Ritbhatmarathi

Search
Close this search box.

®️©️राधिका कुलकर्णी.

अवघा रंग एक झाला।
रंगी रंगला श्रीरंग।

किशोरी ताईं तल्लीन होऊन अभंग गात होत्या. त्या दैवी देणगी लाभलेल्या स्वर्गीय आवाजानेच आज आशूची पहाट उजाडली. लहानपणापासून रेडीओवर सकाळची अभंग वाणी ऐकत आईची कामे चालायची..त्याचे बीज नकळत कधी कसे तिच्यात रूजले तिलाही कळले नाही पण रोज रेडीओवर भक्ती गीते अभंग ऐकतच तिलाही कामं
करायची सवयच जडून गेली होती.
पण आज ह्या अभंगात नकळत ती गुंतून गेली.
एखाद्या आवाजाची काय जादू असते नाऽऽ!
एखादा व्यक्ती,एखादा आवाज,त्यातले शब्द,भाव, मनावर गारूड घालतात..आज ह्या शब्दांचे भाव तिला जास्त आकर्षित करत होते.कित्येकदा ऐकलेल्या त्याच अंभंगाचे संदर्भ आज मात्र निराळे भासत होते…

अवघा रंग एक झाला..रंगी रंगला……ऽऽऽ?
हा श्रीरंग ..माझा कृष्ण सखा प्रसादच तर नव्हे..!
माझा जीवलग सखा..
मी घेतलेला निर्णय त्याला पटेल ना?
तो समजून घेईल मला की अळवावरच्या पाण्यासारखा हा प्रवासही सूर्योदयानंतर आपले अस्तित्व समाप्त करेल??
प्रसादच्या आवाजाची धार मला अजूनही जाणवतेय.
त्याला काय अपेक्षित होते माझ्याकडून? मी त्याला समजण्यात चूक करतेय की त्याने मला समजण्यात काही गल्लत केलीय ?
किंवा हे फक्त माझ्याच मनाचे खेळ आहेत….. !
तसे असेल तर बरेच आहे,पण तसे नसेल तर!!!

देवा श्रीरंगा तू मीरेचा सखा झालास , द्रौपदीचाही सखा झालास..,असे कोणते पूण्य लागते की तुझ्यासारख्या सखा मिळण्याची पात्रता निर्माण होते..?
मी आहे का तशी ?
मग मला समजून घेणारा सखा मला मिळेल की मी काही गमावून बसणार आहे…?
मला आता खूप अवघड जाईल हं ह्या सवयीतून बाहेर पडणे.. खरच मी ह्या रंगात इतकी रंगून गेलीय की त्याशिवाय मला माझी कल्पना करवत नाही..
तू आहेस ना पाठिशी??

“आई… अगं टॉवेल दे ना ..माझी आंघोळ झालीय.”

सोहमच्या आवाजाने आशूच्या विचारांना ब्रेक लागला.. ती धावत वॉशरूमकडे पळाली. कडीला आधीच टॉवेल अडकवून ठेवलाय हेही ती विचारांच्या नादात विसरून गेली.

” अरे इथेच तर अडकवून ठेवला होता ना सोहम.. किती रे आरडाओरडा करतोस ! थोडे इकडे तिकडे बघितलेस तर दिसेल पण सगळीकडे आई लागते..! चल आवर पटकन आणि ये बाहेर तोपर्यंत मी डबा भरते. “
जराशी वैतागतच आशू परत जायला वळली. कसलातरी उग्र जळकट वास नाकात शिरला तशी ती घाईने किचनकडे धावली. सोहमला टॉवेल देण्याच्या नादात तव्यावर पोळी भाजायला टाकली हेच ती विसरली त्याचाच करपलेला वास घरभर पसरला होता.
पटकन गॅस बंद करून तिने जळका तवा उतरवला आणि दुसरा नवीन तवा ठेवून पोळ्या उरकल्या.

पोळी करपली म्हणून मी तवा चटकन बदलला पण एखादं नातं परिपक्व होण्याआधीच करपले तर….??
त्याची रीप्लेसमेंट ह्या तव्या इतक्या सहज करता येईल..?

“अगंऽऽ झाला की नाही ब्रेकफास्ट..? लक्ष कुठेय आशू तुझे..? आणि तिकडे बघ दूध… दूध…”

हॉलमधे आलेल्या श्रीने दुरूनच गॅसवरचे दूध वर येताना बघून धावत येऊन गॅस बंद केला आणि आशूकडे एक कटाक्ष टाकला.
आपलीच जीभ दाताखाली चावत इशाऱ्यातच श्रीला सॉरी म्हणत आशूने ब्रेकफास्ट बनवायला घेतला.

आज आशूची सतत अशीच तंद्री लागत होती. कामाची लिंक विचारांच्या गर्तेत कुठेतरी निसटून चालली होती.
तिने पुन्हा एकदा मनावर घट्ट झाकण घालून विचारांना आत बंदीस्त करतच श्रीचा ब्रेकफास्ट डायनिंग टेबलवर लावला आणि मुलांचेही डबे पॅक केले.

