक्की या.. मी कॉफीच देईन तुम्हाला..” पाण्याची बाटली त्याच्या हातात दिली. तो थँक्स बोलून पाणी घेऊन गेला.

तिने दरवाज्यातून पाहिले तर त्याच्या घरात काही जण काम करत होते. आणि मागून “Hymn on the weekend” हे गाणे सुरू होते. तिला तो जरा अवलियाच वाटला. तिने दार लावून घेतले. तो येण्याअगोदर कित्येक भाडेकरू त्या समोरच्या फ्लॅट नंबर  204 मध्ये येऊन गेले. पण तिला नेहमी आपला अभ्यास, नोकरीं आणि घर यातून सवड मिळत नव्हती.

सायंकाळी तो खरंच कॉफी प्यायला म्हणून तिच्या घरी आला. पुन्हा घरात शिरण्या अगोदर त्याने विचारले, “कुणी आहे का घरात..?” हे वाक्य ऐकून तिला हसूच आले. तिनेही त्याचे हसून स्वागत केले. येताना त्याने सोबत veg चॉकलेट brownie आणल्या होत्या.

दोघांनीही हसत हसत गप्पा मारल्या. नेहमी बुजरी राहणारी मेघा त्याच्याशी दिलखुलास गप्पा मारत होती. त्यात दोघांचे दोन आवडते विषय सोडून दोघांमध्ये काही साम्य नव्हते. अमोल चौतीस वर्षांचा अविवाहित. आई वडील लहानपणी वारले तेव्हापासून  हा फक्त स्वतःसाठी जगतोय. आणि मेघा.. जेव्हापासून सावरली तेव्हापासून फक्त घरच्यांचाच विचार केला. यामुळे दोघेही अगदी विरुद्ध टोकं.. पण त्यात दोघांना आवडणारी गोष्ट म्हणजे music आणि coffee..

बघता बघता दिवस सरत होते. मेघा आणि अमोल आठवडाभर आपापल्या कामात busy असत आणि weekend आला की एकमेकांशी music विषयी, नव्या picture विषयी गप्पा मारत. पण coridoor मध्ये..जवळपास सात आठ महिने झाले. एव्हाना मेघा आणि अमोल एकमेकांचे घट्ट मित्र झाले. तो क्वचित तिच्या घरी यायचा आणि तोच प्रश्न विचारायचा.. “कुणी आहे का घरात…..?”
   

एकमेकांना आहोजाहो करणारे मेघा आणि अमोल आता एकमेकांचा एकेरी उल्लेख करत.

एक दिवस असाच रविवार होता. दुपार झाली तरीही मेघा आपल्याशी बोलायला coridoor पाशी आली नाही म्हणून अमोलला जरा वेगळेच वाटले. एव्हाना त्याला तिची आणि तिला त्याची खूप सवय झाली होती. त्याने आधी दुर्लक्ष केले आणि स्वतः लॅपटॉप घेऊन काम करत बसला पण दुसऱ्या क्षणी त्याला काळजी वाटू लागली. त्याने पटकन जाऊन तिच्या घराचे दार ठोठावले. तिने जरा वेळाने दार उघडले. त्याने तिचा चेहरा बघितला. पाण्याने स्वच्छ धुतला होता. पण डोळे रडून लालबुंद झाल्यासारखे भासत होते.

त्याने मेघाच्या डोक्याला हात लावला. अंग जरा तापले होते. त्याने काहीच न बोलता तिला सोफ्यावर बसवले आणि विचारले, ” मेघा.. का रडत होतीस..? काय झाले नीट सांग. हे बघ तू मला तुझा बेस्ट फ्रेंड बोलतेस ना…? बोल बरं. ” आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिला न राहवून हुंदका फुटला. ती त्याला मिठी मारून रडू लागली. त्याने तिला मनसोक्त रडू दिले.

नंतर तिनेच बोलायला सुरुवात केली. “माझे बाबा शेतमजूर होते. जास्त पैसे नसायचे घरात. म्हणून मी जॉब करून शिक्षण पूर्ण केले. धाकटा भाऊ दोनच वर्षं लहान माझ्यापेक्षा.. तरी त्याच्या शिक्षणाला मी पैसे पुरवले. त्याला जॉब करू दिला नाही. आणि आज आई बाबांनी त्याचे लग्न ठरवले. माझा जराही विचार केला नाही. मी विचारला जाब तर बोलले कि तू स्वतः बिनलग्नाची राहिलीस. आम्ही काय करू त्यात. आता तुला मुलगा शोधू तर आमच्या पोराचं लग्न कधी करू.. म्हणजे मी कोणीच नाही का त्यांची..? मी आता ठरवले आहे त्या घरी एकही पैसा पुरवणार नाही. आणि sorry.. मी तुला त्रास दिला. माझं गाऱ्हाणं गात बसली.” तिचे डोळे पुसत, “अगं काही हरकत नाही. मी मित्र आहे ना तुझा. मित्राला बिन्धास्त सांगू शकतेस तू.. Okay..” थोड्या गप्पा मारून झाल्यावर तो त्याचा घरी निघून गेला.

 त्या दिवसापासून स्वतःतच राहणारी मेघा सगळ्यांमध्ये मिसळू लागली होती. हे बघून अमोल पण खुश होता. एके दिवशी अमोल ऑफिसमध्ये काम करत होता. त्याच्या एका क्लायंटने सहज त्याला दोन picture च्या तिकिटाचे voucher दिले. दोन टिकेट्स बघून आधी तो संभ्रमात पडला कि दुसरे तिकीट देणार कुणाला..? पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या डोळ्यासमोर मेघा आली. त्याने पटकन मेघाला फोन केला.., “hey मेघा.. कुठे आहेस..?” “अरे घरीच आहे. जरा कंटाळा आला म्हणून घरी थांबले तर घरात जास्तच कंटाळा आलाय. उगीच घरी थांबले असे वाटतेय आता. तू बोल का फोन केलास..?”

“अगं काही नाही. एका picture ची दोन टिकेट्स मिळाली. रात्रीचा शो आहे. येशील का..? असे विचारणार नाही. कारण तू येत आहेस. आणि तू तयारी करून ठेव. मी येतो तुला घ्यायला.. ” तो बोलला.

मेघाने होकार कळवला आणि त्याने घराकडे कुच केली. जवळपास एका तासाने तो घरी आला तर एक व्यक्ती त्याला मेघाच्या घरातून बाहेर पडताना दिसली. त्याने चेहरा बघून लगेच ओळखले.

मेघाच्या घराचा दरवाजा उघडा होता. ती रडत नव्हती पण हताश होऊन बसली होती. अमोल तिच्यापाशी गेला. त्याने तिच्या डोळ्यात डोळे घातले आणि बोलू लागला, “मेघू आवर मूवीला जायचे आहे आपल्याला.” “नाही यायचं मला. मी माझी एकटी मजेत आहे. मला नको कोणीच. जा तू इथून. मी खुश आहे.” ती जरा चढ्या आवाजात बोलली. हे ऐकून अमोलच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो रागात उठून बोलला, “तू आणि खुश..? डरपोक आहेस एक नंबरची..

जी स्वतःसाठी स्टॅन्ड घेऊ शकत नाही ती स्वतःसाठी काय बोलेल. मी ऐकले बाहेर उभा होतो तेव्हा तुझ्या भावाचे बोलणे. तू एक महिना पैसे दिले नाही तर त्याने आणि तुझ्या घरच्यांनी तुला बोल लावले. नातं तोडलं.. तरी तू गप्प. एक नंबर डरपोक आहेस तू..माझी बेस्ट फ्रेंड  अशी असूच शकत नाही. आपण आता मूवी जायचं नाहीच. आणि पुन्हा बोलायचं पण नाही. मला असे बुजरे, चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज न चढवणारे मित्र नकोतच. Good बाय..” इतके बोलून तो निघून गेला.

इकडे मेघा बराच वेळ बसून अमोल जे काही बोलत होता त्याचा विचार करत होती. काहीतरी निर्धार करून ती उठली. तिने मस्तपैकी निळा वन पीस घातला आणि छान तयारी केली.

तिने आज पहिल्यांदा त्याच्या घरचा दरवाजा ठोकवला आणि विचारले, “कुणी आहे का घरात…..?” त्याने तोंड वाकडं करून उत्तर दिले, “कुणीच नाही..” त्यावर ती बोलली, “अरे पण माझा बेस्ट फ्रेंड इथेच राहतो. बावळट आहे जरासा. अमोल नाव आहे त्याचं. मला picture ला नेणार होता..”

“तुला खरंच यायचे आहे की माझ्यासाठी बोललीस..?” त्याने प्रतिप्रश्न केला. त्यावर तिने हसून उत्तर दिले, “मी तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी बोलले रे अमोल. मला पटले तुझे बोलणे. चल आता आवर पटकन. मला National anthem पण मिस करायची नाही. “

अमोलने डोळ्याच्या पाणावलेल्या कडा पुसून पटकन तयारी केली. दोघेही बाहेर जाऊन picture बघून आले.

ते आता खऱ्या अर्थाने एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. एकमेकांच्या घरी जातात. पण एक प्रश्न आवर्जून विचारतात, “कुणी आहे का घरात…..?”

©️®️ऋचा निलिमा

==================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *