Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️राधिका कुलकर्णी.

“आईऽऽ…आईऽ ते गाईचं पिल्लू बघ ना केव्हाचे हंबरतेय मोठमोठ्याने. त्याला भूक लागलीय का

गंऽऽ?”

” आपण त्याला काही खायला देऊयात का ! “

रमण रडवेल्या सूरात निरागसपणे आपल्या आईला विचारत होता. त्याची अनुकंपा पाहून रमाचे आतडे पिळवटले.

दिवाळी सुरू झाली आज वसूबारस पण घरात अन्नाचा दाणा नव्हता. कोरोनामूळे कामं सुटली होती. नवरा म्हणजेच श्रीहरीचेही कारखान्याचे काम बंद पडलेले. दिवसभर मोलमजूरी करून जे मिळेल त्यात किडूकमिडूक सामान आणून त्यातच कसेबसे दिवस ढकलणे चाललेले होते. आता लहानग्या लेकराची कशी समजूत घालावी?? रमाला काही केल्या समजत नव्हते.

उसने हसू चेहऱ्यावर आणत ती रमणला म्हणाली,

” अरे त्याची आई हरवलीय नाऽऽ म्हणून ते आपल्या आईला शोधण्यासाठी जोरजोराने हंबरतेय. तु नाही का मला हाका मारतोस तसेच. मिळेल हंऽऽ! त्याची आई लवकरच. चल तू ये बघू. दोन घास खाऊन घे आणि दारातच बैस. मी जरा पलिकडच्या आळीतील राणेबाईंची जास्तीची भांडी घासून येते. तू घरातच बैस.. घर सोडून जाऊ नकोस कुठे…”

रमणची खोटी समजूत घालत त्याला भाकरी वाढून रमा डोक्यावरचा पदर सावरत कामाला गेली सुद्धा.

इकडे त्या पाडसाचे करूण रूदन ऐकुन रमणला काही जेवण जाईना.त्या लहानग्या वासराची सैरभैर अवस्था बघून तो रडवेला झाला. आपल्या ताटातली भाकरी घेऊन पळतच तो दारापूढे थांबलेल्या वासराजवळ आला. त्याच्या अंगावर मायेने हात फिरवताच ते थरथरले. रमणने बघितले तर वासराच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. त्याला खूप वाईट वाटायला लागले.

बिचारे किती वेळचे असेच भटकतेय. देवा त्याची आई त्याला लवकर मिळू दे. मनातल्या मनात प्रार्थना करत त्याने आपल्या हातातली चतकोर भाकरी वासरासमोर धरली. त्याने दोन तीनदा हुंगून तोंड फिरवले. कदाचित एवढा लहान तूकडा हातातून खाता येत नसेल म्हणून रमणने तो जमिनीवर त्याच्या पुढ्यात ठेवला पण त्याने तरीही तोंड लावले नाही उलट पुन्हा हंबरडा फोडत ते समोरच्या दिशेने पळत सुटले.

दर दोन चकरा मारल्या की ते पुन्हा रमणच्या घरापूढे येवुन विसावे. रमणने दिलेली भाकरी त्याने खाल्ली नाही म्हणून रमणने ती उचलून कागदात गुंडाळली आणि देवडीत ठेवली.

मग विरंगूळा म्हणुन चूलीतल्या राखेतला एक कोळसा घेतला आणि कागदावर वासराचे गाई सोबतचे चित्र काढण्यात तो मग्न झाला.

       ~~~~~~~

राणेबाईंचे काम संपवून रमा घरी आली तेव्हा रमण दारातच झोपी गेला होता. तिने त्याला उचलले आणि घरात बाजेवर निजवले तोच त्याची झोप चाळवली आणि तो डोळे चोळतच विचारला,” गेले की आहे ते पिल्लू अजून?

त्याला त्याची आई मिळाली का गं?”

“नाही रे राजाऽ..ते काय बिचारे थकून दारातच निजलेय.”

आता एव्हाना दूपार टळून गेली होती.तिने आपल्या ताटात डोरलीत उरलेली भाकर वाढून खायला सुरवात करणार इतक्यात तिला सहज आठवले,

“रमणऽऽ  जेवलास का रे तू?

मी जाताना वाढून गेले होते ना?”

त्यावर रमणचा चेहरा रडवेला झाला.तिने ताट बाजूला सारत लेकराला आपल्या कुशीत घेतले तसे त्याचे डोळे पाणावले. रडवेल्या चेहऱ्याने तो म्हणाला,

“आईऽऽ गं मी तूला न विचारता माझी भाकरी त्या वासराला दिली. मला भूक लागली तर तू तरी आहेस नाऽऽ पण त्याला तर बोलताही येत नाही आणि द्यायलाही कोणीच नाही. सकाळपासून आईला शोधून शोधून त्यालाही भूक लागली असेल पण ते कूणाला सांगणार? म्हणून मी माझी भाकर त्याला दिली पण त्याने तोंड पण नाही लावलं गंऽऽ….!!”

“आईऽऽ त्याला त्याची आई मिळेल ना गंऽऽ?”

रमण बोलता बोलताच रडू लागला.

रमाला एकीकडे आपल्या लेकराचे कौतूक वाटत होते तर दूसरीकडे ते आज उपाशीच आहे म्हणून दू:ख वाटत होते. तिने त्याला जवळ घेतले आणि समजावले.

” हे बघ तु ना जेव आणि मग देवबाप्पाजवऴ मनोभावे प्रार्थना कर. लहान मुलांचे देवबाप्पा लगेच ऐकतो. बघ त्याला त्याची आई नक्की परत मिळेल. “

आईच्या बोलण्याने रमणची हिरमुसलेली कळी खूलली. त्या आनंदातच त्याने आईच्या हाताने दोन घास खाल्ले आणि तिकडेच बागडू लागला.अर्ध्या कोरीतली चतकोर रमणला देऊन उरलेल्या चतकोर भाकरीला तिखट मिठाच्या पाण्यात कुस्करून तिने तशीच ती घश्याखाली उतरवली.

आता ऊन्हं कलून संध्याकाळचा संधीप्रकाश सगळीकडे विखूरला होता.तिने देवापुढे उदबत्ती ओवाळली आणि मनातली खंत डोळ्यावाटे नकळत पाझरू लागली.

” देवाऽऽ दर दिवाळीला लेकराला निदान शर्ट तरी घ्यायचे ह्यावेळी तर कोरोनाने अशी कंबर मोडली की तूला दिवाबत्ती करायलाही घरात तेल नाही तर दारात पणती कशी लावू??

” तू तर सगळेच जाणतोस. माझी अडचणही समजून घे हं देवा. वसूबारसेच्या दिवशी माझ्या दारी एक पाडस आईविना भुकेले पडलेय. निदान त्याची तरी दया कर. आज खरे तर त्यांना डाळ गूळ खाऊ घालून पूजा करायला हवी पण मी इतकी कमनशिबी हाय की दारासमोर गोबारस असुन माझ्या घरात त्याला चारायला पसाभर धान्य नाही.”

ती डोळे मिटून प्रार्थना करत असतानाच रमण धावत धावत आईला बिलगला. तो रडून रडून सांगत होता.

” आई बघ ना मी बाप्पाला प्रार्थना करून किती वेळ झाला तरी बाप्पाने अजून त्याची आई शोधून नाही दिली. तु सांग ना गं बाप्पाला की रमणचे ऐक म्हणून. ते पिल्लू बघ जमिनीवर कसे पडलेय.मला खूप कसेतरी होतेय गंऽऽ. ” रमणच्या धक्क्याने देवाच्या देव्हाऱ्याला धक्का लागला आणि रमाच्या ओंजळीत एक कागद पडला.तिने काय म्हणुन उघडून पाहिले तर कागदाच्या घडीत पन्नासची नोट होती. आनंद आणि आश्चर्य एकाचवेळी चेहऱ्यावर पसरले रमाच्या.

“देवा तुझी करणी अगाध आहे रेऽऽ.!! वेळेला, अडचणीला लागले तर असु द्यावेत म्हणून मीच कधी तरी मागे सरकवलेले पैसे तु मला असे परत केलेस होय रेऽऽ! “

” खरच तु गरीबांचा कैवारी आहे. आत्ता जाते अन् वाण्याच्या दूकानातून तेल,डाळ-गूळ आणते.”

” माझी वसुबारसेची पूजा तु चुकवू नाही दिलीस ह्या बारीलाही. खरच तुझे आभार मानावे तितके कमी हाय..असाच पाठिशी रहा सतत आम्हा गरीबांच्या.”

पदराने डोळे पुसत रमणला बोटाला धरून ती घाईघाईने वाण्याच्या दूकानात गेली. हवी ती सगळी सामग्री गोळा करून लगबगीने घरी आली.

दोन पणत्या दारी लावल्या. रमणने कोळशाने काढलेल्या गाय गोरसाचे चित्र देवघरात मांडून त्याची पूजा केली.  त्यालाही डाळ गूळाचा नैवेद्य चढवला. एव्हाना सूर्य मावळून आता अंधार पडायला सुरवात झाली होती. तिने एका ताटात गोबारस पुजेची सर्व तयारी केली.

गूळ-डाळ,पाणी,हळदीकुंकवाचा करंडा, थोडी परसाच्या अबोलीची दोन फूले सगळी तयारी करून त्या बछड्यापाशी आली. आईविना ते पाडस आपल्या आईला शोधून थकून मलूल होऊन पडले होते. ती त्याच्या जवळ गेली. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. त्याने किंचित थरथर केली अंगाची पण उठले नाही जागचे. तिने त्याच्या कपाळावर लाल गंधाचा टिळा लावला.त्याच्या पुढल्या खूरांवर पाणी टाकले. त्याची पूजा केली. त्याला हाताच्या ओंजळीने डाळगूळ भरवू पाहिले पण त्याने फक्त हुंगून मान फिरवली.

तेवढ्यातऽऽऽ …..

तेवढ्यात काय झाले माहित नाही, त्याने त्याचे लांब लांब मोठे कान टवकारून टुणकन उठून उभा झाला.

टपोऱ्या डोळ्यांनी रस्त्याच्या विरूद्ध दिशेकडे बघत मोठ्याने हंबरायला सुरवात केली. थोड्याच वेळात दुरून कुठूनतरी तसाच हंबरायचा अस्पष्ट ध्वनी कानी येऊ लागला.

रमा आणि रमणनेही त्या दिशेने बघितले आणि काय आश्चर्य !


कांचनयोग -1

©️®️राधिका कुलकर्णी.

रमा आणि रमणला कशाचे आश्चर्य वाटले?

त्या पाडसाला त्याची आई मिळेल का?

रमेच्या आयुष्यात पूढे काय होणार?खरच वसूबारसेची पूजा तिला फळद्रूप होणार का?

हे  सगळं वाचायची उत्सुकता असेल तर

काचनयोग अंतिम भाग-२  जरूर वाचा आणि आपले अभिप्राय कळवा..