Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौ.गीता गजानन गरुड

पाच मिनिटं तरी राघव व जानकी त्या अवघड अवस्थेत लॉकेटमधून बट सोडवण्याच्या प्रयत्नात होती.  जानकीची बट त्या खेचाखेचीत दुखावली..हलकासा राग तिच्या चेहऱ्यावर उमटला. राघवनेच शेवटी अलगद एकेक केस सोडवला नि कशीबशी एकदा जानकीची  सुटका झाली तशी ती खोलीवर पळाली. राघवने ती फुलं वेचून टेबलवर ठेवली,तितक्यात मावशी बाहेर आली.

“अगं बाई,जुईची फुलं..जानकी येऊन गेली का! किती मागे लागलेली पोर मला गजरा शिकव म्हणून. पावसाने पार झोडपून गेली होती वेल. आता कुठे बहरतेय.”

“अगं पण मावशी कोण ही जानकी? आणि तिचं आपल्याकडे काय काम?”

राघव बाहेरुन कितीही  मग्रुर वाटत असला तरी आतून तो फार हळवा होता. त्याने निलूच्या फोटोला फुलं वाहिली व मनोमन तिची माफी मागितली. ऑफिसच्या कामात त्याने डोकं खुपसलं. दुपार कधी झाली त्याला कळलंच नाही.

“राघव, अरे न्हाऊन तरी घे. ऑफीसला गेला नाहीस म्हणून न्हायचं नाही असं थोडंच आहे!” मायामावशीने त्याच्या हातात टॉवेल ठेवलं.

राघवला, आज न्हाताना  कितीतरी वर्षांनी निलूच्या गंधित स्पर्शाची आठवण झाली. त्याचं मन अगदी सैरभैर झालं.

हे असं जानकीच्या अकस्मात धडकेमुळे झालं..तिचे केस लॉकेटमधे गुंतल्याने, तिच्या अधिक जवळ येण्याने,तिच्या ह्रदयाच्या वाढलेल्या स्पंदनांनी,  नकळत झालेल्या तिच्या गालांच्या स्पर्शाने.. आपल्या चित्तव्रुत्ती बहकल्या.. हे राघवला जाणवत होतं.

चुलीतल्या राखेखाली एखादा निखारा धुमसत असावा नि नेमके त्यावर फुंकणीने फुंकरताच राख उडावी, त्या निखाऱ्यातलं रसरशीत लालबुंदपण पुनश्च प्रज्वलित होऊ उठावं तसं काहीसं बऱ्याच वर्षांनी राघवच्या बाबतीत होत होतं.

वास्तविक निलू गेल्यानंतर इतरही बऱ्याच मुलींशी त्याचं बोलणंचालणं व्हायचं,कामाच्या निमित्ताने पण हे असं मनातला डोह उसळवणारं, काहीतरी आत खोलवर झाकून ठेवलेलं उसवू पहाणारं प्रथमच घडत होतं,त्याच्याबाबतीत.

राघव मनात येणारे हळवे विचार निश्चयाने मागे लोटत होता. त्याला त्याच्या निलांबरीशी एकनिष्ठ रहायचं होतं.

निलूच्या आठवणीत उर्वरित आयुष्य जगायचं, ठरवलेलं त्याने.

चिनूने शाळेतून आल्यावर राघवला “येss बाबा आले,” म्हणत मिठी मारली. राघवने चिनुच्या विस्कटलेल्या काळ्याभोर केसांतून हाताची बोटं फिरवली.

मनात म्हणाला..अगदी आईचं रुपडं घेऊन आलायस, आणि हे मऊशार केसही अगदी तिच्या केसांसारखेच..रेशमाची लड उलगडावी तसे अंबाड्याला हात घातला की केस निलूच्या पाठीवर घरंगळायचे.

परत ती बट..जानकीची..तिच्या केसांचा तसाच तलम स्पर्श..राघवने एखादा डास कानाजवळ घोंगवावा न् त्याला मानेने उडवावं तसा तो वेडाविद्रा विचार महत्प्रयासाने उडवला.

मावशीने आज चिनूसाठी त्याच्या आवडीची पुरी न् बटाट्याची भाजी केली होती नि राघवसाठी सांजोऱ्या..जोडीला लिंबाचं गोडं लोणचं.

दोघांची जेवणं आवरल्यावर  दोघे बापलेक रजई अंगावर ओढून गप्पा मारत बसले.

राघवने चिनूला प्रवासातल्या गमतीजमती सांगितल्या.  चिनूला बाबांनी आणलेल्या गाड्या खूप आवडल्या.

राघवच्या लक्षात येत होतं,नेहमी चिडचिड करणारा चिनू बदललाय..त्याचा स्वभाव काहीसा म्रुदु झालाय. त्याने चिनूला विचारलं,”चिनू,तुला ट्युशनला जायचं असेल नं?”

बाबाच्या कुशीत अधिकच शिरत चिनू म्हणाला,”नाही बाबा, जानकी आंटीने माझा अभ्यास आधीच घेऊन ठेवलाय.
फक्त होमवर्क केला की झालं. आता माझ्या कविता पाठ झाल्यात. माझी गणितही चुकत नाहीत.
जानकी आंटी खूपच छान शिकवते. हातावर छडीदेखील मारत नाही. आपल्याच गेस्ट हाऊसमधे रहाते ती.

कधीकधी मी लाडात आलो तर मला भरवतेसुद्धा. तुम्हाला माहितीय..तिला खूप साऱ्या गोष्टी येतात. रोज नवीन गोष्ट..तिच्या गोष्टींत राक्षस असतो, मोठं गलबत, उधाणलेला समुद्र,उड्या मारणारा डॉल्फीन, वाळू,शंखशिंपले, राजवाडा,राजाराणी, राक्षस..बर्रच काही शिवाय  तिला गाणीही गाता येतात..खूप सारे बैठे खेळ येतात.

खूप खूप मज्जा आणि बाबा, माहितीय.. जानकी आंटीला आता बाळ होणारै..माझी वार्षिक परीक्षा संपली की होईल बहुतेक,मग मी आणि बाळ खूप खेळणार. मी माझ्या मित्रांना दाखवणार..ते मला चिडवतात न् तू एकटा एकटा आता मी एकटा नसणार माझंसुद्धा भावंड येणार.”

मोठाले डोळे करुन.. हातवारे करुन चिनू बाबाला हे सारं सांगत होता..बाकीचं ठीक पण भावंड येणार म्हणताच राघवचा चेहरा सर्रकन उतरला. म्हणजे ती जानकी प्रेग्नंट आहे..कोणाची पत्नी कोणास ठाऊक..तिला घरात घेतलीच का? लोक काय म्हणतील..का माझ्याकडे बोट दाखवतील..पुन्हा असंख्य प्रश्नांचं मोहोळ राघवच्या मेंदूत उठलं.

राघव वत्सलाबाईंच्या येण्याची वाट पहात बसला.

इकडे जानकीने दिलेल्या जबानीनुसार आरोपी पतीपत्नी यांना पकडण्यात पोलीसांना यश आलं होतं.

कोर्टाच्या ऑर्डरनुसार जानकीला ओळखपरेडसाठी पोलीसस्टेशनमधे बोलावलं आहे असा निरोप वत्सलाबाईंना पोलीसांमार्फत पाठवण्यात आला.

ड्रायव्हर तांबेकाकांना पाठवून वत्सलाबाईंनी जानकीला बोलावून घेतलं. त्या जानकीला पोलीस स्टेशनमधे घेऊन गेल्या.

आधी तो नराधम सफशेल खोटं बोलत होता पण पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवताच व जानकीला समोर पहाताच, तो पोपटासारखा बोलू लागला..हातापाया पडू लागला. त्याच्या बायकोलाही महिला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला.

ओळख परेडच्यावेळी कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमक्ष आरोपींना जानकीने ओळखले. पंच म्हणून वत्सलाबाई व तांबेकाका यांनी ओळखपरेडच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. जानकी व वत्सलाबाईंना कार्यकारी दंडाधिकारी यांनी जाण्यास सांगितलं.

जानकीला आता फार हायसं वाटत होतं. तिला लग्नाचं आमिष देऊन फसवणाऱ्या त्या जोडप्याला शिक्षा होणार होती. गाडी घराकडे पोहोचताच वत्सलाबाई जानकीला म्हणाल्या..जानकी, चल घरीच..जेवण झाल्यावर जा गेस्ट हाऊसकडे पण ती म्हणाली..दिवाबत्ती करुन, फ्रेश होऊन आलीच न् गेलीसुद्धा..

अवखळ पोर आहे अगदी..जानकीबाई मनाशी म्हणाल्या. चिनूला मैदानात साद घालायला गेल्या. येतो येतो करत अर्ध्या तासाने चिनू आला. त्याला मायामावशी हातपाय धुवायला आत घेऊन गेली.

वत्सलाबाई येताच राघव वत्सलाबाई़समोर जाऊन बसला.
“राघव,तू फार छान काम केलंस. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. तुझ्यावर ठेवलेला विश्वास तू सार्थ करुन दाखवलास.”

“आई,बिजनेस..बिजनेस..बिजनेस..बाकी काही सुचतं का तुला!”

“काय झालं एवढं चिडण्यासारखं?”

“वत्सलाबाईं,तुमच्यावर चिडलोय मी. कोणती गरोदर बाई घरात आणून ठेवलीय तुम्ही? उद्या लोकं तोंडात शेण घालतील आपल्या..कोणाचं पाप वहातेय कोण जाणे आणि ..आणि चिनू म्हणतो माझं भावंड येणारै. हे काय आहे वत्सलाबाई?”

तो असं विचारायला नि जानकी घरात शिरायला एकच गाठ पडली. राघवचा शब्द न् शब्द तिचं काळीज चिरुन गेला. ती धावत गेस्टरुमकडे गेली.

उशीत डोकं खुपसून ती बराचवेळ हुंदके देत राहिली..तिने आरशात पाहिलं..आरशातली छबी तिला विचारत होती..’जानकी..जानकी..काय पण नावाला जागलीस..कुठे ती रघुरायाची पतीव्रता भार्या..अग्नीपरीक्षा देणारी सीतामाई आणि कुठे तू लग्नाआधीच विवाहीत पुरुषाशी स्वसंमतीने शरीरसंबंध ठेवणारी चवचाल स्त्री. काही चुकीचं बोलत नाहीएत राघव.

किती चांगलं,नावाजलेलं घराणं आहे त्यांचं..त्यावर तुझी अभद्र छाया पडू देऊ नकोस..तुझ्यामुळे भांडणं,कलह होऊ देऊ नकोस मायलेकरांत.’

तिने डोळे पुसत काही कपडे पिशवीत भरले..आणि निघाली..वाट फुटेल तिकडे.

सोबत वत्सलाबाईंनी चिनूची शिकवणी म्हणून जबरदस्तीने हातात ठेवलेले पैसे होते.

बसस्टॉपवर उभी राहिली पण अशी तिन्हीसांजेला एखादी बाई एखाद्या राबता नसलेल्या ठिकाणी उभी राहिली की वसवसलेल्या नजरा रोखून बघू लागतात. एकदोन रोडरोमियो तिला पाहून शिट्टी मारू लागले.

तिला अंगविक्षेप करून दाखवू लागले तशी तिला कापरी भरली. ती भरभर चालत सुटली. थरणी दुभंगावी नि सीतामाईसारखंच आपल्याला सामावून घ्यावं
असं तिला वाटलं.

तिनं अंगभर ओढणी ओढून घेतली. केसांच्या बटा तोंडावर येत होत्या. ती फार वेगात पावलं टाकत होती..जणू धावतच होती. पाठीमागून ती दोन जनावरं चित्रविचित्र हसत तिच्या दिशेने येत होती. ओय छमिया,ओय मेरी बुलबुल..मधुनच हाळी देत होती.

बंगल्यामागचा तो रस्ता तसा निर्मनुष्यच असायचा म्हणून त्या पाशवी व्रुत्तीचं फावलं होतं. एक तर अगदी जवळ आला. त्याने तिच्या ओढणीला हात घातला व तिला जवळ ओढली. दुसऱ्याने तिला कमरेकडून वेढा घातला.

“कहाँ भागती है जानेमन? इतनी भी क्या है मजबुरी? चल तुझे आज फाय स्टारकी सैर कराते है।” त्यांचं दात विचकत बोलणं चाललं होतं. नजरेतून हवस टपकत होती.

जानकीला एकदम शिसारी आली. ती त्यांच्याकडे दया याचना करणार पण तिच्या तोंडातून शब्दच फुटेनात. घसा अगदी कोरडा पडला.

एक दारूच्या बाटलीचं बुच उघडून तिच्या तोंडाला लावू लागला..तितक्यात. साटकन लाथ बसली त्याच्या पेकाटात.

तो बाटलीसकट खाली कलंडला. दुसरा मारायला धावणार इतक्यात त्याच्या दोन ढेंगांमधे प्रहार झाला. तो कळवळत खाली पडला..कोण होते हे देवदूत..समाज ज्यांना बहिष्कृताची वागणूक देतो ते हिजडे,शबनम आणि लैला.

त्यांनी जानकीला वासनांधांच्या जाळ्यातून सोडवलं. टाळ्या वाजवत त्यांना विचारु लागल्या,”तुम्हारे घर में माँबहेन नहीं है क्या? यहीच काम करनेकू पैदा किया क्या तुम लोग को..तुम्हारेसे हम भले..जाओ भागो यहाँ से।”

“ए लडकी डर मत. कहाँ है घर तेरा? चल तेरे साथ आते है, तुझे छोडने।” लैला असं म्हणताच जानकी स्फुंदू लागली. जानकीला घरदार नाही, तिचं या जगात कोणी नाही हे ऐकून त्यांचं मन द्रवलं.

जानकीला ते आपल्या वस्तीत घेऊन गेले. त्यांची अम्मा भाकऱ्या बडवत होती. धिप्पाड देहाची,केसाचा मधोभध भांग,कपाळावर मोठी टिकली,भडक साडीतली अम्मा पाहून जानकीची धडधड अजून वाढली.

जानकीला पाहून काही हिजडे चवताळले,” हाय दैया,क्यों ये आफत लेके आई?”

“अरे, वो गली के कुत्तेकमीने साले टुट पडे न इसके ऊपर.”

“तो क्या हुआ? कौनसा पहाड टूट पडा? ये खुदकी रक्षा खुद नहीं कर सकती क्या? खाली बडी बडी बातें करते है ये बडे लोग. इनके सोसायटी में गये तो भिकारी के माफीक भगा देते है हम लोग को।” चमेली वेणी हलवीत बोलली.

क्रमश:

जानकीला आश्रय मिळेल का अम्माकडे? तिचं पुढे काय होणार..चिनू शोधेल का जानकी आंटीला..
पाहू पुढील भागांत. प्रतिक्रिया द्या.

–सौ.गीता गजानन गरुड.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *