Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️राधिका कुलकर्णी.

सगळे इंटरव्ह्यूज संपून आता निघायचा दिवस उगवला.आज मुंबई ऑफिसमध्ये त्याच्या कामाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे ऑफिसने सगळ्या इंटरव्ह्यू पॅनेल करता हॉटेल ताजमधे डिनर आयोजित केले होते.पण प्रसादची फ्लाईट रात्री आठला असल्याने त्याने डिनर पार्टी अव्हॉइड केली आणि लॉजवर आला. सामानाची आवराआवर,बील सेटलींग अशा फॉर्मॅलिटीज उरकून आता फक्त लॉज सोडायचे आणि काही वेळातच निघायचे होते पण का कुणास ठाऊक पाय निघत नव्हता आज त्याचा. काहीतरी सुटून चालल्यासारखा तो फिल त्याला उगीचच पुन्हा मागे खेचत होता. आजचा दिवस थांबूया का? पुन्हा एक चक्कर आशूच्या घरीऽऽऽ….!
छे!छेऽ!. काय होतेय मला. कसली ही अनामिक ओढ!
प्रसादराव सांभाळा स्वतःला.. थोड्याच वेळात फ्लाईट आहे. आवरायला घ्या..

मनातले विचार झटकायला त्याने चेहऱ्यावर पाण्याचे हापके मारले.मन आणि विचारांनी स्वतःला फ्रेश करून तो बाहेर आला.
आठवणींचा सगळा पसारा जमेल तसा समेटत त्याने कुठे काही राहीलं तर नाही ह्याची खात्री करून हॉटेल सोडले.
गाडी भरधाव वेगाने विमानतळाकडे जात होती. हॉटेलपासून विमानतळ हे अंतर बरेच होते त्यात मुंबईचा महामूर ट्रॅफिक पाहता त्याला कमीत कमी तासभर तरी पोहोचायला लागणार होता. कॅब ड्रायव्हरने रेडिओ ऑन करताच गूलाम अलिंची गझल वाजायला लागली.

मेरी मंजिल है कहाॅं ;
मेरा ठिकाना है कहाॅं।

सुबह तक तुझसे बिछडकर;
मुझे जाना हैं कहाॅं।

सोचने के लिये
एक रात का मौका दे दे।।

हम तेरे शहर में आये है
मुसाफिर कि तरह।

सिर्फ एक बार
मुलाकात का मौका दे दे।।

गझल मधले बोल जणू प्रसादच्याच मनातलेच विचार उजागर करत होते. त्याची भेटीची ओढ तरीही न भेटता
येण्याची असहायता ती रूखरूख ह्याचे मार्मिक दर्शन ती गझल करत होती.
दिवसभराच्या शिणवट्याने थकलेले शरीर गझल ऐकता ऐकताच डुलकी घेऊ लागले. मोठ्या हॉर्नच्या आवाजाने प्रसादची तंद्री भंगली. ते जागे होत इकडे तिकडे पाहिले..ट्रॅफीक सिगनलवर गाडी थांबली होती.
“भैय्या और कितनी देर लगेगी ?”
प्रसादने ड्रायव्हरला विचारले.
“बस अभी पोहोच ही जायेंगे साब..बस पंधरा मिनिट.”
अजून पंधरा मिनिट म्हणजे बराच वेळ होता. त्याने पुन्हा हेडरेस्टवर डोके ठेवून डोळे मिटले.

अर्ध्या तासात तो विमानतळावर पोहोचला. आता त्याला प्रचंड भूक लागली होती. पण आधी सगळ्या फॉरमॅलिटीज पूर्ण करून तो पिझ्झाहटमधे शिरला. चिजी बेक्ड मोमोज् हा त्याचा फेव्हरेट पिझ्झा त्याने ऑर्डर केला. अजून त्याच्या फ्लाईटला बराच अवकाश होता. थोड्याच वेळात पिझ्झा आला आणि त्याने गरमागरम पिझ्झा्यावर मस्त ताव मारला.मग बाहेर एक ब्लॅक कॉफी घेऊन तो प्रतिक्षासनावर जाऊन बसला.
अजून तरी अनाउन्समेंट झाली नव्हती.
प्लेन अनाउंसमेंटच्या प्रतिक्षेत पेपर चाळत आसनावर बसला तसे त्याला काहीतरी टोचले. खुर्चीला चाचपडताना अचानक हात पॅंटच्या मागच्या खिशाकडे गेला.काहीतरी कठिण वस्तू होती खिशात जी टोचल्या सारखे झाले. काय म्हणून खिशात हात घालुन चाचपले तर सकाळचा आशूचा लिफाफा वेळ झाला की बघू म्हणून सुरळी करून घुसवलेला तसाच होता.

त्याने चटकन फोडुन पाहीले. बिलसारखा कागद असावा.
बिलासोबतच आणखीन एक कागद होता. आशूने लिहिलेला काहीतरी मजकूर होता. पत्रच म्हणा ना. उत्सुकतेने प्रसादने पत्र वाचायला घेतले.आणि थोडे हसूही आले त्याला.. फोन करण्याची सोय असताना आशूने पत्र का लिहीले..!
पण त्यालाही मौज वाटली त्या कृतीची.. पत्र ह्या कितीतरी आठवणी देऊन जातात.पत्ररूपात त्या आपण कायमस्वरूपी जतन करू शकतो पण असे कितीसे फोन आपल्या लक्षात राहतात नंतर.??
आशूचे ते मोत्यासारख्या हस्ताक्षरातले पत्र वाचायला सुरुवात केली प्रसादने.

” प्रिय प्रसाद,

शेवटी वेळ मिळाला तर तूला. पत्र वाचायला. माझ्या मुर्खपणावर हसतोय नाऽऽ!
पण लिफाफ्यासोबत काहीतरी द्यावे जे सतत तुला आपल्या पहील्या भेटीची आठवण देईल असे वाटत होते.म्हणून ही पत्रभेट द्यायची कल्पना आली.तू म्हणशील फोनच्या जमान्यात जिथे एका मिनिटात अगदी अमेरिकेतल्या माणसाशीही बोलणे शक्य आहे तिथे मी हा इतका आउटडेटेड पर्याय का निवडला.पण आता तुच बघ हे पत्र तुला नंतर जितके वेळा हे वाचशील तितकेवेळा आपल्या भेटीची आठवण ताजी करेल की नाही ते.. अणि त्या प्रत्येकवेळी तू एकट्यातच सुखावलेला असशील.. कदाचित मी म्हणते ते तुला आज पटणार नाही पण उद्या भविष्यात जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा हे उघडून वाच आणि तेव्हा तुला काय मिळाले ते तू मला कळव आणि म्हणून हे पत्र तू जपून ठेव….
असोऽऽ .
बरेच विषयांतर झाले. आता थोडे मुद्द्यावर येऊ.
अरे हो.. विसरलेच.. पुढे वाचण्याअगोदर डबीतला ऐवज चेक कर बरं. सगळे ओके आहे ना बघ?”
प्रसादने पत्र एका हाताच्या चिमटीत पकडून
दुसऱ्या हाताने खिशातली डबी उघडली. डबीत कानातले व्यवस्थित होते. आशूने कानातले परत केले पाहून मन जरासे उदासच झाले तरीही स्वत:ला थोडेसे सावरत त्याने पून्हा पत्र वाचायला घेतले…..

” तूला वाईट वाटले असेल ना ?
साहजिकच आहे पण आपली मैत्री हिच इतकी अनमोल भेट आहे माझ्यासाठी मग आणखी कोणत्याच भेटींची काय गरज सांग पाहू ?
आणि तूला माहितीय का प्रसाद तू मला खरेतर एक भेट आधीच दिलीय.तुझ्याही नकळत.
ओळख पाहू!!
नाही ना आठवत..?
बरं . थांब.मीच सांगते.

तू मला भेट दिलीएस एका सुंदर नावाची.!
सगळे जग मला आशू म्हणते पण तू मात्र परवा मला बोलता बोलता ‘ सखे ‘ म्हणालास,आठवतेय तूला !!
ते संबोधन खूऽऽऽप आवडले मला.
आणि ती भेट मी आनंदाने स्वीकारलीय हंऽऽ.

काही माणसांचे आयुष्यातील स्थान खूप वेगळे असते. तूझेही तसेच आहे. ध्रुव तारा कसा असतो अढळस्थान पटकावून.त्याची जागा कोणीच नाही घेऊ शकत अगदी तसे… तू माझ्या स्वत:च्या हक्काचा मित्र, माझा कृष्णसखा आहेस. ‘असतील बहू होतील बहु
परी यासम हा’ हे ऐकलेय ना आपण शाळेत असताना पण त्याची खरी प्रचिती आज तुझ्या रूपाने मिळतेय.

तुझ्या मैत्रीने माझे आयुष्य परिपूर्ण झालेय प्रसाद.
हाक मारली की ओ देईल असा गोविंद मिळालाय मला ह्याहून भाग्य ते काय..!!!

हया गोष्टी पाहील्यातर फारच छोट्या आहेत पण त्यातून मिळणारा आनंद मात्र खूप मौल्यवान आहे.
हे छोटे छोटे प्रसंग, ह्या आठवणी आणि त्याच्याशी निगडीत माणसे आयुष्यभराच्या गोड आठवणी देऊन जातात रे !!
तुझ्या रूपाने मला मिळालेली ही मैत्रीची मोरपिशी गोडऽऽऽ आठवण !!
ह्या बहुमूल्य भेटीसाठी खूप खूप थॅंक्यु !

आज कितीतरी दिवसांनी कसले वर्षानी पत्र लिहीलेय.
काही चूकल्यास माफ कर..

तूझा प्रवास सूखाचा होवो.
पोहोचलास की कळव.

आणि हो,तूझ्याशी भेट हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर योग आहे.ही मैत्री अशीच वृद्धिंगत होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!!!

चल आता निरोप घेते.

तूझी सखी,
आशू.

(पत्राबाबत तुझी प्रतिक्रीया ऐकायला नक्कीच आवडेल.
थँक्स.)”

प्रसाद तेच पत्र पुन्हा पुन्हा वाचतो.
विमानाने उड्डाण केले पण प्रसाद मात्र अजूनही पत्राच्या मजकूरात नजर खिळवून बसलेला.
काय वाचायचा प्रयत्न करत होता कुणास ठाऊक.
त्याचे त्यालाच समजत नव्हते की ही अनामिक अस्वस्थता का जाणवत होती त्याला…


(क्रमश-6)
©️®️राधिका कुलकर्णी.