Ritbhatmarathi

Search
Close this search box.

कौन तुझे यूँ प्यार करेगा..(भाग दुसरा..अंतिम भाग)

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

मित्रांमधे कुजबुज वाढली. बहुतेक फायनल एक्झाम होताच लग्न उरकून घेतील..नऊ महिन्यात बारसं..

पोरं एवढा पुढचा विचार करतील..धनंजयला खरंच वाटलं नव्हतं पण या गॉसिप्सने तो भानावर आला. त्याचे वडील जाऊन नुकतेच सहा महिने झाले होते. घरी समजलं तर आई काय म्हणेल.. तो विदुलाला अक्षरश: टाळू लागला.

विदुला,परीमल कॉलेजला जायच्यायायच्या त्या गेटन जायचा बंद झाला. खरंतर धनालाही मनापासून आवडू लागली होती विदुला. विदुलाची बेधडक व्रुत्ती,तिचं दिलखुलास हसू, तिचं मैत्रत्व..सारंच भूल घालत होतं धनाला पण तो दु:खात होता..

त्याची आई अजून सावरली नव्हती..अशावेळी प्रेमात पडणं, आईसमोर प्रेमाची कबुली देणं वगैरे त्याच्या मनाला पटत नव्हतं..

मित्रांमधे आपल्या प्रेमाची अशी चर्चा होणंही त्या अभ्यासू मुलाला मान्य नव्हतं.

==========================

एकदा विदुलाने मेल्स टॉयलेटजवळ उभं राहून गाठलंच धनंजयला.

“का टाळतोयस मला?”

“मुलं काहीबाही बोलतात.”

“कोणाबद्दल?”

”आपल्याबद्दल. . म्हणजे तुझं माझं ते अफेअर वगैरे.”

“मग”

“हे अफेअर वगैरे मला परवडणार नाही.”

“तुझं प्रेम आहे का माझ्यावर,धना?”

“ते मी नाही सांगू शकत..पण आजपासनं मला भेटायचा प्रयत्न करु नकोस. माझी शपथ आहे तुला..आणि केलास तर मी जीवाचं काहीतरी बरंवाईट करुन घेईन.”

“धना, इतका डरपोक असशील असं वाटलं नव्हतं मला. तुझी अशीच इच्छा असेल तर नाही भेटणार मी तुला. काळजी करु नकोस.”

विदुलाने धनंजयकडे पाठ फिरवली. खूप रडली..खूप रडली पण धनाच्या शपथेमुळे तिने त्याच्याजवळ प्रीतीची  गळ घातली नाही.

धनाने स्वतःला पुस्तकांत बुडवलं. प्रेम वगैरे सगळं झूठ असतं..परिस्थितीपुढे प्रत्येकाला वाकावच लागतं. तो मनातल्या मनात घोकत रहायचा.

कॉलेज संपलं..प्रत्येकाचे मार्ग वेगळे झाले. विदुला घरच्यांच्या विनंतीला मान देऊन परदेशात शिकायला गेली. कदाचित भूतकाळापासून दूर होण्यासाठीच.

इकडे भारतात धनंजयने एमएमएस केलं. क्याम्पस इंटरव्यूमधून सिलेक्शन झालं. नामांकित कंपनीत रुजू झाला.

धनंजयच्या आईने धनंजयसाठी मुली बघायला सुरुवात केली. तिच्या जवळच्या नात्यातली धनश्री धनंजयसाठी सांगून आली. पत्रिका वगैरे जुळल्या. दोष ठेवण्याजोगं दोघांतही काही नव्हतं.

एका सुमुहुर्तावर धनंजय व धनश्रीचं लग्न झालं. अशारितीने धनाच्या वैवाहिक आयुष्याला प्रारंभ झाला.

धनाची बायको,धनश्री..अगदी चारचौघींसारखी दिसणारी,स्वभावाने लाखात एक. धनाच्या आईची काळजी घ्यायची. धनावर भरपूर प्रेम करायची. त्याच्यासाठी उपासतापास करायची.

दोनेक वर्षांत त्यांच्या संसारवेलीवर दोन गोजिरी फुलं उमलली.

