Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

रंकाळाजवळच्या बागेत विशाखा विषण्ण मनाने बसली होती. ऑफिसमधून घरी आल्या आल्या तिला खरंतर घराची ओढ असायची, ऑफिस सुटायच्या आधीपासूनच तिचं लक्ष घड्याळाकडे असायचा. अगदी एखादी मैत्रीण पार्टी देते म्हणाली, किंवा ‘‘थांब ग जरा चहा तरी पिऊ.. किंवा जरा खरेदीला जाऊ.’’ असं म्हणाली तरी विशाखा म्हणायची, ‘‘नाही ग बाई माझा विशाल वाट बघत असेल माझी. मी गेल्याशिवाय काही खायचा नाही तो…’’ आणि आता? आता? विशाखाने डोळ्यांचं पाणी टिपलं. वारंवार तिचे डोळे भरून येत होते.
‘‘अगं आहे ना त्याची आई ती बघेल की त्याच्याकडं, तू किती गुंततेस त्याच्यात..’’ मैत्रिणी तिला ओरडायच्या. त्यामुळे ही बर्‍याच वेळा तसा प्रयत्न पण करायची, की जाऊ दे उगाच मायेच्या फेर्‍यात गुंतायला नको. असं तिलाही वाटलं, म्हणून एक-दोन वेळा मुद्दाम उशीर केला तिने घरी यायला तर छोटा गुलाम गाल फुगवून रुसून बसला होता. कुणाच्याही हातनं काहीही खाईना. मग सगळ्यांनी तिच्यावरच तोंडसुख घेतलं त्याचं तिला काहीच वाटलं नाही पण आपण आलो नाही आणि तो उपाशी राहिला याचं तिला जास्त वाईट वाटलं. हातपाय धुऊन स्वत: काही न खाता आधी तिने विशालला समजावलं आणि भरवलं. तेव्हापासून तिने ठरवलं अगदीच इलाज नसेल तरच थांबायचं नाहीतर उगाच इकडे तिकडे करत बसायचं नाही. हेच पथ्य तिने अगदी परवापरवापर्यंत पाळलं होतं तो अगदी तो मोठा झाला होता तरीही… त्याचं लग्न झालं होतं तरीही, पण आज तिला घरी जाववेना.. पाय जड झाले होते.
तिथेच शेजारी लहान मुलं खेळत होती. विशाखाला त्यांच्याकडे बघताना वाटलं, का मुलं मोठी होतात? लहान असतात तेच बरं. तिला झटकन असं वाटलं की, आपला लहान विशालच खेळतोय त्या मुलांच्यामध्ये ती पटकन धावत एका मुलाजवळ पोहोचली त्याचा पापा घेणार तोच तो मुलगा पळून गेला ही कोण बाई आपला पापा घ्यायला आली म्हणून. विशाखा एकदम भानावर आली. आपण काय करतोय हे असं तिला वाटलं, ती घरी जायला निघाली.
घरात विशाल त्याची बायको सामान बांधून तयार होती. विशाखा घरी येताच विशालने तिच्या पायाला हात लावून नमस्कार केला ती जरा मागे सरकली.
‘‘आत्या, आम्ही दोघं आईकडे जातोय….’’ तिला लागलेली कुणकुण खरी होती तर… शेवटी मातीचे …. तिला कुणीतरी म्हटलेली म्हण आठवली. तिचे डोळे भरून आले होते. नकोसा वाटणारा क्षण तिच्या आयुष्यात आलाच होता. तिने आशेने सारिकाकडे म्हणजे विशालच्या बायकोकडे पाहिले तर तीही मान खाली घालून त्याच्याबरोबर आवरून तयार झाली होती.
पूर्वइतिहास विशाखाच्या डोळ्यांसमोर नाचू लागला. तिचे लग्न झाले आणि काही दिवसांतच नवरा अल्पशा आजाराने मृत्युमुखी पडला. त्यामुळे ती माहेरी राहू लागली. तिला विशालचा आणि विशालला म्हणजे तिच्या भावाच्या मुलाला तिचा खूप लळा लागला होता. लहानपणापासून तिने विशालला आपल्या मुलासारखे सांभाळले होते. विशालमध्ये ती आपली सारी दु:ख विसरून जात असे. तिला चांगली नोकरी होती. विशाल जरा मोठा झाल्यावर ती माहेरच्या घरापासून थोड्या अंतरावर घर घेऊन विशालबरोबर राहू लागली. कधीकधी तर ती विसरूनही जात असे की, विशाल आपला मुलगा नाहीये तर आपल्या भावाचा, वहिनीचा मुलगा आहे.
विशालची आई तर मायेच्या बाबतीत दगड होती. तिला आपल्या मुलाबद्दल मायाच नव्हती. तसंही विशालला आणखी दोन भाऊ आणि एक बहीण होती, परिस्थिती बेताची होती त्यामुळे विशाल आत्याकडे राहायला गेला याचं तिला अजिबात दु:खं नव्हतं. आत्याने त्याचं चांगलं पालन-पोषण केलं, बाकीच्या मुलांच्या शिक्षणासाठीही ती मदत करीत असे. पण विशालवर तिचा विशेष जीव होता. विशाल चांगला शिकला इंजिनिअर झाला त्याला चांगली नोकरी लागली. आणि वर्षभरापूर्वी विशाखाने त्याच्यासाठी योग्य स्थळ बघून त्याचे एका छानशा मुलीशी लग्नही लावून दिलं होतं. इथपर्यंत सगळं व्यवस्थित होतं.
विशाल मुळातच हुशार होता त्यात त्याच्या हुशारीला योग्य खतपाणी मिळाल्याने त्याला चांगला पगार मिळत होता. आणि हेच विशालच्या आईच्या लक्षात आले होते. अलीकडे विशालला मिळणारा पैसा त्याच्या आईच्या डोळ्यांत भरू लागला आणि तिने विशालशी जवळीक वाढवली. त्याचे लाड करू लागली. सुनेचं कोडकौतुक करू लागली. विशाल लहानपणापासून आईच्या मायेला पारखा झाला होता, लहानपणी आईने आपलं कोडकौतुक करावं अशी मनात कुठेतरी खंत वाटत असावी. त्यामुळे आता स्वार्थापोटी आई माया करतेय हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. आईच्या मायेने तो हुरळून गेला आणि आईकडे परत ओढला गेला. गोड बोलून आईने त्याचे मन आपल्याकडे वळवलं आणि विशाखा अगदी एकटी उरली…
आपण याच्यासाठी दुसरं लग्न केलं नाही अगदी एकटे राहिलो त्याचं हेच का फळ मिळालं आपल्याला? तिला वाटू लागलं. विशाल मात्र आपल्याच तोर्‍यात पुढे निघाला होता. विशालची बायको सारीका हिला या सगळ्या प्रकारात अगदी कानकोंड व्हायला झालं होतं. कारण तिचा विशाखावर जीव होता. ती नवर्‍याबरोबर दोन पावलं चालली, पण त्याच वेगाने परत आली आणि म्हणाली,
‘‘आई,’’ हो ती आईच म्हणत असे विशाखाला.
‘‘आई, माझा नाईलाज आहे… पण एक ना एक दिवस मी विशालला परत तुमच्याकडे आणायचा नक्की प्रयत्न करेन.
तिच्या शब्दांनी विशाखा विषण्ण हसली आणि आरामखुर्चीत तिने आपले अंग झोकून दिले.
©️®️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

==================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *