Ritbhatmarathi

Search
Close this search box.

®️©️राधिका कुलकर्णी.

सकाळी सकाळी फोनच्या घंटीने जाग आली.
“कोणाचा ग फोन एवढ्या सकाळी?”
श्रीधरने अर्धवट झोपेतच विचारले.
“अरे बघते थांब जरा.”
डोळे किलकिले करतच आशूने फोन चाचपडला.
मनिषचा फोन!! इतक्या सकाळी?
जराशा आश्चर्यानेच आशूने फोन घेतला.

” सुप्रभात मनिष!आज सकाळीच आमची आठवण कशी काय आली ?
सगळे ठिक ना?
एवढ्या सकाळी कसा काय कॉल केलास?”
आशूने मस्करीतच विचारले.

” होय मी ठिक आहे. पण एक बातमी द्यायला फोन केलाय.”
आता आशू जरा गंभीर झाली.

“कसली बातमी? काही सिरियस तर नाही ना ,पटकन सांग ना.”

“अग् आज पहाटे आपल्या प्रसादचे वडील गेले
हार्ट ॲटॅकने.”
“अरे बापरे! भलतेच शॉकींग आहे हे!
पण काय आजारी होते का?

“अगं काही नाही. कालपर्यंत छान होते. मला लायब्ररीत भेटले ना संध्याकाळी. मग घरी आले माझ्या. माझ्या मुलींबरोबर गप्पा केल्या आणि चहा घेऊन गेले परत. रात्री रोजच्या प्रमाणे आठ वाजता जेवण करून टिव्ही पाहत होते म्हणे तर थोडंसं अस्वस्थ वाटतंय म्हणाले. काही खाण्यापिण्याने ॲसिडिटी झाली असेल वाटून आधी काकूंनी त्यांना गार दूध दिले.ते प्यायले. थोड्यावेळ बरं वाटलं की पुन्हा छातीत कळ आल्यासारखे झाले म्हणे. मला प्रसादने फोन केला म्हणून ताबडतोब गेलो. घाईने त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केले. सगळ्या तपासण्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांना घरी एक माइल्ड ॲटॅक येऊन गेलाय. सगळे औषधोपचार वेळेत सुरू झाले.
डॉक्टरांच्या अंदाजानुसार त्यांना आणखी एक ॲटॅक येण्याचे चान्सेस होते म्हणून आयसीयू मधेच ठेवले होते. दुसरा ॲटॅक इतका सिव्हीअर होता की डॉक्टरांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. त्यातून ते वाचूच शकले नाहीत. प्रसादला खूप धक्का बसलाय.बोलत नाही काही पण आतून तुटलाय खूप.

“साहजिकच आहे रे !!!
किती अचानक काय होऊन बसले ?
फारच वाईट झाले. बरं तू तिकडे बघ. तोवर मी आपल्या गृपवर पोस्ट करते.
अगं नाही.. त्याची गरज नाही.मी ऑलरेडी पोस्ट केलाय मेसेज.पण तू सकाळी लवकर नेट ओपन करत नाहीस ,
तूलाच माहित होणार नाही म्हणुन फक्त तुलाच फोन केलाय. “
“बर. त्याला सावर तू आणि काही असेल तर कळव.”
म्हणत फोन ठेवला.

सकाळी सकाळी मिळालेल्या त्या बातमीने आशूचे मन पुन्हा उदास झाले.
तिने नेट ओपन केले. त्याचाही पर्सनल मेसेज येऊन पडला होता.
रात्री नेट बंद म्हणून आत्ता पहात होती आशू.
खूप काळजी वाटत होती. कारण ठरवूनही कोणतीही मदत करायला ती असमर्थ होती.
त्याला एक फोन तरी करावा असा विचार क्षणभर चमकला.
परत वाटले तो सध्या पुढल्या सर्व तयारीत बिझी असेल,फोन नाही घेतला तर?
पुन्हा मनात आले,काय होइल फार फार तर? तो फोन नाही उचलणार,
पण आपण फोन केला होता हे तर समजेल? कॉल करतेच.
मनाचा विचार पक्का झाला आणि तिने कृतीही केली.
रिंग जात होती. बऱ्याच वेळाने फोन उचलला गेला. पण आवाज परत एकदा मनिषचाच.
“हॅलो!.”
” अग् आशू. मनिष बोलतोय.
तो जरा बिझी आहे म्हणून फोन माझ्याजवळ देवून ठेवलाय त्याने. मी कळवतो हं त्याला.”
ओके म्हणत फोन बंद केला मी.

देव पण कशी एकावर एक संकटे देत होता प्रसादला.
बिचारा आधीच ऑफिशियल कोणत्या तरी अडचणींमूळे त्रस्त होता आणि त्यात आता ही नवी भर. संकटे येताना हातात हात घालूनच येतात.आणि परमेश्वर चांगल्या माणसाचीच नेहमी किती परीक्षा घेतो..
काय असेल त्याची अवस्था आत्ता ह्याक्षणी.. ? काश मला पण तिथे त्याच्यासोबत आत्ता रहायला मिळाले असते तर?
त्याच्याशी पुढले काही दिवस तरी संपर्क होणे शक्य नव्हते होणार आता.
त्याच्या वडिलांसाठी आणि त्याच्यासाठी प्रार्थना करणे इतकेच काय ते आपल्या हातात. आशूने डोळे मिटून मृतात्याच्या चीरशांतीची प्रार्थना करत मनाला शांत केले.तरीही मनात एक अनामिक अस्वस्थता भरून उरली होती.

इकडे मुलांचा सिमल्याचा बाबासोबत प्लॅन पक्का होत होता. मूले तर जाम खूष होती. मीही मुलांसोबत ट्रिपला जाण्यासाठी खूपच उत्सूक होते पण नकळत ह्या बातमीने जरा उदास झाले होते अचानक.
दोन/चार दिवसच राहीले होते निघायला.
त्यामुळे सगळी पॅकिंग,गरम कपडे, फस्ट एड बॉक्स जे जे आठवेल तसतसे सगळे पॅकिंग करणे चालू होते.
मनात राहून राहून वाटत होते.पून्हा माझे कधी बोलणे होणार आहे प्रसादशी?
तो आत्ता दु:खात असताना त्याची सगळ्यात जवळची मैत्रिण नुसते म्हणवते स्वत:ला पण मैत्रीत साधे भेटायला जाणेही मला शक्य नाही?
आज पहिल्यांदा वाटले स्त्री खूप असहाय्य असते नाही का??
आत्ता जर मी पुरूष असते तर पटकन गाडी पकडून त्याला भेटायला गेले असते कुणाला सांगण्याची किंवा कुणाच्या परवानगीची ही गरज पडली नसती मला.

स्त्री खूप स्वतंत्र झालीय.तिचे निर्णय आता तिचे ती घेवू शकते.आजची स्त्री खूप कॉन्फिडंट आहे वगैरे वगैरे.किती काय काय बोलतो आपण. सत्य ही आहे थोड्या फार फरकाने.
पण काही वेळेस वाटते की नाही आजही तीला मनाप्रमाणे काही निर्णय घेताना तिचे घर संसार मुलेबाळे सगळ्या सगळ्याचा विचार करावा लागतो.
घरात नवरा बायको दोघेही कमावतात पण घराची जवाबदारी त्याही वेळी फक्त स्त्री कडेच असते.कुठलाही असा प्रसंग जिकडे काही त्याग करायची वेळ येते मग ती नोकरी असेल किंवा मग प्रमोशन,बदली काहीही त्यात माघार स्त्रीलाच घ्यावी लागते.
का? तर ती फक्त स्त्री आहे म्हणून?
मुलांची आई घरात हवी.बाप नसला तरी चालेल.
आता ही मी जर श्री ला विचारले की जावू का तर कितीही प्रेमळ नवरा असला तरी तो हेच म्हणेल,आता दोन चार दिवसात आपल्याला फिरायला जायचेय.त्याआधी मला माझ्या ऑफिशिअल कमिटमेंट्स कमप्लिट कराव्या लागणार आहेत.तू गेलीस तर मुलांकडे कोण बघेल?
आणि मग पून्हा मलाच वाद होवुन ट्रिपचा मूड स्पॉइल नको व्हायला मुलांचा म्हणून त्याचेच ऐकावे लागणार होते.
स्त्रीलाच इतकी वेसणे का सामाजिक वैचारिक भावनिक?
का स्त्रीलाच सगळ्या जवाबदारीचे ओझे? संसार दोघांचा, अपत्ये दोघांची, अर्थार्जनासाठी दोघेही दिवसरात्र मरमर करतात मग एकाच्या मरमरीचे कौतुक अन दुसऱ्याला मात्र कर्तव्याची घूटी का पाजली जाते फक्त.. सगळ्या जवाबदारीचा मक्ता एकट्या स्त्रीचा का?
का?
का?
आशूचे मन उद्विग्न झाले होते.
विचारांनी नकळत मनातल्या मनात बंड पूकारले होते.
आणि ती त्या विचारांना पुन्हा एकदा मनाच्याच एका कोपऱ्यात बंदिस्त करायचा व्यर्थ प्रयत्न करत होती.

“आई,पास्ता बनव ना ग्.खूप भूक लागलीय”
आई!!!
मुलांच्या गलबलाटाने विचारांचे काहूर थांबले.
पावले नकळत सवयीने किचनकडे वळली.

(क्रमश:10)
®️©️राधिका कुलकर्णी.