Ritbhatmarathi

Search
Close this search box.

घाईने रात्री पर्समधे कुठेतरी कोंबलेले पुडके आता शोधायला सुरवात झाली.पर्स कसली कबाडखानाच..असंख्य वस्तुंचे भांडार. सेफ्टी पिना, टिकल्यांची पाकीटे,रूमाल,पेपरमिंट गोळ्यांचे अर्धवट फाडलेले पाकीट,झालंच तर हळदीकुंकवाला गेल्यावर दिलेली विड्याची पाने असेच कोंबलेली,चूरडून वाळून गेलेली,हळदी कुंकू,पान सुपारीची पाकीटे, फुले, मुलांच्या चॉकलेट/ गोळ्यांची रॅपर्स ,प्रवासात हाताशी असावी म्हणून ठेवलेल्या आवळा सूपारीच्या पूड्या,गाडी लागली तर ओवामिनची गोळी, बामची बाटली, विक्स, शेंगदाण्याची पाकीटे आणि असेच चघळायला काहीतरी लागते म्हणून खूपसलेल्या असंख्य वस्तू.. विचारू नका…. लागेल असु द्यावे म्हणुन प्रत्येक खेपेला काही ना काही कोंबलेले..
गरज किती पडते माहित नाही पण त्यामुळेच नेमकी हवी ती वस्तु मात्र वेळेला सापडेल तर शप्पथ…. पण आज माझे नशीब जोरावर होते.ह्या सगळ्या पसाऱ्यात लपलेले ते गिफ्ट हाताला लागले..
हुश्श!! सापडले बाई एकदाचे.

खरेतर वरची वेष्टण केलेली कागदं मी फार जपून काढते. तडातडा फाडणे मला आवडत नाही. आज मात्र तो नियम धाब्यावर बसला आणि कागद अगदी लहान मूल होउनच मी फाडला.
आता एक छोटिशी डबी होती.
आणि डबीत एक सुंदर नाजूकसे कानातले.

बाई ग्ऽऽऽ !! कित्ती सुंदर !!

एक उभा सोनेरी व्ही आणि त्यावर अगदी छोटे छोटे मोती जडवलेले. खालीही तसेच छोटेसे मोत्याचे लोलक लटकत होते. त्याच्या चॉईसवर मी जाम फिदा झाले..

माझा आणि श्रीधरचा खरेतर प्रेम-विवाहच. पण बापजन्मात श्रीधरला सरप्राईज गिफ्ट आणणे कधी जमलेच नाही.
एक-दोनदा मला सरप्राईज करायचा प्रयत्न करण्यात मला गिफ्ट आवडले नाही म्हणुन जोरदार भांडणच झाले आमचे.

तो ऐतिहासिक किस्सा आठवून आम्ही आजही खूप हसतो.आता हसतो पण त्यादिवशी मात्र जोरदार भांडण झाले होते आमचे. आज तो तुम्हाला सांगतेच आता…

तर झाले असे की ती आमच्या लग्नानंतरची पहिलीच दिवाळी. दिवाळीच्या पाडव्याला बायकोला भेट द्यायची असते एवढे श्रीधरला माहीत होते आई बाबांना बघून, त्यात घरची सगळी मंडळी अगदी सासूबाईंपासून घरातल्या सगळ्यांनीच श्रीधरला ‘ काय मगऽऽ… पहिल्या पाडव्याला बायकोला काय गिफ्ट देणार?? म्हणून सगळ्यांनी पिळून काढलेले… ‘बघ हं..! बायकोची आवड-निवड ओळखून गिफ्ट दे..’ त्यात वर हे बोलून अजूनच टेंशन दिलेले..

एवढे प्रेमबिम केले पण गिफ्ट तेही सरप्राइज द्यायची कामं मीच करायचे नेहमी. गिफ्ट मिळाल्यावर त्याचा चमकलेला चेहरा बघूनच मी खूष व्हायचे पण आज मात्र त्याची परीक्षाच होती. त्याने माझ्या माहेरी सगळ्यांना माझी आवड निवड विचारून झाले.आमच्या कॉमन फ्रेंड्संना विचारून झाले.प्रत्येकाने काही वेगवेगळे ऑप्शन्स सुचवले ज्यामुळे तो जास्तच कन्फ्युज झाला.मग अखेरीस खूप विचार करून त्याने स्वतःच काहीतरी ठरवून एक भेट विकत घेतली. आम्ही सगळेच त्याची ही सगळी गडबड कान्या डोळ्यांनी बघत होतो. त्याच्या गूपचूप आमच्या बेडरूममध्ये माझ्या नकळत होणाऱ्या चकरा पाहून मीही मनातल्या मनात खूष होत होते..काय आणले असेल श्रीने माझ्यासाठी!!! मलाही त्या क्षणाची भारी उत्सुकता होती…..
शेवटी तो क्षण येऊन ठेपला. संध्याकाळ झाली. औक्षणाची वेळ झाली. आधी सासू सासऱ्यांचे पारंपारिक पध्दतीने औक्षण झाले मग मी ओवाळायला घेतले. श्री रांगोळीने अधोरेखित चौरंगावर येऊन बसला. मी औक्षण करताच गिफ्ट रॅप केलेले एक जाडजूड वजनदार कव्हर त्याने माझ्या हातात दिले. मी अगदी ‘आनंदी आनंद गडे.. ‘ अशा अवस्थेत बेडरूममध्ये गेले… कव्हर उघडून आत काय दिलेय लाडक्या नवऱ्याने म्हणून बघायची कोण घाई मला… घाईघाईने मी कव्हरचा वरचा कागद बाजूला केला. इतके वजनदार काय असेल विचार करतच मी गिफ्ट उघडले आणि त्यातली वस्तू बघून माझं तोंड कडू कारलं खाल्ल्यागत वाकडं झालं… पहिल्या पाडव्याला श्री मला वाचायची आवड म्हणून पाच सहा पुस्तके घेऊन आला होता.
How unromantic…!
दिवाळी पाडव्याला कोणी असे गिफ्ट देते का???

माझी प्रतिक्रिया बघायला उत्सुक श्रीधर जवळच कुतूहलाने उभा होता, गिफ्ट मिळाल्यावरची माझी रीॲक्शन बघायला. माझा लालपिवळा इंद्रधनुषी रंगातला चेहरा बघून तो काय समजायचे ते समजला… खूप भांडले मी त्यादिवशी त्याच्याशी…
पण सासूबाईंना माहीत होते की असेच काही होईल म्हणून त्यांनी अगोदरच एक सुंदर नेकलेस आणि साडी आणून ठेवली होती. तीच मला देऊन ‘मी तुझी गंम्मत करत होतो ‘ अशी श्रीधरने संपादनी केली . नंतर सासूबाईंनी खरा किस्सा सांगितला तेव्हा आम्ही दोघीही खूप हसलो…तर असे माझे नवरोबा…!

पण मग त्या दिवसानंतर श्रीने कानाला खडाच लावला. काहीही घ्यायचे झाले तर तो मला सोबत घेऊनच खरेदी करायचा. त्यामुळे कित्येक वर्षात अशा सरप्राईज गिफ्टची मला सवयच नव्हती.

पण प्रसादची ही भेट मला मनोमन खूष करून गेली. दोन कारणांनी…
एकतर माझ्या आवडीनिवडी फारशा माहित नसतानाही त्याने सरप्राईज गिफ्ट इतक्या थ्रिलिंग स्टाईलने दिले.
आणि दुसरे…..,
मला कोणीतरी गिफ्ट तेही एका मित्राने दिले होते.
आजवर मैत्रिणी नातेवाईक किंवा इतर परिचितांकडून अनेक भेटी मिळाल्या पण मित्र , तोही वर्गमित्र…! आणि त्याने आणलेले हे पहिले वहीले गिफ्ट…!

लगेच कानात घालुन बघितले.लोलक हलताना होणारी नाजुक किणकीण कानात घुमत होती.
फोनवर ईनकमिंग कॉलरट्युन ढायढाय
वाजत होती. धावत जाऊन फोन बघितला तर प्रसादचाच कॉल…..
“अरे कित्ती गोड आहेत कानातले.!!!
तुझी निवड सुंदर आहे हं!! खूप खूप थँक्यु !!!
पण गिफ्टची काय गरज होती रे??
ही फॉर्मॅलिटी कशासाठी ?
मी धाडधाड बोलतच सुटले. नकळत ओव्हर एक्साईटमेंट!!!!!
त्यावर हलकेसे हसत तो म्हणाला…
“अगंऽ पहिल्यांदाच आयुष्यात कुठल्यातरी गोड मैत्रिणीकडे जात होतो. मग असेच रित्या हाती कसे जाणार ? म्हणून जे सहज दिसले ते घेतले.”
खरेतर मला टेन्शन आलेले… पण आता तुझ्याशी बोलून उतरले ते..
टेन्शन?? ते कसले!! मी निरागसपणे विचारले.त्यावर जोरजोराने हसतच मला म्हणतो कसा
” आशूऽऽ तुला माहितीय का!! आज पहिल्यांदा मी कुणासाठी तरी तेही एका स्त्रीसाठी काहीतरी खरेदी केलीय.
अख्खे शाळा/कॉलेजचे आयुष्य गेले पण कोणी मैत्रिणी नव्हत्या गं मला आणि लग्नानंतर बायकोच माझ्या आणि तिच्या खरदीचा भार वाहते. ती ड्रेस डिझायनर आहे ना,तिला हा सेन्स खूप चांगलाय की मला काय छान दिसेल!

तीने तर सांगुनच टाकलेय मला की ‘ प्रसाद तुला ह्यातले काही कळत नाही. मला काही आणायच्या भानगडीत तु पडूच नकोस.’ त्यामुळे गिफ्ट आणणे ही जवाबदारी आमच्याकडे आमच्या गृहमंत्रीच सांभाळतात..
त्यामुळे हे मी निवडलेले पहिले वहिले गिफ्ट. तुला आवडले हे ऐकुन बरे वाटले….

कालपासून मला सारखे हेच वाटत होते की तू इतका उशीर लावलास म्हणजे नक्कीच तुला कानातले आवडले नसणार..पण हे मला कसे सांगायचे म्हणुन तू मला काहीच बोलत नाहिएस…
असोऽऽ…मी खरच खूप आनंदी आहे..
कुणाला तरी माझी निवड आवडली ह्याहून जास्त भाग्याचे काय असू शकते. तसेही स्त्रियांना खूष करणे सगळ्यात अवघड .त्यात दिलेली भेट आवडणे ही दूरापास्तच क्रिया आहे पण आज मला त्यात यश मिळाले..हम बहोत खूष है आज!
म्हणजे ह्यापुढे आता मी हिंम्मत करायला हरकत नाही.. हो ना..!!!”
तो पुन्हा जोरजोरात हसत होता पलिकडून..”

मीही हसले…… मनात आले.

घरोघरी मातीच्या चुली….!
~~~~~~~
क्रमश: – 2
©️®️राधिका कुलकर्णी.