Ritbhatmarathi

Search
Close this search box.

®️©️राधिका कुलकर्णी.

असाच एक आठवडा अजून गेला. प्रसादचा कुठलाही संपर्क नव्हता.हळूहळू मनालाही समजूत पटली असावी कारण पहिल्या इतका त्रास होत नव्हता आता.तीव्रता जरा कमी झाली होती पहिल्यापेक्षा.आहे ते स्वीकारायची तयारी केली होती मनाने.आज
बऱ्याच दिवसांनी आशू लॅपटॉपवर मेल्स चेक करत होती.अनेक मेल्समधे एक मेलवर आशूची नजर पडली आणि ती सरप्राईज झाली.तो मेल प्रसादचा होता, अगदी त्रोटक असा.
“In a big office problem.
wl cntact asap.
gd day.”
मागच्या आठवड्यात आला होता.
म्हणजे त्याने मेसेज केला होता तर!!!
आणि मी मात्र त्याला मनातल्या मनात दोषी ठरवून मोकळी झाले होते.आशूचे मन स्वतःलाच खात होते. कितीतरी वेळपर्यंत तिने स्वतःला अपराधीच्या पिंजऱ्यात उभे केले.
कारण नसताना त्याच्या वागण्यावर शंका घेतली होती.
पण आशूला राहून राहून एकच प्रश्न सतावत होता.
‘इतकी सगळी माध्यमे सोडून मेल का केला असेल? ‘ हे कोडे काही केल्या उलगडत नव्हते.
ठिक आहे. निदान हे तर कळले की तो भेटवस्तू परत केल्यामुळे नाराज नाहीये.
एकीकडे मनावरचा एक ताण हलका होत असताना आता नवीन चिंतेने मन ग्रासले गेले. इथून जाताना तर खूप छान मूडमध्ये गेला मग अचानक असा कोणता प्रॉब्लेम आला की त्याने संपर्कच तोडला?
ऑफिसमध्ये मधे असे काय झाले असेल..?त्याची बदली लांब कुठेतरी तर नसेल ना झाली??
त्याला पुणं सोडून कुठेही जायची इच्छा नाही असे तो नेहमी म्हणायचा.मग त्याच्या मनाविरुद्ध काही घडत तर नसेल ना..?
‘हे देवा त्याच्या सगळ्या समस्यांमधून त्याला अलगद सोडव..’
मनोमन देवाकडे प्रार्थना करून आशूने आपल्या मनालाही शांत केले.
पण आता ह्या सगळ्या अनिश्चिततेत त्याने स्वतःहून संपर्क करेपर्यंत वाट पाहायची ह्या निर्णयावर मात्र आशू ठाम झाली..

आज मुलांच्या परिक्षा संपणार होत्या.सुट्ट्यांचे प्लॅनिंग सुरू झाले होते घरात. कुठे जायचे फिरायला ? आशूला माहेरी आईकडे जावे वाटत होते पण आता मुले मोठी होत होती त्यामुळे ते ठरवतील तसेच घडणार हेही आशूला जाणवत होते.
मुलांच्या डोक्यात कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जावे असे चललेले. मुले इंटरनेटवर सगळ्या थंड हवेच्या ठिकाणांची माहिती मिळवत होते. त्यांचा उत्साह पाहून मलाही गंमत वाटत होती. आपण आपल्या मुलांना किती स्वातंत्र्य दिलंय.इतक्या लहान वयात ते उघडपणे आपल्या इच्छा आई वडीलांपूढे जाहीर करू शकतात,त्यावर त्यांची मते मांडू शकतात.. नाहीतर आपली पिढी.. किती कोषात होतो.आपल्याला आई-वडील सांगतील ती पूर्व दिशा. त्यांच्या मताला खोडायची ना तर आपल्यात धमक होती ना तेवढी अक्कल. त्यांनी ठरवलेल्या प्रमाणे सांगतील तशी कृती करणे ह्यातच काय ती धन्यता… पण म्हणूनच आताची पिढी जितकी कॉन्फिडन्ट आहे तेवढे आपण कुठे होतो?
आशूच्या मनात हे सगळे चाललेले असतानाच श्रीधर घरी आला.

त्याला पाहताच मुलांनी एकच गलका केला त्याच्या भोवती.
“बाबा,बाबा.हुर्रे!!! शाळा सुटली पाटी फुटली,…हेहे..हेहे”
“अरे,अरे ! काय चाललेय तुमचे?
बाबाला फ्रेश तर होवू दे..”
आशू जराशी ओरडली पोरांवर.
श्री मात्र नेहेमी प्रमाणे पोरांना दोन खांद्याला लटकवुन तसाच घरभर फिरत होता. कितीही थकलेला असु देत पण रोज ऑफीसहून आल्यावर जोपर्यंत मुलांशी मस्ती करणार नाही तोपर्यंत त्याला चैनच पडायचं नाही.त्याच्या दोन्ही मुलांसाठी बाबा म्हणजे आयडल होता त्यांचा.
त्यांचे एकमेकांशी हसणे /खिदळणे अन् मस्ती बघुन स्वत:च्या भाग्याला स्वतःचीच नजर लागते की काय असे वाटले आशूला..

आज अचानक वातावरणात एक अनामिक आनंद मोकळेपणा ती अनुभवत होती.
जेव्हा मनावर कुठला ताण असतो तेव्हा समोरच्या सर्व घटना आपल्यासाठी जाणीवपुर्वक उदासिनता निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्याएत असे वाटायला लागते.नकळतपणे तो ताण कुणावर तरी काढला जातो.
आशू खूप प्रयत्न करून स्वत:ला गेल्या दोन आठवड्या पासून जितकी सावरत होती तितकी आतून तूटत चालली होती.
अनामिक भीतीने मन ग्रासले होते.
मुलांवर चिडचीड केलेली श्रीला अजिबात आवडत नसे.
त्यामुळे मनावरचा ताण शक्यतोवर कुणावर जाहीर न होवो ही काळजी घेत तिने हे दिवस कसे काढले होते फक्त आशूलाच माहित होते.
अशावेळी आशूच्या मनात राहून राहून एकच प्रश्न यायचा.
‘असे काय आहे प्रसादच्या आणि माझ्या मैत्रीत की मी इतकी अस्वस्थ व्हावे?’

ह्या आधीही बऱ्याच मैत्रिणींशी वेगवेगळया कारणांनी असा अबोला घडायचा.आणि मी खूप तटस्थ राहायचे.शेवटी त्याच पून्हा यायच्या माझ्याशी बोलायला.
पण प्रसादच्या वेळी अनुभवत असलेली घालमेल ह्या आधी का कधी अनुभवली नाही?
प्रश्नांचे इतके तरंग मन:पटलावर कधीच हेलकावले नव्हते.
तशी पहिल्यापासुन फारशी भावनिक गुंतागंतीत न अडकणारी आशू प्रॅक्टिकल म्हणुनच प्रसिद्ध होती.
आशूची एक अगदी जवळची मैत्रीण एक दिवस अचानक घरी आली आणि रडायलाच लागली. म्हणजे ही त्या दोघी कॉलेजला असतानाची घटना .

आशूला काहीच समजेना ती का रडतेय , विचारले तर काही सांगायलाही तयार नाही.
बराच वेळाने शांत झाल्यावर तिला विचारले
“अग्,काय झाले गिरीजा, रडतेस का अशी?
कोणी काही बोलले का?”
त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून अचंबितच झाली आशू तेव्हा .
ती म्हणाली , ” अगं काही नाही गं खूप भरून आले मन. वाटले की रडावे म्हणून तुझ्याकडे आले.”

तिच्या त्या बोलण्याचा अन् रडण्याचा अर्थ आशूला तेव्हा लागलाच नाही. उलट तिला मनातल्या मनात हजारवेळा मूर्ख ठरवुन मोकळी झाली होती आशू.

पण गेल्या दोन आठवड्यात कितीदा तरी असे कढ भरून आले तेव्हा तिला गिरीजाच्या त्यावेळच्या अवस्थेची जाणीव झाली. आभाळ कसे गच्च दाटले की पावसाच्या दोन सरी पडल्या की पुन्हा आकाश निरभ्र होते अगदी तसेच.
परंतु तरीही मनाने खूप खंबीर असणारी आशू स्वत:ला रडवेले बघुच शकत नव्हती म्हणुन सतत मनाला सावरायचा आटोकाट प्रयत्न करत होती.
सतत समजावत होती मनाला ‘ माणसे काय येतात अन् जातात.त्यांच्या असण्या-नसण्याने आपल्याला का इतका फरक पडावा.?
अजिबात टीपं गाळायची नाहीत.. आणि स्वतःला कमजोर तर अजिबात समजायचे नाही.विश्वासाने एक नाते जोडण्याचा प्रयत्न केला.आता नशिबात जर एवढेच सुख लिहीले असेल तर कोण काय करणार?ह्यात कुणालाच दोष द्यायचा नाही.दोष कुणाचा असेलच तर तो आपल्या नशिबाचा.
स्वत:ला सतत हे बजावून ती सावरायची जेव्हा कधी मन रडायला लागायचे.

पण आजच्या एका मेसेजनी अशी काय जादू केली होती माहित नाही पण मनमोर आज मुलांबरोबर स्वत:भोवतीही रूंजी घालून नाचत होते.

“बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला”
लताबाईंच्या ह्या गाण्याचा खरा अर्थ आज आशूला गवसला होता…

(क्रमश:9)
®️©️राधिका कुलकर्णी.