Ritbhatmarathi

Search
Close this search box.

हळव्या प्रेमाची महती

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

सारंगी..आवडायची मधुला. मधु त्याच्या मित्राकडे जायचा ..तिथे शेजारच्याच घरात रहायची ती. मधुचा मित्र, शरद..शरदच्या घरी बाईमाणूस कोणी नव्हतं. शरद,त्याचा लहान भाऊ नं वडील..तिघे निरनिराळ्या वयोगटातले पुरुष.

सारंगीची आई शरदकडे स्वैंपाकाला यायची. मिल बंद पडल्याने सारंगीच्या घरात हातातोंडाची जुळवण करणं कठीण होऊन बसलं होतं. भरीत भर म्हणून सारंगीच्मा आजीला पक्षाघाताचा झटका आल्याने ती अंथरुणाला खिळली होती. सारंगीचे वडील, चार पैसे कमवण्यासाठी खटपट करायचे पण त्यांना दम्याने ग्रासलं होतं. एखाद्याचं दु:ख ही दुसऱ्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी व्हावी अगदी तसंच झालं.

शरदची आई तो पाचवीत असताना, दोन्ही मुत्रपिंड निकामी झाल्याने अचानक गेली. शरदच्या वडिलांनी कधी प्यायचं पाणीही स्वहस्ते घेतलं नव्हतं. शरदची आजी येऊन राहील तर गावी गुरंढोरं,शेती..भलामोठा व्याप.

शरदच्या वडिलांनी,अप्पांनी मग मधुच्या वडिलांना विचारलं,”वैनीला पाठवशील का,स्वैंपाकाला? पोरांची तोंडं बघवत नैत रे. चुकलच माझं..तिच्या तब्येतीकडे सपशेल दुर्लक्ष केलं मी. तरी ती म्हणायची अधनंमधनं पाठीत दुखतं पण मला वाटलं, असेल बायकी दुखणं..नेहमीचंच रडगाणं..आपलं माणूस हातचं गमावून बसलो.. आता इथेतिथे तोंड वेंगाडावं लागतय..दुवक्तासाठी.”

आपला खोकल्याचा भर कसाबसा आवरत सारंगीचे वडील म्हणाले,”अप्पा, अरे खुळा का तू! या चाळीत एकत्र वाढलो आपण. कित्येकदा एका ताटात जेवलोय. तुझ्या दु:खाची जाणीव मला नाही, असं का वाटतय तुला! जरुर येईल आबी तुझ्याकडे स्वैंपाकाला. तू बिनघोर रहा.”

आबी..मधे भांग पडणारी,चापूनचोपून केस विंचरुन आंबाडा घालणारी, त्यावर कुणाच्याही कुंडीतलं कोणतही फुल खोचलेलं..अगदी झेंडूचंसुद्धा. फुल तिच्या केसात माळलं गेलं की जणू ते खुदकन हसे.

आबी अडल्यानडल्यांच्या इतकी उपयोगी पडायची की कुणाच्या कुंडीतलं फुल तिनं काढलं म्हणून तिला टोकत नसत. पायावर निऱ्या येणारं तिचं नववारी लुगडं, अंगभर पदर,कपाळावर लाल कुंकवाचा टिळा.

शरदची आई गेल्यापासनं आबी तशी आमटीभाजीची वाटी शरदच्या घरी पाठवायचीच पण तिचे हातही थिटे झालेले होते. शेवटी पैशाचं सोंग काही केल्या आणता येत नव्हतं.

अप्पांनी घरी येऊन स्वैंपाक कर सांगितल्यापासनं आबी पहाटे चारला उठून आपल्या घरातलं आवरुन साडेसातापर्यंत शरदच्या घरी जाऊ लागली. मुलांसाठी पोळीभाजीचे डबे, वरणभाताचा कुकर लावून, घरातली थोडीबहुत कामं आवरुन मगच ती आपल्या घरी जायची. सणाला मुलांची  पानं सांजोऱ्या,गुळपोळ्यांनी सजू लागली. रिते डबे लाडवांनी,कडबोळ्यांनी भरले. मुलं पुन्हा अंग धरु लागली.   अप्पा आबीला नियमित मोबदला देऊ लागले.

आबीसोबत सारंगीही जायची. सुट्टी असली की शरद व त्याच्या धाकट्या भावासोबत,मानवसोबत खेळत बसायची. मानवने कळ काढली की त्याचं आबीला नाव सांगायची, मग मानव रडवेला व्हायचा..म्हणायचा,”सारुताई,मी गं कुणाला सांगू तुझं नाव?”
” असं रे काय बोलतोस.. मी कधी  रागावते का तुला..ये बघू असा..” असं म्हणत आबी मानवला कुशीत घ्यायची. आई गेल्यापासनं आबीनं केलेल्या मायेने माधव आबीच्या अधिकाधिक जवळ जात होता. शरदला तशी समज होती. तो आतल्याआत घुसमटत मोठा होत होता.

आबीमुळे अप्पांची दोन वेळच्या स्वैंपाकाची, घरातल्या पसाऱ्याची चिंता दूर झाली होती. सारंगी आबीसोबत आली की मानव व शरदवर डाफरत सगळं घर चट चट चट आवरायची..पट पट पट केर लोटायची..लख्ख फरशी पुसायची..अप्पा सारंगीला म्हणायचे देखील,”सारु, तू फरशी पुसलीस की आरशाऐवजी फरशीतच चेहरा पहावासा मोह होतो बघ. बाकी नवरा लाड करणार हो तुझे.”

“है हो काय अप्पा!” असं म्हणत सारंगी लाजायची. अप्पा सारंगीला आवडते म्हणून ओली भेळ घेऊन यायचे. पळसातल्या पानातली ती आंबटगोड भेळ सारंगी अगदी मन लावून खायची. मानस व शरदला मात्र सुकी भेळ आवडायची. शरद सारंगीला चिडवायचा,”गिली भेल लो गिली भेल..एss..”

“अप्पा हा बघा ना कसा करतो..” सारंगीने नाव सांगताच अप्पा शरदवर डाफरायचे. सारंगी शरदपेक्षा अवघ्या चार वर्षांनी लहान होती.

अप्पांच्या कामावर एक नवीन शिपाई बदली होऊन आला होता. त्याचा मुलगा मधु हा शरदच्या वयाचा..अप्पांनी मधुचा प्रवेश शरदच्या शाळेत करवून दिला. उशिरा प्रवेश झाल्याने बुडालेल्या अभ्यासक्रमाचं कसं व्हायचं हीही चिंता होती.

अप्पांनी मधुला त्यांच्या घरी यावयास सांगितलं..शरद पहिलं मधुस शिकवण्यास नाराज होता. त्याचा अभ्यासाचा वेळ खर्ची होणार या विवंचनेत होता पण आबीने शरदला समजावलं,”विद्या वाटल्याने वाढते, शरदा. हे एकच दान असं आहे,जे दिल्याने वाढतं.”

आणि मग मधु येऊ लागला..अभ्यासाला. येताना तो चांदोबा, तेनालीरामन अशी पुस्तकं आणायचा. शरदला मधुस शिकवणं आवडू लागलं..गोष्टीची पुस्तकं जी वाचायला मिळत.

पीक तरारुन वर यावं तशी मुलं वाढत होती. सारंगीचे वडीलही वॉचमन म्हणून कामाला लागले होते. पाचेक वर्ष अंथरुणाला खिळलेली सासू गेल्याने सारंगीच्या आईचं कामही थोडं हलकं झालं होतं.

शरदचं कॉलेज पुर्ण झालं. तो नोकरीला लागला तसं अप्पांनी त्याच्या लग्नाचं मनावर घेतलं.

शरदने अप्पांना सांगितलं,”अप्पा, सारंगी आवडते मला..तिच्यासोबत..”

“अरे पण कसं शक्यय. गावचे मानकरी आपण. आपल्या तोलामोलाच्या घराण्याशी संबंध जोडायला हवेत.”

“अप्पा, आई गेली तेंव्हा कुठे गेली होती ही तोलामोलाची माणसं! कबुलय तुम्ही आबीला तिच्या कामाचा मोबदला दिलात पण तिने केलेली निर्व्याज माया..”

“अच्छा..म्हणजे उपकार म्हणून तू सारंगीशी..”

अप्पांचं बोलणं मधेच अडवत शरद म्हणाला,”नाही अप्पा. सारंगी खरंच आवडते मला.”

“तुझा निर्णय अंतिम आहे?”अप्पांनी विचारलं.

“हो अप्पा.”

आईविना लेकराचं मन अप्पा कसं मोडणार होते!

“बरं तर मी बोलणीला लागतो..”असं म्हणत अप्पा बाहेर पडले.

दाराच्या मागे मधु उभा होता. त्याने ठरवलं होतं..आज त्याच्या मनातलं सारंगीबद्द्लचं प्रेम शरदजवळ व्यक्त करावं..शरदकडून त्याच्या टपोऱ्या अक्षरात, सारंगीला द्यायला प्रेमपत्र लिहून घ्यावं पण तो मागे फिरला..तो कायमचाच. शरदशी कमापुरते संबंध ठेवू लागला.

अप्पांनी सारंगीचा हात शरदसाठी मागितला तेंव्हा सारंगीच्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रु दाटले. आबी सारंगीला जवळ घेत म्हणाली,”नशीब काढलस बघ पोरी.” पण सारंगीच्या काळजाचे तुकडे होत होते. तिचाही जीव मधुवर जडला होता.दोघं डोळ्यांच्या कोपऱ्यांतून एकमेकांना चोरुन बघायची..पण आता हे उघडपणे बोलायची चोरी होती कारण शरदच्या अप्पांचे त्यांच्या कुटुंबावर मोठे उपकार होते.

 सारंगी ओठ मिटून गप्प राहिली. मानव तेंव्हा होस्टेलला रहात होता. लग्नास त्याला यायला जमलं नाही. अख्खी चाळ वावरली लग्नात. बाया अधनंमधनं शरदच्या दिवंगत आईची आठवण काढून उसासे टाकत होत्या.

लग्न,पूजा..सारं कसं यथासांग पार पडलं. शरद,अप्पा व सारंगीला घेऊन नवीन ब्लॉकमधे रहायला गेला.

“मधुचं काहीतरी बिनसलय खरं..पहिल्यासारखा येतजात नाही.”शरद सारंगीला म्हणाला तसं सारंगीने डोळ्यात भरत आलेलं पाण्याचं तळं पाण्याचे हबके मारुन लपवलं.

मधुला रेल्वेत नोकरी लागली. त्यांच्या नात्यातल्या मुलीशी त्याचं लग्न झालं. काहीतरी कारण सांगून सारंगीने मधुच्या लग्नाला जाण्याचं टाळलं.

शरदसारंगीला दोन मुलं झाली . मधुही त्याच्या संसारात रुळला, त्यालाही एक मुलगी झाली. मधु बायकोमुलीस घेऊन कधीकधी फेरी मारायचा, शरदकडे.

शरदचं डोकं अलिकडे फार दुखायचं. मधुच त्याला बळेबळे डॉक्टरकडे घेऊन गेला. सर्व तपासण्या झाल्यानंतर मेंदूत गाठ असल्याचं निदान झालं. शरदच्या वडिलांनी होती नव्हती ती पुंजी पणाला लावली. गावची जमीनही गहाण ठेवली.

शस्त्रक्रिया नामवंत डॉक्टरांनी केली पण शरद शुद्धीवर येत नव्हता. हातपाय हलवत नव्हता. शरदची मुलं दीनवाणी झाली होती. मधु सर्वतोपरी मदत करत होता. शेवटी नियतीपुढे प्रयत्न कमी पडले नं शरदची प्राणज्योत मालवली.

मधुने सारी जबाबदारी घेतली होती. मानव परदेशात नोकरीस असल्याने येऊ शकला नव्हता पण मधु शरदच्या वडिलांच्यापाठी सावलीसारखा उभा होता.

मधुने सारंगीलाही तिच्या पायांवर उभं केलं. तिला बँकतील,पोस्टातील व्यवहार समजावून दिले. काही येत नसलं तर जरुर सांगायचा पण शक्यतो तिचं तिला करु लावायचा.

मधुने  सारंगीला साड्यांचा बिजनेस करण्याची आयडीया दिली. तिला होलसेल मार्केटमधे न्हेलं. व्यापाऱ्यांशी रुजवात घालून दिली. नव्या व्यापारात मन गुंतवल्याने तिचं दु:खही हलकं झालं, घरात पैशाचा ओघ येऊ लागल्याने घरावरील अनिश्चिततेचं सावटही कमी होऊ लागलं

अगदी शरदसारंगीची मुलं मोठी होऊन त्यांची लग्नकार्य झाल्यानंतरही मधु त्यांच्या हाकेला धावून येत होता.

मधुचं प्रेम अजुनही होतंच सारंगीवर पण त्याने त्या प्रेमाला एका वेगळ्या उंचीवर न्हेलं. आपल्या कधीकाळच्या प्रेयसीच्या पायवाटेवरील काटे तो तिला जाणवूही न देता बाजूला सारत राहिला.

(समाप्त)

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

======================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter