Ritbhatmarathi

Search
Close this search box.

फोनवर आलेला निनावी नंबर पाहून वकील मनोहर रावांना आश्चर्य वाटले , त्यांनी फोन रिसीव केला. 

“….हॅलो, कोण वकील साहेब ना”

‘ हो आपण……’

“मी प्रकाश, सुधाकर आठवले यांचा धाकटा मुलगा बोलतो आहे.”

“हं बोला ,कसा काय फोन केला??”

“तुम्हाला कळल असेलच,….बाबांचे मागच्या आठवड्यात निधन झालं…..

 मी व माझा मोठा भाऊ प्रमोद दोघं अमेरिकेतून आलो आहोत….. बाबांच्या जमीन -संपत्ती वगैरे बाबत बोलणं—-“

 “हो, हो समजलं. संध्याकाळी सातच्या सुमाराला, मी येतो तिकडं, मग बोलू….,”  म्हणत मनोहर वकीलांनी फोन कट केला.

त्यांना आठवलं, दोन महिन्या आधीच तर सुधाकररावां कडे ते गेले होते.

सुधाकरराव एकटेच राहत असत. तब्येत जरा नरम गरम असायची, त्यामुळे त्यांना मृत्युपत्र तयार करायचे होते.

सुधाकरराव बडी असामी होती, बरीच संपत्ती जमा केली होती. त्याची रितसर वाटणी करायची होती.

संध्याकाळी वकील मनोहर आठवले यांच्या बंगल्यावर पोहोचले.

घरात दोघ मुलं धाकटा प्रकाश व मोठा भाऊ प्रमोद व त्यांच्या दोघांच्या बायका एकूण चारच जण होते .

वकील साहेब ‘चहा-कॉफी की सरबत घेणार’ प्रकाश नी विचारले.

“नाही -नाही काही नको….. फक्त पाणी द्या….. आणि हो,  शेखर ला नाही बोलावले का?”

“का बरं, त्याचे काय काम?”

“बोलवून घ्या, सांगतो,”….  पाणी पीत मनोहर वकील म्हणाले.

थोड्यावेळाने शेखर जरा बिचकत बिचकतच आला, प्रकाश व प्रमोदने त्याला ये, बस ही म्हंटले नाही.

“बस शेखर,” वकील साहेब म्हणाले.

” हे  इच्छापत्र म्हणजेच मृत्युपत्र तुमच्या वडिलांनी उर्फ सुधाकर आठवले यांनी केले होते,वील कायदेशीर रजिस्ट्रर्ड आहे,… व त्यांनी त्याची कस्टडी आणि तरतूद माझ्याकडे सोपवली आहे…… हे  ते इच्छापत्र” आपल्या ब्रीफकेस मधून इच्छापत्र काढत वकील साहेब म्हणाले ….”मी हे तुम्हाला आता वाचून दाखवतो”.

सुरवातीच्या कायदेशीर मायन्या नंतर मनोहररावांनी लिहिले होते……

‘प्रिय प्रकाश व प्रमोद ,

तुम्ही नेहमी सुखाने रहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.’

‘मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण संपत्तीचे माप नेहमीच आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा झुकते असते हे मी व तुमची आई दोघही समजून चुकलं आहे.’

‘तुम्ही माझेच अंश आहात या नात्याने माझ्या या संपत्तीवर तुमचा पूर्ण अधिकार आहे. पण माझा एक मुलगा अजून आहे त्याला तुम्ही पाहिले आहे पण ओळखत नाही कारण तो माझा मानस पुत्र आहे, माझा मित्र अशोक चा मुलगा शेखर.

आश्चर्य वाटलं ना ?’

‘त्यालाही अंदाज नाही.पण एका मुलाचे जे कर्तव्य आहे त्याहीपेक्षा काकणभर जास्तच आमच्यासाठी त्यानं केले आणि तेही मनात काहीही अपेक्षा न ठेवता.

अशोक आणि मी लहानपणीचे मित्र. आमच्या मैत्रीत त्याची गरीबी किंवा माझी श्रीमंती कधीच आड आली नाही. अगदी लहान असल्यापासून मी शेखरला पाहतो आहे . आपल्या  आईबाबांचा त्यांनी नेहमी मान ठेवला.’

‘जेव्हा तुम्ही दोघंही आम्हाला सोडून परदेशात स्थाईक झालात, तेव्हा आणि अशोक व वहिनी दोघांचे निधन झाले, त्यानंतरही त्याने आमची साथ त्यानं सोडली नाही.’

‘प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली ती पण अगदी सख्या मुला प्रमाणे. पैशांचा मोह त्याच्या वागण्या त मला कधीच जाणवला नाही.’

‘पैशांची गरज तर ईश्वर कृपेने आम्हालाही नव्हती. होती ती फक्त नी फक्त प्रेमाची, आपलेपणाची, सोबतीची. म्हातारपणी जेव्हा शरीर साथ देत नाही  आपल्या माणसांची गरज  जास्त असते, असं वाटते की आपलं कोणीतरी जवळ असावे, ज्याच्यावर सर्व सोपवून निर्धास्त व्हावे, आणि तोच निर्धास्तपणा, तेच आपलेपण आम्हाला शेखरच्या रुपात भेटले.’

……. हे ऐकता ऐकता आता प्रकाश ला आठवले, मागे बाबांनी फोन करू सांगितले होते तुझी आई खूप आजारी आहे. डॉक्टरांच्या मते ती फार दिवस नाही काढणार ….. .पत्रात बाबांनी पुढे लिहिले होते—तिला सतत तुमची दोघांची आठवण येत असते. एकदा जरी भेटला  तरी तिच्या जीवाला शांती मिळेल पण—-‘  

वाचता वाचता वकील साहेबांनी  दोन्ही मुलांकडे पाहिलं, दोघांच्या नजरा शरमेने खाली झुकलेल्या होत्या.

‘तेव्हां शेखर आणि सुनबाई दोघांनी अगदी सख्ख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली. अगदी मांडी देऊन, शेवटचे पाणीही त्यानी तिला पाजले,….सख्या मुलाप्रमाणे अग्नी देण्यापासून सर्व दिवस वार सुद्धा केले.’

‘तुमच्या आईची व माझी दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही शेखर च्या नावाने करतो आहे. हे घर मी माझ्या मेहनतीने बांधल आहे.हे माझ्यासाठी सर्वात अनमोल आहे. त्यात लावलेली फळझाडे बाग या सर्वांची देख रेख  तोच करू शकतो जो इथे राहील.  तुम्हाला या सर्वांची काहीच गरज ही नाही.तुम्ही दोघं हे सर्व विकून वाटून घ्याल, मला ठाऊक आहे.’         

‘बाकी सर्व संपत्ती, जमीन ,तुमच्या आईचे दागिने त्यावर तुमचाच अधिकार आहे ते तुम्ही वाटून घ्यावे.’

 तुमचे बाबा

 सुधाकर आठवले.

इच्छापत्र पूर्ण वाचून  त्याची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले, दोघांचे चेहरे शरमेने काळे ठिक्कर पडले होते. आणि शेखर, रडत रडत हात जोडत म्हणाला…..  “नाही नाही वकील साहेब मला यातलं काही नको तुम्ही हे घर  दादांच्या च नावाने करून द्या.”

“अरे, मी हे सर्व नाही करू शकत. ही आठवले साहेबांची शेवटची इच्छा होती व ती कायदेशीर आहे.”

“तू मुलाप्रमाणे वागला त्यांनी वडिलांचे कर्तव्य निभावले. आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर, ज्याने त्यांच्या आत्म्याला समाधान मिळेल”….. असे म्हणत वकील साहेबांनी मृत्युपत्र प्रकाश च्या हातात दिले व उठून

 सुधाकर राव यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला, तेव्हा   त्यांना जाणवले की फोटोतल्या सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर तृप्त भाव दिसत होते.

—————————————

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *