Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“आरं ए नाम्या….बास कर कि..किती राबशील रं शेतात?” सखाराम आपला घाम टिपत नाम्यापाशी आला.

नाम्या एका गरीब शेतकऱ्याचा पोरगा. पिढ्यानपिढ्या शेतीत राबणारी माणसं ज्या घरात गरिबीने कधीच पिच्छा सोडला नाही. नाम्याला शिकायची फार ईच्छा होती आणि तास शाळेलाही हुशार होताच तो. पण मागच्या ७ पिढ्यांमध्ये कुणी गावाबाहेर शिकायला म्हणून बाहेर पडलं नाही….त्यामुळे नाम्याच्या वडिलांनीही नाम्याला कुठं बाहेर शिकायला जाऊ दिलं नाही. मग काय कसं बस १०वी पर्यंतच शिक्षण केलं त्यानंतर नाम्यानेही शिक्षणाला राम राम ठोकला आणि आपली वडिलोपार्जित शेती करू लागला.

शेती तशी कमी नव्हती. पण गावात पुरेश्या पाण्या अभावी कुठलंही पीक काढणं अवघड होऊन जायचं. एकंदर गावात नाम्याचीच नाही तर सगळ्यांची तीच अवस्था होती.

नाम्याच्या लग्नाला १५ वर्ष झाली होती. त्यांच्या संसाराच्या वेलीवर २ फुले उषा आणि रामच्या नावाने फुलली होती. राम १४ वर्षांचा आणि उषा १२ वर्षांची. नाम्याप्रमाणेच नाम्याचा मुलगाही शाळेला खूप हुशार. इतकी वर्षे कुठेतरी शिकून मोठ्ठ होयचं हे स्वप्न नाम्या आपल्या उराशी बाळगून होता आणि हे स्वप्न त्याला राम मधून पूर्ण करायचं होतं.

नाम्या सखारामला, “आर, सख्या पोराला राबायलाच पाहिजे न्हा वं…. लय शिकवायचं रं पोरास्नी…. आपलं समदं आयुष्य गेलं काबाडकष्टवाणी….निदान पोरासने तरी शिकवून गावाबाहेर जाऊ द्या म्हणतोय. अन माझा राम्या लय हुशार आहे बी बघ…. “

तेवढ्यात राम येतो, “तात्या आईनं पाठवलंय भाकरी आणि कालवण….”

नाम्या, “ये रं पोरा….आरं तू इथं काय करतूएस? शाळेला नाही व्ह गेला….”

राम, “तात्या आज सुट्टी आहे न्हा व्ह शाळेला….उद्या शाळेचं इन्स्पेक्शन व्हनार आहे…त्यामुळं आज समद्या शाळेची साफ सफाई व्हनार आहे…. मग आम्हाला आज सुट्टी दिली. “

नाम्या, “बरं पोरा….जा घरी जाऊन अभ्यास कर….इकडं तिकडं हिंडू नको”

नाम्याच्या गावापासून एकंदर ५० किमी अंतरावर एअरपोर्ट असल्याने रोज शेतावरून विमानांची वर्दळ दिसायची. रोज नाम्या त्या विमानांना बघून आपल्या स्वप्नांना दिशा द्यायचा कि माझं पोरगं बी असंच एक दिवस विमानात बसून परदेशात जाणार….आणि त्यासाठी वाट्टेल तितकी मेहनत करायचा.

लोकं त्याला वेड्यात काढायचे कि पोराला शिकून सवरून परदेशात पाठवलं कि तो ढूंकूनही बघणार नाही ह्याच्याकडे….पोरगंही त्या विमानासारखं फुर्र्कन उडून जाईन.

पण नाम्या म्हणायचा कि पोरं आपल्या सोबत कायमची राहावीत आणि म्हातारपणी आधार देतील ह्यासाठी पोरं जन्माला घालायची नसतात. सोबत नाही राहिलं तरी चालेल पण तो कुठं बी गेला तरी माझं नाव तर त्याच्यासोबत कायमचं राहिलं….बापाचं नाव रोशन करिन आणि सोबतच गांवचबी….

बघता बघता  राम मोठा झाला. हुशार असल्या कारणाने त्याला प्रत्येक ठिकाणी स्कॉलरशिप मिळत राहिली आणि त्याला जोड म्हणून नाम्याचे कष्ट….मग काय राम बघता बघता इंजिनिअर हि झाला नि पुण्यात एका नामांकित कंपनी मध्ये उमद्या पगाराच्या नोकरीला लागला. शहरात जरी गेला तरी बापाचे काबाडकष्ट तो कधीच विसरला नाही. राम आवर्जून दर महिन्याला घरी पैसे पाठवायचा….आणि दर २ महिन्यांनी गावाकडची वाट धरायचा.

रामने आपल्या बहिणीचंही चांगल्या घरात लग्न लावून दिलं. 

रामला नोकरीला लागून २ वर्षे झाली नाही कि लगेच कंपनीमधून त्याला परदेशात जाऊन काम करायची संधी मिळाली. राम ही आनंदाची बातमी घेऊन गावाकडे आला.

नाम्या, “आरं राम्या आता कसं व्ह आला? आताच तर मागच्या महिन्यात येऊन गेला “

राम – “हो तात्या….पुढच्या महिन्यात अमेरिकेला जायचं आहे….व्हिसा लागला माझा….म्हणून मग म्हटलं कि ह्या खेपेला १५ दिवस सुट्टी घेऊन यायचं गावाला”

नाम्या – “आरं काय सांगतो….हि तर लय आनंदाची बातमी सांगितली बघ तू….किती दिवसांसाठी चालाय माझा लेक?”

राम – “तात्या ते आताच नाही सांगता येणार….कंपनीतून मला जोवर राहायचं तोवर मी राहू शकतो….सध्या तरी २ वर्षांचा प्लॅन आहे. “

नाम्या – “बरं पोरा जा तू….पण गावाकडची वाट विसरू नको व्ह कधी…. लोक मले लय वेड्यात काढायचे….पोरगं फुर्र्कन उडेल….पण तू तुला जसं जमल तसं येत जा रं “

राम – “अहो तात्या तसं मी कधी केलाय का? दर २ महिन्यातून मी गावाकडच्या ओढीनं यायचोच कि…. आता फक्त सारखं सारखं नाही जमणार यायला पण हो वर्षातून एकदा नक्की येत जाईन. “

नाम्या – “बरं पोरा नीट जा… (आपल्या बायकोला आवाज देत) सुमे ए सुमे बघ पोरं अमेरिकेला जाणार हाय….१५ दिसांसाठीच आलाय….जा त्याला काय आवडत ते करून दे त्याला “

ते १५ दिवस….वर्ष…२ वर्षे कशी उलटली हे कळलंच नाही. तेवढ्या २ वर्षात राम २ दा येऊन गेलाही. रामला अमेरिका रास येऊ लागलं आणि त्याने तिथेच स्थायिक होयचा निर्णय घेतला. ह्या खेपेला राम ने आईवडिलांना अमेरिकेला घेऊन जायचं ठरवलं. त्यासाठी त्याने त्यांचे ६ महिन्यांचे टुरिस्ट व्हिसा देखील बनवून घेतला.

राम निघणार त्या दिवशी , त्याचा मित्र – “काय रे राम दर वर्षी तू गावाला जातोस….पण ह्यावर्षी मी बघतोय स्वारी फारच आनंदात आहे.”

राम – “अरे का नसणार….ह्या खेपेला आई वडिलांना घेऊन येणार आहे….फार कष्ट केलेत रे त्यांनी माझ्यासाठी….माझ्या वडिलांनी मला साथ नसती दिली तर मीही आज गावात शेती करत बसलो असतो. अमेरिकेपर्यंत येणं माझ्यासाठी एवढं सोपं नव्हतं रे….बस्स आता पुढले ६ महिने आई वडिलांना मस्त इथे घेऊन येणार. “

इकडे गावाकडेही चर्चा रंगात आली होती.

सखाराम – “आरं नाम्या लय नशीब काढलं व्ह तू….पोरगं अमरिकाला घेऊन जातंय तुझं…आपल्या अख्य्या गावात कुणी स्टुडिओ मध जाऊन एक फुटू बी नसलं काढला बघ आणि इथं तुझ्या फुटू वर चक्क अमेरिकाचा शिक्का बसला कि रं…. “

नाम्या – “आरं सख्या पोराला लय समजावलं बघ कि आम्हाला काय अमेरिकेला वगैरे जायचं न्हाही…. पण पोरगं काय ऐकत नाही बघ….आता तिथं जाऊन काय करू सांग…. पोरगं जाईल कामाला आम्ही आपलं दिसभर तिथं हाथ जोडून बसायचं”

सखाराम – “जाऊन ये तू एकदा….आपल्या शेतावरून जाणारी विमानं लय पाहिल्यात आजवर….एकदा बसूनच जा विमानातून.. “

नाम्या – “व्हाय….बघू नाही करमला तर येऊ महिन्याभरात वापस..उद्या राम्या येतोय मग बोलू”

गावातले सगळेच राम ची आतुरतेने वाट बघत होते. सरपंच हि नाम्याला तो अमेरिकेला जाणार म्हणून येऊन भेटून गेले.

आज राम येणार होता आणि तो आनंद नाम्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पण पुढे काय अघटित घडणार होतं ह्याची कुणालाच कल्पना नव्हती. रामचं विमान क्रॅश झालं होतं आणि दुसऱ्याच क्षणी होत्याचं नव्हतं झालं होतं. गावात वाऱ्यासारखी हि बातमी पसरली. परंतु कुणी नाम्याच्या घरी जाऊन त्याला हि बातमी सांगायची हिम्मत करत नव्हतं.

सखाराम – “नाम्या लय वाईट झालं रं….”

नाम्या – “काय रं काय झालं…असा कुत्र्यासारखं का पळत आला तू”

सखाराम – “नाम्या आरं आपला राम ज्या विमानाने येणार व्हता त्या विमानाला अपघात झाला रं…विमान समुद्रात कोसळलं म्हणतात….कुणीच वाचलं नाही “

हे ऐकून राम च्या आईने तिथेच हंबरडा फोडला आणि ढसा ढसा रडायला लागली. पण नाम्या मात्र निपचित पडला होता. त्याला ना रडू येत होतं ना हसू. सगळी गावकरी नाम्याच्या घरी जमा झाली होती. पण नाम्या मात्र ढिम्म सारखा बसला होता आकाशाकडे बघत.

आज राम ला जाऊन ५ वर्षे झाली होती….

नाम्या भर उन्हात आकाशात डोळे टिपत होता.

राम गेल्यापासून सखारामहि नाम्यासोबतच असायचा नेहमी. 

नाम्या – “काय रं सख्या एवढी विमानं जाताय रोज पण माझा राम्या अजून कसा आला नाही…. गावाकडची वाट तर विसरला नसलं न्हा व्ह”

ऐकून सखाराम ओक्सबोक्शी रडू लागला….राम गेल्यापासून नाम्या रोज फक्त एवढंच बोलायचा….राम ह्या जगात नाही ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता….

अजूनही नाम्या राम परत यायची आस धरून बसला आहे.

नाम्या – “माझा राम गावाकडची वाट विसरला नसलं न्हा व्ह……माझा राम गावाकडची वाट विसरला नसलं न्हा व्ह…… ” 

समाप्त..