Ritbhatmarathi

Search
Close this search box.

®️©️राधिका कुलकर्णी.

सिमल्याच्या शांत,थंड मनाला प्रसन्न करणाऱ्या प्रदेशाला मागे टाकत गाडी हळूहळू दिल्ली एअरपोर्टकडे भरधाव वेगाने धावत होती. तिथला उष्मा आणि गर्दीमूळे प्रचंड अस्वस्थता जाणवत होती.
फ्लाईट वेळेवर सुटली आणि एकदाचा निश्वास टाकला मी.
सगळ्या सुचना देवून हवाईसुंदरी तिथून अंतर्धान पावली. अवघ्या पावणेदोन तासाचा प्रवास होता.
हा हा म्हणता चुटकी सरशी मुंबईच्या विमानतळावर पोहचत असल्याची सुचना मिळाली.
# ## ## ## #
जेवढा वेळ दिल्लीहून मुंबईला लागला त्याहून दूप्पट वेळ विमानतळ ते घर ह्या प्रवासाला लागला. मुंबईतली ऐन उन्हाळ्यातली चिकचिक,घाम,रस्त्यावर ओसंडणारे माणसांचे पूर, ट्रॅफिक ती गर्दी,हॉर्नचे गोंगाट, ह्या सगळ्या दिव्यातून घरी पोहोचणे ही एक परीक्षाच होती.

एका गोष्टीची मात्र गंम्मत वाटली. आपण कितीही प्रगती केली नॅनो टेक्नॉलॉजी विकसित केली त्याच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रात सगळी कामे चुटकीसरशी होतात तरीही एका विशिष्ट मर्यादेपलिकडे त्याची उपयोग्यता संपतेच.
म्हणजे हेच बघा ना अगदी मालकीची स्वत:ची हेलिकॉप्टर्स असणारी मंडळीही एका विशिष्ट टप्प्यावर त्याला सोडून गाडीतच बसतील.आणखी घराजवळ गाडीला बाहेर सोडून घरात प्रवेशताना परमेश्वराने दिलेल्या दोनचाकी वाहनाचा म्हणजेच आपल्या पायांचा वापर करूनच प्रवेश करावा लागतो घरात. मग तो बिल क्लिंटन असेल नाहीतर सर्वसामान्य व्यक्ती. किती खरय ना!!
जणू काही ईश्वराला हेच सुचवायचे असते की कितीही प्रगती केली तरी पाय सतत जमिनीवर असुद्यात.

विचारांच्या नादात घर कधी आले समजलेच नाही.
# # # # # # # #
मुंबईच्या चिकट गर्मीने अंग नुसते आंबुन गेले होते. प्रवास सुखावह असला तरी शीणवटा जाणवत होता.
आठवड्यापासून घर बंद होते. दार उघडल्याबरोबर आलेला उग्र दर्प त्याची जाणीव करून देत होता.
आशूने पटापट सारे खिडक्या दारे उघडून फॅन लावल्यावर थोड्याच वेळात हवेशीर आणि प्रसन्न वाटायला लागले. घरात सर्वत्र दिसत नसलेल्या धूळीचा संचार झाला होता. फॅन ऑन करताच त्याचाही दर्प नाकात शिरला. एखाद्या आळशी माणसाने अंग आडवेतिडवे पसरून पडावे तसे घर अस्ताव्यस्त पसरलेले होते.
लेटरबॉक्समधे बऱ्याच लग्न, मूंज,एंगेजमेंटचे इन्वहिटेशन कार्डस येऊन पडले होते. मे म्हणजे लग्नाचा सिझन. कुठे मुंज तर कुठे लग्न. आता त्याही गोष्टी प्रायॉरीटीनूसार बघाव्या लागणार होत्या.

तो विचार तात्पूरता बाजूला ढकलून आशूने बॅगांची आवराआवर करायला घेतली.
खरेतर खूप थकायला झाले होते प्रवासामूळे पण काही अंगच्या खोडी मरेपर्यंत सुटत नाही म्हणतात ना त्यातलीच ही एक खोड.
वाईट की चांगली देवच जाणे…!

कुठूनही बाहेरून आले की ती बॅग जोवर रिकामी करून वस्तू जागच्या जागी जात नाहीत आशूला काही चैन पडायचे नाही. जरा कंटाळतच तिने ते काम उरकले.
सगळे धूवायचे कपडे वॉशिंग मशीनच्या बीनमधे सॉर्ट केले.त्यातही काही कलर जाणारे,नवे, खूप जास्त मळलेले ह्याप्रमाणे वर्गवारी करून तिने सगळा कपड्यांचा पसारा आवरला.आता फक्त तिकडून खरेदी केलेले सामान आणि बॅगा वरच्या कॅबिनेटमध्ये सरकवणे एवढे काम श्री करता सोडून ती स्नानाला गेली.
तोपर्यंत श्रीने बाहेरून जेवण मागवले होतेच. सगळ्यांनी जेवणे उरकली आणि मूले तर लगेच शिणवट्याने खावून झोपली देखील.
मागची झाकपाक उरकून आशूनेही अंथरूणावर अंग टाकले.
थकलेल्या शरीराचा कधी डोळा लागला कळलेही नाही.

सकाळी फोनच्या कर्ण कर्कश्श गझरने सहा वाजताच जाग आली. खूप कामे आ वासून वाट पाहत होती पण आशूला अजिबात उठावेसे वाटत नव्हते.

गझरच्या आवाजाने एकदा झोपमोड झाल्यावर प्रयत्न करूनही आशूला पून्हा झोप लागेना. तशीच शरीराला जबरदस्तीने ढकलत ती बेडवरून उठली. काहीशा आळसावलेल्या अंगाने बाहेर आली. पेपर येऊन पडला होता येवून. आळस झटकायला तिने मस्त स्ट्रॉस चहा बनवला आणि सोफ्यावर बसली. चहा घेताघेता पेपरची पाने उगीचच उलट सुलट फिरवणे चाललेले तिचे.

चहा संपवून बाकीची राहीलेेली आवराआवरी करायला
घेतली तिने.
पर्समधेही बराच पसारा झालेला होता. वेगवेगळ्या ठिकाणी खेळासाठी घेतलेले एन्ट्री टिकीट्स, चॉकलेटचे रॅपर्स, बडीशेपच्या पुड्या,वेळोवेळी मॅचिंगच्या बदललेल्या काही तुटक्या बांगड्या, टुथपिक्स,सेफ्टी पिन्स, मुलांचे बदललेले मोजे , रूमाल, सॅनिटरी पॅडपण घाईत पर्स मधेच कोंबलेले. इतके ब्रम्हांड कसे काय सामावून घेते बिचारी!!!!
आश्चर्य करतच आशूची आवराआवरी चाललेली.
त्यातच एका कोपऱ्यात चपट्या आकारात काहीतरी हाताला लागले. काढून बघते तर काय! तिचा मोबाईल फोन बेवारशासारखा निर्जीवावस्थेत एखाद्या स्थितप्रज्ञ साधूसारखा समाधी लावून बसलेला. आशूबाईंची कधी कृपादृष्टी वाढतेय ह्या विचारात पुन:रूज्जीवनाच्या प्रतिक्षेत बिचारा ध्यान लावून बसला होता.
सिमल्यात बरेचदा रेंज नसल्याने आशूने ह्या तिच्या जीवलग मित्राला मागील काही दिवसात विसरूनच गेली होती.अगोदर चार्जर शोधून तिने फोनमधे संजीवनी फुंकली तसे पटापट फटाक्यांची आतषबाजी व्हावी किंवा मग धो धो पाऊस अचानक कोसळावा तशी मेसेजेसची बारीश होऊ लागली. असंख्य गृप मेसेजेस पर्सनल मेसेजेस, मुलांच्या शाळेचे असंख्य मेसेजेस येऊन पडलेले होते.
त्यातल्या एका मेसेजने आशूचे लक्ष वेधले आणि तिला खुदकन हसू आले.

तो मेसेज असा…..

“धरतीवर आपण कधी प्रकट होणार आहात देवी?
स्वर्गाची सैर करता करता धरतीवर पाचरण करण्याचे आपणाला विस्मरण झालेय की काय ?
इकडे भूतलावर हाह्हाकार माजलाय देवी.
कृपया सत्वर शीघ्र पाचारण करावे”
इति नारद.
उर्फ
मुरली.

हो मुरलीच. अगदी हटके कॅरेक्टर.

तसा मित्र तर तो श्रीचा होता पण आमच्या प्रेम प्रवासाचा हाच एकमेव दूवा होता.
म्हणजे कधी दोघांत काही वाद ,भांडण काही झाले तरी मुरली आशूच्याच बाजूने उभा असायचा.
तिचा भाऊ,मित्र,सखा आणि श्रीचा मित्र म्हणुन दीर अशी विविध नाती होती त्याची तिच्याशी .
श्री तर नेहमी लटक्या रागाने म्हणायचा,साला मित्र माझाय पण पक्का सवत्या झालाय आणि तूझा पिद्दू”
मला कधी मेसेज करून विचारत नाही तू कसाएस पण तूला बघ लगेच मेसेज वर मेसेज”
श्रीच्या त्या रागावरही जीव ओवाळून टाकावा वाटायचा अशा वेळी.
मुरलीचा स्वभाव असाच मस्कऱ्या नेहेमी.
पण चेष्टे चेष्टेतच कधी इतके सुचक बोलून जायचा ना की विचार करायला भाग पडावे.
तो माझा हक्काचा कोपरा होता श्रीशी नाते जुळल्यापासून. काहीही असेल तर त्याला सांगायचे की काम फत्ते झालेच म्हणून समजा.
तर त्याचा मेसेज वाचून हसायलाच आले.कारण तो एकटाच होता ज्याला मी सांगीतले होते की सिमल्याला चाललोय स्वर्गात…
त्यामूळेच असा मेसेज केला होता त्याने.
# ## ## ## ## #
गृपचे अनेक मेसेजेस टाळून फक्त काही महत्वाचे पर्सनल मेसेजस मी वाचत होते.
प्रसादचेही तीन चार मेसेजेस होते. कूठेस विचारणारे.
आत्ता मला स्मरण झाले की निघताना मी त्याला काहीही न सांगता गेले होते.कारण तो त्याच्या घरगूती अडचणींमधे व्यस्त होता.
आता वेळ झाला की फोनच करूया ह्या विचाराने मी त्याच्या मेसेजला रिप्लाय देणे टाळले.
# ## ## ## ## #
माझ्या किचनची अवस्था तर बघवत नव्हती. पाल आणि झुरळं हातात हात घालून वावरत होते इतस्त:. त्यांनी त्यांची प्रजा पण तिकडेच वसवल्याचे प्रत्येक ट्रॉलीच्या कोपऱ्यात कोपऱ्यात दिसत होते.आता ह्या अतिक्रमणाला हटवण्यासाठी आधी पेस्ट कंट्रोल करावे लागणार होते पण ते लोक उद्या येणार त्याआधी थोडेफार आवराआवरीसाठी कामवालीला फोन करून बोलावून घेतले होते. तिच्या मदतीने जरा स्वच्छता करूनच स्वैपाक सूरू होणार होता हे तर निर्विवाद सत्य होते. त्यामुळे श्रीला आजही बाहेरचेच मागवावे लागणार होते.
गेले आठ दिवस बाहेरचे खावून वैतागलेला श्रीधर त्यामूळे घरी येवूनही पून्हा बाहेरचे म्हणल्यावर चिडचीड करणार हे निश्चितच होते. आता त्याला
कसेतरी बाबापूता करून मनवावे लागणार होते आशूला.
‘चला आता मिशन श्रीसाठी तयार व्हा आशूबाई!!!’
असे स्वत:च स्वत:ला बजावत आशू बेडरूममधे गेली…

क्रमश: -12
राधिका कुलकर्णी.