Ritbhatmarathi

Search
Close this search box.

कौमुदी (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२

©️®️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

आज कौमुदी विशेष खूश होती. कारण तिच्या डॉक्टर मुलासाठी म्हणजे उद्धवसाठी सांगून आलेली मुलगी सायली घरी येणार होती. काहीतरी स्पेशल डिश करावी असं कौमुदीच्या मनात होतं. ती सकाळीच लवकर उठून तयारी लागली. आता आपल्याला सून आली की, आपण तिचं कोड-कौतुक करायचं, आपल्याला झालेला त्रास तिला होऊ द्यायचचा नाही, म्हणून तर आपण तिलाच आपल्या  घरी बोलावलं. कौमुदीच्या मनात झरझर विचार येत होते, तेवढ्यात सासू समोर येऊन उभी राहिली. तिचा रागावलेला चेहरा पाहताच कौमुदीच्या लक्षात आलं की, आपलं कानातलं मशीन घालायचंच राहिलं की, या गडबडीत. तिला एकदम अपराध्यासारखं वाटलं तिने दोन मिनिटं अशी हातानेच खूण केली आणि ती मशीन आणायला धावली. कानात मशीन घालून येत असता असता सासूचे शब्द तिच्या कानावर पडले,

‘‘उद्धवा, तुझं लग्नं होणं कठीण आहे रे बाबा, तुझी बायको म्हणेल अशी बहिरी सासू नको.’’

कौमुदीचे डोळे पाणावले. उद्धव आजीला म्हणाला, ‘‘असं काही नाही हा आज्जू, माझी आई खूप छान आहे.’’

‘‘तू तिचीच बाजू घे.’’ म्हणत सासूने चार कामं कौमुदीला सांगितली. कौमुदी झालेल्या अपमानाने खरंतर चिडली होती, पण आता तिला वाईट वाटू लागले. खरंच असं होईल का या भीतीने तिला ग्रासलं. तेवढ्यात लाडकी कन्यका गळ्यात पडून म्हणाली,

‘‘चिल माँ…’’ अशा कोत्या मनोवृत्तीच्या माणसांकडे लक्ष द्यायचं नसतं.

कौमुदी नेहमीप्रमाणे आवरत राहिली. तिच्या अंगात काही रोग वास्तव्य करून होते, माणूस गोड असलं की सारं काही त्याला मुंगळ्याप्रमाणे चिकटतं तसंच तिचं होतं. दोन-चार मेजर ऑपरेशन्स झाली होती. पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन करता करता साईडइफेक्ट म्हणून बहिरेपण फ्री मिळालं होतं. पण तरीही तिच्या अंगात भरपूर कला होत्या, ती हुशार होती,  ती गप्प राहात होती कारण उगाच वादविवाद नकोत. आपल्या आईवडिलांना त्रास नको. त्यांचा मान-सन्मान ती जपत होती. कारण ती नुसत्या कागदावर सुशिक्षित असणार्‍या आई-वडिलांची मुलगी नव्हती, पण तिला मिळालेलं सासर मात्र फक्त कागदोपत्री सुशिक्षित होतं.

सारी कामं आवरून तिनं अंग टाकलं. बेड जवळच्या टेबलावर तिचं चित्रकलेचं सामान पडलं होतं. शेजारी पुस्तकांचा ढीग. विपुल असं शब्दसामर्थ्य होतं तिच्याकडे. तिच्या लेखणीतून शब्द असे काही बाहेर पडत की, वाचणार्‍यांच्या हृदयाचा ठाव घेत. पण आताच्या सासूच्या वागण्यामुळे तिचं मन चलबिचल झालं होतं. तिला एकदम काहीतरी सुचलं. ती पटकन उठली. कागदावर काहीतरी रेखाटलं. थोडं फार लिखाण केलं. तोपर्यंत मुलगी येण्याची वेळ झाली होती. सायली नाव होतं तिचं. नावाप्रमाणेच नाजूक होती सायली. सर्व कार्यक्रम हसत-खेळत पार पडला. जाता जाता कौमुदीच्या सासूला नमस्कार करायला ती वाकली. तेव्हा त्या म्हणाल्या,

‘‘निदान नातसून तरी चांगली मिळेल हीच अपेक्षा आहे. तू जर घरात आलीस तर सोनं होईल.’’

तिनं चमकून आजीकडे पाहिलं. त्या पुटपुटल्या, ‘‘सून अशी लंगडीबहिरी…’’

सायलीने ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं कौमुदीला नमस्कार करायला ती वाकली. कौमुदीने तिला अर्ध्यातच थांबवलं त्या बरोबर सायलीचे डोळे भरून आल्यासारखे तिला वाटले. आपल्या खोलीतून कौमुदीने एक ग्रिटींग सायलीला दिलं. सायलीला खूप आनंद झाला. ती आईवडिलांसह घरी गेली.

चार दिवसांनी सायलीच्या घरून नकार आल्यावर घरातल्या सर्वांनाच आश्‍चर्य वाटलं. असेच दिवस गेले आणि एक दिवस अचानक सायली दारात उभी राहिली. कौमुदी काहीतरी चित्रं काढण्यात दंग होती. दार उघडंच होतं. सायली पटकन कौमुदीजवळ आली नी म्हणाली,

‘‘किती सुरेख काढता तुम्ही चित्रं?’’

‘‘हम…’’

‘‘तुम्हाला वाटलं असेल ना की मी तुमच्याकडे बघून नकार दिला.’’

‘‘हो ना ते तर 100 टक्के निर्विवाद आहे.’’

‘‘नाही आई, तसं काही नाही.’’

‘‘आई?’’

‘‘हो मी आणि उद्धवने लग्नं करायचं ठरवलंय.’’

‘‘हे कधी ठरलं?’’

तेवढ्यात उद्धव तिथे हजर झाला. आवाज ऐकूनन कौमुदीची सासूही आली. उद्धव म्हणाला,

‘‘सायलीने नकार दिल्यावर माझं मन कशातच लागेना, तेव्हा बहिणाबाईंचा सल्ला घेतला तर ती म्हणाली, ‘‘दादू, एकदा फोन तरी करून बघ. तिच्या नकाराचं कारण तरी विचार.’’

तिचा सल्ला ऐकून फोन केला तर सायली म्हणाली, ‘‘मी तुझ्याच फोनची वाट बघत होते.’’ तिचं उत्तर ऐकून मी तर चाटच पडलो, मग तिने मला भेटायला बोलावले.

सायली मी पुढचं सांगू शकत नाही ग, मी माझ्या मम्माचा अपराधी आहे. तू बोल.

‘‘आई, त्या दिवशी जाताना तुम्ही मला एक ग्रिटींग दिलंत त्यात एका बाईचं चित्रं होतं जी अतिशय सुंदर होती, पण, कानात मशीन होतं. त्यामुळे तिच्या चेहर्‍यावर कारुण्य होतं. पायावर फुली मारलेली होती. पण तरीही एक बुद्धिमत्तेची चमक त्या चित्रांत मला दिसली होती आणि आतला संदेश. सायलीचेही डोळे भरून आले.

तो होता ‘‘सायली, मी अशी आहे म्हणून तू उद्धवाला नाकारू नकोस, तुम्ही सुखाने संसार करा, माझं मी खूप सोसतेय, पण मी तुम्हाला त्रास देणार नाही.’’ तुमचा हा संदेश पाहिला आणि मला आजींचं पुटपुटणं आठवलं. तुमच्याबद्दल मनात करुणा दाटून आली, तेव्हाच वाटलं की पटकन येऊन तुम्हाला मिठी मारावी, पण मग वाटलं की आधी उद्धवला थोडा धडा शिकवला पाहिजे. म्हणजे मला त्याला काहीतरी सांगायचं होतं. मला  उद्धवाला समजावायचं होतं की, तू अशा गोड आणि हुशार आईच्या पाठी खंबीरपणे उभं राहायला हवंस. आज तू आईला आधार दिला पाहिजेस, असाच आधार मलाही दिला पाहिजेस. एक मुलगा म्हणून तुझं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तू निभावलं पाहिजेस.’’

खरंतर या घरात आले तेव्हाच मला उद्धव, त्याची बहीण आणि आई तुम्ही प्रचंड आवडला होतात. उद्धवच्या डोळ्यातही मला माझ्याबद्दल पसंती स्पष्ट दिसली होती, म्हणून मी हा निर्णय घेतला आणि त्याला नकार दिला. फक्त नशीब एकच की उद्धवने मला फोन केला, जर तो फोन आला नसता, तर मी त्याला समजावू शकले नसते आणि माझं स्वप्नं अधुरंच राहिलं असतं, तुमच्यासारखी गोड सासू मिळण्याचं… पण माझी देवावर श्रद्धा होती.’’

कौमुदीच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता, तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहात होते. पण तिच्या सासूचा चेहरा आता बघण्यासारखा झाला होता. त्या स्तब्ध उभ्या होत्या. 

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

========================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *