Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ प्रज्ञा जोशी कुलकर्णी

अंथरूणावर पडून फक्त इकडून तिकडे कूस बदलण्यातच रात्र सरणार होती बहुतेक!
             गेल्या कित्येक रात्री झोपेनं बहिष्कारच टाकला होता माझ्यावर! काय वाईट केलं होतं मी या झोपेचं की ही बया माझ्यावर इतकी रूसून बसली असावी? मी मनातल्या मनात करवादलो!
            झोपेनं पाठ फिरवली की मनात ठासून-कोंबून भरलेली विचारांची गाठोडी बाहेर पडू पाहतात! अस्ताव्यस्त कपाटात आपण शिस्तहीन कपडे कोंबलेले असावेत आणि न सापडणाऱ्या वस्तू त्या कपाटात शोधू पहाव्यात तेव्हा दार उघडताच कपाटातला पसारा भसाभस खाली यावा तसं झालं होतं माझ्या मनाचं!
            मी शोधत होतो काहीतरी वेगळंच पण नको त्या गतीनं नको तेवढं सारं माझ्या नजरेसमोर तरळू लागलं!
            इतकी कशी शांत ही रमा? किती कमी प्रतिक्रिया देते!मी तरी कुठे वेगळा आहे म्हणा.आई तर हेच म्हणत होती….”सारक्याला बारकं आणि संसाराची चाकं”! म्हणजे नवरा-बायको दोघांचे स्वभाव मिळते-जुळते असले की संसारारथाची चाकं सारख्या गतीनं पळतात!रमा खरंच माझ्यासारखीच असावी बहुतेक….शांत-बुजरी- फारशी खुलणारी नव्हतीच ती! तिच्या स्वभावातला प्रत्येक सगुण-दुर्गुण प्रमाणबद्धच होता.
            एव्हाना तिला कळून चुकलं असावं की मी या लग्नासाठी खूश नव्हतो कारण माझी प्रत्येक निर्विकार प्रतिक्रिया ती सहनशीलतेनं झेलतीय! म्हणजे मलातरी तसं वाटतंय!आतापर्यंत तरी!
             तिचे डोळे मात्र कायम प्रश्नांत हरवलेले असतात!तिच्या डोळ्यातल्या प्रश्नचिन्हांची भीती वाटायला लागली आहे आता मला! वाटतं..‌.. एकदाच काय ते भडाभड ओकून मोकळं व्हावं…तिचे प्रश्नही संपतील आणि माझ्या पाठीमागची तिची पीडा!सतत ते डोळे आपल्या मनात गाडलेल्या संभ्रमीत आठवणींचा पाठलाग करतायत् असा भास होत राहतो मला! आणि ही असली गुप्त अपराधी भावना नको झालीय! नको असणारं काहीतरी आपण स्वतःच्या इच्छेविरुद्ध खातो आणि ते दडपलेले भाव दाखवू शकत नाही पण पोटातली मळमळ लपवूही शकत नाही तसंच काहीतरी झालंय माझं! म्हणूनच वाटतं भडाभडा ओकून टाकावं सगळं तिच्यासमोर! लागूदेत एकदाच काय तो सोक्षमोक्ष!
              पण मग माझंच मन खोडा घालतं! सांगायचं तर आहेच पण थोड्या संयमानं सांगू! परिणामांचा आणि त्यावरच्या उपायांचा विचार करून सारासार विचारानं घेऊ असं वाटतं राहतं!पण तोपर्यंतच्या काळात किती संयम बाळगावा लागेल हा केवळ विचार करूनही शक्तीपात होतो त्याचं काय?
               एकूणच माझं मन तिला अगदी पत्नीच काय पण रूम पार्टनर म्हणूनही स्वीकारायला राजी नाही!मी माझ्याच मनाची समजूत घालायचा कितीही आटापीटा केला तरीही!
               माझं मन….ते तरी काय करणार ना? ते प्रत्येक वेळी रमाची बरोबरी मिलिषासोबत करू पाहतंय…आणि त्या दोघींमधला जमीनअस्मानाचा फरक मला जिवंत जाळतो!
               मनसोक्त खिचडी खाऊन भरल्या पोटानं अंथरूणावर पडलो तरी तो लग्नाचा हा गुंता काही
सुटत नव्हता आणि झोप काही लागत नव्हती! आपल्याच घरात -आपल्याच अंथरूणावर अनामिक दडपणानं घेरलं होतं! राहून राहून मन त्याच विचारांमागे धावू लागलं!
              झोप लपाछपी खेळू लागली.
              किती अंतर आहे नाही या दोघींच्यात…अगदी दोन ध्रुव!उत्तर आणि दक्षिण!
              ही रमा सरळसाधी-गृहकृत्यदक्ष आणि स्वेच्छेने गृहिणी तर मिलिषा एका मल्टीनॅशनल कंपनीत एच आर एक्जेक्यूटिव्ह,रमा एक अतीसामान्य लाजरीबुजरी तरूणी आणि मिलिषा एकदम बोल्ड ललना! तिचा बोल्डनेसच तर भावला होता मला! म्हणतात ना…जे आपल्यात नसतं त्याचंच आकर्षण असतं आपल्याला!
             माझ्यासारख्या एसटी-बसची सोय नसलेल्या खेड्यात लहानाचा मोठा झालेल्या,कष्टकरी आईबापांच्या मायेत, रानोमाळ भटकत अवघं लहानपण घालवून वाढलेल्या पोराकडे कुठला असायला शहरी बोल्डनेस! अर्थात तिथे जन्माला येऊनही बोल्ड-बिनधास्त होणारेही असतातच! पण तो माझा स्वभावच नाही! मी लहानपणापासून भित्रा-बुजरा! चारचौघांत आत्मविश्वासानं फाडफाड बोलणं वगैरे मला झेपायचं नाही! अजूनही मी कामचलाऊ पद्धतीनंच गर्दी आणि माणसांचा घोळका हाताळू शकतो- हाताळतो!
            तो तसा बोल्डनेस- तो कॉन्फिडन्स आपल्या अंगी यावा म्हणून काय काय नाही केलं मी?
           तसा मी अभ्यासात हुशार! पण पब्लिक स्पीकींगचा फोबिया!आत्मविश्वास नावाची चीजच नाही अंगात! पण तरीही खूप श्रम-मेहनत करून सायन्स ग्रॅज्युएट झालो आणि नोकरी शोधण्यासाठी पुण्यात पहिलं पाऊल टाकलं!त्याच भित्र्या-बुळ्या स्वभावामुळं शामळू,बाळू, लाजरी मैना अशी कित्येक विशेषणं माझ्यावर फेकायची माझी दोस्तमंडळी!
                 खरंतर सायन्स ग्रॅज्युएट झालो तिथंच चुकलं! माझा पिंड खरंतर ती निर्जीव आकडेमोड आणि जन्ममृत्यूचा अभ्यास करण्याचा नाहीच!मी काव्यात रमतो, कथांमधल्या स्वप्नाळू जगात जगतो! मी चित्रं काढतो, चित्रांमधलं जग अनुभवयाला बघतो! जे जे सुंदर,सुगंधी,सूरमयी ते ते सगळं आवडतं मला! मी सौंदर्यासक्त आहे!रसिक आहे! अभिरुचीसंपन्न आहे!एसटीतून प्रवास करताना खिडकीतून दिसणाऱ्या हिरव्या सौंदर्यानंही मी मोहित होतो..या जगातलं सगळं सौंदर्य साद घालत असतं मला!सतत!कलेत-सौंदर्यांत रमण्याचा प्रांत आहे माझा!
               पण तरीही नोकरी करून आईबापाचे कष्ट संपवावेत या एकाच उद्देशानं शिक्षण पूर्ण केलं.विज्ञानशाखेची फारशी आवड नसली तरी मनाविरुध्द का होईना ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.तेही भारीपैकी मार्क्स घेऊन!नोकरी शोधण्याचं शास्त्र असल्यासारखा पुण्याला आलो आणि बेरोजगारांच्या गर्दीचा भाग बनून रोज निरनिराळ्या ऑफिसांचे उंबरे झिजवू लागलो.
               रोज सकाळी बाहेर पडताना उन्हातान्हात माती आणि अंगच्या घामाचं मीलन घडवून आणणारी आई आणि नुसतंच काम ओढून खारकेसारखा सुरकुतलेला बाप आठवायचा आणि मग नशिबाला चार घाणेरड्या शिव्या हासडून मी मित्राच्या खोलीतून बाहेर पडायचो.कधी चहा पिऊन तर कधी चहाची तल्लफ पाण्यावर भागवून! बसमधून लळतलोंबत प्रवास करताना महागडे चकचकीत कॉफी शॉप्स,पॉश शॉपिंग मॉल्स आणि तिथं बागडणारी स्वैर युगुलं पाहून हे सगळं फक्त बघतच आपण म्हातारे होणार की काय असं वाटायचं आणि जीव गलबलायचा! ‘चांगली नोकरी मिळवलीच पाहिजे!’ अशी टोचणी जीवाची सगळी स्वस्थता हिरावून घ्यायची! नोकरीसाठी वणवण वाढायलाच लागायची! मन आशानिराशांच्या पारंब्यांवर लटकत राहायचं.
                माझी नोकरीसाठी फरफट चालूच होती.आई-आबा पण माझ्या नोकरीच्या बातमीकडे डोळे लावून बसले होते.आठवड्यातून एकदा फोनवर बोलणं व्हायचं त्यांच्यासोबत पण त्या बोलण्यातही त्यांचे माझ्या काळजीनं खोल गेलेले आवाज कानावर पडायचे. आवाजातली चिंता लपवणं त्यांना जमत नव्हतं!
आई गावाकडनं खायला पाठवायची काहीबाही! सणावाराला फराळ तर हमखास पाठवायची येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या हातनं!
               तेव्हा बैलपोळा होता.गावाकडचा मदन मला खोलीवर भेटायला आला.आईनं बेंदराच्या कडबोळ्या पाठवल्या होत्या त्याच्यासोबत!तोच जाता जाता म्हणाला….”या शहरातल्या धबडग्यात कुठं दारोदारचे उंबरठे झिजवतो! सरकारी बॅंकांच्या परीक्षा दे! हां…एक मात्र आहे, सहजासहजी निवड होत नाही!रात्रं-दिवस एक करून
अभ्यास करावा लागेल पण एकदा का आत शिरलास की आयुष्याची घडी अशी बसेल की ईस्त्री पण एक मारंल!”त्याच्या मामेभावाला कुठल्यातरी बॅंकेत नोकरी लागली होती.मामेभावाचं कसं कल्याण झालं ते मदन सांगत राहिला आणि मी ऐकत राहिलो. मन माझ्यासाठीही नवनवं स्वप्नरंजन करत राहिलं.नेहमीप्रमाणंच!
               दुसऱ्या दिवशी मी व्यवसायमार्गदर्शन करणारे चार-दोन पेपर्स आणले आणि त्या परीक्षांचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक बघितला.तसं तर सगळं डोक्यावरून चाललं होतं पण आयुष्याची घडी बसावी म्हणून मी काहीही करायला तयार होतो!

=====================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *