Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सूर्य आपला राजपाट आवरून परतीला निघालेला. समुद्राला जड जातंय निरोप देणं. लाटांतून व्यक्त होतेय अगतिक खळबळ. या निरोप समारंभाचा कर्ता अलिप्त राहून साक्षी भावाने पहात तो पाठमोरा उभा. तो माझा परममित्र, माझा अंतर्यामी सखा, माझं आराध्य. आज मला जाणवतोय, तो त्याचा धीरगंभीरपणा. आज मुकुट नाही, अलंकार नाहीत, राजसी वस्त्रही नाहीत. साधसं शुभ्र धोतर , त्यावर तसेच उत्तरीय, इतकंच . स्वात्ममग्न समाधी. कधी भंगच करू नये, अशी. पण आज्ञा आहे, तेव्हा कर्तव्य तर करावंच लागणार.

“स्मरण केलंत देवा,”. त्यानं माझ्याकडे वळून पाहिलं . त्या दोन नेत्रात विश्वाचं कारुण्य सामावलेलं . अन याच कारुण्याचा विरोधाभास दर्शवणारं त्याचं स्मितहास्य. ओठ विलग होतात, न होतात, असं.

“उद्धवा, स्मरण हेच आमंत्रण.” त्याच्या मुखातले शब्द; जीवाचे कान करून ऐकावेसे वाटतात.

“आमंत्रण कसलं देवा, आज्ञा म्हणा.”

“आज भक्त म्हणून नाही, सखा म्हणून बोलावलेय तुला.”

कशासाठी बोलावले त्याचा अंदाज आला आहे मला. पण अज्ञानातले सुख अनुभवायचं आहे . ज्ञान दुख देणारं असेल तर अज्ञान काय वाईट. सत्याचा कटू घोट घेणं इतकं सोपं नसतं. पण हा घोट घ्यायला मीच का? अर्जुन, विदुर, सुदामा, बाकीचे पांडव, सगळेच तुझ्या किती जवळचे, मग केवळ मीच का?

मन कळलेय त्याला. उत्तरादाखल मंद स्मित. पण या अबोल स्मितातून त्याला बरंच काही बोलायचं आहे, हे स्पष्ट जाणवतंय. “बोल कृष्णा, मनमोकळे पणाने बोल. अरे मेघ आपले जलभार रिते करूनच पूर्ववत होतात, हे काय मी तुला सांगायला हवं? “ माझ्यातल्या मित्राने माझ्यातल्या भक्ताला जरा बाजूला ठेवलंय.

“उद्धवा, मीच निर्माण केली ही  सृष्टी, आणि या सृष्टीचे सगळे नियम. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं अविरत नृत्य म्हणजे हे नियम. या नियमाला कोणीच अपवाद नाही, अगदी मी सुद्धा. कार्य पूर्ण झालं आता इथलं.”

गळा भरून आला, शब्दांनी वैर धरलं. डोळे बोलताहेत आता, पाण्याची घागर काठावर नेऊन. कसे कोण जाणे, पण धाडस एकवटून एवढेच शब्द मुखावाटे बाहेर पडले, “पण देवा, तू तर पूर्ण पुरुष !” पुढे काही बोलताच आले नाही. सारी स्पंदने त्याच्या ताब्यात, तिथे शब्दांची काय कथा.

यावेळी स्मित अधिकच गहिरे पण विषादाची चन्द्रकळा लेऊन.

“उद्धवा, पूर्ण पुरुषाचे अपूर्णत्व ठाऊक आहे तुला?” मती कुंठीत झाली, हा प्रश्न ऐकून. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.

“अपूर्ण राहतं त्याचं मन……”

मी निर्णय करू शकत नाहीये. विश्वाचा नियंता त्याच्या अनावर भावनांचे मोती माझ्या ओंजळीत ओततोय, त्याचा आनंद मानू, की त्याच्या महाप्रयाणाची वार्ता त्याच्या भक्तांना देण्याची जबाबदारी त्यानं माझ्यावर टाकलीय याचं दु:ख मानू.  

“उद्धवा, तुला तर ज्ञात आहे, मी जन्मलो, ते देवकी माता आणि पिताजी वसुदेवांच्या कुशीत. पण माझ्या जन्मापूर्वीच माझ्या भावंडांचा बळी गेला. दादुंचा चा सहवास मला मिळाला, पण ते मोठे असूनही मोठेपणा मात्र माझ्या अंगावर येऊन पडला. योगमाया भगिनी म्हणून लाभली, पण तिच्याकडून कधीच राखी बांधून घेण्याचं सुख लाभलं नाही. असीमित शक्ती ती, पण माझ्या लीलांसाठी तिनं स्वत: ला सीमित करून घेतलं. हा सगळा मायेचाच तर खेळ. माता पित्यांना माझ्या संगोपनाचे सुख तरी मिळाले का?

त्याचे हक्कदार ठरले यशोदामैया आणि नंदबाबा .” त्याला थांबवत मी मधेच बोललो,

“पण कृष्णा, खरा भाग्यवान तू. कित्येक अभागी जीव मातृ पितृ सुखाला वंचित राहतात, पण तुला तर ते दुप्पट मिळालं.”

“ खरंय तुझं. पण यशोदा मैया आणि नंद बाबांना माझा वियोग सहन होणार नाही, इतक्या मोहमयी अवस्थेत सोडून यावं लागलं. उद्धवा, तुला एक सांगू? गोकुळातला कान्हा गोकुळातच राहिला, अन मथुरेतल्या कृष्णाला निराळंच रूप धारण करावं लागलं. गोकुळ, बासरी, मोरपीस, अन ….राधा….सारे काही मागे पडलं.” राधेच्या उल्लेखावेळी त्यानं सोडलेला नि:श्वास जाणवला मला.”

बासरी सुटून शस्त्र हाती आले, तिथेच राधाचं अस्तित्व संपले .ती म्हटलं तर माझी सावली, म्हटलं तर माझे सूर….व्यक्त अव्यक्ताच्या सीमा रेषेवरची राधा , माझ्या नजरेतून पाहिली, तरच दिसते.”

“कंस माझा मामा, पण त्याला मारण्याचं काम मला करावं लागलं . त्याचे कधी ना कधी डोळे उघडतील, म्हणून किती संधी दिल्या मी त्याला. पण अहंकारानं त्याचं बोट धरून त्याला मृत्यूकडे नेलं. आपल्या लोकांना मारणं किती कठीण असतं !”

मला फक्त ऐकत राहावंसं वाटतंय आज.

“पांडव माझे बंधू, पण सखे अधिक. अर्जुनाशी तर जरा जास्तच स्नेह. इतरांचा रोष ,भेदभावाचा आरोप , हे सगळं ओढवून घेतलं मी त्यापायी. भावना तर माझ्या सर्वांशी सारख्याच होत्या ना. कौरव तरी माझे शत्रू कुठे होते? पाच पांडवांची पत्नी द्रौपदी, तीही माझ्याकडेच मन मोकळं करायची. ती कारणीभूत ठरली धर्मयुद्धाला, पण घडवून तर मीच आणलं होतं.”

“ उद्धवा, तुझ्या लक्षात आले का, या युद्धात माझा कसलाही स्वार्थ नव्हता. राज्यासाठी युद्ध होतं, पण पांडवांच्या. मी राजेपण उपभोगलं, ते द्वारकेत. माझी सारी कर्तव्य संपल्यावरच. मनाच्या तंतूंनी विणली होती मी द्वारका. पण तिच्या मोहात अडकलो असतो, तर कोळयात आणि माझ्यात फरक तो काय?

वधूपित्याच्या अंतकरणाने द्वारका जलाधीन केली. अपूर्णत्व आणि वियोग, हे तर मनुष्याचं भागधेय. मानवी अवतारात ते मलाही कसे चुकणार. देवत्वाचा असामन्यपण लेऊन मनुष्याचं सामान्य पण सांभाळणं ही तारेवरची कसरत आहे. जन्मोजन्मी साथ देईन असं वचन दिलं होतं मी रमेला, पण या जन्मात माझी साथ अशी तिच्या वाट्याला आलीच नाही, जी काही होती, ती तिला वाटून घ्यावी लागली.”  उत्तुंग हिमालायाच्या कुशीतला झुळझुळणारा झरा पाहत होतो मी. आपल्याच विचारात हरवला होता तो, पण भानावर आणून काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरंही  मिळवावीच लागणार होती.

“पण देवा, तुमच्या भक्तांचा बहिर्मय प्राण आहात तुम्ही.”

“होय उद्धवा, तू म्हणतोस ना, तुलाच का निवडलं मी आज? ऐक. सर्व भक्तांचा मी सखा आहे; पण माझा सखा तू आहेस. तुझी सद्सद्विवेक बुद्धीच तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल.”

माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, मला नेमकं काय करायचं आहे, हेच त्याला या वाक्यातून सूचित करायचं होतं.

“आम्हा भक्तांना आता याची जाणीव ठेवायची आहे, की तू असणार आहेस गीतेच्या रुपात इथेच.” माझा भार हलका झाला, अन समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. खांद्यावरून मोरपीस फिरावं तसा अलगद थोपटून स्पर्श केला त्यानं, अन पुढे निघाला. आज पहिल्यांदा आणि शेवटचं आमच्या वाटा निराळ्या आहेत. केसरिया भैरवीनं आसमंत व्यापून गेला आहे…