Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पहाटेची कोवळी किरणं, मलमली पडद्यातून चेहऱ्यावर पसरली तशी गुलाबी दुलई पांघरुन रात्रीच्या प्रणयाराधनेनंतर पहाटे कुठे झोपी गेलेल्या त्या नव्याकोऱ्या जोडप्याच्या पावलांनी हलकीशी चुळबुळ केली.

मनवाला, आपसूक जाग आली तशी ती दचकून उठली. समोरचा आदिचा, निजलेला निरागस चेहरा पाहून तिला खुदकन हसू आलं.

आदिच्या विस्कटलेल्या कुरळ्या केसांत बोटं फिरवत ती लाडिकपणे म्हणाली..”उठ ना रे राजा, मधुचंद्राहून येऊन आठवडा होत आला आपल्याला तरी तुझं..”

पुढचे शब्द बोलूच न देता आदिने मनुला, वेलीला घट्ट लपेटून घ्यावं तसं लपेटून घेतलं. त्याच्या अंगाचा पारोसा गंधही तिला हवाहवासा वाटला. रात्रीची आठव येऊन ती परत त्याला बिलगली. दोघांची पावलं पुन्हा एकमेकांत गुंफली गेली.

किचनमधून येणारा आंबोळ्यांचा खरपूस गंध, मनवाच्या नाकात शिरला तसं ती बळेच उठू लागली. आदिने तिच्या मंगळसुत्राच्या वाट्या ओठांत पकडल्या.

“अस्स रे काय करतोस,आदू?”

“का.. तुटेल?”

“चुप्प..चुप्प बैस..वाढवेल अस्सं म्हणतात.”मोठ्ठाले डोळे करत मनुने आदिला दटावलं.

“अस्स,” ओठांचा चंबू करत आदि म्हणाला.

“हो,”मनु लटक्या रागात म्हणाली.

“पण मग ते घालून का निजलीस..आपल्यात मधे येतं.”

“चल..माझा नाही धीर होत..मंगळसूत्र काढून ठेवायला..ते लग्नातले पवित्र विधी अनुभवले ना तेव्हापासनं हे अंगावरच असावं असं वाटतं बघ.”

“गळ्याबरोबरचा मुहर्तमणीचा सर आहे ना.”

“हो रे पण मला या वाट्या आवडतात..म्हणतात नं मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरमाहेरचं प्रतिक.”

“ओ हो उखाणा घेतैस का..”

“काहीही हां..आदि,” असं म्हणत मनुने परत एकदा वाट्यांना न्याहाळलं.

“अगं पण आपण छोटं घेऊ मग ते घाल तू.”

“हां. ही छान आयडीया रे. एक्च्युली नं आमचे अण्णा घेणारच होते मला पण मग ते दीदीच्या लग्नात तिला घेतलं नव्हतं..मग दोन घ्यावी लागली असती..दीदीसाठीसुद्धा नि तितके पैसे सध्या नव्हते रे..सो पाडव्याला घेतील म्हणालेत ते.”

“अग्ग.. पण आता मी घेईन की तुला..अण्णांकडे कशाला मागायला हवं! उलट आपणच त्यांना अधुनमधून काही भेटवस्तू देऊ.” मनुची पुढे हेलकावणारी बट कानामागे करत आदि म्हणाला.

“तसे मानी आहेत हं आमचे अण्णा. जावयाकडचं जास्त काही घ्यायचे नैत.”

“हो तर अण्णांची लेकही मानी दिसतेय खूप.”

“आहेच मुळी. तुला रे कसं कळलं?”

“काल ऐकलं मी, तुझं नि पमाताईचं बोलणं.”

मनवाला कालचा, चुलत नणंदेचा व तिचा संवाद आठवला. पमाताई काल सहजच म्हणून आली होती.

मनवाने,सासूबाईंच्या सूचनेनुसार पमाताईला शिरा करुन दिला..चमचाभर शिरा पमाताईने जीभेवर ठेवला. तो शिऱ्याचा घास तोंडात घोळवत, पमाताई मनुला म्हणाली,”थोडं तूप जास्त घालत जा हो. इकडे कसं तूप,दही,लोणी..सगळं उजव्या हाताने घालतात हो.” मनवाने मान हलवली. नंतर पमाताई मनवाच्या बांगड्या चाचपू लागली..

“ह्या आईकडच्या ना गं.”

“हिरव्या चुड्याच्या खालीवर घातलेल्या वेलीच्या बांगड्यांवर हात फिरवत मनवा ‘हो’ म्हणाली.

“अगं किती पातळैत. चार तोळ्याच्या खालीच वाटतात बाई आणि हे काय छोटं मंगळसूत्र नाही का घातलं तुला माहेरच्यांनी.”

पमाताईच्या अवाजवी चौकशीने मनवाचा चेहरा झर्रकन उतरला. तिला वाटलं, सासूबाई तिच्या बाजूने काहीतरी बोलतील पण त्या पलंगावर बसून पाय हलवत राहिल्या.

हळव्या मनाच्या मनवाचे भरलेले डोळे आदिला दिसले. आता मधे बोललो तर.. आला लगेच बायकोची बाजू घ्यायला..बाईलवेडा..असं पमाताई बोलेल म्हणून तो गप्पच राहिला.

रात्री शतपावली करायला म्हणून पप्पांनी त्याला बोलावलं व गुपचूप तीस हजार रुपये दिले.

“अहो पप्पा, हे इतके पैसे मला कशासाठी?”

“लहान मंगळसूत्र आण माझ्या सुनेसाठी. सुनबाईला आत्ताच सांगू नकोस. सरप्राइज दे तिला. बायकांना आवडतं नवऱ्याने न मागता सरप्राइज गीफ्ट दिलेलं..नेहमी काही महागडं दिलं पाहिजे असंही नाही. साध्याशा गजऱ्यानेही खूश होते रे बायको. अनुभवाचे बोल आहेत हे,लक्षात ठेव न् आचरणात आण बेटा.”

आदिने पप्पांना जादूची झप्पी दिली.

“आदि बेटा,कितीही मोठा झालास तरी बाप बापच असतो रे.” असं म्हणत त्यांनी आदिच्या पाठीवर थोपटलं.

मनवाला आदि व पप्पांतलं बोलणं ठाऊक नव्हतं. तिला फक्त पमाताईंचे ते प्रश्न आठवले नं परत तिचा चेहरा हिरमुसला झाला.

आदिच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवून घेत ती बळेच उठली नि न्हायला गेली. आज ती मधुचंद्राहून आल्यानंतर प्रथमच माहेरी जाणार होती.

आदिच्या पसंतीची गुलाबी ओरगंडी साडी ती नेसू लागली.

“अगं ड्रेसच घाल ना.”

“नको. पहिलंच माहेरी जातेय ना. मला साडीच नेसायची आहे. आज्जीला आवडेल मी साडी नेसून गेले तर.”

“बरं बाई..”

“बरं काय बरं..हेल्प मी.. हे मी फोल्ड करतेय ना त्याला निऱ्या म्हणतात. एकेक बोटांत धरत रहा.” आदि प्रामाणिकपणे ती सांगेल तसं करु लागला.

“हूँ, खोव आता आत.”

आदिने निऱ्या आत खोवून दिल्या न म्हणाला,”असं असेल नं मनु तर रोजच नेस तू साडी.”
“चल काहीतरीच तुझं असं म्हणत मान वेळावताना तिच्या ओलेत्या केसांचं पाणी आदिच्या गालांवर उडवलं.”

“उफ्फ ये अदा..घायल कर देगी हमें.”

“ए पुरे हं आदि. चल, लवकर पीनअप कर पदर नि तुझं आवरायला घे.”

“माझं काय..दोन तांब्ये अंगावर घेतले की झालं नि टीशर्टपँट चढवली की..है तय्यार.हम.”

“मुळीच नाही. छानपैकी दाढी कर गुळगुळीत. मग जा आंघोळीला. तोवर मी तुझ्यासाठी पिंक कलरचा शर्ट नि हां.. ग्रे कलरची पँट काढून ठेवते.”

“अगं इस्त्री कुठे केलीय तिला!”

“ते मी बघते. तू जा बरं आता.”मनु आदिला रुमबाहेर ढकलत म्हणाली.

आंबोळ्या न् कैरीची आंबटगोड चटणी..मस्त नाश्ता करुन लव्हबर्डची जोडी बाहेर पडली.

नेहमीच्या रुटऐवजी आदिने गाडी स्टेशनकडे वळवली तसं त्याच्या पाठीवर हलकेच थाप मारत मनु म्हणाली,”अरे आदि,सासरवाडचा रस्ता विसरलास वाटतं.”

आदिने नुसतीच मान हलवली. पेडणेकर अँड सन्सच्या पेढीसमोर त्याने गाडी उभी केली. मनुचा हात हातात गुंफून तो दुकानात प्रवेशला.

नेहमीचं गिर्हाइक असल्याने दुकानदाराने त्यांचं स्वागत केलं. आईवडलांच्या तब्येतीची विचारपूस केली. चांदीच्या सुरेखशा फुलपात्रातून गार पाणी आणून दिलं..चहा दिला.

मनु उगीचच भांबावली होती.

“हिच्यासाठी छोटं मंगळसूत्र दाखवा, काका” आदि बोलताच तिने विस्मयाने आदिकडे पाहिलं. आदिने डोळे मिटून तिला खात्री दिली..दोघांनी मिळून त्या नाजूक मंगळसुत्रांच्या डिझाइन्स पाहिल्या.

आवडेल ते मंगळसूत्र मनु गळ्याला लावून आरशात पहात होती..मग आदिकडे पहात होती..असं करता करता एक, दोन सोन्याचे मणी, चार काळे मणी असं आलटूनपालटून घडवलेलं मंगळसूत्र दोघांनाही आवडलं..त्यात दोन इवल्याशा वाट्या लावून घेतल्या.

मुहुर्तमण्याच्या सरापासून एक इंच खाली तिच्या गोऱ्यापान कांतीवर ते शोभून दिसत होतं.

मनवा खूप खूष झाली. आता तिच्या अण्णांनाही हा खर्च करावा लागणार नव्हता..याचंही समाधान तिला आतून जाणवलं.

आज्जीला चावता येत नाही म्हणून तिच्यासाठी भुसभुशीत सुतरफेणी,अण्णांसाठी मोतीचूराचे लाडू, आईसाठी कचोऱ्या शेजारच्या काकुंसाठी बाकरवडी..आदि मनुची ही खरेदी कौतुकाने बघत होता.

दोघं घरी पोहोचताच मनुच्या आईने त्यांच्यावरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला. पायावर पाणी घालून त्यांना आत घेतलं.

मनुला पाहून सगळी खूष झाली. सख्याशेजारणी येऊन ख्यालीखुशाली घेऊन गेल्या. मनुचे अण्णा, जावईबापूंच्या सरबराईत गुंतले.

आईने मनुला नजरेनेच न्याहाळलं. सासरी खूष आहेस नं..नजरेनेच विचारलं..मनुनेही डोळ्याच्या पापण्या मिटून आईला खात्री दिली..मनीमाऊला कुशीत घेऊन कुरवाळू लागली. मनीही मनवाला अधिकच बिलगली.

टेरेसमधे जाऊन तिने तिच्या गुलाबाच्या रोपाला,बटशेवंतीच्या रोपांना न्याहाळलं. गुलाबाला लालचुटुक कळी आली होती..न्..बटशेवंतीच्या इटुकल्या पिवळ्या फुलांचा ताटवा सजला होता.

नंतर अण्णांच्या,आईच्या,आज्जीच्या..औषधंगोळ्या तपासल्या. कोणतं औषध संपलय..आणायला हवं..ते डायरीत लिहून ठेवलं.

मनुने आज्जीला सुतरफेणीचा घास भरवला.
“मने,माझी आवड लक्षात ठेवलीस बरं. ” आज्जी तिचे सुरकतलेले हात मनवाच्या गालांवर फिरवत म्हणाली.

“अगो बाई, किती छान लहानसं मंगळसूत्र गं.” आज्जी असं म्हणताच आईनेही निरखून पाहिलं व हाताच्या बोटांचा मोर नाचवत तिची पसंती दर्शवली.

मनुचे अण्णा मात्र संकोचले.”जावईबापू, हे मी पाडव्याला करणारच होतो. तुम्ही उगाच कशाला..”

“अण्णा, ते जावईबापू वगैरे नको हो. मनवाला मनु म्हणता तसं हक्काने आदि म्हणा मला..आणि हे छोटं मंगळसूत्र वगैरे आता अलिकडच्या काळात सेफ्टीसाठी बाजारात आलं. मुल़ीच्या वडिलांवर अधिकचा भार म्हणून नाही काही.”

आदिचं हे स्नेहाद्र बोलणं ऐकून अण्णांचे डोळे पाणावले. खेळीमेळीत जेवणं उरकली. मनु तर लहान मुलीसारखी अण्णांकडे भरवा म्हणून हट्ट करु लागली. अण्णाही तिला भरवू लागले. आदिला सासरवाडचं हे वातावरण खूपच भावलं. मनुतला अल्लडपणा पाहून तो मनोमन सुखावला.

घरी येताना त्याने आईसाठी व मनुसाठी अबोलीचे गजरे घेतले. रात्री शतपावली करताना तो वडलांना म्हणाला,”आईला विचारुनच दिलात नं पैसे?”

“असं का विचारतोयस? अरे वेड्या, काल पमाताई बोलली ते आईलाही आवडलं नाही पण पमाताईची सवय ठाऊकै ना तुला. तिला टोकलं असतं तर तिला बरं नसतं वाटलं. नंतर तुझ्या आईने समजावलं तिला पण मला स्वत:च्या हाताने पैसे काढून दिले न् आदिला मनुसाठी सोनं खरेदी करायला सांगा, म्हणाली.”

दारावर उभ्या असलेल्या आपल्या आईकडे आदि बघत राहिला.

समाप्त

–गीता गरुड.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *