Ritbhatmarathi

Search
Close this search box.

चिमीचा गंपतीबाप्पा

©® गीता गजानन गरुड.

आमची चिमी,म्हणजे चिन्मयी राणे.यावर्षी कधी नव्हे ती शाळेने जास्त सुट्टी दिली..तसंच मध्ये सार्वजनिक सुट्टया आल्याने चांगलं विसर्जनापर्यंत बाप्पासोबत रहायला मिळणार होतं.

चिमीने गणपती बाप्पाची भिंत रंगवायला काकाला मदत केली.पताका लावताना मदत केली.इवलूशी झाडू घेऊन पडवीतला केर काढायची.बाप्पासाठी रोज परसवातील दुर्वा काढून आणायची,दादासोबत जास्वंदीची फुलं काढायची.ताईसोबत शेतात फिरायला जायची.तिथल्या ओहोळात पाय टाकून बसायची.मग छोटे छोटे मासे पायाला चावायला येत,तिला गुदगुल्या केल्यासारखं वाटे.
रोज संध्याकाळी ताई,काकूसोबत फुगड्या घितल्या..झिम्मा खेळली..

त्यांची गायपण व्याली.छान पाडी झाली.तिचं चंद्री असं नाव चिमीनेच ठेवलं.भरपूर खरवस खाल्ला.
या घरातून त्या घरात,मग विहिरीकडे..चिमी अगदी दमून जायची..कोण आलंगेलं की त्यांना प्रसाद द्यायची.बाप्पासमोर टाळ वाजवून सगळ्यांबरोबर आरती म्हणायची व सगळे काका,काकू,दादा,ताई,.तिचे भरपूर लाड करायचे.

एकूणच चिमीला गावचा गंपतीबाप्पा भावला होता.पण.आदल्यादिवशी तिला सरुने सांगितलं की उद्या गंपतीबाप्पा जाणार मग तुम्ही परवा मुंबईला जाणार..

चिमीने एवढसं तोंड केलं व हे भोकाड पसरलं..तिथून घरी आली..सगळे विचारु लागले..अगं चिमी काय झालं??कुठे लागलं का??कोणी मारलं का??तुला चोकलेट देतो..चिमी ढिम्म..सरळ बाप्पाकडे गेली व रडतरडत म्हणाली,” मी माझ्या बाप्पाला हात लावूच देनाल नाय.माज्या बाप्पाला पान्यात नाय ताकायचं.तेला सल्दी होईल मग ताप येईल.डाक्तलकाका तेला इंजिक्शन देतील.माज्या बाप्पाला पान्यात विसलजित नाय कलायचं.”

आत्ता झाला प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला.सगळेच भावूक झाले.आत्याने चिमीला जवळ घेतलं,तिचे डोळे पुसले.मग तिला समजावलं..”चिमे,तुझे आईबाबा,दादा आहेत नं..तसेच आपल्या बाप्पाचे आईबाबा,दादा आहेत.

शंकरबाप्पा त्याचे वडील तर पार्वती त्याची आई व कार्तिकेय दादा.बाप्पा आपल्या आईबांची परवानगी घेऊन थोडे दिवस इथे आपल्याकडे रहायला येतो.त्याची आईपण आपल्या भरवशावर त्याला पाठवते.तिथे स्वर्गात बाप्पाला असे मोदक,करंज्या खायला मिळत नाहीत..अशी लहान मुलं खेळायला मिळत नाहीत..इथे तो सगळं अनुभवतो..

पण त्यालापण त्याची शाळा आहे..त्याची कामं आसतात..शिवाय कार्तिकेय दादा तिथे एकटा कंटाळला असणार..आत्ता त्याच्या आईला..बाबांनाही त्याची आठवण येत असणार..तु कशी ग दोन दिवस माझ्याकडे रहायला आलीस की आई पायजे म्हणून रडतेस..तसंच बाप्पालापण त्याच्या आईची आठवण येत असणार..

म्हणून उद्या आपण त्याला भरपूर जेवू घालायचं..अन् त्याला पाण्यात विसर्जित करायचं..मग तो त्याच्या घरी जाईल..त्याच्या आईबाबांकडे..आईला इथल्या चिमीच्या,पिंकीच्या,गुड्डूच्या गंमतीजमती सांगेल..कार्तिकेयदादासोबत खेळेल..शाळेत जाईल तुझ्यासारखा..मग पुढच्यावर्षी परत त्याची आई त्याला आपल्याकडे पाठवेल.आपण त्याचं असच स्वागत करायचं..आपण त्याला पोटभर मोदक खाऊ घालायचे..
आत्ता कुठे चिमीची कळी खुलली व चिमी झोपी गेली.

सकाळी उठून तिने लवकर न्हाऊमाखू केलं..दुर्वा काढून आणल्या..बाप्पाची पूजा केली..आजीबरोबर बाप्पासाठी करत असलेल्या स्वैंपाकात लुडबूड केली..आरती म्हंटली व बाप्पाच्या विसर्जनासाठी नटूनथटून तयार झाली..
गंपतीबाप्पा मोलया..पुलच्या वलषी लवतर या..
एक दोन तीन चार गंपतीचा जयजयकाल असं दादासोबत म्हणू लागली.

===============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *