Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सायली

तिला कौतुक हा शब्दच माहित नव्हता जणू. घरातली सारी कामे ती निमूटपणे करायची. “आज अमुक अमुक छान झालंय हा सुनबाई,”असं सासुबाई कधीच म्हणायच्या नाहीत आणि नवरा ही कधी तिचे कौतुक करायचा नाही. तिने केलेले दोघे गपचुप खात आणि झालं उठून जात. ती जेवली काय आणि नाही काय कुणालाच फरक पडत नव्हता. सासूबाईंना ती तशी आवडत ही नव्हती म्हणा. तिच्या हातून थोडीशी जरी चूक झाली तरी सासुबाई लगेच रागवायच्या तिच्यावर. तेवढाच काय तो दोघीतला ‘संवाद ‘. काही कारण नसताना त्यांनी तिच्याशी तसा अबोला धरला होता आणि तिचा नवराही आता संसाराला सरावला होता, तो लक्ष देत नव्हता तिच्याकडे फारसा. याचा जाब विचारायला ओठावर शब्द यायचे तिच्या ,मात्र उगीच ‘भरल्या घरात भांडण नको ‘ म्हणून ती संयम ठेऊन ते परतवून लावायची.

परगावी शिकायला असलेला ‘धाकटा दीर ‘ तेवढा अधून -मधून तिला फोन करायचा. विचारायचा, “वहिनी कशी आहेस?” म्हणून. त्याचा फोन आल्यावर तिला खूप आनंद व्हायचा, आपलं मन मोकळं करायचं हक्काचं ठिकाण होतं ते तिचं.

काही दिवसांतच दिराचे शिक्षण संपले आणि तो घरी आला. थोड्या कालावधीतच त्याला छान नोकरीही लागली. कित्ती आनंद झाला तिला. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर तिच्या सासूबाईंनी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नाची बोलणी सुरू केली. पण दीर एकही मुलगी पसंत करेना. “हिनेच सांगितले असेल त्याला नकार द्यायला” म्हणून सासुबाई तिच्यावरच चिडल्या. ती हिरमुसलेली पाहून दीर आईला बोलू लागला, म्हणाला “माझे एका मुलीवर मनापासून प्रेम आहे. मला तिच्याशीच लग्न करायचे आहे,” म्हणून हट्टून बसला. तशी वहिनीची कळी खुलली. “भाऊजी हे आधी नाही का सांगायचे!” म्हणून तिने आपल्या नवऱ्याच्या कानावर घातले सारे. त्याने थोडे आढेवेढे घेतले, मात्र मुलगी पाहून तो ही तयार झाला. राहता राहिला प्रश्न सासूबाईंचा, आपल्या धाकट्या मुलाचे मन कसे बरे मोडतील त्या? शेवटी त्यांचाही होकार आला.
तिला खूप आनंद झाला. वाटले, एक मैत्रीण येईल आता सोबतीला, मनातलं गुपित सांगायला. पण कशा असतील धाकट्या जाऊबाई! जमवून घेतली का आपल्याशी आणि या घराशी? की वेगळा संसार मांडायचा हट्ट करतील भाऊजींकडे? या विचाराने थोडे टेन्शन ही आले तिला.

काही दिवसांतच तिच्या ‘धाकट्या जाऊबाई ‘माप ओलांडून घरी आल्या.

जाऊबाईंनी आल्या आल्याच सारं घर आपल्या हातात घेतले. आता सासुबाई आपल्या धाकट्या सुनेचे जास्तच कौतुक करू लागल्या. मायेने तिची विचारपूस करू लागल्या. हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिला वाटले “आपणही हे करत होतोच की सारे, मग माझ्याच वाटणीला का हे असे? आता थोड्याचं दिवसांत जाऊबाई साऱ्या घरावर राज्य करतील आणि मग आपली जागा कुठे तरी कोपर्‍यातच..” आपल्याच विचारात हरवून गेली ती. तसे तिच्या मनातले भाव कळल्याप्रमाणे धाकट्या जाऊबाई तिचे हात हातात घेऊन म्हणाल्या “वहिनी मला ठाऊक आहे हो सारे. मला तुमची धाकटी बहीण समजा, बघा लवकरच सारे काही ठीक होईल.

धाकट्या जाऊबाईंनी साऱ्या घराचा ताबा घेतला खरा. पण कामात काही ना काही सारख्या चुका होऊ लागल्या त्यांच्याकडून. मग धाकटी आपल्या वहिनींकडे जात आणि मदत मागे. असे रोजच होऊ लागले. हे पाहून सासुबाई मात्र चिडल्या. इथे ‘मी ‘ असताना ही ‘धाकटी ‘ मोठीला विचारतेच कशी? मग सासुबाई ही पदर खोचून रोज स्वयंपाकघरात येऊ लागल्या. चार कामे करू लागल्या. हळूहळू त्या धाकटीसोबत नकळत मोठया सुनेशीही प्रेमाने वागू बोलू लागल्या. नवे नवे पदार्थ दोघींना शिकवू लागल्या. चुका समजून सांगू लागल्या. आता सासुबाई आणि दोन्ही सुनांची छान गट्टी जमली. यामुळे मोठीचा स्वभाव ही खुलू लागला, मोकळेपणा आला तिच्या स्वभावात.
आपल्या दोन्ही सुनांचे गुळपीठ जमलेले पाहून सासुबाई कशा मागे राहतील! त्या ही दोघींसोबत कधी शॉपिंग, तर कधी फिल्म पाहायला जाऊ लागल्या. आता सासुबाई आपल्या दोन्हीं सुनांवर सारखीच माया करू लागल्या. यामुळे घरचं वातावरण हसतं – खेळतं झालंच, शिवाय आपल्या भावाचे आणि भावजयीच बाँडींग पाहून मोठीचा नवराही तिच्याशी छान वागू लागला.
हे पाहून धाकटी सुखावली.
“वहिनी या घरावर आधी तुमचा हक्क आहे बरं.” असे म्हणत धाकटीने सारे घर पुन्हा आपल्या मोठ्या जाऊबाईंच्या ताब्यात दिले.

वर्षभरात मोठीच्या दिराची चांगल्या पगारावर व मोठ्या हुद्यावर परगावी बदली झाली. “आता धाकट्या जाऊबाई ही आपल्या दिरांच्यासोबत परगावी जाणार, आणि मी पुन्हा एकटी पडणार. शिवाय इतक्या वर्षांनी बदललेली सासुबाईंची वागणूक पुन्हा आधीसारखीच झाली तर?” या विचाराने मोठी धास्तावली. धाकटीची तिला इतकी सवय झाली होती, की तिच्याशिवाय घर खायला उठणार होते. धाकटीच्या येण्याने घरचं वातावरण बदलून गेलं होतं. ती होतीच तशी, नावाप्रमाणे आनंदी, उत्साही.
इथे धाकट्या जाऊबाईंची अवस्था काही वेगळी नव्हती. इथेच राहावे, तर नवऱ्यापासून दूर राहावे लागणार याचे दुःख वाटत होते त्यांना.

आपल्या दिराची जायची चाललेली गडबड आणि जाऊबाई मात्र निवांत असलेल्या पाहून मोठी विचारात पडली. शेवटी न राहवून तिने धाकटीला विचारलेच.
“वहिनी बदलीच्या ठिकाणी तिथे मी एकटीच राहणार दिवसभर. त्यापेक्षा इथेच राहीन म्हणते. तुमच्या दिरांना सांगितलय बरं का मी, शनिवार आणि रविवारच्या सुट्टीत तुम्हीच इथे या म्हणून. मी ही त्यांच्यासोबत जाईन अधून मधून थोडा बदल म्हणून. त्यावर हे म्हणतात कसे, सहा महिन्यांत पुन्हा इथेच बदली करून घेईन मी.”आपल्या नवऱ्याची नक्कल करत धाकटी म्हणाली, तशा दोघी हसू लागल्या. आपल्या डोळ्यातले पाणी पुसत मोठी म्हणाली, ” जाऊबाई हे दिवस पुन्हा यायचे नाहीत बरं! जा तुम्ही आपल्या नवऱ्यासोबत. त्यांच्याही सोबतीला हवेच ना कोणीतरी.”
तशी धाकटी म्हणाली, “ताई तुम्ही मला मोठ्या बहिणीची माया दिली आणि सासुबाईंनी आईची माया. तसेच भाऊजींच्या रूपाने एक भाऊ मिळाला. हा भरलेला संसार सोडून मी कशी जाऊ? तिथे एकटीला करमणार नाही मला. सहा महिन्यांचा तर प्रश्न आहे.’ हे ‘ ही येतीलच की इथे परतून. हे ऐकून मोठीने आनंदाने मिठीच मारली तिला. तशी धाकटी पुन्हा म्हणाली,”आपल्या नवऱ्याच्या पाठी लागून वेगळा संसार मांडायला वेळ नाही लागत. आपल्या माणसात राहून नवऱ्याची वाट पाहण्यातही आनंद असतोच की! नाही का?”

=============================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *