Ritbhatmarathi

Search
Close this search box.

घेऊदेत तिलाही मोकळा श्वास!!

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

पहाटेचा गार वारा खिडकीतून आत शिरला. खिडकीलगतच्या झाडावर पाखरांची किलबिल सुरु झाली. ‘मला एक लोकल पकडायची असते. हे पक्षीगण का बरं झोपत नसावेत! उठावं की चांगली उन्हं वर आली की..’अनघा मनाशीच हसली..

तिला माहेरची सकाळ आठवली. भावाला गादीवरनं पार फरशीवर ढकलून अख्खी गादी काबीज करायची न् आईने सतरा हाका मारल्या तरी..अगं उठलेच आहे मी..अगं एक..एकच मिनिट हं..हे बघ..हे एवढं स्वप्न तेवढं पुरे होऊदेत बघ..असं झोपेत बरळायची..भाऊ उठून न्हायला गेलेला असायचा.

मग कसंतरी आळोखेपाळोखे देत उठायचं.. ट्रेन चुकली तर कॉलेजला उशीर होईल म्हणून बाथरुमच्या दारावर भावड्या..चल निघ बाहेर..करत शंख फुंकायचा. अनघाला सकाळीच भावाची आठवण आली न् चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं. फोन केला पाहिजे खरा..बरेच दिवस बोलणं झालं नाही भावड्याशी. ती स्वत:शीच बोलत ब्रश करु लागली.

आरशाने दाखवलं..केस डाय करायला आले आहेत. चंदेरी तारा जरा जास्तच चमकताहेत..न्हाऊन आल्यावर तिने सासऱ्यांसाठी व नवरा उमेश याच्यासाठी चहा ठेवला. स्वत:साठी घेतला. पार्थ व आर्य या तिच्या दोन छकुल्यांसाठी दूध गरम करत ठेवलं.

अनघा परत तिच्या आरशाकडे आली. मघाच्या त्या चंदेरी तारा दिसणार नाहीत असा वन साइडेड भांग पाडला व मोकळ्या केसांचा घट्टसा बन घातला.

एकीकडे कणिक तिंबलं..पोळ्या करायला घेतल्या. श्रावणघेवड्याची भाजी फोडणीला टाकली. कुकर ग्यासवर चढवला नि फटाफट ड्रेस चढवला.. चेहऱ्यावर माफक मेकअप केला. तोवर कुकर गार झाला होता. वरणाला तूप,हिंग,जिऱ्याची फोडणी दिली. बेताने मीठ घातलं नि उकळी काढली. अन्न झाकून ठेवलं.

तेवढ्यात पार्थ,आर्य दोघंही उठले नि दोन बोटं दाखवू लागले. लेकरांचं आवरल्यावर त्यांच्या कुल्ल्यावर पाणी घातलन..त्यांना एकाच टबात न्हाऊमाखू घातलं. कितीतरी गप्पा सांगायच्या होत्या पार्थला..आर्यला खारुताईचं घर कुठे असतं,बघायचं होतं..मम्माला खरंच वेळ नव्हता..तिने मुलांना पंचाने पुसलं नि कपडे घातले,दूध दिलं.

मुलांना बाय करुन ती रिक्षा स्टँडजवळ आली. कसंबसं तिसऱ्या सीटवर स्वतःला कोंबलं..स्टेशनजवळ आली तर गाडी लागलेलीच होती. अनघा भरभर जिने चढत होती..तीन नंबर प्लेटफॉर्मवर उतरली..नि लेडीज डब्याच्या दिशेने कूच..पण थोडक्यात गाडी चुकली..अगदी डोळ्यासमोरुन गेली म्हणा ना. परत दहा मिनटाशिवाय गाडी नाही..ती एका बाकावर टेकली. पर्समधली बाटली काढून पाणी प्याली. इतक्यात शैलजा,तिची शाळूमैत्रीण आली..हाय करत.

“अनघा, आज या गाडीला?”

“अगं,शैलू, गाडी चुकली माझी. आज जरा उशीरच झाला. दोघा लेकरांना एकदम परसाकडला झालं..मग त्यांच आवरेस्तोवर, घड्याळाचे काटे का माझ्यासाठी थांबणार..”

“चालायचंच. परवा विजूचा बर्थडे आहे. पार्टी देतेय. येणार नं तू. तू आलं पाहिजेस हं.”

“नाही गं खरंच नाही जमणार. उगा फोर्स नको करुस.”

तेवढ्यात गाडी आली. बराच घोळका जमा झाला. कुणी मधे तर कुणी दरवाजाच्या साइडला..उतरणाऱ्या़चा लोंढा वाहला तरी एक मधे गुरफटलीच खांब्याला..नवखी होती वाटतं..तिला कसंबसं काढलं उचकटून बाहेर नि जय भवानी करत शत्रू सैन्याच्या गोटात शिरावं तसं आत शिरल्या. पटापटा जागा पटकावू लागल्या. अनू डोअरलाच उभी होती. एकदोन स्टेशनं मधे गेली असतील नं अचानक गलका झाला..

“उई माँ, तोबा तोबा..ये तो गीर गयी। कोई पानी लाव जल्दी। उसकी मुँह पे शिडको..” तोवर आत बसलेल्या शैलाला कुणी सांगितलं..तुझी मैत्रीण पडली म्हणून. ती बाहेर डोअरजवळ आली.

अनघा फतकल घालून बसलेली. काहींनी तिला उठवायला मदत केली. खिडकीजवळच्या एकदोघी आपणहून उठल्या नं तिला बसायला जागा दिली. अनघाचं सर्वांगं घामाने चिंब झालं होतं. कुणी तिला वारा घातला,कुणी साखरपाणी दिलं. गार वारा लागल्यामुळे काही वेळात ती नॉर्मल झाली.

“थँक्यू हं..” ती आजुबाजूच्या सख्यांना म्हणाली.

“हं. चल उठ.” शैलू म्हणाली.

“अगं. आता कुठे. वेळ आहे..मस्जिद यायला.”

“आपण दादरला उतरतोय..”

“अगं पण का?”

“ते मग सांगते. तुझी पर्स दे इकडे नि माझ्यापुढे उभी रहा.”

“अगं शैलू, लेट होईल मला.. आणि तुलाही..”

“होऊदेत.”

दोघीही लोंढ्याबरोबर आपसूक खाली उतरल्या. जवळच्या एका उपहारगृहात लस्सी घेतली.

शैलूने अनघाला ब्रीजजवळच्या एका स्त्रीरोगतज्ञाकडे न्हेलं.. जी शैलूची आत्या होती.

“काय गं शैलू, आज सकाळीच आत्त्याची आठवण आली..तब्येत बरीय ना!”

“मी फिट.ही माझी मैत्रीण गं..अनघा..आज गाडीत पडली चक्कर येऊन..पडली म्हणजे बसकण घातली तिने..लागलं वगैरे नाही पण तू चेक कर..काही गुडन्यूज वगैरे.”

“ए कायतरीच काय. कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झालीय डॉक्टर.”

“हो हो. मला तपासुदेत जरा.”डॉ. मेधा म्हणाल्या.

“मंथस्प्री़ग चालू आहे का?’

“हो डॉक्टर. एक्च्युली त्यामुळे जरा जास्तच थकवा आला आहे. गळून पडल्यासारखं होतं अगदी. घरचं,ऑफिसातलं..”

“घरी कोण कोण असतं?”

“सासरे,नवरा ,दोन मुल़ं..मुलांना सांभाळायला एक बाई येते. बरं आणि स्वैंपाक वगैरे. त्यासाठीच तर पहाटे पाचला उठते. वरणभात,भाजी,आमटी,पोळ्या..”

“सासूबाई..”

“चार महिने झाले, गेल्या..त्या असेपर्यंत बरं होतं..भांड्याला भांड लागायचं पण कदर होती त्यांना माझ्या कामाची. अशा हळव्या दिवसांत खरंच जपायच्या मला. रोजची जमतील तेवढी कामं आवरायच्या.”

“घरातल्या इतर माणसांची मदत..”

“त्यांच्यात पुरुषमाणसं बायकी कामं करत नाहीत म्हणे.. बाई लावेन तर दांड्याच जास्त.” अनघा उत्तरली.

” स्त्रीपुरुष दोघांनाही अन्नग्रहण करायचं असतं पण रांधायचं म्हंटलं की बायकी..” शैलू फणकारली.

“आपणच लाडावून ठेवतो त्यांना. आता हेच बघ..ही तुझी मैत्रीण..आजचा दुसरातिसरा दिवस तिचा..ही पुरुष मंडळी काय म्हणणार..आम्ही या दिवसांतही शिवाशिव पाळत नाही..म्हणजे ती मंडळी ग्रेट,सुधारणावादी..पण हिला अती रक्तस्त्राव होतोय..हिला आरामाची गरज आहे, त्याचं काय? लग्न करताना बायको नोकरीवालीच हवी..मग घरातही कामं करा की तिच्यासोबत. शिणून जातात बिचाऱ्या. मी आता हिला औषधं वगैरे देईन पण तो कायमचा इलाज नाही. समस्येच्या तळाशी गेलं पाहिजे..”

“मग काय करायचं म्हणतेस?” शैलूने विचारलं.

“अनघा, तुझ्या सासऱ्यांना व नवऱ्याला पाठवून दे. मी त्यांनाच रिपोर्ट देणार आहे असं सांग.”

शैलू,अनघाला तिच्या घरी घेऊन गेली. शैलूच्या नवऱ्याने मेथीचे पराठे बनवून ठेवले होते.

पराठ्याचा घास तोंडात घोळवत अनघा म्हणाली,”अगं शैलू एक नंबर झालेत पराठे.”

“हो अगं, आज शशांक उशिरा जाणार होता नं म्हणून मग संध्याकाळी आल्यावर मला जास्त काम नको पडायला म्हणून करुन ठेवले त्याने. आधी कुठे काय येत होतं..पण दोघंही कामानिमित्त बाहेर जाणार म्हंटल्यावर शिकला. आता माझ्यापेक्षा भारी बनवतो. बरं..हेल्थकॉन्शसही आहे. आता या पराठ्यांतच.बघ, गहू,ज्वारी,बाजरी..अशी सगळी पीठं घालतो समप्रमाणात.. पुलाव तर भन्नाट असतो त्याचा..अगदी सिग्नेचर रेसिपी..माझे मम्मीपप्पा आले की शशांककडे पुलावची फर्माइश करतार.”

अनघा घरी आली. भांडीवालीने दांडी मारलेली..ओटा,किचन..सगळीकडे भांडी..तिने ते दिव्य पार पाडलं. सासऱ्यांना घावण हवे झाले..नवऱ्याला पोळीच हवी होती. मुलांसाठी बटाट्याची भाजी..सगळं करेपर्यंत.. औषधांनी दिलेला आराम गायब झाला. तिला परत चक्कर आली. तिने शैलूला बोलवून घेतलं. मुलं कावरीबावरी झाली. अनघाचा नवरा विशाल,सासरे,शैला सगळेच निघाले. मुलांना सांभाळणाऱ्या मावशीला,त्यांच्या सोबतीसाठी बोलवून घेतलं.

डॉक्टरांनी परत अनघाला तपासलं. सलाइनमधून इंजेक्शन्स सुरु केली.
“मि. बावळे अँड सन..तुम्ही दोघं..तुम्ही जबाबदार अहात या परिस्थितीला. कधी अनघाचं रेग्युलर चेकअप करुन घ्यावं असं वाटलं नाही तुम्हाला?..एनिमिक झालेय ती. ती काय खाते..तिला पुरेसा आराम मिळतो का? ती व्यायाम करते का? तो करण्यासाठी तिला वेळ हवा..तो वेळ तिला मिळण्यासाठी..घरकामात तिला मदत करता का?

एक माणूस म्हणून तिच्या ज्या बेसिक/मुलभुत गरजा आहेत त्या तरी पुरे होऊदेत तुमच्या घरात. घेऊदेत तिलाही मोकळा श्वास..छंद जोपासूदेत स्वत:चे. त्यासाठी शनिवार,रविवार किचन,मुलं तुमच्या ताब्यात घ्या. तिला नोकरीला जाऊ दिलात, याचा अर्थ तिला मोकळीक दिलीत असा होत नाही. अनघा तुम्हाला हवी असेल तर खरंच जपा तिला.”

रात्री दोघा बापलेकांच हितगुज झालं. विशालचे बाबा म्हणाले,”विशाल, खरंच आपलं चुकतय. आपण सगळीच कामं आधी तुझ्या आईवर लादत होतो. घरातच आहे नं..बसून बसून करते काय..हेही सतरांदा बोलायचो..तिच्या तब्येतीकडे माझं अक्षम्य दुर्लक्ष झालं.

साधं ताटात केस मिळाला तर जेवणावरचा उठायचो. नेमकं ती गेल्यानंतर..कार्य वगैरे झाल्यानंतर तिचा लांबसडक केस आमच्या बेडजवळ पडलेला दिसला. कुरळे केस होते असल्याने असा रिंगाच्या स्वरुपात..स्स..माझी मलाच घ्रुणा वाटली.

अनघाबाबतीतही तोच कित्ता नकळत गिरवतोय आपण. बदल करुया आपल्यात. आपापली कामं आपापल्या हाताने करण्यात कसली रे लाज! ती करुच..शिवाय तिचीही कामं हलकी करु.”

अनघाला चारेक दिवसांत डिस्चार्ज मिळाला. घरी आली नं सुखद धक्के भेटू लागले तिला. नवरा विशाल जमतील तशी घरातली कामं आवरत होता. बाबा त्याला हातभार लावत होते,मागून सूचना देत होते. अनघा आजारपणातून सावरली तरीही विशालने त्याचा वसा मोडला नाही. घर एकाचंच नसतं,सगळ्यांच असतं..मग घरातली कामंही सर्वांनी मिळून केली पाहिजेत, हे डॉक्टर मेधांचे शब्द,मनात रुजले त्याच्या..मित्रांत बोलून पोळीसाठी काकू शोधून काढली. ती वेळेत येऊ लागल्याने अनघाचं ते एक काम कमी झालं.

तद्नंतर सहाएक महिन्यांनी अनघा विशाल जोडीने डॉक्टरांकडे गेले. अनघाच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं. डोळ्यांखालचा काळपटपणा निवळला होता.

अनघाचा नवरा,विशाल म्हणाला,”डॉक्टर, बरं झालं त्यादिवशी उपदेशाचा डोस दिलात तो. आता मी अनघाच्या खाण्यापिण्यावर जातीने लक्ष ठेवतो. कुकर लावतो, नारळ खवून देतो..अगदी असिस्टंट झालोय बघा अनघाचा. बाबा, भाजी आणून निवडून ठेवतात. नातवांना अंघोळी घालतात. सहचर्यात खरा आनंद लपलेला असतो हे ध्यानात आलं बघा.”

एकीचं आयुष्य मार्गी लागलं म्हणून डॉक्टर समाधानाने हसल्या.

(समाप्त)

–सौ.गीता गजानन गरुड.

============================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *