Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️राधिका कुलकर्णी.

रमा आणि रमण ज्या दिशेनेआश्चर्याने बघत होते त्याच दिशेने एक काळा ठिपका दुरून जवळ जवळ येताना दिसत होता. तीच त्याची आई असावी. ती सगळे बळ एकवटून आपल्या पिल्लाच्या ओढीने आवाजाच्या दिशेने धावत येत होती. जसजशी ती जवळ येऊ लागली पाडस आनंदाने उड्या मारू लागले.
आता गाय पिल्लाच्या जवळ आली आणि त्याच्या सर्वांगाला प्रेमाने चाटू लागली.पिल्लाच्या प्रेमाने तिच्या अचळातून दूधाच्या धारा स्त्रवू लागल्या. पिल्लू जवळ जाऊन आईला लुचू लागले. तो माय लेकाराच्या भरत भेटीचा विहंगम सोहोळा पाहून रमाच्या डोळ्यातुनही धारा वाहू लागल्या तर रमण टाळ्या वाजवून नाचून आनंद व्यक्त करू लागला. वासरू आईचे दूध पिऊन तृप्त होत होते तसतसे गाईच्या चेहऱ्यावरही समाधान विलसू लागले. ती शांत उभी पाहून रमाने पून्हा गाेबारसाची एकत्रीत पूजा केली. त्यांना आरतीने ओवाळून डाळ गूळ खायला घातले.रमणलाही काहीतरी आठवले.आईचा हात सोडून तो घरात गेला.घराच्या देवडीत कागदात गुंडाळलेला सकाळचा भाकरीचा तुकडा घेऊन त्यानेही तो गाईला खाऊ घातला. गाईने मटामटा सर्व साफ केले. तसा रमणही आनंदाने उड्या मारू लागला. रमा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. घरात तर भाकरी शिल्लक नव्हती मग ही भाकरी कुठून आली?
त्यावर रमण लगेच म्हणाला,
” सकाळी तू मला खायला दिलेली भाकरी ह्या पिल्लाला दिली पण तो खातच नव्हता म्हणुन मी तिला कागदात गुंडाळून देवडीत ठेवली म्हणजे नंतर भूक लागली तर त्याला द्यायला होईल ना., बघ आली ना कामी! नाहीतर दुसऱ्या कोणीतरी खाऊन संपवली असती. “
आपल्या लेकराचा गोड पापा घेत गाईला नमस्कार करून ती घरात परततच होती की दारात एक आलिशान कार थांबलेली दिसली.
कोणीतरी वाटसरू पत्ता विचारत आले दिसतेय म्हणत ती तिथेच थबकली. गाडीतून ऊंची साडी नेसलेली एक सुंदर स्त्री साेबत एक तितकाच उमदा तरूण पुरूष गाडीतून खाली उतरले.
अंधारात चेहरे नीट दिसत नव्हते पण ते रमेच्याच दिशेने येत होते.रमा चक्रावून त्या दोन आकृत्यांकडे निरखून पहात विचार करत होती की हे कोण लोक आहेत आणि इकडे का येताहेत????”
जसजसे ते जवळ आले तसे रमा चकित झाली.
ती ज्या मालकीणबाईंकडे पूर्वी काम करायची (म्हणजे कोरोनाच्या आधी) त्या तिला शोधत आल्या होत्या. तिला मनोमन आश्चर्यच वाटले की त्यांना ह्या नव्या जागेचा पत्ता कोणी दिला?
दिव्यामॅडम आणि देवसाहेब दोघेही आता तिच्या अगदी निकट पोहोचले.
जवळ येताच दिव्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
“काय ग रमाऽऽ असा फोन बंद का ठेवला आहेस तू..? काल पासुन शंभरवेळा फोन केला पण तुझा फोन स्विच्ड ऑफच लागतोय. बर घरी जाऊ म्हणले तर तू घरही बदललेस. मग नवा पत्ता कळवायचास तरी नाऽऽ? आता कुठे कुठे शोधायचे गं तुला ऐन सणात? “
” तुझ्या नवऱ्याला श्रीहरीलाही किती फोन केले. तोही फोन उचलत नाही..काय चाललेय काय..हेऽऽ ? “

रमा मान खाली घालून निमुटपणे फक्त ऐकत राहीली. काय उत्तर देणार होती ती…!!
तेवढ्यात दिव्या पुन्हा म्हणाली,
” आता आम्हाला दारातच उभी करणारेस की आत पण बोलावणारेस ?”
आत्ता कुठे रमा भानावर आली. तिला वरमल्यासारखे झाले. एवढी मोठी बंगल्यात राहणारी माणसं….
कोणच्या तोंडाने त्यांना आत या म्हणावे.?? आत बोलावले तर बसायला वीतभरही मोकळी जागा नाही. पण तरीही तिने चटकन बाजेवर एक साडी अंथरून त्यावर दोघांना बसायला दिले. मग दिव्याने पून्हा विचारले,
” काय गं फोन का बंद तुझा ? “
रमाने कसनूसे तोंड करत सांगितले,
“आता काय सांगू मॅडमऽ, “फोनमधला बॅलन्स संपला तसा तो बंदच हाय.”
” माझी अशीही सगळी कामं सुटली मग मला काय करायचा फोन म्हणून म्या बंदच ठेवला. धन्याचा फोन चालू हाय. तेवढा बस होतो निरोप पाण्याला.”
” बरंऽऽ मग जूने घर का बदलले? “
त्यावर डोळ्यातले पाणी पुसत ती म्हणाली,
“त्या घराच भाडं थकलं होतं. घरमालक पैसे भरा म्हणुन तगादा करू लागला. तशातच पावसाने त्याची एक भिंत कोसळली मग मालकाने घर खाली करायचा तगादाच लावला. म्हणुन नाईलाजानं इकडं याव लागलं रहायला. हे माझ्या आईचं खोपटं हाय. सध्या ती बी गावी पोराकडं अडकली कोरोनामूळं म्हणून ती येऊस्तोवर इकडं राहतोय. ती आली की पुन्हा दुसरीकडं जाणं लागल. “
दिव्याचेही डोळे तराळले पण ते लपवतच ती म्हणाली,
” बरं ते सगळे जाऊ दे. मी काय सांगते ते ऐक
उद्यापासुन तू माझ्याकडं कामाला यायचेस. दिवाळी बिवाळी काही कारणं चालणार नाहीत हं मलाऽऽ. माझं ऑफीस सूरू झालेय आता. मला स्वैपाकापासुन सगळ्या कामाला तू हवीएस. श्रीहरी कुठेय गं दिसत नाही ? “
दिव्याने सहज इकडे तिकडे डोकवत विचारले.
“मॅडम त्याचं बी काम सुटलं. आता सकाळीच बाहेर पडतो. जे मिळलं ते काम करून रातच्याला घरी येतो. ज्या दिवशी पैसे मिळतात त्यादिवशी चूल पेटतीया,नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपतोय. काय करणार??
कोरोनानं लई कंबर मोडलं बघा गरीबाचं. “
रमाच्या डोळ्यातुन पाणी पाझरू लागले आपली दीनवाणी अवस्था सांगताना.
त्यावर दिव्या ही सावरत लगेच म्हणाली,
” बरं बरंऽ आता रडतच बसणारेस की आम्हाला चहा पण विचारणारेस? “
तिच्या ह्या बोलण्यावर रमाला काय बोलावे समजेना घरात तर दुधाचा पत्ता नव्हता कुठुन बनवणार चहा पण हे त्यांना कसे सांगणार..??
तिच्या मनात हे विचार चालू असतानाच देवही दिव्याकडे डोळे वटारून बघत होता. बिचारीची परिस्थिती काय अन् तु काय तिला चहा मागतेस असा त्या बघण्यामागचा हेतू होता.
त्यावर दिव्या रमाला लगेच म्हणाली,”चहा कर पण आम्हाला तो दूधातला चहा चालत नाही बरं का..आम्ही डाएटवाला चहा पितो माहितीय ना तूला…”
रमा आता अजून बुचकळ्यात पडली. तिच्याकडे तो डिपवाला पाऊच कुठुन असायला..पण तिची अडचण दिव्यानेच सोडवली.
“हे बघ मी सांगते तसा चहा कर…
पहिल्यांदा पाणी उकळायला ठेव.त्यात अगदी पाव चमच्यालाही कमी चहापत्ती टाक. हम्म्ऽऽऽऽ..आता त्यात थोडं आल किसून घाल असेल तर. नसेल तर राहूदे. “
“हो हो,आहे की,आत्ता घालते.”
रमाने थोडं आल किसुन त्यात घातलं.
“सोनेरी रंग येताच आच बंद कर. आता तो चहा गाळ दोन कपात आणि दे आम्हाला. “
रमाला तेवढ्यात दुरडीत एक लिंबू दिसले.
“मॅडम लिंबू पिळू का त्यात थोडे.?”
“असले तर चालेल. नसले तर गरज नाही.”
” मॅडम आहे की.थांबा पिळते. “
तिने लगेच पाव फोड दोन कपात पिळुन तो चहा दोघांना दिला.
मिटक्या मारत चहा संपवताच दिव्या म्हणाली, “श्रीहरीला फोन लावून बोलावून घे. आम्हाला त्यालाही भेटायचेय.”
“मॅडम फोनमधे बॅलन्स नाही माझ्या..”
” बघ फोन लावून लागेल आता.”
तिने नंबर लावल्याबरोबर लागला.तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. पण दिव्याने तेवढ्या वेळात तिचा फोन रिचार्ज केला होता.
“येतोय मॅडम,रस्त्यातच हाय.”
थोडावेळ ह्या त्या गप्पा झाल्या तसा श्रीहरी पण घरी आला. गमचाने अंगाचा धूळ खकाणा आणि घाम पुसतच तो समोर बसला.
तसे देव साहेब बोलले,
” हे बघ श्रीहरी माझ्या ऑफीसमधे चपराशाची जागा रिकामी आहे तर तू येणार का तिकडे उद्यापासुन ?
मला खूप नड आहे सध्या प्रामाणिक काम करणाऱ्यांची.
महिन्याला दहा हजार देईन. “
घर चालत काम आलेले पाहून अत्यानंदाने श्रीहरीच्या डाेळ्यातून धारा बरसू लागल्या. तो देव साहेबांच्या पायावर डोक टेकवत म्हणाला,
” नड तर माझी हाय साहेब. सहा महिने झाले दिवसाआड चूल पेटतीय घरात. लेकराच्या पोटी घालायला अन्नाचा दाणा नाही की डोक्यावर छप्पर नाही. फार वाईट हाल चाललेत होऽऽ.”
” तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. तुमचे उपकार कसे मानू काही कळत नाही. फार कृपा झाली साहेब गरिबावर. “
पायावर डोकं ठेवून श्रीहरी मनातली व्यथा बोलत होता.

“आणि होऽऽ,बरं का गं रमाऽ आमचे आऊट हाऊस आता रिकामेच पडलेय. तुम्ही तुमचे बिऱ्हाड तिकडेच हलवा. म्हणजे मला सारखेसारखे फोन करायला नको…काय!! मग उद्याच सगळे सामान घेऊन तिकडे या ..”
” आणि काय रे रमण आल्यापासुन बघतेय असा का आईला बिलगून बसलाय. दिव्या काकूला विसरलास होय रेऽऽ..?”
” हे बघ दिव्याकाकुने तुझ्यासाठी काय आणलेय…!!!”
म्हणतच दिव्याने त्याला गाडीकडे नेले.खूप सारे बॉक्सेस घेऊन दोघेही पुन्हा घरात आले. दिव्याने सगळ्यांसाठी कपडे,फराळ,रमणसाठी फटाके,मिठाई आणि त्याच्या आवडीचे चित्रकलेचे सर्व साहित्य आणले होते.
श्रीहरी रमा फक्त भिजल्या नेत्रांनी दोघांकडेही कृतज्ञतेने बघत होते.
रमाच्या डोक्यात लख्खकन विचार तरळला.
त्या कामधेनूचेच हे आशीर्वाद नसतील नाऽऽ..!!!!
वसूबारसेच्या संध्याकाळी जशी तिची पावले ह्या दाराला लागली तसा कधी नव्हे ते हा ‘कांचनयोग’ घर चालत आला.
दिव्या आणि देव साहेबांच्या रूपाने कामधेनूनेच आशिर्वादांची बरसात केली होती ह्या अंगणी जणू.
रमा डोळे टिपतच परसाकडे धावली.
गाय आणि तिचे बछडे त्यांची कृपादृष्टी टाकुन केव्हाच अंतर्धान पावली होती.
~~~~(समाप्त)~~~~~~
©️®️राधिका कुलकर्णी.

कशी वाटली कांचनयोग कथा?
हे कमेंट्स द्वारे नक्की कळवा.
धन्यवाद.
@राधिका.