Ritbhatmarathi

Search
Close this search box.

इन्स्पेक्टर सरोदेंनी घरात पाऊल टाकताच विचारले…

इनिस्पेक्टर सरोदे – सौ.शुभांगी चित्रे आपणच का…?

शुभांगी – हो मीच शुभांगी चित्रे…पण आपण उभे का बसा ना…हे शेजारचे जोशी काका…यांनीच तर तक्रार दिली पोलीस स्टेशन मध्ये…

इन्स्पेक्टर सरोदे शुभांगीवर धारदार नजर टाकून म्हणाले…

इन्स्पेक्टर सरोदे – तुमच्या कुठल्या कुठल्या वस्तू चोरीला गेल्या आहेत…?

शुभांगी – नाही सर…माझ्या कुठल्याच वस्तू चोरीला गेल्या नाहीत…

इन्स्पेक्टर – चोर…दरवाजा फोडून आत आला आणि तुमच्या कोणत्याच वस्तू न घेता गेला…?”

जोशी काका – इन्स्पेक्टर साहेब…मी थोडंसं बोलू का…? एक तर यांचे मिस्टर घरात नाहीत…खूप गोंधळून आणि घाबरून गेल्या आहेत या…अहो त्या चोराने तर आमच्या शेजारचा ब्लॉक सुद्धा फोडलाय हे तर मीच आपणाला फोन करून सांगितले…

इन्स्पेक्टर – ठीक आहे मग तुम्ही सगळं सांगा मला…

जोशी काका – खरं म्हणजे साहेब…आपण सौ.चित्रेंचं कौतुक करायला हवंय…त्य्नाचे मिस्टर घरात नसतानासुद्धा चोराशी मोठ्या धैर्याने त्यांनी तोंड दिले आहे त्याला तोड नाही…त्यांनी काय केलं ठाऊक आहे…चक्क तिखटाच्या डब्यातलं तिखट काढून त्या चोराच्या डोळ्यात फेकलं…हे पहा सर्व घरभर तिखट पसरलं आहे…अहो साहेब तिखट टाकल्याने त्या चोराला  टीव्ही,टेपरेकॉर्डर,घड्याळ या वस्तू नेताच आल्या नाहीत…त्या सर्व वस्तू ब्लॉकच्या बाहेरच आहेत…बाकी दागिने,रोख रक्कम गेली की काय हे ठाऊक नाही…

इन्स्पेक्टर – त्या…ब्लॉकमध्ये राहतात म्हणजे ज्यांच्या ब्लॉक फोडलाय त्यांचं नाव काय म्हणालात…?

जोशी काका – प्रशांत कुलकर्णी…असं नाव आहे त्यांचं…पण त्या वेळेला ते चेन्नईला गेले होते…त्यावेळेलाच हा सगळा प्रकार घडला…त्यांचं परतीचं रिसेर्वेशन आजच आहे…मग आज दुपारपर्यंत येतील ते…

इन्स्पेक्टर – ठीक आहे…मग ते आल्यानंतर परत येऊन जाईन मी…तोपर्यंत या वस्तूंचा पंचनामा करून घेतो…आणि मी मिसेस चित्रेंना काही प्रश्न विचारतो…

शुभांगी – थांबा साहेब…मी तुम्हाला प्यायला पाणी आणते…

शुभांगी पाणी आणून ठेवते पण मनात विचारांचा गोंधळ चालूच असतो कारण आता इन्स्पेक्टर सरोदेंच्या प्रश्नांना सामोरं जायचं होत…

इन्स्पेक्टर – चोराच्या डोळ्यात तिखट तुम्ही फेकलंत…मग चोराचा चेहरा तुम्ही पाहिलेला आहे…म्हणजे तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात…तुम्हाला त्या चोराचं वर्णन सांगावं लागेल…तसं तुम्ही सांगूही शकता…हो ना…?

शुभांगी – साहेब…त्या चोराचं वर्णन सांगणं तसं कठीण आहे…कारण माझा नंबरचा चष्मा आहे…हे घडलं तेव्हा मला चष्मा लावण्यासाठी तेवढा वेळच मिळाला नाही…तेव्हा त्या चोराचा चेहरा मला दिसलाच नाही…लांबूनच मी त्याच्या चेहऱ्यावर तिखट फेकलं…

इन्स्पेक्टर – पण…चोर घरात येईपर्यंत…तुम्ही तिखट फेकेपर्यंत तो चोर काय नुसता पाहत उभा होता की काय…?

शुभांगी – नाही साहेब…तशी माझी झोप सावध आहे….दरवाज्याच्या लॅचवर कुणीतरी ठोकत असल्याचा आवाज मला बराच वेळ येत होता…नक्कीच कोणीतरी दरवाजा फोडण्याच्या प्रयत्नात आहे हे मी ओळखलं…काय करावं हे मला काही सुचेचना…मग धावत जाऊन डब्यातून दोन मुट्टी तिखट आणलं…क्षणार्धातच चोर माझ्या दिशेने येताना दिसला…मला रागाने ‘ कपाटाच्या किल्ल्या दे ‘ असं म्हणाला आणि मीही ‘देते’ असं म्हणाले…आणि थोडं पुढे जाऊन त्याच्या डोळ्यात तिखट फेकलं…चोर मग मोठ्याने विव्हळला…तेवढ्यात बाहेर हॉर्न वाजल्याचा आवाज आला…आणि तो बाहेर पळत सुटला…

इन्स्पेक्टर – हं…मला असं वाटत की बाहेर त्या चोराचा साथीदार रिक्षा किंवा कार घेऊन आला असावा…धोक्याचा इशारा म्हणून त्याने गाडीचा हॉर्न वाजवला….त्यामुळेच त्याने तुमच्या शेजारच्याच सामान बाहेर तसाच ठेऊन पळ काढला असावा…!

जोशी काका – अगदी बरोबर साहेब…तुमच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवावरून तुम्ही काढलेला तर्क अगदी बरोबर असावा…[ जोशी काका हसत-हसत म्हणतात ]

इन्स्पेक्टर – तरीसुद्धा आज डोळ्यांच्या डॉक्टरांकडे फोन करून चौकशी करतो…की कुणी डोळ्यात तिखट गेलेला पेशंट आला तर मला फोन करून कळवा असं सांगावं लागेल सगळ्यांना…तर मग निघू मी आता [असं म्हणत इन्स्पेक्टर सरोदेंनी डोक्यात आपली हॅट चढवली…]

खरं म्हणजे आयुष्यात झुरळालाही न मारणारी शुभांगी असं चोराच्या डोळ्यात तिखट फेकेन हे मुळी शक्यच  नव्हतं…विशेष म्हणजे शुभांगीने चोराच्या डोळ्यात तिखट फेकलंही नव्हतं…कारण तो फक्त एक देखावा होता आणि तोही त्या इन्स्पेक्टर आणि शेजाऱ्यांसाठी केलेला…..चोर दरवाजा फोडून आत आला ही गोष्ट खरी…चोराने शुभांगीकडे कपाटाच्या किल्ल्या मागवल्या ही गोष्टही खरी…पण किल्ल्या मागितल्या नंतर तो चोर शुभांगीकडे एकटक पाहत राहिला, तसं त्या चोराचं वयही फार नव्हतं पंचवीस वय असेल जेमतेम…असं एकटक पाहत असल्याने शुभांगीचं तर थरकाप उडाला होता…भीतीने शुभांगी त्या चोराला म्हणाली-

शुभांगी – तू किल्ल्या घे तिजोरीच्या…दागिने घे…काय वाट्टेल ते घे पण मला मारूबिरू नकोस…[क्षणात तो चोर जवळ आला आणि शुभांगीला म्हणाला- ]

चोर – थांब ग ताई…तुझ्या चाव्या वैगेरे देऊ नको मला…तू मला मागच्या वर्षी तुरुंगात राखी बांधली होतीस…त्या राखीच्या नात्याने तू माझी बहीण आहे…आणि मी तुझा भाऊ आहे…भाऊ कधी बहिणीच्या घरी चोरी करील का ?

मग शुभांगीला आठवलं…एक सामाजिक बांधिलकी म्हणून …काही सामाजिक कार्यकर्त्या दरवर्षी दर राखीपौर्णिमेला त्या भागातील पोलीस स्टेशन मधल्या कैद्यांना राखी बांधत असे…त्या अंधारकोठडीच्या खोलीत कैद्यांची तोंड शुभांगीला कधीच पाहता आलं नाही…फक्त लोखंडी गजाबाहेर कैदी हात बाहेर काढत असे आणि सगळ्या कार्यकर्त्या कैद्यांच्या हातात राखी बांधत असे…त्याच राखीने आज शुभांगीचं रक्षण केलं होत…मग हे सगळं आठवल्यावर शुभांगी थोडी हिंमत करत म्हणाली…

शुभांगी – अरे…..तू सारखा चोऱ्या करतोस…काही मेहनत आणि कष्ट कर…आपलं पोट भर…

चोर – ताई…मी बारावी झालो आहे…नोकरी कुठे मिळत नाही…घरी आई आजारी असते…तिला टीबी झालाय…तिचं खाणं-पिन…औषध यासाठी मी चोऱ्या करत फिरतोय…आणि आज राखी बांधणाऱ्या बहिणीच्या घरातच मी चोरी करतोय…याची मला जरादेखील कल्पना नव्हती…मला तर बहीणही नाहीय…

शुभांगी – मग…सांगू का…या मानलेल्या बहिणीसाठी एक करशील…

चोर – जरूर करेल…पण काय करू शकेल मी..?

शुभांगी – चोरी सोडून दे…

चोर – पण माझ्या आईच कसं होईल…?

शुभांगी – तुझ्या आईला …मी एका टीबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करेल…आणि तुलासुद्धा कुठेतरी एक साधीशी नोकरी लावून देईल…

चोर – ताई…कुठलाही काम करायची माझी तयारी आहे…

त्या वेळी….त्याच क्षणी त्या चोराच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता…तो चोरी करत होता पण नाईलाजास्तव….राखीच्या एका धाग्याने त्या चोराने एक बंधन बांधून घेतलं होत…आणि शुभांगीकडे चोरी करण्याचा बेत रद्द केला…बोलताना टेपरेकॉर्डर,टीव्ही असं ब्लॉक फोडून बाहेर काढून ठेवल्याचं शुभांगीला आधीच त्या चोराने सांगितलं होत…पण स्वतःहूनच चोर शुभांगीला म्हणाला-

चोर – ताई….आज पासून चोऱ्या वैगेरे कारण बंद…पण…मी ब्लॉक फोडलाय म्हणून पोलीस कंप्लेंट होणार…तेव्हा तू काय सांगशील त्यांना …

शुभांगी – माझं मी पाहून घेईन…तुझं नाव मात्र मी येऊ देणार नाही…पण नाव काय तुझं…?

चोर – अमित जाधव…

शुभांगी – ठीक आहे…आता निर्धास्त मनाने घरी जा…आणि काळजी करू नकोस…

अमित गेल्यानंतर शुभांगीने एक नामी युक्ती केली…घरभर तिखट पसरवलं…आणि डोळ्यात तिखट टाकलं असा कांगावा केला…आणि चोर पळून गेला असं शुभांगीने जोशी काकूंना सांगितलं… शुभांगीच्या धाडसीपणाचं सगळीकडे कौतुकच होत होतं…मात्र खरा प्रकार शुभांगीलाच ठाऊक होता…अमित पोलिसांच्या हाती सापडू नये…त्याला सुधारण्यासाठी संधी मिळावी असं शुभांगीला मनापासून वाटत होतं…म्हणून इन्स्पेक्टर सरोदेंना शुभांगीने खोटं सांगितलं…

दुसरीकडे आपल्या घरात चोरी झाली या भीतीने कुलकर्णी काका यांचा थरकाप उडाला…आपल्या पत्नीच्या पर्समधून किल्ल्या काढून प्रथम त्यांनी कपात तपासून घेतला आणि सुटकेचा निश्वास टाकला…कारण कपाटातले दागिने…पैसे जसेच्या तसे होते…म्हणून शुभांगीचे त्यांनी अगदी मनापासून आभार मानले…त्याच्या दुसऱ्याच दिवशी शुभांगीने घडलेला सगळा प्रकार आपल्या नवऱ्यास सांगितला…यावर मंदार म्हणाला…

मंदार – तुला काय गरज होती नसत्या फंदात पडायची…?

शुभांगी – अहो…पण चांगल्या कामासाठी खोटं बोललेलं चालत…आणि मला खात्री आहे याचा नक्की फायदाच होईल त्याला…आणि तुम्ही तुमच्या शिफारशीने अमितला नोकरीला लावायचं आहे….

मंदार – शुभा…तू ऐक ग माझं…काहीही डोक्यात घेऊन बसू नकोस…

शुभांगी – अहो….वाल्याचा वाल्मिकी नाहीका झाला…रामायणात….

मंदार – शुभा….तू काही माझं ऐकणार नाही….ठीक आहे मी प्रयत्न करून पाहतो…माझ्या कार्यालयात आहे एका शिपायाची जागा रिकामी तिथे लावून घेतो मी अमितला…

शुभांगी – तुम्ही किती चांगले आहात हो…

मंदार – तू आता काहीतरी मागतेय माझ्याकडे…मग द्यायला नको…

काही दिवसातच…अमितची शिपाई म्हणून नेमणूक झाली असं शुभांगीला समजलं….साधारण महिन्याभरानेच रक्षाबंधन होतं…आणि अमितचाही पहिला पगार झाला होता…म्हणून अमितने आपल्या पहिल्या पगाराचं शर्ट पीस पॅन्ट पीस, साडी आणि एक पेढ्याचा बॉक्स…असं घेऊन तो शुभांगीच्या घरी आला…शुभांगीला समोर अमितला पाहताच एक सुखद असा धक्का बसला….शुभांगी सगळं पाहून म्हणाली –

शुभांगी – अरे…अमित हे सगळं कशाला…

अमित – ताई…उलट तुमच्यामुळेच हे सन्मार्गाचा जीवन जगण्याची संधी मला मिळालीय…मला काहीतरी करण्याची संधीच भेटलीय…तुम्ही घ्या हो…नाही घेतलं तर मला वाईट वाटेल…तुम्ही तर माझ्या साठी चक्क पोलिसांबरोबर खोटेही बोललात…माझ्यावर केवढे उपकार केले तुम्ही…चोर सापडला नाहीं म्हणून ती फाईल पोलिसांनी कधीच बंद केली…हे केवढं महत्वाचं आहे नाही का…?

शुभांगी – झाल गेलं गंगेला मिळालं आधीच काहीच आठवू नको बरं…आईची तबियत कशी आहे आता…?

अमित – ताई तुमचीच कृपा…तुमच्या ओळखीनेच सेवाभावी संस्थेकडून माझ्या आईला पुनर्जन्म मिळालाय…

हे सांगताना अमितच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू तरळत होते…त्या रेश्माच्या एका धाग्याने अमितच्या मनात केवढा बदल झाला होता…शुभांगीने तर आपलं कार्टेयाच केलं होतं पण किमया मात्र त्या राखीची होती….जसं रामायणात नारदाने वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ह्रिषी केला तेही राम नामामधून तशी चोर अमितचा बदल अमित शिपाई म्हणून झाला तेही एका रेशमाच्या प्रेमळ धाग्यामधून….