काल प्रसादने आधीच सांगितल्याप्रमाणे त्याचा माणूस गिफ्ट कलेक्ट करायला येणार होता..
ती थोडी नर्व्हस झाली होती पण आता माघार घेणेही योग्य नव्हते.विचार तर आधीच पक्का झाला होता.. त्याप्रमाणे फक्त कृती बाकी होती.
सगळे घराबाहेर पडले तसे तिनेही स्वतः:चे आवरायला घेतले.
खरेतर सकाळची गडबड शांत झाली की छान घट्ट दूधातली मोठ्ठा मग भरून कॉफी घेऊन तिच्या बाल्कनीतल्या मिनी गार्डनमध्ये कॉफीचे सिप घेता घेता वेळ घालवणे तिला खूप आवडायचे. तिथे येणारे छोटे छोटे पक्षी बघणे, त्यांना दाणा पाणी ठेवणे, झाडांना पाणी,त्यांची पिवळी सुकलेली पाने खुडून बाजूला करणे.निशिगंधिला आलेला टपोरा तुरा,गूलाबाची वाऱ्यावर डोलणारी कळी त्या प्रत्येकात कालपेक्षा आज झालेले सूक्ष्म बदल बघायला तिला फार आवडे. ती तासनतास त्यात रमून जाई पण आज तो मोह टाळून तिने पटकन कॉफी संपवली आणि बाकीची कामे हातावेगळी करायला सुरुवात केली.

साधारण दहा वाजेपर्यंत तो येईल हे अपेक्षित धरून
सगळी कामे आटोपून जरा हुश्श करेपर्यंत दारावरची बेल वाजली.
ठरल्याप्रमाणे प्रसादने पाठवलेला माणूस दारात दत्त म्हणून हजर होता.

” मॅडम बील. “

त्याने बिल आशूसमोर धरले. आशूने आत एक लिफाफा तयारच ठेवला होता.

” ये आपके सर को दिजीए “

आशू लिफाफा देत म्हणाली.

“मॅडम बिल??”
फार अदबीने त्याने विचारले.

“बिल इस पॅकेटमेही रखा है”

आशूने हसतमुख चेहऱ्याने उत्तर दिले. त्यावर त्यानेही मंद स्मित करत पुन्हा विचारले..

“और कोई मेसेज है सर के लिए?”

“पॅकेट मिलते ही मेसेज करने को कहना.”

आशूने आपला निरोप त्याच्याकडे दिला तसे
तो कडक सलाम ठोकत( जणू मी पण साहेबीण बाई कोणीतरी!!) निघूनही गेला पाच मिनीटात.
गंम्मतच वाटली.

आता प्रतिक्षा होती ती लिफाफा मिळाल्यावर प्रसादची प्रतिक्रीया बघण्याची.
क्लासेसची वेळ झाली होती. मुले केव्हाही येतीलच. क्लास चालू असताना फोन कटाक्षाने सायलेंटवर ठेवायची आशू. सगळे माहितीचे लोक त्यावेळी फोन करत नाहीतच पण तरिही ती काळजीपुर्वक बंदच ठेवायची व्हॉल्यूम.
परीक्षा जवळ आल्याने आता फक्त उजळणी आणि पेपर्स सोडवून घेणे असेच चाललेले होते.
काही अडचणी,शंका सोडवणे ह्यासाठी फक्त आशूची तिकडे उपस्थिती गरजेची.
म्हणतात ना “रिकामे डोके भूताचा कारखाना”
मग उगीचच नको-नको ते विचार आशूच्या डोक्यात येऊ लागले. परत परत भटकणाऱ्या विचारांना झटकून आशू कामावर लक्ष केंद्रीत करायचा प्रयत्न करत होती.

क्लास संपले. जरा रिलॅक्स करताकरता आशूने फोनवर नजर फिरवली. गेले दोन-तीन तास बघितलेच नव्हते तिने फोनला.

बापरे !!!! प्रसादचे तीन चार मिस्डकॉल्स!!.
आणि मेसेजही होता.
” हाय आशू! गूड इव्हीनिंग!
बिझी?
कॉल व्हेन फ्री.”

आशू नंबर डायल करतच होती एवढ्यात त्याचाच कॉल आला.
” हाय! अरे पॅकेट मिळाले ना?
चेक केलेस का? उघडून बघ बरं आधी.”
फोन उचलल्या उचलल्या आशूची सरबत्ती सूरु झाली.

” अगं थांबऽ थांबऽऽ.!!

मी फक्त पॅकेट मिळाले म्हणून फोन केलाय. मी पण बिझीच होतो. आज निघायचेय. आठ वाजताची फ्लाइट आहे. वेळ झाला की निवांत बघेन आणि काय आहे माहितीच आहे की. त्यात काय बघायचेय…
चल जरा आवरतो आणि मग बोलू.

अरे हो,जे बोलायचे होते तेच विसरलो.
इतक्यांदा फोन होऊन पण महत्त्वाची गोष्ट विसरूनच गेलो.

“काय एवढे महत्त्वाचे रे?” आशूने हसुनच विचारले.

अगं, तुझ्या घरी तुमचा पाहूणचार घेतला पण साधे शब्दाने बोललो नाही.. कशीही झालीस तरी मैत्रीण आहेस माझी एवढं तर करायलाच हवं होतं पण दोन दिवस इतके घाईत गेले की शांत बोलायलाही वेळ मिळाला नाही. नंतर मला ते खूप खटकले.
पण आता मात्र बोलल्याशिवाय राहवत नाही..

हे बघ खोटी तारीफ करणे माझ्या स्वभावात नाही. जे खरे आहे तेच मी बोलणार पण मी जे पण सांगणार आहे ते स्पोर्टिव्हली घ्यायचे तरच सांगतो..”

प्रसादची इतकी लंबीचौडी प्रस्तावना ऐकून मनातल्या मनात धास्तावली आशू पण तरीही तो काय सांगणार हे ऐकायला उत्सुक ती लगेच संयमित होत म्हणाली…

” अरे हो रे बाबा… बोल काय बोलायचे ते. मोकळेपणाने ! मला काही वाईट वाटणार नाही. “

“बरं आता तू इतका आग्रह करतेय म्हणून सांगतोय..
अगं त्यादिवशी तू बनवलेले जेवण….
आई आईगंऽऽ!
इतके…. ऽऽऽ!”

” इतके काय? “
आशूने थोडे घाबरतच विचारले.

” इतकं छान,चविष्ट आणि रूचकर होते की उंगलीयाॅं चाॅंट चाॅंट कर खाया.. पोट भरले पण मन नाही भरले. “

” किती घाबरवलेस ?
मला वाटले खूप वाईट झाले होते.”
” हाहाहा.. जरा फिरकी घेतली “
” But Really you are excellent cook…! श्रीधर लकी
आहे हं खूप.. तुझे घर, तुझे कुटुंबं सगळेच छान. आणि श्रीधर तर जेम ऑफ अ परर्सन!! आय मस्ट टेल यू.

त्या दिवशी मी जरा शंकाकूल होतो की नवरा कसा रिॲक्ट होइल तुझा ,कोणीतरी मित्र येतोय म्हणल्यावर.?
म्हणूनच मी घाईघाईत तुला घेतलेले ते गिफ्ट मुलांचे वॉशरूम वापरले तेव्हा तिकडेच ठेवले. वाटले की मी उघडपणे गिफ्ट आणलेले तुझ्या नवऱ्याला आवडले नाही तर.?
पण त्याच्याशी बोलताना जसजसा मी सहज होत गेलो तसतसे मला वाटून गेले की त्याच्या समोरही गिफ्ट दिले असते तरी चालले असते. खूपच मोकळ्या मनाचा आहे श्रीधर.
तूम्ही दोघे एकमेकांशी खूप सहज वागता. नवरा-बायको पेक्षाही मित्रत्वाचे नाते जास्त आहे तुमचे. खूप कमी जोडप्यात इतका समन्वय असतो.
रिअली आय फिल, यू बोथ कॉम्प्लिमेंट इच ऑदर !
हे कौतूक नाहीतर मनापासुनची प्रतिक्रीया हं!

बाकी श्रीशी खूप नविन सुंदर नाते निर्माण झाले. एक छान मित्र मिळाला श्रीच्या रूपाने.
खूप आनंदी आहे मी आणि मुख्य तुझ्यासारखी सुगरण मैत्रीण. आता मी कधीही आलो तरी जेवायचा अड्डा हाच असणार माझा..ॲम सो फूडी यू नो.. आता तर काय जादूई चिरागच हाती लागला..मी फक्त फर्माईश करणार आणि तू हुकूम मेरे आका म्हणत ते लगेच हाजीर करणार.. हाहाहाऽऽ !!
जोक्स अपार्ट पण आता मी निदान ह्या खाण्यासाठी तरी तुझ्याशी भांडणार नाही कधीच ! “

” ए नालायक! हाऊ मिन!! “
म्हणजे फक्त जेवणापुरती मैत्री हवीय होय रे तुला..!”

“अगं गंम्मत गं..!

पणआता तुम्ही या सगळे माझ्या घरी. तुझ्याइतकी सुग्रण नाहिये माझी बायको पण नक्की चांगले आदरातिथ्य करेल तुमचे ॲम शुअर.”
त्याच्या वाक्यावर तो स्वतःच जोरजोरात हसत होता.


मला तो काय बोलतोय इकडे लक्षच नव्हते.कारण मला अपेक्षित जे होते ते तर तो लिफाफा उघडल्यावरच बोलणार होता. त्याची प्रतिक्रीया आणि त्यानंतरचा फोन ऐकायची उत्सुकता मला सर्वात जास्त होती.
“बर चल. नंतर बोलतो ग.बाय. “
” ह्ं !! “
मी भानावर आले तोवर फोन बंद झाला होता.


( क्रमश:-5)
®️©️राधिका कुलकर्णी.

काय असेल लिफाफ्यात एवढे?? जाणून घ्यायला वाचत रहा वर्गमित्रचे पुढील भाग.