Ritbhatmarathi

Search
Close this search box.

®️©️राधिका कुलकर्णी.

प्रसादचे आजचे रूप काहीतरी वेगळेच होते.मला त्याच्या मनात काय चालले असेल ह्याचा अंदाजच लागत नव्हता.
श्री गाडी चालवत असताना मी मात्र पेंगुळले होते बाजूच्या सीटवर. खरेतर ड्रायव्हरच्या बाजूला बसून को पॅसेंजरने झोपू नये नाहीतर ड्रायव्हरला पण झोप यायला लागते म्हणतात पण आज विचारांच्या ओघात कधी माझा डोळा लागला कळलेही नाही…
घरी पोहोचेपर्यंत बराच वेळ झाला होता. तन्वी मुलांना तिच्याच घरी घेऊन गेली होती..
मी पोहोचताच तिला कळवले तसे दोघेही घरी आले. मला पाहताच ऋषी मुसमुसायला लागला.
खरेतर तन्वीची मुले आणि ह्या दोघांची भारी गट्टी होती. एकत्र रहायला मिळणार म्हणले की ऋषी जास्त खूष असायचा कारण तन्वीची मुलगी ऋतू त्याची बेस्ट फ्रेंड होती. पण आज काहीतरी बिनसलेलच दिसत होतं त्याचं. मी त्याला जवळ घेऊन बसतच होते की तन्वीचा फोन.
” अगं ऋषीकडे बघ गं जरा. तासभरापासून आई कधी येणार म्हणून तोंड बारीक करून बसला होता.. मी त्याला वरण भात खाऊ घातला पण तोही नाक मुरडत चार घास खाऊन नको नको केला. उगीच आग्रहाने भरवून उलटी केली तर आहे नाही ते सगळेच पडले असते म्हणून मी आग्रह केला नाही..तू बघ त्याला भरवता आला तर. सोहम सोबत पाठवलाय भात-वरण जरा बघ कढी का आंबट झालीय ते. .”
” हो हो .बघते.. आणि थॅंक्यु ग तनू… तुझ्यामुळे निर्धास्त गेले मी तिकडे..”
” बरं बरं..आता उद्या बघते तुझ्याकडे.आत्ता प्रवासातून दमून आली आहेस म्हणुन सोडून देते.. बावळट कुठची..चल बाय..गूड नाईट! “

तन्वीचा फोन झाला आणि मी ऋषीला विचारले..” काय झाले पिल्लू जेवणार का? मावशीने छान छान वरण भात दिलाय ऋषीच्या आवडीचा.खाणार का पिल्लू.”

त्यावर काही न बोलता तो फक्त कुशीत शिरून झोपला.
त्याचे अंग किंचित कोमट लागत होते..श्रीने थर्मामीटरने चेक केले तर बारीक ताप वाटत होता.. त्याला औषध देऊन झोपवून मीही त्याच्या शेजारीच थकव्याने झोपी गेले.

” काय,गेलीस की तिकडचीच झालीस की तू? काही मेसेज नाही, फोन नाही. सगळे ठिक आहे ना? “
प्रसादनी फोन करून प्रश्नांची सरबत्तीच लावली आज.

“अरे हो हो..जरा उसंत घे.किती प्रश्न.”
” अगं काय मग! किती हा दुर्लक्षितपणा.! मी किती अस्वस्थ झालो इकडे. एकतर भाच्चीच्या घरी दोन तीन दिवस सगळे कार्यक्रम, सारखे जा- ये चालू.त्यात मी पण विसरलो. आज शेवटी मलाच आठवले..

पुण्याहून निघाल्यानंतर साधा पोहोचल्याचाही मेसेज नाही तूझा. घाईत विसरली असशील उद्या येईल मेसेज, परवा येइल करता करता आज चार दिवस झालेत. मी खूप घाबरलो.त्या दिवशी मी तुझी जरा जास्तच मस्करी केली म्हणून तू रागाने तर मेसेज केला नाहीस असे वाटून जास्त अस्वस्थ झालो… सखी , तू विसरलीस हं मला ! “
काहीशा तक्रारीतच बोलत होता प्रसाद.

त्याची काळजी जाणवत होती शब्दागणिक.
किती छान असते नाऽ हे, की कुणीतरी आपला एवढा विचार करतोय, आपली काळजी घेतोय. आज पहिल्यांदाच मला त्याचे हे रूप दिसत होते.
एरवी हेच चित्र उलटे असायचे.

मागील काही घटनांमधे तर प्रसादमूळे कित्येकदा मी रात्र रात्र त्याच्या विचारात आणि काळजीत घालवल्या होत्या.
पण आज तो माझी काळजी करताना बघून मला खरच खूप भरून आले होते.

“अरे,काय सांगू, इकडे आलो तर ऋषी सारखी चीडचीड करत होता.लहान आहे ना , अजून सवय नाहीये त्याला मला सोडून रहायची. पण त्या चिडचिडीचे कारण वेगळेच होते.त्याच्या अंगात कणकण होती.मी झोपताना पॅरासिटेमॉल सिरप देऊन झोपवले पण रात्रीतून तो जास्तच फणफणला.अंग चटकत होते तापाने. सकाऴी उठून बघतेय तर पूर्ण अंगावर लाल पुरळ उठलेले.
ताबडतोब डॉक्टरकडे घेवून गेलो. तर गोवर निघाला म्हणे. ते पुरळ दुखून ठसठसीने पुरता बेजार झालेला तो. सारखी रडरड चाललेली त्याची. सतत जवळ बस म्हणून मागे लागलेला. त्यामुळे लक्षातूनच गेले रे तूला निरोप करायचा.

सॉरी डिअर.प्लिज अंडरस्टँड आणि आता चिडू नकोस रे.”
“बर.आता कारण कळलेय म्हणून सोडतोय तूला.पण कळवायचे ना यार हे सगळे.
किती काळजीत होतो मी.
ठिक आहे, तू काळजी घे मुलाची.
आणि हो लग्नाचे फोटो आलेत.
तू मोकळी झालीस की सांग तूला पाठवतो बघ किती सुंदर आलेत फोटोज्.”
“हो रेऽऽऽ! सध्या तर मला घरातल्या कामातूनच डोके वर काढायला फूरसद नाहीये.
त्यात श्री पून्हा बेंगलोरला चाललाय टूरसाठी. ऋषीकडे घराकडे सगळीकडे मलाच बघायला हवे ना. खूप गुंतून गेलेय. त्यात आता चार तारखेपासून मी ही क्लासेस सूरू करायचा विचार करतेय.
ह्या वर्षी आमचे फिरणे झाले त्यामूळे क्लासेसला लवकर सुट्टय़ा दिल्या. आता पोर्शन कम्लिट करायला लवकर सुरू करणे भाग आहे.
बर माझे जाऊ दे सगळे. तू कसाएस?
घरी सगळे मजेत ना.आणि तूझी गुडन्युज जी तू मला भेटल्यावर सांगणार होतास. इतके बोललो पण तेच सांगितले नाहीस.
काय आहे ती न्यूज?
मी उत्सुकतेनेच विचारले.

” होगं. मलाही सुचले नाही. अचानक तूला समोर बघून काय बोलायचे ते सगळे विसरून गेलो !
नंतर तुला जायची घाई त्यामुळे काहीच बोलणे झाले नाही.

“अगं गूड न्यूज ही की, माझा तो फ्रॉड केलेला कलिग सापडलाय आणि त्याने त्याचा गुन्हा पण कबूल केलाय. पोलिस केस चालू आहे पण आता माझ्या मागचा ससेमिरा सुटला चौकशीचा.

ते सततचे पोलीसांचे फोन्स, ती संशयीत नजर. खूप धास्तावलो होतो.
कसा पार पडणार ह्या दूष्ट चक्रातून ह्याचाच दिवस रात्र विचार यायचा.
फक्त त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे नौकरीवरून काढून नव्हते टाकले. त्यामुळे जरा तरी विश्वास आहे लोकांचा ही एक जाणीव मनाला उभारी देत होती.

” अरे वाह्ऽ !! ही तर खूपच आनंदाची बातमीय आणि तू मला ती इतक्या कोरड्या पद्धतीने सांगतोएस ? नॉट फेअर प्रसाद. मला राग आलाय तूझा.”

” बर मग सांग काय करू?काय हवेय? कशी माफी मिळणार ह्या पामराला? बोल,तू म्हणशील ते..

” काही करू नकोस सध्या तरी.
पण भेटल्यावर पार्टी हवीय.भरपूर मजबूत कापणार तूला.!”

” अग एऽऽ कापणार काय ! खाटकाच्या दूकानात रवानगी करणारेस की काय माझी ! काय हे !

” अरे देवा! तूम्ही पुणेकर नेहेमी अर्थाचे अनर्थ का करता रे? ही मुंबईय्या लँगवेज आहे. कळेल हळुहळू.
कापणार म्हणजे भरपूर वसूली करणार पार्टीत.”
मी हसत हसतच त्याला टोमणे मारले.तोही ऐकून हसत दूजोरा देत होता.

खूप फ्रेश वाटत होता आवाजावरून.

“मग कधी भेटतेस सांग. पार्टी काय तू म्हणशील तेव्हा म्हणशील तिथे यार.”

“बघूया.पण निवांत भेटू नक्की. बर चल निघते आता.
ऋषीचे स्पजिंग करायची वेळ झालीय.दोघेही उठून बसलेत.
पण छान वाटले रे बोलून.परत फोन करशील असाच तूला सवड झाली की.?जरा निवांत गप्पा मारू.”
“हो ग.मी करतो.करेन.
मलाही तूझ्याशी बोलले नाही की दिवस सूनासूना वाटतो.
करेन मी कॉल.
काळजी घे सगळ्यांची.
बाय..”

मला आज खूप दिवसांनी असे आवर्जून वाटायला लागले की मित्र असणे ही किती सुखावह बाब आहे.
किती हक्काने मी सहजपणे त्याला पून्हा फोन कर म्हणू शकले.

किती छान वाटते की कुणीतरी आपल्या शिवाय दिवस सूना जातो म्हणते.
हे खूप सुंदर आहे आणि मी ती भाग्यवान होते जिला असे म्हणणारा एक जिवलग मित्र होता.
जो फक्त तिच्या आणि तिच्याच सुखाचा विचार करतो.

(क्रमश:18)
®️©️राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी,

कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?

हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.)
धन्यवाद.