Ritbhatmarathi

Search
Close this search box.

®️©️ राधिका कुलकर्णी.

“प्रसाद,एक विचारू का?”
गिफ्टच्या डबीवर “भारत ज्वेलर्स” लिहीलेय,कुठुन खरेदी केलेस सांगशील का? आशू गंभीर होती आता.
“अगं काय करायचेय हे जाणुन? तुला गिफ्ट आवडले ना मग झाले तर..”
विषय सहज करण्याचा प्रयत्न करत आशुच्या प्रश्नाला उत्तर देणे त्याने शिताफीने टाळलेय ही गोष्ट आशुच्या लक्षात न आली तरच नवल होते.
तीने पुन्हा विचारले,”प्रसाद मला सरळ उत्तर दे कुठुन घेतलेस?”
” अगं इतक्या प्रेमाने गिफ्ट आणले एका मित्राने त्याच कौतुक करायचे सोडून माझी अशी उलटतपासणी का चालवलीय? मी काही गून्हा केलाय की कुठे दरोडा पाडून चोरी करून ही वस्तू आणलीय?
कशाला इतक्या चौकश्या…?
हे बघ प्रसाद..मी काही उलटतपासणी वगैरे घेत नाहीये.पण मला कळायला हवेय ना की हे तू कुठून घेतलेस??
पण का? काय गरज? तुला गिफ्ट देणाऱ्या प्रत्येकाला तू अशीच प्रश्न विचारून फैलावर घेतेस का गं!
प्रसादने हळूच आशूची फिरकी घेत वातावरण सहज करायचा प्रयत्न केला.
” हे बघ प्रसाद….. आज आत्ता तो मूद्दाच नाहीये.तू उगीच मस्करी करून विषयाचे गांभीर्य घालवू नकोस.
मला एकच गोष्ट डोक्यात फिरतेय कालपासून ज्याची एकदा खात्री करून घ्यावी म्हणून हा प्रश्न करतेय. प्लिज सरळ सरळ सांग ना …”
” आशू मला सांग नेमके काय घोळतेय तुझ्या डोक्यात?”
कसले एवढे प्रश्न…? मला तर बूवा कोणी असे काही गिफ्ट दिले असते तर आम्ही तर खुश झालो असतो. तुझ्यासारखे फालतू प्रश्न मला नसते पडले. पण आमचे कुठले इतके नशिब! आम्हाला कोण घेतेय आवडीची भेट वस्तू..! आम्हाला बदल्यात फक्त बोलणीच ऐकावी लागताहेत…
उपरोधिक स्वरात प्रसादची डायलॉगबाजी चालूच होती.पण इकडे आशूवर त्याचा शून्य परिणाम दिसत होता. सूई अटकलेल्या टेपसारखी ती एकाच जागी अडकून पडली होती.

एकीकडे आपण वागतोय ते अति होतेय हेही तिला पटत होते पण दुसरे स्वाभिमानी मन अशी महागडी भेट स्विकारण्याची मूभा देत नव्हते.. ह्या भेटी आपण सहजगत्या स्विकारण्याचा अर्थ नंतर काही वेगळा घेतला गेला तर!!! आणि तेच तिला व्हायला नको होते.

तिच्या नजरेसमोरून कॉलेज काळातला तिच्या जिवलग मैत्रिणीचा गिरीजाचा एक किस्सा तिला आठवून गेला.
फस्ट इयर बी.एस.स्सीत होत्या दोघीही तेव्हा.
गिरीजा आणि ती रोज सिटीबसने प्रवास करायच्या.
जाय-यायच्या वाटेवर हनूमान मंदिर स्टॉपवर रोज एक मुलगा चढायचा. थोडासा सावळा पण तरतरीत रूबाबदार तरूण , साधारण पावणेसहा फूट उंची,सरळ धारदार नाक, बदामी डोळे आणि केसांचा झूपका. एकंदर बघताच छाप पडावी असे व्यक्तिमत्त्व. रोज तो आमच्या आसपासचीच सीट पकडून बसायचा. हळुहळू रोजच्या जाण्या येण्यातून नजरानजर झाली की नकळत स्माईल देणे होऊ लागले.
एकदा बसला खूप गर्दी होती म्हणून जिथे जागा रिकामी दिसली तिथे आम्ही जागा पकडून बसलो. त्यात बरोबर त्याच्या स्टॉपला गिरीजाच्या बाजूची सीट रिकामी झाली आणि त्याने ती लगेच पटकावली.त्यानिमित्त पहिल्यांदाच त्यांच्यात संवाद घडला. त्याचे ते मृदू बोलणे ऐकून गिरीजा तर पूर्ण फ्लॅट झाली. बसमधून उतरल्यावर घरी पोहोचेपर्यंत ती फक्त त्याच्याबद्दलच बोलत होती. नंतर तर हे रोजच होऊ लागले. तो कुठल्यातरी कंपनीत कामाला होता आणि रोज तिथूनच तो बस पकडायचा ही एवढी माहिती तिला मिळाली होती. मग आता रोज गिरीजा त्याची सीट पकडून ठेवायची आणि तो चढला की मला सोडून त्याच्या सीटवर जाऊन बसायची. हळूळू त्यांचे सूत जरा जास्तच जुळले. कधीकधी हनूमान स्टॉपला उतरून ती त्याच्या बरोबर कुठेतरी फिरायलाही जायची आणि मला तिच्या घरी खोटा निरोप द्यायला सांगायची की तिचे लेक्चर लेट चाललेय तर ती उशीरा घरी येईल.

एकदा गाडीत बसल्याबरोबर त्याने गिरीजाला एक बॉक्स दिला. ‘ भेट आहे उघडून बघ आणि आवडले का सांग .. आत्ता नको घरी गेल्यावर उघड’ सांगितले.
तिला पहिल्यांदा कोणीतरी गिफ्ट दिले होते.एकिकडे भीती तर दुसरीकडे उत्सुकता.. काय असेल
बॉक्समध्ये ???
तिला ती भेट वस्तू घरी न्यायची धास्ती वाटत होती म्हणून आम्ही आधी माझ्या घरी गेलो. गूपचूप गच्चीवर जाऊन ते फोडले…तर त्यात एक गोल्ड प्लेटेड लेडीज वॉच होते.. भेटीसोबत एक छोटीशी नोटही होती..
अ गोल्डन गिफ्ट टू अ गोल्डन हार्ट!
आम्ही तर चक्रावूनच गेलो. एक तर ते बरेच किमती दिसत होते त्यात गिरीजाच्या घरचे खूपच ऑर्थोडॉक्स विचारांचे. ती ते गिफ्ट घरी नेऊच शकणार नव्हती. तिने ते मला ठेवायला दिले आणि रोज जाताना ते घालून निघे.
असेच दिवस गेले आणि एक दिवस तो तिला म्हणाला ‘उद्या माझा वाढदिवस आहे आणि माझी इच्छा आहे की मी माझा सगळा वेळ माझ्या गोल्डन हार्ट सोबत घालवावा…!’ तिनेही होकार दिला.
सकाळी कॉलेजला सोबत निघालो पण वाटेत ती त्याच्या सांगण्याप्रमाणे उतरून गेली. मी तिला संध्याकाळी वेळेत बस पकड सांगून सोडले.. संध्याकाळी रोजच्या जागी तिने बस पकडलीच नाही. मला खूप काळजी वाटायला लागली. बरं तेव्हा आतासारखी फोनची सोयही नव्हती चौकशी करायला. त्या मुलाचे गौरव नाव सोडता मला काहीच माहिती पण नव्हती
मी कशीबशी घरी पोहोचले. कोणी विचारलेच तर नेहमीचे ठरलेले उत्तर देऊन आपली सुटका करून घ्यायची हेही ठरवले. मी घरी पोहोचून तास दीड तास झाला असेल आणि अचानक गिरीजा घरी आली. चेहरा काळजीने काळवंडलेला थोडासा भेदरलेला.
मी काही न बोलता सरळ तिला घेऊन गच्चीवर गेले. गच्चीत आमची जिन्याखालच्या कपारीत बसायची ठरलेली जागा होती तिथेच बसलो. तिथे जाताच गिरीजा घट्ट मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागली..
मी तिला विचारले ” अगं काय झाले,का रडतेस अशी?” त्यावर थोडे रडे आवरत तिने सांगितले ते असे की…
त्याचा वाढदिवस म्हणून दोघे खूप भटकले. आधी मूव्ही बघितला. मग जेवायला हॉटेल मध्ये गेले. दोघांसाठी त्याने बरीच शॉपिंग पण केली. संध्याकाळी मी वेळेतच निघत होते तर म्हणाला
” माझ्या वाढदिवसाचा केक तर कट केलाच नाही आपण. चल माझ्याघरी.केक कट करून मग तू जा.” त्यात वावगे असे काहीच नव्हते. ठिक आहे म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो. त्याने येतानाच केक आणला होता.
एका सेंटर टेबलवर केक ठेवून त्याने तो कापला. केक एकमेकांना भरवत असताना तो एकदम माझ्या जवळ आला आणि म्हणाला ,

” आजच्या दिवशी माझे तोंड गोड नाही करणार!!! “

मला त्याच्या बोलण्यातला हेतू कळलाच नाही. मी म्हणाले
” का नाही..! लगेच!!
अणि मी केकचा एक पिस उचलून त्याला भरवणार तोच त्याने मला झटकन त्याच्या मिठीतओढले आणि माझा किस घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्या अवचित ह्या कृतीने मी घाबरले. स्वतःची सोडवणूक करत मी त्याला लांब ढकलत माझा विरोध प्रदर्शित केला तर तो चिडून म्हणतो कसा.. ” मी दिलेली महागडी गिफ्ट घेताना फार गोड वाटले ना! तेव्हा विचार नाही आला का की माझ्या मनात तूझ्याविषयी काय भावना आहेत?
मग इतकीच काकूबाई होतीस तर प्रेम कशाला केलेस ? कशाला इतके दिवस माझ्यासोबत फिरलीस??”
मला त्याच्या बोलण्याची खूप भीती वाटली गं आशू. मी त्याची सगळी गिफ्टस तिकडेच फेकून त्याला कायमचा बाय करून आलेय आत्ता.”
त्यानंतर तो कधीच त्या बसमध्ये दिसला नाही.

पण जाताजाता हा धडा नक्की शिकवून गेला तो..
की कुणी अनोळखी व्यक्ती जर महागड्या वस्तू भेट म्हणून देत असेल तर ती स्विकारताना शंभरवेळा विचार करावा.
आजही त्यामुळेच पुन्हा एकदा मन खात्री करू पहात होते की प्रसादने इतके महागडे गिफ्ट का दिले…? त्यामागे त्याच्याही मनात काही………????

खरेतर प्रसाद काही अनोळखी व्यक्ती नव्हता पण तरीही दुधाने तोंड पोळले की माणूस ताकही फुंकून पितो तसेच मीही करत होते पण हे सगळे मनातले द्वंद्व मी प्रसादला तर नव्हते ना सांगू शकत….

“अगंऽऽ एऽ कुठं हरवलीस???”

प्रसादच्या प्रश्नाने मी भानावर आले आणि त्याला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न केल्यावर प्रसादचा नाईलाजच झाला.
काहीशा वैतागातच तो म्हणाला…

प्रसाद : हो, तू बरोबर ओळखलेस. ते दुकान वाटेवरच लागले मग तिथेच खरेदी केली.

आशु : प्रसाद…. पण इतके महागडे गिफ्ट मी नाही घेऊ शकत.माझ्या मनाला पटत नाहीये हे.
काय सांगू श्रीला मी ?तू इतके महाग कानातले मला का दिलेस? काय उत्तर आहे माझ्याजवळ?
तुला कळतेय ना मी काय बोलतीय?”

प्रसाद : अग् सखे ,तुही माझी अनमोल मैत्रिण आहेस ना, नकली वस्तु देऊ का इतक्या सच्च्या दोस्तीला?

आशु : तसे नसते रे. आपल्या अवतीभोवतीच्या लोकांची मानसिकता पण विचारात घ्यावी लागते बाबा. आपण आता फार जवाबदार घटक आहोत रे आपल्या प्रत्येक नात्यांचा. इतका वरवरचा विचार करून कसे चालेल? त्यातल्यात्यात स्त्रीला खूप भान ठेवावे लागते..
कसे सांगु तुला?
मला कळतेय तुझ्या भावना खूप साफ आहेत पण हे प्रत्येकाला सांगणे खूप अवघड असते. “

प्रसाद: ए..क एक मिनिट..होल्ड ऑन डिअर,..
मला बोलण्यातुन मधेच काटत तो बोलला..

“तुला इतकाच प्रॉब्लेम होणार असेल तर एक काम कर. मी उद्याही इकडेच आहे. माझा माणूस बिल पेपरसहीत येइल तुझ्याकडे. बिल चेक कर आणि त्याच्या हाती परत पाठव.
नीट व्यवस्थित पॅक करून दे.
आता खूष???
सॉरी… तुला त्रास झाला नकळत…
चल, बोलू नंतर..बाय.”

अरे ..अरे..म्हणेपर्यंत फोन बंदही झाला होता.
माझ्यामूळे तो दुखावला गेला होता.
मला काहीही बोलायची संधी न देता त्याने विषय मोडीतच काढला होता.
काय करावे काही समजत नव्हते. इतक्या वेळपासुनचा आनंद क्षणात मावळला होता. मन उदास वाटत होते.
दारावरची बेल वाजली. मुले शाळेतुन आली असावीत..
मी विचारांना तात्पुरती मुठमाती दिली.
आणि त्यांच्या खाण्याचे करायला किचनकडे गेले..
डोळ्यातून नकळत ओघळलेले अश्रू ..
समजत नव्हते कांदा कापताना येत होते की. . . . . . .

(क्रमश:-3)

®️©️राधिका कुलकर्णी.