मुलांचा सांभाळ, त्यांवर उत्तम संस्कार, किराणा आणणं, चारीठाव स्वैंपाक, बँकेचे,पोस्टाचे व्यवहार,..कसलंच टेंशन नव्हतं धनंजयला. ग्रुहखातं धनश्री उत्तमरित्या सांभाळत होती. धनंजय त्याच्या कार्यक्षेत्रात यशाच्या पायऱ्या चढत होता. काळासोबत तो विदुला नावाचं फडफडतं पान सहज विसरुनही गेला.

विदुला आता तिच्या अंकलच्या कंपनीत जाऊ लागली होती. सगळे तिला लग्न कर म्हणून आर्जवं करत होते पण तिने मनावर घेतलच नाही. तिच्या मनातला तो हळवा कप्पा फक्त तिच्या धनासाठी होता.

तिच्याइतकं खोलवर प्रेम धनाने केलं नसावं तिच्यावर, कदाचित त्याच्यावरील जबाबदाऱ्यांनी तो भानावर राहिला असावा,सजग राहिला असावा..पण .. पण विदुला तशी नव्हती..फक्त धनाने शपथ घातली म्हणून तिने त्याचा नाद भौतिक जगासाठी सोडला होता तरीही तिच्या मनातल्या त्याला ती काढून टाकू शकत नव्हती.

धना व धनश्रीच्या लग्नाचा वाढदिवस होता. धनाची आई मुद्दामहून नातवंडांना घेऊन लेकीकडे रहावयास गेली. धनाने धनश्रीला फोन केला..संध्याकाळी बाहेर जाऊ आपण. तयार रहा.

धनश्री खूष झाली. तिने आरशात स्वतःला पाहिलं, चक्क  लाजली. धनाने पाडव्याला घेतलेली अंजिरी रंगाची, सोनेरी बुट्ट्यांची साडी ती नेसली. गळ्याबरोबर एक मोत्याचा सर घातला. हातात मोत्यांच्या बांगड्या चढवल्या..कानात अंजिरी खडा असलेली मोत्याची कुडी. लांबलचक केसांची सैल वेणी घातली.

धनाने तिच्यासाठी येताना मोगऱ्याचे गजरे आणले. ते त्याने धनश्रीच्या वेणीत माळले नं तिची हनुवटी तर्जनीने वर उचलून ह्याप्पी एनिवर्सरी,बायको म्हणाला. ती त्याला बिलगली तसं त्याने  तिच्या नितळ पाठीवरुन हात फिरवत तिच्या भाळावर ओठ टेकवले.

गाडीत बसल्यावर म्युझिक प्लेअर ऑन केला. धनश्रीच्या आवडीचं गाणं लावलं..

माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास॥

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन॥

धनाच्या खांद्यावर डोकं टेकवून धनश्री त्या गाण्यातील स्वरांशी,भावाशी समरस झाली होती. धना अधनंमधनं तिच्या निष्पाप,निरागस चेहऱ्याकडे पहात होता. स्वत:शीच समाधानाने हसत होता.

थोड्या वेळात ती इच्छित स्थळी पोहोचली.
दोघं बराचवेळ समुद्रकिनाऱ्यावर बसली. सांजवारा अंगाशी खेळत होता. नभात मावळतीच्या रंगांची रंगपंचमी सुरु होती. दिवसा डोळे दिपवणारा तेजोगोल अगदी मलूल झाला होता. पाहता पाहता पाण्यावर टेकत, आपल्यातच जिरु लागला..तरीही पाण्याशी न स्पर्श करता..अद्भूत..अगम्य तरीही लोभसवाणं द्रुश्य.
क्षण दोन क्षण त्याची सोनेरी किनार दिसली अन् एकदम गडप झाली.

धनंजय व धनश्री, त्या मावळत्या सुर्यमण्डलाच्या साक्षीने, जोडीने बेतलेल्या गतवर्षांच्या पाऊलखुणा आठवत होते.

सगळं कसं नीटनेटकं,सुखी संसार..स्वत:च्याच आयुष्याचा हेवा वाटावा असं गुळगुळीत रस्त्यावरुन सरळ रेषेत चाललेलं आयुष्य. धनश्रीची सासू धनश्रीवर अतोनात माया करी आणि धनश्रीचे आईवडील जावयाची अधनंमधनं चौकशी करीत. जावई घरी आला की आपलं वय विसरुन त्याला चांगलंचुंगलं खाऊ घालण्यासाठी धावपळ करीत. सुर्यनारायण अस्ताला गेला. बीचवर पांगापांग झाली तसे ही जोडीही उठली.

दोघं एका उपहारगृहात जेवायला गेली. दोघांच्याही आवडीचे पदार्थ मागवले होते. गप्पा मारत जेवणं झाली. धना बेसिनकडे वळला..तिथे त्याचा एका लेडीला धक्का लागला.

तो सॉरी म्हणणार इतक्यात तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं..धना..ती जोरात ओरडली. सारी लोकं तिच्याकडे पाहू लागली..हो ती विदुलाच होती. विदुलाला पाहून धनाच्या अंगावरुन सर्रकन काटा आला.

विदुलाचं पुर्वीचं तेज गेलं होतं. डोळे खोलवर गेले होते. डोळ्यांखालची त्वचा ठार काळवंडली होती. वजन कमालीचं कमी झालं होतं. इतक्यात परीमल पुढे आली. तिने धनंजयला ग्रीट केलं.

“धना, बायकोला घेऊन आला असशील नं. दाखव ना आम्हाला.” परी म्हणाली.

धनाने विदुलाशी या दोघींची ओळख करुन दिली. परीमलनेही आपल्या नवऱ्याला त्यांची ओळख करुन दिली. ती दोघं जरा घाईत होती. धनाचं कार्ड घेऊन,आपलं कार्ड त्यांना देऊन..परत भेटू म्हणत निघून गेली. विदुला मात्र थांबली. धनश्री तिच्याशी भरभरून बोलत होती..जणू काही बालमैत्रिणीच भेटल्या होत्या. धना मात्र जाम अस्वस्थ झाला होता.

धनाने विदुलाला तिच्या लाइफपार्टनरविषयी विचारलं..विदुला ग्लासवर बोटं फिरवत बोलू लागली,”धना, पहिला जो एक मनात भरला होता तोच. त्यानंतर इतक्या जणांशी संपर्क झाला पण जोडीदार म्हणून एकही पसंतीस उतरला नाही. कदाचित मनातली पार्टनरची जागा..त्या पहिल्याने इतकी व्यापलेय की दुसरा कोणीही आला तरी माझ्या मनाचं कवाड उघडूच शकणार नाही.”

“आणि ही अवस्था गं तुझी. काय झालंय नेमकं विदुला?”धनाने विचारलं.

“त्याचसाठी तर इथे आले. त्या पहिल्याच्या आठवणीत रात्र जाता जात नसायची..लीकरच्या अधीन झाले. आता लिव्हर ड्यामेज झालंय. तिथे कोण बघणार मला म्हणून इंडियात आले,मम्मीपप्पांकडे..

इथे आल्यावर तब्येत सुधारत होती थोडी पण मम्मीपप्पा,माझी मोठी दीदी,जिजू,दीदीची मुलगी टिना सगळे मिळून एका रिलेटिव्हच्या लग्नासाठी गेले होते..उत्तरांचलमधे..तिथे बस कोसळली दरीत..मला अखेरचं बघता पण आलं नाही त्यांना पण टिनाचं दैव बलवत्तर..ती अगदी सुखरुप होती. पुसटशीही जखम नव्हती तिच्या अंगावर. टिना वाचणं हा एक दैवी चमत्कारच होता माझ्यासाठी.

मिट्ट अंधार सभोवताली असताना..टिनाचा तो मम्मा मम्मा असा आवाज..माझं काळीज पिळवटलं,माझ्या दीच्या आठवणीने.

धना, मी माझा आजार विसरुन टिनासाठी जगू लागले. ड्रिंक्सही कमी केले होते पण दुखणं आता बरं होण्याच्या पलिकडे गेलंय. डॉक्टरांच्या मते,मी आता काही थोड्याच दिवसांची सोबती आहे.

मला मरणाची भीती नाही रे धना पण माझ्या टिनाचं काय होणार? अवघी चार वर्षांची टिना..कोण सांभाळेल तिला..”एवढं बोलून विदुला परत वेड्यासारखी हसू लागली. ” या सगळ्याशी तुझा काय संबंध? मीपण किती वेडी ना..इतक्या वर्षांनी एक कॉलेजफ्रेंड भेटलाय आणि मी माझं रडगाणं लावून बसलेय.
सो सॉरी..धना..सो सॉरी..धनंजय आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बाय मिसेस धनंजय..गॉड ब्लेस द स्वीट कपल” असं म्हणून विदुलाने त्या दोघांचा निरोप घेतला.

घरी येताना धनंजयला गाडी चालवणंही सुचत नव्हतं.

त्याचा मेंदू भूतकाळातील पानांनी भंजाळून निघाला होता.

कँटीनमधे भेटलेली बिन्धास्त विदुला, परीक्षाहॉलमधे त्याची बाजू घेण्यासाठी पुढे सरसावलेली विदुला,त्याला कोषातून बाहेर काढणारी,बाहेरच्या जगाची ओळख दाखवणारी विदुला आणि त्याच्या प्रेमात पडली असताना देखील केवळ त्याच्या शब्दाखातर,शपथेखातर त्याच्या आयुष्यातून दूर झालेली विदुला आणि तद्नंतर त्याच्या आठवणींत स्वतःच्या जीवाची राखरांगोळी करुन घेतलेली विदुला..हे सारं आठवून त्याचं मन विद्ध झालं. महत्प्रयासाने तो डोळ्यात दाटलेले अश्रु रोखत होता.

ती अख्खी रात्र धनंजय तळमळत होता. धनश्रीला कळत होती, त्याच्या मनातली भावनिक आंदोलनं पण तो एवढा का व्यथित झाला आहे ते नेमकं कळत नव्हतं.

परीमलच्या कार्डवरील तिचा नंबर  धनश्रीने फोनमधे सेव्ह केला होता. धनंजयचा डोळा लागताच ती हॉलमधे आली. पहाटेचे चार वाजले होते.

हो ना करत तिने परीमलला फोन लावला,”सॉरी परीताई,मी धनंजयची मिसेस, धनश्री बोलतेय. तुम्ही गेल्यानंतर विदुलाताई बऱ्याच अपसेट झाल्या होत्या. त्यांची कहाणी फारच ह्रदयद्रावक आहे. तिथून घरी आल्यावर धनंजयही अक्षरश: तळमळत होते. आता कुठे डोळा लागला त्यांचा म्हणून मी फोन लावला तुम्हाला. मला हे सगळं काय आहे..प्लीज सांगाल का? मी काही मदत करु शकते का यात?”

परीमलने अगदी पहिल्या दिवसापासनं धना व विदुलाची मैत्री, विदुलाचा स्वभाव, विदुलाला धनाबद्दल वाटणारं आकर्षण, त्याचं प्रेमात झालेलं रुपांतरण,धनाचं विदुलावर प्रेम असुनही मान्य करण्यास न धजावणं,पाय मागे घेणं नं विदुलाला त्याने घातलेली शपथ..त्यानंतर विदुलाचं देश सोडून जाणं..हे सारं सांगितलं.

धनश्री मनात म्हणत होती,धना..मला वाटत होतं..मला तुझ्याबद्दल सारं काही माहिती आहे..पण तो माझा भ्रम होता..कदाचित तुला मी त्या पात्रतेची वाटली नसावी..मीही तुला याबद्दल कधीही विचारणार नाही.

या गोष्टीला आठवडा झाला असेल..एके दिवशी भल्या पहाटे परीमलचा फोन आला..”धना,विदुला इज सिरीयस. एडमिटेड इन सीटी हॉस्पिटल.”

धनंजय नुकताच उठला होता. या फोनने तो डोकं गच्च धरुन बसला. धनश्री धनाच्या जवळ येऊन म्हणाली,”चल धना, आपल्याला गेलं पाहिजे. विदुला वाट बघत असेल  तुझी,माझी.”

दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. विदुला शेवटचे श्वास मोजत होती. तीचा जीव अडकला होता.. टिनामधे. धनश्री विदुलाजवळ गेली..तिचा हात हातात घेतला..धनालाही जवळ बोलावलं. धनाने त्या दोघींच्या हातावर हात ठेवला. धनश्री म्हणाली,”विदुलाताई, तुमच्या टिनाचा सांभाळ आम्ही करू. तुम्हाला वचन देतो.”

धनश्रीने टिनाची जबाबदारी घेते म्हंटल्यावर विदुलाच्या चेहऱ्यावरचा ताण निवळला. विदुलाने मंदसी ओठांची हालचाल केली न सुखाने डोळे मिटले.

छोट्या टिनाला काहीच समजत नव्हतं. ती विदुलालाच मम्मा समजत होती.मम्मा कुठे गेली..सारखी परीमलला विचारत होती. धनश्रीने टिनाच्या गालांवरुन हात फिरवला. तिचे गाल अश्रु सुकल्याने खरखरीत झाले होते.

धनश्रीने टिनाला घट्ट कवटाळलं.  टिना तिला ओळखत नव्हती पण यासमयी तिला जो मायेचा स्पर्श हवा होता,तो तिला धनश्रीच्या मिठीत मिळाला. ती एवढीशी पोर, धनश्रीला मम्मा मम्मा म्हणत तिच्या डोळ्यांत ओळख शोधू लागली.

धनंजय हताशपणे हे सारं पहात होता. कोणत्या अधिकाराने तो धनश्रीला सांगणार होता की एकेकाळच्या माझ्या प्रेयसीच्या भाचीचा सांभाळ कर. तो अगदीच असहाय्य,अगतिक झाला होता.

धनश्रीने मात्र आपल्या पदराने टिनाचे डोळे पुसले न टिनाला म्हणाली..”टिनुबाळा,तुझी विदुमम्मा बाप्पाकडे गेली. जाताना मला सांगून गेली की माझ्या टिनूला सांभाळ. आता मी तुझी नवीन मम्मा. तू आता आमच्याघरी रहायचं.”

धनंजय, धनश्रीने टिनाला आपल्या कुटुंबातव आणलं.

धनंजयने त्या रात्री धनश्रीचे पाय धरले. धनश्रीने त्याला उठवलं,”धना,असं रे काय करतोस. अरे,टिनाचं मात्रुत्व सांभाळून मी काही विशेष करतेय असं मुळीच नाही. आम्हा स्त्रीयांत आईपण असतं रे जन्मजात..ती बिचारी आईविना पोर..मी माझ्या पदराखाली घेतली इतकंच.

धना विचार करत होता..भूतकाळातील घटनांचा..’त्यावेळी विदुलाला चारेक वर्ष थांब म्हणून सांगितलं असतं तर कदाचित विदुलाने समजून घेतलं असतं..माझी वाट पाहिली असती..आणि आज ती या जगात असती. तिच्या या अकाली मरणाला माझं बुजरेपण,स्वार्थीपण कारणीभूत ठरलं..विदुला माझ्यासारख्या स्वार्थी माणसासाठी दु:खात बुडाली..तिचा अंत झाला..न् दुसरीकडे ही माझी धर्मपत्नी..जी ना नात्याचं न गोत्याचं असलेल्या  या एवढुशा जीवाला सांभाळायची जबाबदारी घेतेय..खरंच या स्त्रिया वेड्या असतात..मी फार खुजा आहे..या दोघींपुढे.’

थोड्याच दिवसांत टिना,धनाच्या दोन बछड्यांची लाडुली ताई बनली. धनाची आई आधी टिनाच्या येण्याने, लोक काय म्हणतील या विवंचनेत होती खरी पण धनश्रीने तिचीही समजूत घातली.

टिनाला कधीच आपण कुणी वेगळे आहोत असं त्या कुटुंबात जाणवलं नाही. आईची माया,बापाची सावली,आज्जीचे लाड,भावंडांची थट्टामस्करी यात टिना कधी मोठी झाली कुणाच्या लक्षातही आलं नाही.

टिनाच्या लग्नावेळी तिचे हे भाऊमंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पाहुणेमंडळींच्या स्वागतासाठी उभे होते.  तिला निरोप देतेवेळी धनंजय दु:खावेगाने वेडापिसा झाला होता..

धनश्रीने विदुलाचा फोटो टेबलवर ठेवला. त्याला बोटांनी चाचपून म्हणाली,”विदुलाताई, तुम्हाला दिलेला शब्द आम्ही  पाळला. लेक सासरी चालली आहे. तिला आशीर्वाद द्या.”

समाप्त

..©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *