Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ गीता गजानन गरुड.

वत्सलाबाईंनी मायाच्या खांद्यावर हात ठेवला.

——————

“माया तूच तर आहेस माझी अशी हक्काची. सासरचं कोणीच उरलं नाही मला. नवराही गेला. मी जोमाने उभी राहिले, आजवर इतकी पारितोषिकं मिळवली ती तुझ्याच जीवावर ना. तू आहेस म्हणून तर कंपनीला वाहून घेता आलं मला.

देवकी नाही होता आलं तुला पण यशोदामैया झालीस माझ्या राघवची. माया,खरं सांगू–,राघव तुझ्या मागे मागे करतो तेंव्हा मलाही वाटतं..असंच त्याने माझ्यामागे लागावं..मला बरं नसलं की बेचैन व्हावं पण मग क्षणात मी भानावर येते.

माया,मी एकट्या राघवाची आई नाही गं. उल्हासराव जाताना कंपनीतल्या साऱ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी टाकून गेलेत माझ्यावर. त्यांचे संसार सावरलेत या हातांनी,त्यांच्या मुलाबाळांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलंय. मला सार्थ अभिमान आहे माझ्या कामाचा. स्वत:चं कौतुक करणं चुकीचं नसतं ना गं!”

“मुळीच नाही बाईसाहेब. मुळीच चुकीचं नसतं. वेळोवेळी स्वत:ची पाठ स्वतःला थोपटता आली पाहिजे. स्वतःवर स्वत:चा अंकुश असावा. स्वतःशीच मैत्री करावी..स्वतःला आंजारावं, गोंजारावं.”

“किती सुंदर बोलतेस गं  माया तू..अगदी संयत.”

“आमच्या संतबाईंनी शिकवलं हे सारं. त्या म्हणायच्या असं. स्वतःला सुधारण्यासाठी इतरांची वाट पाहू नये. कोणी निंदानालस्ती केली म्हणून खट्टू होऊ नये,कोणी अतिस्तुती केली तर हुरळून जाऊ नये असं बरंच काही..आतपर्यंत पाझरत जायचं त्यांचं शिकवणं.”

“बरं,माया तुला सांगायचं राहूनच गेलं. विकासदादा परवा येऊन गेला ऑफिसात.”

“सहजच?”

“कामाशिवाय येतो का तो? एकुलती एक बहीण..अकाली विधवा झाली..तेव्हा पाठीशी उभा रहाता तर.. पाहुण्यासारखा येऊन गेला. माईअण्णाही त्याच्याच बाजूने. लेकीला आधार द्यावंस त्यांना वाटलं नाही. सून किती का बोलेना सुनेचं घर ते त्यांचं नि लेकीचं,जावयाचं घर ते परक्याचं..असो..तो मात्र त्यावेळी पाठीशी उभा रहाता तर आज मी कंपनीत हिस्सेदारही केला असता त्याला..अजाणतेपणी काही प्रमाद घडले माझ्या हातून ते घडलेही नसते कदाचित. आपल्या माणसांचं पाठबळ मोलाचं असतं, माया.”

“आता काय म्हणणं आहे त्यांचं?”

“काय म्हणणार..वसु तुझी एवढी मालमत्ता आहे तर तुला माहेरच्या इस्टेटीचा मोह नको. ती माझ्या नावावर करण्यासाठी हक्कसोड पत्रावर सही कर म्हणत होता.”

“केलीत सही?”

“केली मी. माया, मला मायेचा आधार हवा होता माहेराकडून तोच जर मिळाला नाही तर मीच करंटी म्हणायचे. माझ्या नशिबातच नव्हतं लाड करुन घेणं. मी दिली सही त्याला तसा खूष झाला अगदी. आस्थेने चिन्मयची,राघवची विचारपूस करुन गेला.”

“बरं केलंत. कुणाचा आकस नको मागे. तुम्हाला काय कमी आहे! स्वतःच्या हिकमतीवर एवढा डामडौल उभा केलात. मी आपलं माझंच घोडं दामटतेय मघापासून. त्या मुलीचं काय झालं सांगा ना बाईसाहेब. आली का ती शुद्धीवर?”

“नाही गं . तिच्या नातेवाईकांचाही पत्ता लागला नाही अजून.”

“म्हणजे शुद्धीवर आली की महिलाश्रमात धाडतील तिला?”

“हो गं. काय भूतकाळ असेल तिचा काही कळत नाही बघ. बरं चिनूचं काय? त्रास नाही नं दिलान दुपारी.”

“हो तर. बाबा लवकर आला ना त्याचा. शाळेत म्हणे मम्मीपप्पांना घेऊन जायचय तर नवीन मम्मी आण म्हणून मागे लागलेला बाबाच्या. बाबाचं तर पाऊस म्हंटल्यावर डोकं चढलं होतं त्यात याचं तुणतुणं. कसंतरी समजावत ट्युशनला नेऊन बसवलं. तिथून कराटे क्लास करुन येईल स्वारी.”

“चिनूचं तरी काय चुकतय गं बिचाऱ्याचं! तू,मी आहोतच गं लाड पुरवायला पण त्यालाही वाटत असेलना आई हवी असं. तरी त्यादिवशी, कारखानीस चिनूला काही सांगू नका..दूर कोणाकडे तरी पाठवा सांगत होते..पण मी नाही ऐकलं त्यांचं. म्हंटलं, एका खोट्याला शंभर खोटी बोलावी लागतील उद्या. काय ते डोळ्यासमोर घडू दे त्याच्या. त्याच्या मनाने तिचं जाणं स्वीकारु देत.”

“हो बाईसाहेब, तुम्ही त्याही परिस्थितीत अगदी योग्य निर्णय घेतलात. चिनूने म्हणूनच तर आईचं जाणं स्वीकारलं तरी एक खेळणं तुटलं की बाबा दुसरं आणून देतो तसं  बाबाने नवीन आई आणून द्यावी असं वाटतय चिनूला.”

“मला सांग,कमी का प्रयत्न केले आपण. थत्ते गुरुजींनी अगदी वीशीपंचवीसीच्या पहिलेपणाच्या मुलींची स्थळं आणली पण हा ऐकायलाच तयार नाही.”

“अगं बाई,चिनू आला वाटतं!” मावशी दार उघडायला गेली.

“चिनू,अरे किती हे डाग कुठे लोळूनबिळून आलास की काय!”

“हो. त्या निखिलशी फायटींग केली आज.” चिनू कपडे झाडत म्हणाला.

“चिनू,कुणाला मारायचं नाही सांगितलंय न् तुला. कुणाची मम्मी भांडायला आली तर मी तुझी बाजू घेणार नाही आधीच सांगते.”वत्सलाबाई दटावणीच्या सुरात म्हणाल्या.

“माझी मावशीआज्जी घेईल नं माझी बाजू.” चिनूच्या बुटांची लेस सोडवणाऱ्या मावशीआजीच्या गळ्यात हात टाकत चिनू म्हणाला.

“नाही हं चिनू. मस्ती केलीस तर मीही तुझी बाजू घेणार नाही.”

“अगं पण माझं ऐका तरी. तो निखिल मला एकलकोंडा म्हणाला. म्हणाला त्याला दोन बहिणीएत. परागला भाऊ आहे. स्वातीला भाऊ आहे नि म्हणे मीच एकलकोंडा.मग सगळीच मला एकटा एकटा करुन चिडवायला लागली. मग राग नै का येणार.”

“नको रागावूस रे बाळा. बाबाने मोठी केडबरी आणलेय तुझ्यासाठी. हातपाय धू स्वच्छ मग देते तुला.” मावी समजावणीच्या सुरात म्हणाली.

” काही नको मला ती. मला एक सिबलिंग पाहिजे.”

“कसलं लिंग?”मावशीआजीने विचारलं.

“अगं,भावंड पायजेल म्हणतोय तो. तूपण काय गं. एकापेक्षा एक नमुने आहेत या घरात.” वत्सलाबाई म़ाडीवर हात फिरवत स्वतःशीच पुटपुटल्या.

रात्री जेवणासाठी सगळी डायनिंग टेबलजवळ जमा झाली. चिनूने सुरु केलं..”बाबा,आणायची नं नवीन आई आणि एक सिबलिंग.. मग मी बर्थडेला काहीच नै गीफ्ट मागणार. प्रॉमिस.” चिनू गळ्याला हात  लावत म्हणाला.

“चिनू बाळा आई आणणं म्हणजे बाजारातनं भाजी आणण्याएवढं सोप्पं नाही. वेळ लागतो त्याला.” मावशी म्हणाली.

“अगं पण मी देतोय नं वेळ..एक पुरा मंथ घ्या की पण मला नवीन आई पाहिजे म्हणजे..”

राघवने जोरात मुठ टेबलवर आपटली. त्याच्या डोळ्यातल्या रागाकडे पाहून चिनू घाबरला व निमुट जेवू लागला. राघवने एका पोळीतच जेवण आवरलं व आपल्या खोलीत निघून गेला.

वत्सलाबाई उद्विग्न अवस्धेत विचार करत राहिल्या.

“माया, मीही जाऊन पडते आता. पैशाने सगळी सुखं विकत घेता येतात..निव्वळ भ्रम होता माझा. चिक्कार पैसा आहे माझ्याकडे पण लेकाला सुख नाही माझ्या..” भरुन आलेल्या डोळ्यातलं पाणी निपटीत त्या निजायला गेल्या.

सकाळीच डॉक्टरसाहेबांचा फोन आला, पेशंटला शुद्ध आली असल्याचा. तांबेंना गाडी काढायला सांगितली न् सकाळचा चहाही न घेता वत्सलाबाई घाईघाईत त्या पेशंटला भेटायला निघाल्या.

पेशंटच्या रुममधे जाण्याआधी,वत्सलाबाई डॉक्टरांना भेटल्या.
“वत्सलाबाई, या. पेशंट पहाटे चारला शुद्धीवर आली. नाऊ शी इज आऊट ऑफ डेंजर. असे पेशंट कोमात गेले तर काही खरं नसतं..पण तो वरचा आहे..नक्कीच आहे..प्रचिती देतो आम्हा डॉक्टरांना. शुद्धीवर आली तेव्हाच तुम्हाला कळवावंसं वाटत होतं पण म्हंटलं सकाळ तरी होऊदेत.”

“अभिनंदन डॉक्टर.”

“अभिनंदन तुमचंही वत्सलाबाई. कोण कुठली मुलगी पण तुम्ही मागचापुढचा काहीही विचार न करता तिला इस्पितळात घेऊन आलात,आर्थिक मदत सढळहस्ते केलीत शिवाय पोलीसांनाही सहकार्य केलंत.”

“डॉक्टर, एक सुजाण नागरिक म्हणून माझं कर्तव्यच होतं ते आणि पैशाच्या मदतीचं म्हणाल तर तो वर बसलाय ना तो मी मुठीने दिलं तर मला ओंजळीने देतो.”

“खरंय तुमचं वत्सलाबाई. एक सांगायचं राहूनच गेलं. पेशंट इज प्रेग्नंट. दीड महिन्याचं बाळ आहे तिच्या उदरात.”

“डॉक्टर, तुम्हाला काही बोलली ती..तिच्याबद्दल..रहाते कुठे,नावगाव,वगैरे.”

“नाही,रडणंच थांबत नव्हतं तिचं.”

“डॉक्टर, मी घरी न्हेईन त्या मुलीला. माझ्याकडे ठेवेन बरी होईस्तोवर. मनाने सावरायला थोडि अवधी लागेलच तिला..मग तिला हवं तर माझ्या घरी राहिल किंवा एका महिलाश्रमाशी कनेक्टेड आहे मी. तिथे तिची सोय करेन.”

“नि:शब्द केलंत वत्सलाबाई तुम्ही. तुमच्यासारखी माणसं आहेत या दुनियेत म्हणून हे जग चाललय.”

डॉक्टरांचा निरोप घेऊन वत्सलाबाई त्या मुलीजवळ जाऊन बसल्या. लांबसडक केस न विंचरल्याने गुंतावले होते. गालावर अश्रु सुकले होते.
वत्सलाबाईंनी तिच्या कपाळावर हात ठेवत विचारलं,”बरं वाटतय न आता.”

“तुम्हीच वाचवलंत न् मला. का वाचवलंत?”

“सगळ्याच कां ना उत्तर नसतं पोरी. वरच्याने मला बुद्धी दिली म्हणायचं..मी एक निमित्त. करताकरविता तोच.”

वत्सलाबाईंचं बोलणं ऐकून ती विषण्ण हसली.”वरचा!”माझं नशीब रेखताना निजला असावा.”

“तुझं नाव काय मुली?”

“जानकी”

“अरे वा. छान नाव ठेवलंय तुझ्या आईवडिलांनी.”

ती क्षीण हसली.

“बरं, तुझ्या घरचा पत्ता सांग. आम्ही स्वतः तुला घरी सोडायला येतो.” वत्सलाबाई म्हणाल्या.

“घर..घर ..कुठचं घर..ना सासर ना माहेर..दुर्दैवी आहे मी. माझी सोय एखाद्या महिलाश्रमात करा. उपकार होतील तुमचे.”

“वत्सलाबाई म्हणतात मला. तू आजपासुन माझ्या घरी रहायचंस. मी तुझे घरचे येईस्तोवर तुला सांभाळणार आहे.”

“मग तर आधीच सांगते बाई..मला शोधायला,न्यायला कुणी येणार नाहीत. उगीच मी भार बनेन तुमच्या घरात.”

“ते आम्ही बघू. तू यापुढे फक्त आनंदी रहायचं..अगं आई बनणार आहेस तू.” वत्सलाबाई असं म्हणताच जानकीच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली.”

हॉस्पिटलची फीज भरुन त्यांनी जानकीला गाडीत बसवलं. मावशीलाही जानकीस घेऊन येतोय अशी वर्दी दिली.

–क्रमशः
जानकी रुळेल का वत्सलाबाईंच्या घरात..का तिचे नातेवाईक घेऊन जातील तिला?.. का अजून काही..बघू पुढील भागात.

©️®️ गीता गजानन गरुड