Ritbhatmarathi

Search
Close this search box.

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२

©️®️ विश्वनाथ घनश्याम जोशी

दोनची बस थांबून पुढे गेल्याचा आवाज आला, तशी आई लगबगीने पडवीवर आली. आई पाठोपाठ मीही येऊन दरवाज्यात उभी राहिले. काही वेळाने वरच्या पायंडीतून वहाणांची करकर ऐकू येऊ लागली. बांबूच्या काठ्यांपासून बनवलेले फाटक उघडून बाबा अंगणात आले. मी पटकन पुढे होऊन त्यांच्या हातातील पिशवी घेतली. टोपी खुंटीला अडकवून ते पडवीवरच्या सोप्यावर येऊन बसले. त्यांची चर्या पाहून मी काय समजायचे ते समजले. मी आत जाऊन चहाला आधण ठेवले. चहाला उकळी येईपर्यंत मनातली दुःखाची उबळ थोडीशी शांत झाली. ओलावलेले डोळे काहीसे कोरडे झाले. चहाचा पेला बाबांना बाहेर नेऊन दिला. बाबा काहीतरी बोलतील अशा अपेक्षेने त्यांचा चहा पिऊन होईपर्यंत आई तिथेच उभी होती. परंतु काहीही न बोलताच बाबांनी चहा संपवला व पंचा घेऊन मागच्या दारी आंघोळीला निघून गेले. आंघोळीहून येऊन ते पूजेला बसले. त्यांची पूजा आवरल्यावर मी पान घेतलं. देवाला नैवेद्य दाखवून ते पानावर बसले. जेवतानाही ते स्तब्धच होते. शेवटी न राहवून आईनेच विचारलं –

“झाली का भेट?”

“होय.” बाबांनी नुसता होकार दिला.

“काय म्हणाले?” आणखी थोडं थांबून आईने विचारले.

“म्हणणार काय? नेहमीचंच उत्तर. लग्नाच्या बाजारात शिक्षण आणि नोकरी नसलेल्या मुलीची किंमत शून्य.” बाबा विषण्णपणे म्हणाले.

“शिक्षण नसलं म्हणून काय झालं? स्वयंपाकपाणी, शेण-गोठा व घरकामात हुषार आहे आपली मृदुला. प्रसंग पडल्यास शंभर जणांचा स्वयंपाक एकटीने करील.”

“तू म्हणतेस ते खरं आहे. पण शंभर जणांचा स्वयंपाक आज-काल लागतोय कुणाला? आज-काल समारंभ हॉलमध्येच होतात. तिथं भटजी पासून स्वयंपाकापर्यंत सगळं काही कॉन्ट्रॅक्टवर मिळतं.”

पुढचं बोलणं ऐकायला मी तिथे थांबलेच नाही. माझ्या अशिक्षितपणाबद्दल मला कधीच फिकीर वा खंत वाटली नव्हती. पण आताशा बाबांची माझ्यासाठी चाललेली दगदग व तगमग पाहून मला माझ्या अशिक्षितपणाचा अडाणी पणाचा राग यायचा. लहानपणापासूनच शिक्षणामध्ये मी अगदीच ‘ढ’ होते. अभ्यासाचा तर मला मनापासून कंटाळा. शाळेत शिकवले जाणारे सगळे विषय मला रुक्ष, नीरस व कंटाळवाणे वाटायचे. गणिताशी तर माझे जन्मजात हाडवैर. त्या आकड्यांचे आणि माझे सूर कधी जुळलेच नाहीत.  शाळेत मी नऊ वर्षे काढली आणि कशीबशी सातवीपर्यंत मजल मारली आणि त्या नंतर मात्र शाळेला कायमचा रामराम ठोकला.

शाळेची कटकट कायमची मिटल्यामुळे मला त्यावेळी खूप आनंद झाला होता. घरकाम, कुळागर, गुरेढोरे यातच मी रमायचे. जमिनीला शेण सारवणे, रांगोळी काढणे, झाडलोट करणे, कुळागरातून सूपार्‍या वेचून आणणे, गुरांसाठी हिरवा चारा आणणे, शेणगोठा करणे वगैरे सारी कामे मी तन्मयतेने करायचे. माझा दिवसातला बराचसा वेळ गोठ्यातच जाई.

 शाळा सोडल्यानंतर माझ्या आयुष्यातील पुढची काही वर्षे इतकी आनंदात गेली की शिक्षणावाचून माणसाचे काही अडू शकते यावर माझा जरा देखील विश्वास राहिला नाही. माझे आई-बाबा देखील माझ्या अल्पशिक्षितपणाबद्दल मला कधीही टोचून बोलले नाहीत की वैतागले नाहीत. उलट बाबा कधी कधी म्हणायचे –

 “सगळीच माणसं काही एकसारखी नसतात. काही शिक्षणात चमकतात तर काही इतर कोणत्यातरी क्षेत्रामध्ये नाव काढतात. एकीकडचं न्यून देव दुसरं काहीतरी देऊन भरून काढतो. त्यामुळे शिकायला जमलं नाही म्हणून वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही.”

पुढे मी वयात आल्यावर माझ्या करिता वरसंशोधन सुरू झाले आणि लग्नाच्या बाजारात माझा अशिक्षितपणा म्हणजे शाप ठरू लागला. आई बऱ्याचदा म्हणायची जिथे जाईल तिथे सोन्याचा संसार करील आमची मृदुला.

 पण आजकाल सोन्याच्या संसाराची व्याख्या बदलली आहे हे तिला बिचारीला कुठे ठाऊक. जिच्या कडे लठ्ठ पगाराची नोकरी नाही ती आज सोन्याचा संसार करू शकत नाही. संसार करायला नालायक समजली जाते. जुन्या काळी वधू-वरांच्या नक्षत्रावरून किती गुण जमतात ते पाहून लग्ने ठरवली जायची. हल्ली दोघांचे पगार मिळून काय आकडा होईल ते पाहिले जाते. शिक्षण नसेल, नोकरी नसेल तर मुलीच्या अंगातील बाकी सारे गुण कवडीमोलाचे ठरतात.

 बिनलग्नाची राहून सारे आयुष्य काढायला लागले असते तरी सुद्धा मला चालले असते. पण माझ्या लग्नाच्या काळजीने दिवसेंदिवस खचत चाललेल्या आईबाबांकरिता तरी माझे लग्न जमायला हवे होते. पुढे माझ्या संसारात मला किती सुख मिळेल याची मला फिकीर नव्हती. पण आई-बाबांच्या चेहऱ्यावरचे कृतकृत्यतेचे, समाधानाचे भाव मला पहायचे होते. म्हणूनच जिथे मी पसंत पडेन ते स्थळ डोळे झाकून स्वीकारायचे असे मी मनाशी ठरवले होते. 

मी मुलगा म्हणून जन्माला आले असते तर किती बरे झाले असते असा विचार माझ्या मनात बऱ्याचदा येऊन जायचा. लग्नाची मुलगी म्हणजे आई-वडिलांच्या गळ्यातली धोंड. आई-वडिलांना धड जगूही देत नाही व मरूही देत नाही. एक वेळ मुलगा बिनलग्नाचा राहिला तरी त्याचे इतके अंतर्बाह्य पोखरून काढणारे पराकोटीचे दुःख आई-वडिलांना भोगावे लागत नाही.

 मनाशी काही ठरवून मी पुन्हा घरात आले. बाबा सोप्यावर बसले होते व आई खाली जमिनीवर बसून केळीच्या पानांचे द्रोण बांधत होती. हे द्रोण नाजूक हळुवार हातांनी बांधले तरच नीट बनतात. नाहीतर कधी फाटतील ते लक्षातही येणार नाही. माझ्या आईचे हात तर तिच्या मनासारखेच नाजूक, मऊशार व उबदार. मी पटकन खाली बसून आईचे हात हातात घेतले.

“आई, आई आता तुम्ही माझ्यासाठी आणखी स्थळे नका बघू. मी तुमचा मुलगाच आहे असं समजा.”

“अग तू एवढी निराश कां होतेस?”

“निराश नाही ग झाले. पण माझ्या करिता तुम्हा दोघांची चाललेली ओढाताण मला सहन होत नाही.”

सोप्यावरून उठून बाबा माझ्याजवळ आले. पाठीवरुन हात फिरवीत म्हणाले –  “अग ओढाताण वगैरे काही नाही. आम्ही जे काही करतोय ते कर्तव्यच आहे आमचे, आणि मुलांच्या बाबतीतली कर्तव्ये पार पाडताना आई-वडिलांना त्याचा भार वाटतो का कधी?”

आपल्या पदराने माझे डोळे पुसत आई म्हणाली –  

“अग देवाच्या दरबारात डावं-उजवं नसतं. प्रत्येकाचा जोडीदार त्याने आधीच ठरवलेला असतो. पण आपल्याला हवा तेव्हा आपल्याला सापडतो असं नाही. त्यासाठी योग्य वेळ सुद्धा त्यानेच ठरवून ठेवलेली असते. योग्य वेळ आली  म्हणजे आपोआप तो समोर येऊन दत्त म्हणून उभा ठाकेल.”

 असेच आणखी तीन-चार महिने गेले. आणखी तीन-चार स्थळांकडून नकार आले. एक दिवस दुपारच्या गाडीने मामा घरी आला. जेवण वगैरे आटोपून तो बाबांबरोबर गप्पा मारायला पडवी वर बसला.

 “भावजी मृदुलासाठी एक स्थळ सुचवायला म्हणून मुद्दाम आलोय.”

“छान, पण मुली बद्दलच्या त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते विचारलं आहेस का?” – बाबा.

“मुलगा आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करतो. त्याने संकरित जातीच्या काही गाई पाळल्यात. गाईगुरांची आवड असणारी, त्यांची कामं करू शकणारी मुलगीच त्याला बायको म्हणून हवीय.”

 “म्हणजे त्याला आमची मृदुलाच हवीय असं म्हण की.” बाबा खुशीने बोलले व त्यांनी आईला व मला बाहेर बोलावले.

“अग मृदुले, तुझी आई म्हणते त्याप्रमाणे देवाने तुझ्यासाठी ठरवून ठेवलेला जोडीदार सापडला बरं का.”

थोडावेळ माझ्या काहीच लक्षात येईना. मग मामाने खुलासा करून सांगितले. त्या पुढील पंधरा दिवसात लग्न ठरले सुद्धा. लग्न ठरले याचा मला आनंद होताच. त्यातून सासरचा व्यवसाय दुधाचा. मी अंतर्बाह्य सुखावले होते. मामा म्हणत होते की संकरित जातीची एक एक गाय दिवसाला 15 ते 20 लिटर दूध देते. नाहीतर आमच्या गावठी गाई. कसेबसे तांब्या दीड तांब्या दुध देतात. कधी एकदा त्या संकरित गाई पाहते असे मला झाले होते.

पुढे एका शुभमुहूर्तावर आमचा विवाह सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी हे मला गाई दाखवायला गोठ्यात घेऊन गेले. आकार, देहयष्टी वगैरे बाबतीत त्या गाई आमच्या गावठी गाईंपेक्षा जरा वेगळ्या होत्या. मी त्यातल्या काही गाईंना पाठीवरून व गळ्याखालून हात फिरवून गोंजारले. आमच्या गावठी गाई असे गोंजारल्यावार लगेच लाडात यायच्या. पण या संकरीत गाई स्थितप्रज्ञा सारख्या उभ्या होत्या. गावठी गायीचे दूध आम्ही डाव्या हातात तांब्या पकडून उजव्या हाताने काढायचो. इथे मात्र गाईच्या पोटाखाली बादली ठेवून दोन्ही हातांनी दूध काढले जाई.

 आमच्या गावठी गाई वासरू दूध पिऊ लागल्यावरच पान्हा सोडायच्या. त्यानंतर वासराला बाजूला बांधून आम्ही दूध काढायचो. थोडं दूध वासरासाठी शिल्लक ठेवायचो. पण इथे सगळेच वेगळे. इथे वासराला नुसते गाईसमोर आणून बांधले तरी गाई पान्हा सोडतात. गाईच्या आचळातून दुध प्यायला इथे वासरांना सक्त मनाई. त्यांना भांड्यातून दूध पाजायचे. शिवाय या संकरित गाईंना आठवड्यातून दोनदा आंघोळही घालावी लागते.

हे पहाटे पाच वाजता उठून गोठ्यात जातात. कारण सकाळी साडेसात पर्यंत सोसायटीमध्ये दूध पोहोचवावे लागते. हळूहळू मीही या साऱ्या मध्ये रुळले. एक दिवस मी ह्यांना म्हटलं –  

“आई-बाबांच्याने होईना झालं की आपण तिथली गुरं सुद्धा इकडेच आणूया.”  “आणायला काही हरकत नाहीय. पण तुमची गावठी गुरं धंद्याच्या दृष्टीने कुचकामाची. दहा रुपयांची खावड खाऊन पाच रुपयांचं दूध देणार. त्यापेक्षा आपण त्यांना सरळ विकून टाकू.”

 त्यांचे म्हणणे बरोबर होते. तरीही गुरांना विकून टाकण्याच्या नुसत्या कल्पनेनेच मी अस्वस्थ झाले. माझ्या माहेरी आम्ही गुरांकडे धंदा म्हणून कधीच पाहिले नव्हते. आमच्यासाठी ती जणु गुरे नव्हतीच. कुटुंबातील माणसेच होती. त्यामुळे ह्यांचे म्हणणे बुद्धीला पटत होते पण मनाला बोचत होते. असो.  त्यावेळचे त्यावेळी बघता येईल असे मी माझ्या मनाला समजावले.

 आमच्या संकरित गाईं पैकी चार गाई गाभण होत्या. त्यातील एकीचे दिवस अगदी भरत आले होते. दर आठवड्याला पशुवैद्य त्यांना तपासून जायचा. कधी एकदा नवीन वासरू जन्माला येते असे मला झाले होते. मला त्याला आंजारायचे  होते, गोंजारायचे होते.

 चार दिवसांनी ती गाय व्याली. तिला पाडा म्हणजे गोऱ्हा झाला. छान गुटगुटीत लालसर रंगाचा होता. गाईच्या वासरांचे माणसाच्या मुलांप्रमाणे नसते. जन्माला आल्यावर काही मिनिटातच ती उभी राहतात व आई जवळ नेल्यास सरळ दूध प्यायला लागतात. पण आमच्याकडे तसं दूध प्यायला मनाई. त्यामुळे या नवजात पाड्याला गाई समोर बांधून ह्यांनी दूध काढले. पण पाड्याला दूध पाजलेच नाही. मला वाटले गडबडीत हे विसरले असावेत.

“अहो पाड्याला दूध पाजायचं विसरलात की काय?”

“विसरतोय कशानं? त्याला दूध पाजून काय उपयोग?”

“अहो पण मग उपाशी मरेल ना तो.”  

“मरू दे ना मग. मरायलाच तर हवाय.”

“असं नका हो करू. किती गोजिरवाणा आहे तो, बघा ना.” माझा स्वर कातर झाला होता.

“अग धंदा करायचा म्हटलं की असं भावनाविवश होऊन नाही चालत. गावठी जातीच्या बैलांचा शेत नांगरायला, गाडी ओढायला वगैरे बऱ्याच कामांकरिता उपयोग होतो. पण संकरित जातीचे हे बैल कुचकामाचे असतात. त्यामुळे त्यांना कोणीही विकत घ्यायला तयार नसतात. त्यांना तसेच पाळायचे म्हटलं तर धंद्याच्या दृष्टीने ते व्यवहार्य नाही. त्यांच्या साठी गोठा खाणं-पिणं वगैरे सारी व्यवस्था करायची झाली तर सारा नफा तिकडेच खर्च करावा लागेल.”

 “अहो पण गोऱ्हा मेला तर ही गाय दूध कशी देईल? तो समोर दिसल्या शिवाय ती पान्हाच सोडणार नाही.”  

“अग असले नखरे तुमच्या गावठी गाई करतात, आणि एवढं सारं करून दूध किती देतील तर पेलाभर किंवा तांब्याभर. या संकरित गाईंचं तसं काही नसतं. वासरू नसेल तर समोर खायला काहीतरी ठेवा. लगेच पान्हा सोडतील.”

मी निरुत्तर झाले. ह्यांचं म्हणणं खोडून काढायला माझ्याकडे एकही मुद्दा नव्हता. पण तरीही यांचं म्हणणं गळ्याखाली उतरेना. त्या गोऱ्ह्याला उपाशी ठेवून मारायच्या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारे आले. गोठ्यात गेल्यावर त्या गाईच्या नजरेला नजर देणं सुद्धा मी टाळीत होते. आमच्या धंद्यासाठी आम्ही तिच्या पोटच्या गोळ्याला मारायला काढलं होतं. माझ्या मनात अपराधीपणाची भावना वाढत होती.

 आमच्या गावठी गाईंना परक्या माणसाने त्यांच्या वासरांना हात देखील लावलेला खपत नाही, आणि या संकरित गाई वासरू मेल्यावर सुद्धा केवळ खाण्याच्या आमिषाने पान्हा सोडतात यावर माझा विश्वासच बसत नव्हता. संकरित झाल्या तरी गाईच ना त्या.

 एक दिवस अपेक्षेप्रमाणे गोऱ्हा उपाशी मेला. दूध काढायच्या वेळी यांनी पेंड व भुशाचे मिश्रण घमेल्यात घालून गाईसमोर ठेवले. ते खाता खाता तिने पान्हा सोडला. मी दिङ्मूढ होऊन पहातच राहिले.

माझ्या दृष्टीने अगम्य अकल्पित असे काहीतरी समोर घडत होते. गोऱ्ह्याचे ते तसे मरणे माझ्या काळजात सलत होते. पण त्या गाईला त्याचे सोयरसुतकही नव्हते. विदेशी जातीचा वारसा सांगणाऱ्या या गाई आपल्या सोबत पाश्चात्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन देखील घेऊन आल्या असाव्यात.

– विश्वनाथ घनश्याम जोशी

==============================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *