Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

सरलावहिनी बाहेरून घरात आल्या. देवयानी त्यांचीच वाट बघत होती. त्या आत येताच तिनं ताट-पानांची तयारी केली. वयोमानानुसार सरलावहिनी आता जरा थकलेल्या वाटत असल्या तरी त्यांच्या अंगात भरपूर उत्साह होता. दिसायला गोर्‍या-गोमट्या, उंच, बांधेसूद अशा सरलावहिनींची सर्वांवर छाप पडायची, किंबहुना त्या तशी छाप पाडणं भाग पाडायच्या समोरच्याला. देवयानीला ताटं घेताना बघून त्यांच्या कपाळाची शीर किंचित तटतटली. हिला फारच हौस काम करायची. शेवटी… त्यांच्या मनात विचार येत होते.
त्यांचा चेहरा इतका पारदर्शी होता की, मनात काय चाललंय समोरच्याच्या लगेच लक्षात येत असे, आणि देवयानीला तर आता त्यांच्या स्वभावााची चांगलीच माहिती झाली होती.
‘‘ते.. मावशी लवकर गेल्या, घरी कोणीतरी आजारी आहे म्हणाल्या म्हणून…’’ देवयानी चाचपडत म्हणाली.
‘‘बरं.. तू असतानाच सगळी आजारी बरी पडतात…’’ असेच काहीसे भाव होते त्यांच्या चेहर्‍यावर. सरलावहिनी म्हणजे देवयानीच्या मोठ्या जाऊबाई, पण दोघींच्या वयात इतकं अंतर होतं की त्या तिच्यासाठी सासूबाईंसारख्याच होत्या. शिवाय देवयानीच्या नवर्‍याला देवांशलाही त्यांनी सासूबाईंच्या माघारी पोटच्या मुलासारखंच वाढवलं होतं. सरलावहिनी माहेरच्या पण श्रीमंत होत्या आणि सासरी पण लक्ष्मी नांदत होती त्यामुळे खानदानी श्रीमंती त्यांच्या अंगात मुरली होती. आणि देवयानी? तिचं माहेर खाऊनपिऊन सुखी या सदरातलं होतं. श्रीमंतीत मोडणारं नव्हतं. पैशाचे चढ-उतार तिला माहीत होते. त्यामुळे घरात काम करणार्‍या नोकरांबद्दल तिला कणव होती आणि सरलावहिनींना याचाच राग यायचा. त्या त्यांच्याशी अगदी वाईट वागायच्या नाहीत पण व्यवहाराने वागायच्या. कामाचे पैसे चोख द्यायच्या, काम पण चोख करून घ्यायच्या. त्या असताना कुणाची कामात अळम्टळम् खपवून घ्यायच्या नाहीत.
सरलावहिनी फक्त हळव्या होत्या त्या देवाबाबत देवधर्म करणे, देवळात जाणे, देवळांना देणगी देणे या गोष्टी त्या अगदी मनापासून करीत. आज दुपारी जेवून त्या एका महत्त्वाच्या कामासाठी परगावी जाणार होत्या. उद्या सकाळी दहा वाजता परत येणार होत्या. जेवणं होऊन त्यांची आवराआवर झाल्यावर त्यांनी देवयानीला हाक मारून सांगितले, मी आता निघते आहे, हे 10,000 रुपये तुझ्याजवळ ठेव. जर मला उद्या यायला उशीर झाला तर स्वामी महाराजांच्या मठात बरोबर 12 वाजता हे पैसे नेऊन दे. खरंतर मी आजच हे दिले असते, पण उद्याचा मुहूर्त चांगला आहे म्हणून उद्या द्यायचे आहेत. मी शक्यतो लवकर यायचा प्रयत्न करतेच. अशी सूचना देऊन सरलाताई निघून गेल्या. देवयानीने ते पैसे आपल्या कपाटात ठेवले.
देवयानी आता एकटीच निवांत होती. एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटं राहून तिला कंटाळा येत असे. तसंच घरात सर्व कामाला बायका असल्याने तिला कामही नसे. मग ती कधी वाचन, कधी टीव्ही. तर कधी घरातल्या काम करणार्‍या बायकांशी गप्पा-गोष्टी करून मन रमवत असे. सरला सरलावहिनींना तिचं हे मनमोकळं वागणंच खटकत असे. बाकी त्यांना देवयानी आवडत होती. ती सर्व कारभार चांगल्या प्रकारे सांभाळते त्यामुळे आपल्याला आता थोडा वेळ मिळत आहे. नवर्‍याची, दिराची काळजी नाही. तसेच सरलासरलावहिनींची दोन्ही मुलं शिक्षणासाठी परदेशी असल्याने त्याही बाबतीत त्या निवांत होत्या. त्यामुळे देवधर्म, वाचन, पारायण करायला वेळ मिळू लागला होता. देवयानीचं लग्न होऊन दोन वर्षंच झाली होती. तिलाही मूलबाळ नव्हतं. त्यामुळे ती सर्व कारभार सांभाळत होती. फक्त पैसे तिच्या हातात नसत.
संध्याकाळी देवयानी कादंबरी वाचत बसली असता अचानक दुपारी लवकर गेलेल्या स्वयंपाकाच्या मावशी आल्या. ‘‘देवयानी दीदी, मोठ्या वहिनी बाई आहेत का घरात?’’
‘‘नाही हो, काय झालं?’’
‘‘अरे देवा!’’
‘‘मावशी, काय झालं? मला सांगाल का?’’ अनुभवी मावशींना माहीत होतं की सरलावहिनी काही इतके पैसे देवयानी जवळ ठेवणार नाहीत आणि अत्ता मोठे दादा व छोटे दादा पण घरात नसणार.
‘‘काही नाही थोडी नड होती, पण बघते दुसरीकडे…’’
‘‘किती पैसे हवे होते.’’ देवयानीला वाटले असतील 200-400 रुपये. पण त्यांना 5000 रुपये हवे होते. मुलाच्या दवाखान्यासाठी लगेच भरायचे होते. त्याचे अपेंडिक्सचे ऑपरेशन लगेच करायचे आहे….
देवयानीने काय करावं असा विचार केला. तिने मावशींना थांबायला सांगितलं आणि सरलावहिनींनी दिलेल्या 10000 तले 6000 काढून मावशींना दिले. पैसे घेऊन, आभार मानून मावशी निघून गेल्या, पण आता देवयानीच्या पोटात मोठा गोळा आला. उद्या जर सरलावहिनी यायच्या आत 6000 रुपये त्यात ठेवले गेले नाहीत तर…? पण असं कसं होईल आपण आज देवांशला सांगून नक्की काहीतरी करू. संध्याकाळी देवांश आणि मोठे दीर जरा उशिरानेच घरी आले. घरी आल्यावर स्वयंपाकाच्या मावशी नाहीत, सरलावहिनी नाहीत या गडबडीत देवयानी स्वयंपाक आणि जेवणखाणं या गोष्टीत ते पैशाचं पार विसरूनच गेली. तिचीही भराभर कामाची सवय मोडली होती. त्यात तिला अजूनही मोठ्या दादांचा जरा दराराच वाटायचा. त्यात आज सरलावहिनी नाहीत, मावशी नाहीत. तिची तारांबळच उडाली.
सर्व आवरून ती खोलीत आली तोपर्यंत बरीच रात्रं झाली होती. सकाळी परत तिची धांदलच उडाली. ही दोघं कामावर निघून गेली आणि ती जरा हुश्श करून बसली. तोच दारात सरला वहिनींची गाडी वाजली. सरला वहिनींना पाहताच तिला ते पैसे आणि सगळं आठवलं. आता काय करायचं? तिनं तर डोक्याला हातच लावला. अत्ता देवांशला फोन करावा तर तो दादांबरोबरच असेल. तिचा भीतीने थरकापच उडाला. आपण न विचारता असं काम केलं याचा तिला पश्‍चात्ताप झाला आणि आपण काल कसं विसरलो या स्वत:च्या विस्मरणाचा राग पण आला.
सरला वहिनी गडबडीतच होत्या. त्या फ्रेश होऊन आल्या आणि देवयानीकडे त्यांनी पैसे मागितले. तिने 4000 रुपये आणून दिले आणि रडत रडत सर्व सांगितले तिच्याकडे त्याशिवाय पर्यायच नव्हता. सरला वहिनींना राग आला, तुला नसते उद्योग कुणी करायला सांगितले होते? त्यांनी रागानेच विचारले. त्यांच्याजवळ पण अत्ता कॅश नव्हती आणि त्यांना मुहुर्ताची वेळ गाठायची होती. अगदी थोडाच वेळ शिल्लक होता. त्या तशाच गडबडीत निघून गेल्या. कंपनीतून त्यांनी पैसे मागवले असावेत. त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे देणगी दिली. पण देवळाची पायरी उतरताना त्यांचा पाय सटकला आणि त्यांना थोडी दुखापत झाली. मी देवासाठी ठेवलेले पैसे असे खर्च झाले म्हणूनच मला दुखापत झाली असा त्यांनी समज करून घेतला आणि देवयानीशी फटकून वागू लागल्या. तिच्याशी बोलणंही त्यांनी कमी केलं.
*
दोन-तीन दिवस त्यांना फारसे काही जाणवले नाही पण त्यानंतर मात्र त्यांना त्रास होऊ लागला. आता स्वयंपाकाच्या मावशी पण हजर झाल्या होत्या. सरला वहिनींना विचारूनच देवयानीने आपल्याला पैसे दिले असा त्यांचा समज होता त्यामुळे त्यांनी सरला वहिनींचे आणि देवयानीचे आभार मानले. तुमच्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला असे सांगितले. सरला वहिनी काहीच बोलू शकल्या नाहीत कारण त्यांना ताप भरला होता, त्यांना चालता-बोलता देखील येत नव्हते. सर्व वस्तू हातात द्याव्या लागत होत्या. स्वयंपाकाच्या मावशींनी सरला वहिनींना खूप मदत केली. त्यांची सेवा केली. प्रेमाने त्यांना हवे-नको ते खाऊ घातले. देवयानीच्या मदतीने त्यांनी सर्व काही सांभाळले. देवयानीनेही कोणताही राग मनात न ठेवता सरला वहिनींची प्रेमाने सुश्रुषा केली. सरला वहिनींनी कळलं की पैसा आणि व्यवहार सांभाळला म्हणजेच सर्व काही असतं असं नाही. कधीतरी माणुसकी पण महत्त्वाची असते. देव तर आहेच पण आपल्या आजुबाजूच्या माणसांत सुद्धा देव आहे. जो आपल्याला देवाच्या रूपात मदत करतो.
या दोघींच्या सुश्रुषेने जेव्हा त्या पूर्ण बर्‍या झाल्या तेव्हा त्यांनी देवयानीची मनापासून माफी मागितली आणि घरातील सर्व कारभार तिच्या हाती सोपवून त्या निश्‍चिंतपणे देवधर्म करायला मोकळ्या झाल्या. ते करताना त्या हे सांगायला विसरल्या नाहीत की, ‘‘जेव्हा पाहिजे तेव्हा तू कुणालाही मदत करू शकतेस. मला विचारायची गरज नाही.’’
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

====================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *