Ritbhatmarathi

Search
Close this search box.

®️©️राधिका कुलकर्णी.

मुलांचा होमवर्क, जेवणे सगळे आवरले. श्रीलाही लायन्सची मिटींग म्हणुन यायला उशीर होणार होता.
उद्याची सकाळची थोडी तयारी म्हणुन मी भाजी चिरणे, कणिक मळणे अशी कामे उरकत होते. मनात मात्र विचारचक्र चालूच. काय होऊन बसले हे?

प्रसाद खरच रागात बोललाय की आपले बोलणे त्याला पटले.??
खरच मी इतका विचित्र प्रश्न केला होता का की तो हर्ट व्हावा ???
गिरीजाच्या प्रसंगाची तुलना इकडे करणे गरजेचे होते???
पण काय करणार… एकदा एखादी दूखरी आठवण मनात घर करुन बसली की मग पुढचे कित्येक वर्ष ती सल जात नाही…
काळाच्या प्रवाहात सामील तर होतो आपण पण प्रत्यक्षात कृती करायची वेळ आली की मनाच्या तळातल्या आठवणी हटकून पाठपुरावा करतात आणि आपले अस्तित्व दाखवून देतात. आणि हे स्वाभाविक आहेच ना… !!! अनुभवातून मिळालेले शहाणपण हे वारंवार त्याच्या योग्यतेचा दाखला द्यायला उसळी मारून वर येतेच…..
मनात विचारांची सर्कस चाललेली…

चूक आणि बरोबरच्या फूटपट्टीवर नाचून दमलेले मन विचारातून बाहेर यावे म्हणुन बेडवर पडल्या पडल्याच मी जवळच पडलेल्या मासिकाची पाने चाळत होते पण कसचे काय?
अचानक मन आठ दहा वर्षे मागे भूतकाळात गेले. लग्न होऊन तेव्हा 2/3 वर्षेच झाली असतील. दिड वर्षाच्या सोहमला घेऊन कसल्याशा समारंभा निमित्त माहेरी गेले होते मी.
कार्यक्रम यथासांग पार पडला. सासूरवाशीण झाल्यावर खरी माहेरची ऊब काय असते ते कळते,होय ना….!
माझेही तसेच झाले. बघता बघता आठ दिवस सरले आणि माहेरच्या उबदार गोधडीला बाजूला सारून माझ्या स्वगृही परतायची वेळ येऊन ठेपली.
घरभर पसरलेल्या सामानाबरोबरच माहेरच्या साऱ्या तरल आठवणींची साठवण करत माझे पॅकिंग सुरू होते.

अखेरीस पुन्हा परतीच्या प्रवासाला निघायची गडबड सुरू झाली. सगळ्यांचे निरोप घेत,डोळ्यांच्या कडा टिपतच आईला नमस्कार करायला मी तिच्या खोलीत गेले. तिने आशीर्वादाचे थरथरते हात माझ्या हातात घेतले.
हाताच्या बंद मूठीला कसलातरी स्पर्श जाणवला. एखादा कागदाचा गोळा किंवा तसेच काहीसे असल्याचा भास होता तो. मी प्रश्नार्थक नजरेने आईकडे बघितले.
तिला काही बोलण्या विचारण्यासाठी तोंड उघडण्यापूर्वीच आईने डोळ्यांनी गप्प राहण्याचा इशारा केला. बाजुला दादा वहिनी उभे बघुन मीही गप्प झाले परंतु तिच्या कृतीचा उलगडा मला अजूनही होत नव्हता. कदाचित तिला ते दादा वहिनीला कळू द्यायचे नव्हते.
पण असे लपवण्याजोगे काय केले होते तिने…!
माझ्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव वहिनीच्या नजरेने हेरले की काय कोण जाणे पण आई सारवासारव करत लगेच म्हणाली,
“अगंऽ शेजारच्या कुमूदकाकू गाणगापूरला गेल्या होत्या ना मागल्या आठवड्यात तिथून त्याचे भस्म आणले होते त्यांनी. त्यातलेच थोडे दिलेय त्या पूडीत. रोज सोहमला लावत जा म्हणजे त्याला भीती वाटणार नाही. सारखा झोपेत दचकून उठतो ना तो. मग रोज झोपताना लावत जा.”
मीही बरं म्हणत निश्वास टाकला. दादा रेल्वे स्टेशनवर सोडायला आला होता. गाडी सुटली जरा स्थिर झाले. सोहमलाही झोप लागली.
आईचे निघतानाचे वाक्य आठवले तसे सोहमला तोच अंगारा लावायला मी पूडी शोधली. पण स्पर्शावरून तरी त्यात पावडर सारखे काही लागत नव्हते. कठीण असे काहीतरी घट्ट दगडागत लागत होते. कदाचित भस्माचा खडा तर झाला नसेल… उत्सुकतेपोटी मी आईने दिलेल्या अंगाऱ्याची पुडी उघडली आणि चकित व्हायची पाळी आता माझी होती. विस्फारल्या डोळ्यांनी मी ती पूडी बघत होते. मला समजतच नव्हते कसे व्यक्त व्हावे. खूप खजिल झाले होते.
आईने त्यात चक्क सोन्याचे किमान पाच-सहा ग्रॅम वजनाचे प्युवर वळे बांधून दिले होते.
पण आईला असे खोटे बोलुन मला ही भेट द्यायची काय गरज होती? तिच्या ह्या कृतीचा मला अंदाज लागत नव्हता… मन सून्न झाले होते.
उद्या फोनवर बोलुनच काय तो सोक्षमोक्ष लावू असा विचार करून तो विषय मी तात्पुरता बाजूला सारला. थंड वाऱ्याने डोळे जड व्हायला वागले होते.

सकाळी पहाटेच श्री स्टेशनवर घ्यायला आला. गाडीही वेळेतच पोहोचली होती. दादाला मेसेज करून कळवले.
सकाळी दादा कॉलेज आणि वहिनी शाळेत जाण्याची घाई.
आईशी ते दोघे गेल्यावरच बोलु म्हणुन 8 वाजायची मी वाट पहात होते.
तेवढ्यात फोन खणखणला.
हो.आईचाच फोन होता.
बबडे,पोहोचलीस का ग नीट,प्रवासात झोप झाली ना?
सोहमनी त्रास नाही ना दिला ग?
आईच्या इतक्या सहज प्रश्नांना मला सहजपणे उत्तर देणे खूप कठीण जात होते.
कारणही तसेच होते. जरी मी श्रीशी स्वत:च्या पसंतीने लग्न केले असले तरी मला माझ्या संसारात कुठलीच कमी पडू दिली नव्हती त्याने.वर्षाच्या वाढदिवसापर्यंत सर्व सोन्याचे दागिने केले होते त्याने मला.

ह्या सगळ्याची मला कधीच आवड नव्हती पण लग्नासाठी घरी बाबांना विचारायला रादर सांगायला की आम्ही एकमेकांना आवडतो आणि आम्हाला लग्न करायचेय तेव्हा बाबा त्याला बोलता बोलता एक वाक्य बोलले, तुमच्या घरच्या श्रीमंतीकडे बघुन मी माझी मुलगी कशी देवु? तुमच्या कर्तुत्वाने एक दागिना घालण्याची तरी ऐपत आहे का तुमची?
तेव्हा फक्त गप्प बसलेला श्री, पण त्याने कृतीतून त्याचे कर्तुत्व सिद्ध करून माझ्या बाबांची वर्षाच्या आत शाबासकी मिळवली.
हे सगळे माहित असुनही आईने मला अशी चोरून मदत मागितल्यासाऱखी वस्तू का द्यावी?
मी : सगळे ठिक आहे गं आईऽऽ. माझ्या आवाजातली नाराजी आईने ओळखली असावी.
” का गं बबडे इतकी वैतागतेस?”
मला तूला काही देण्याचा हक्क नाहीये का बाळा?
मी आता परस्वाधिन. तुझे बाबा असताना आधार वाटायचा. पण आता नाही म्हणले तरी काही करताना तुझ्या दादा वहिनीचा विचार करावा लागतो बाई.
आईचा आवाज बोलताना घोगरा झाला होता. मला उगीचच तीला दुखावल्याची बोच लागुन गेली.

“आई,तू शांत हो बघू आधी. किती विचार करतेस? दादा वहिनीचा काही त्रास होतोय का तुला? तुला कोणी काही बोलले का? काय झाले?
आणि तुला माहितीय ना, मला सोन्या दागिन्यांचे वेड नाही आणि द्यायचेच तर मग उघडपणे द्यायचेस ना सर्वांदेखत. असे तुझ्याच घरात तुझ्याच हक्काच्या कमाईचे देताना अशी चोरी का?
आता आई पण जराशी सावरलेली होती.
बबडे,मलाही हौस नाही गं असे चोरून वागायची पण तुला दिलेले हे सोन्याचे वळे बाबांनीच एका गुरूपुष्यांमृताला खरेदी केले. मला म्हणाले आता हे बबडीला देऊ पुन्हा आली की. लग्नानंतर तिने स्वाभिमानाने आपली कोणतीही भेटवस्तू स्विकारली नाही.श्रीधररावांनीही काही मागितले नाही. आपली फूल ना फुलाची पाकळी. बाकी त्यांना कसली कमीय म्हणा त्यांच्या संसारात. खरच पोरीने हिरा शोधला अगदी!! स्वभाव काय कर्तुत्व काय!!!
कसे कोण जाणे तुझ्या वहिनीने आमचा संवाद ऐकला अन् बाबांवर रागातच बोलली.
” बाबा तुमच्या मुलीला ह्याची गरज नाहीये,ज्याला गरज आहे त्याला द्या ना.”
काय बोलणार तिच्यापुढे. खूप वाद झाला.मग ते सोने तसेच आत ठेवले.
नंतर अवघ्या सहा महिन्यांतच बाबा गेले.
तुही निवांत आलीच नाहीस. आता हे निमित्तही छान होते म्हणून बाबांची ईच्छा पुर्ण करावी हा विचार आला आणि बबडे खरच सांगते बाबा गेल्यापासुन रूता माझी जास्तच काळजी घ्यायला लागलीय. मला कधी दुखवत नाही दोघेही. पण हे देताना जर तिला पुन्हा जूने काही आठवले तर उगीच चांगल्या जुळलेल्या नात्यात कडू नको ना पडायला? आणि माझे सगळेच तर त्यांचेच आहे की?
नाती जुळवून ठेवायला कधी कधी काही गोष्टी लपवुनही ठेवाव्या लागतात बबडे.
तूला राग आला असेल कालच्या माझ्या वागण्याचा पण मला फक्त माझेच नाही तर तुझेही दादा वहिनीशी असलेले नाते जुळवून ठेवायचे होते गं. मी काय पिकले पान माझ्यानंतर तुला तुझे माहेरपण असेच मिळत राहो हिच इच्छा आहे गं माझी. गैरसमज करून घेवु नकोस.”
मी आईचे सगळेच ऐकत होते.सुन्न झाले होते मी.
# # # # # # #
नाती जपण्यासाठी खरच असे करणे गरजेचे आहे?
“ज्या गोष्टीतुन काहीतरी चांगलेच निष्पन्न होणार असेल तर असे खोटे सत्याहूनही पवित्र आणि निर्मळ असते.”
असे कुठेतरी ऐकले वाचले होते. ते खरंय का ?
मग मी काय करायला हवे?
प्रसादची गिफ्ट स्विकारू की नाकारू??

दारावरच्या बेलने विचारांची तंद्री भंगली. बारा वाजले होते.श्री आला होता.
माझाही निर्णय ठरला होता. काय करायचेय हे मनाशी पक्के करूनच मी श्रीच्या कुशीत विसावले…

(क्रमश:-5)
®️©️राधिका कुलकर्णी.

काय असेल आशूचा निर्णय?तिने जे ठरवलेय तसेच घडेल की नियतीच्या मनात वेगळेच काही आहे?
जाणून घ्यायला वाचत रहा वर्गमित्र चे पूढील भाग..
धन्यवाद 🙏
@राधिका.