Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौ.गीता गजानन गरुड

“जानकी बिटिया..अरे है ना..रसोई पका रही है। वह आयी है तबसे कुछ न् कुछ काम करती रहेती है।”

“हम उसे लेने आये है अम्मा।” वत्सलाबाई म्हणाल्या.

—————

“अच्छा,तो आपही के घरसे वो बेइज्जत होके निकली थी।  गली से जा रही थी तो कुछ लौंडे उसपर जबरदस्ती करने लगे।

हमारी शबनम और छम्मो ने उन गुंडो से दो हात कर जानकी को बचाया। आज पुरनपोली बना रही है हमारे लिए। जानकी जरा बाहर आ तो।”

जानकी बाहेर आली. समोर वत्सलाबाई व राघवला बघून ती थक्क झाली.

वत्सलाबाई काही बोलणार इतक्यात राघव म्हणाला,”जानकी,आय एम रिअली सॉरी. मी खरंच माफी मागतो तुझी..त्यादिवशी मी तसं बोलायला नको होतं..रागाच्या भरात निघून गेले अपशब्द माझ्या तोंडून..परत नाही असं व्हायचं, माझ्याकडून..पण प्लीज तू घरी चल..चिनूसाठी..चिनूने ताप घेतलाय तू गेल्यापासून.  सतत तुझं नाव घेतोय.”

जानकीने अम्माकडे पाहिलं. “जा बेटी..बडों का घुस्सा छोटोंपर नहीं निकालते। और वो अब सॉरी बोला ना तुझे।

कुछ कम ज्यादा लगा तो मुझे फोन कर। मैं खुद तुझे लेने आऊंगी।”

“अम्मा..तू मेरे लिए देवदूत है।” वत्सलाबाई म्हणाल्या.

“आज मेरे घर खाना खाओगे ना?” अम्माने विचारताच वत्सलाबाई “जरुर” म्हणाल्या. अम्मासोबत त्या तिघांनी जेवण केलं.

अम्माला निरोप देऊन तिघेही गाडीत बसले. अम्माच्या डोळ्यात पाणी तरळलं. गाडी नजरेआड होईस्तोवर ती टाचा उंचावून हात हलवत राहिती.

गाडी च्या वेगासोबत जानकीच्या मनात विचारांनी वेग पकडला होता..म्युझिक सिस्टीमवरील गाण्याशी ती समरस झाली होती..

वेगळया वाटा निराळे आपले आभाळ हे

का तुझ्या माझ्यात असती बंध कुठले ना कळे

कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे

कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे

का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे

लाख शंका या मनाशी प्रश्न होती भोवरे

का तुझ्या डोळयात माझी शोधते मी उत्तरे

वाटते का हे निराळे मला माझे वागणे

कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे

का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे

वेगळया वाटा निराळे आपले आभाळही

का तुझ्या माझ्यात विणतो बंध हळवे काळही

कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे

कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे

तांबे गाडी आत घेणार तोच मावशी चिनूला खांद्यावर घेऊन येताना दिसली.

राघव धावला.

“मावशी..मावशी काय झालं चिनूला..”

“आकडी आली आपल्या चिनूबाळाला. डॉक्टर नेमके बाहेर गेलेत. आपण चीरंजीवी इस्पितळात घेऊन जाऊ..डॉक्टर काम आवरलं की थेट तिथे येतील,म्हणालेत.” असं म्हणत मायामावशी गाडीजवळ पोहोचली.

वत्सलाबाई व मायामावशीने चिनूला मांडीवर घेतलं नि तांबेंनी चिरंजीवी इस्पितळाच्या दिशेने गाडी वळवली.

राघव व जानकी मागून बाईकवरुन गेले. चिनूला एडमिट करण्यात आलं..इवलासा जीव तो..त्याच्या नसेत सुया टोचल्या.  पुन्हा ब्लड,युरीन टेस्ट्स केल्या. सलाईनमधून इंजेक्शन्स सुरु केली.

कोणालाच खाण्यापिण्याचं भान नव्हतं.  फ्यामिली डॉक्टर येऊन चाइल्ड स्पेशालिस्टना भेटले. चिनूच्या आजाराबाबत चर्चा केली.

दुपारी सौ.अग्निहोत्री स्वतः डबा घेऊन आल्या.

वत्सलाबाई,मायामावशी,जानकी,राघव..चौघांनाही बळेबळेच पोळीभाजी खाऊ घातली. चिनू बरा होईस्तोवर घरी स्वैंपाक करु नका. मी देत जाईन असं मायामावशींना बजावलं.

चिनू ग्लानीतच होता.

तापामुळे पांढऱ्या पेशी प्रचंड प्रमाणात कमी झाल्या होत्या.

राघव डॉक्टरांच्या केबिनपाशी खेटे घालत होता. डॉक्टर त्याला धीर देत होते.

जानकीला वाटत होतं..चिनू आपल्यामुळे आजारी पडला..आपण निघताना चिनूचा तरी विचार करायला हवा होता. इतक्या कशा स्वार्थी आपण. जानकी आता चिनूच्या या अवस्थेबद्दल स्वतःला जबाबदार ठरवत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी आटत नव्हतं.

मायामावशीने जानकीच्या पाठीवरनं हात फिरवला नि म्हणाली,”नको मनाला लावून घेऊस बाळा. तुझ्या जागी तू बरोबरच होतीस..ती परिस्थितीच तशी होती बाळा.  तू आलीएस नं आता, चिनू लवकर बरा होईल.”

सिस्टर, चिनू डोळे उघडतोय सांगत आल्या.  सगळे उठून उभे राहिले. डॉक्टरांनी चिनूला तपासलं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं.

जानकीने चिनूचा हात हातात घेतला व त्याच्या केसांतून बोटं फिरवू लागली.

स्पर्शाची भाषा चिनूला कळली.

“जानकी आंटी..तू कधी आलीस..प्लीज मला टाकून जाऊ नकोस ना.” चिनू क्षीण आवाजात पुटपुटला.

जानकीच्या डोळ्यांना धारा लागल्या..चिनूच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली,”सॉरी  चिनूबाळा..परत नाही जायची मी तुला सोडून. किती प्रेम करतोस माझ्यावर.”

मावशीने  तिथेच हात जोडून तिच्या मुरलीधराचे आभार मानले.

जानकी आल्यापासून चिनूचा ताप ओसरु लागला.

चिनूला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.

चिनूला घेऊन सगळे घरी परतले.

जानकी स्वतः चिनूच्या औषधगोळ्यांवर, खाण्यावर लक्ष ठेवू लागली. त्याची तब्येत सुधारण्यासाठी त्याला मोसंबी,सफरचंदाचा ज्यूस करुन देऊ लागली. त्याचा बुडालेला अभ्यास..इतर मित्रांच्या वह्या आणून उतरवू लागली.

मायामावशीसोबत तिने चिनूसाठी ड्रायफ्रुट्सचे लाडूही वळले.

आता तर चिनूचं पानही जानकीशिवाय हलत नव्हतं.

चिनूची तब्येत सुधारतेय पाहून वत्सलाबाईंना हायसं वाटलं. त्यांनी पुन्हा कंपनीच्या कामकाजात लक्ष गुंतवलं.

चिनू आता बाबाकडे लाँग ड्राइव्हला जायचा हट्ट करायचा..तेही आंटीला सोबत घेऊनच.

राघवही चिनूबाबत फार हळवा झाला होता. तो सांगेल ते ऐकायचा.

चिनू न् जानकीची छान गट्टी झाली होती.

राघव माडीवरल्या सज्ज्यातून गेस्ट रुमकडे पहायचा. जानकी पहाटे उठून आंघोळ करुन दारात रांगोळी रेखाटत बसलेली असायची.

मोकळे ओलेते  केस पाठीवर सोडलेली ती, बघत रहावीशी..एखाद्या चित्रासारखी..

अंगणातल्या पारिजातकाचा सडा वेचणारी ती..राघव वेड्यासारखा तिच्याकडे पहात रहायचा..हातातली कॉफी गार झाली तरी त्याला भान नसायचं.

जानकीलाही राघवचं चोरुन पहाणं कळत होतं. ती आता अधिकच टापटीप राहू लागली होती.

जसजसं  जानकीच्या पोटातल्या गर्भाची वाढ होऊ लागली तसतशी ती अधिकच देखणी दिसू लागली.

राघवला जानकीची ओढ वाटू लागली होती पण निलूची प्रतारणा केल्यासारखं होईल म्हणून तो शक्यतोवर स्वतःला आवर घालण्याचा प्रयत्न करायचा.. पण ते आता त्याच्या हातात राहिलं नव्हतं..त्याचं ह्रदय जानकीने चोरलं होतं.

——————–

पप्पा सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे

मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पांची

इवल्याइवल्या घरट्यात चिमणाचिमणी रहातात

चिमणाचिमणी अन्भवती पिलेही चिवचिवती

पप्पा सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे..

या गाण्यावर जानकीने चिनूचा डान्स बसवून दिला. साताठ दिवस रात्री दोघांची डान्सप्रेक्टीस चालायची. घरातल्या सगळ्यांचं मनोरंजन होत होतं.

राघवही जेवल्यानंतर खोलीत न जाता यांची डान्स प्रेक्टीस बघत बसायचा.

ग्यादरिंगचा दिवस जवळ आला तसं चिनूचं टुमणं  सुरु झालं..आंटीला सोबत घेऊन जायचं म्हणू लागला.

कपाटातली आपल्या आईची लाल रंगाची जॉर्जेटची साडीही तिला न्हेऊन दिली. जानकी बावरली..मावशी म्हणाली,”लहानग्या लेकराचं मन मोडू नये बाळा. नेस ती साडी आणि हो मोगऱ्याचे गजरे करुन ठेवलेत मी, तेही माळ.”

“अगं पण मावशी..ही चिनूच्या आईची साडी. चिनूच्या बाबांना काय वाटेल. रागावतील ते माझ्यावर.”

“मुळीच नाही रागवायचा आणि रागावलाच तर मी आहे ना. मी कानच उपटेन त्याचा. तू छान तयार हो जा.”मावशी म्हणाली.

लाल रंगाच्या साडीवर चिकनचा स्लीव्हजलेस ब्लाऊज जानकीला शोभून दिसत होता. गळ्यात खड्यांचा नेकलेस, तसेच इअररिंग्स, हातात नाजुकसं चमचमणारं ब्रेसलेट.. राघवची नजर तिच्यावरनं हटत नव्हती.

गाडीतनं उतरताच चिनूने राघव व जानकी दोघांचेही हात धरले व ऐटीत चालू लागला.

चिनूच्या फ्रेंडने त्याच्या बाबांसोबत असलेली आंटी कोण विचारलं तर चिनूने चक्क नवी आई  असं सांगून टाकलं.

चिनूच्या मित्रमैत्रिणी जानकीला नमस्ते नवी आई म्हणत, नमस्कार करुन गेल्या.

जानकीला आणि राघवला दोघांनाही कसंसच वाटत होतं.

‘दोघं सभाग्रुहात अगदी जवळजवळ बसले होते. सभाग्रुहात असुनही मनाने मात्र वेगळ्याच दुनियेत होते.

तरी जानकी स्वतःला बजावत होती..आवर स्वतःला जानकी..नको पडू या आखडूच्या प्रेमात..जो काही आसरा पुन्हा मिळालाय तोही सुटायचा.’

साऱ्याच मुलांचे कार्यक्रम उत्तम झाले. चिनूने तर भन्नाट डान्स केला. रात्र कधी झाली कळलंच नाही. बाहेरच डिनर केलं आणि दिवसभराच्या दगदगीने जानकीला गाडीत मळमळू लागलं.

रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. जानकी एका झाडाजवळ गेली व ओकाऱ्या काढू लागली. राघवने प्रथमच तिला स्पर्श केला.

तिचं डोकं गच्च धरलं.

तिच्या पाठीवरुन हात फिरवला. डॉक्टरांना फोनवर विचारुन, फर्स्ट एड बॉक्समधली गोळी तिला दिली.

चिनूला या साऱ्याची जाग नव्हती. तो मागच्या सीटवर पाय पसरून झोपला होता. त्याचे पाय मांडीवर घेऊन जानकी कडेला बसायचा प्रयत्न करु लागली,पण चुकून चिनूची लाथ पोटावर बसली तर म्हणून राघवने तिला त्याच्या शेजारी बसण्याची विनंती केली. प्रथमच तो तिच्या इतक्या निकट तेही एकांतात बसला होता.

त्यानेच तिला खांद्यावर डोकं टेकायला सांगितलं. जानकीजवळ दुसरा पर्याय नव्हता. राघवला आत खोलवर कुठेतरी पुर्णत्वाची जाणीव होत होती.

जानकीची जबाबदारी त्याला हवीहवीशी वाटू लागली होती आणि जानकी हीच आपल्या चिनूची नवीन आई बनू शकेल असा त्याला विश्वास वाटू लागला.

तिच्या पोटातल्या बाळाबद्दलही प्रेमाची जाणीव त्याच्या मनात जाग्रुत झाली. जानकीच्या वेणीतल्या मोगऱ्याचा मंद सुगंध..बाहेर टिपूर चांदणं..राघव आपल्याच मनाशी हसत गाडी हाकत होता.

म्युझिक सिस्टीमवर गाणं लागलं होतं..

शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी

चंद्र आहे स्वप्न वाहे,धुंद या गाण्यातुनी

आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला

तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला

अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा

लाजर्‍या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा

अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा

भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा..

जानकीची मान आता त्याच्या खांद्यावर विसावली होती न् तिचे भुरभुरते केस त्याच्या गालांना अलवार स्पर्श करत होते.

घर जवळ आलं तसं राघवने जानकीला हलकेच उठवलं..आपण इतका वेळ..राघवच्या खांद्यावर डोकं ठेवून..ती लाजेने गोरीमोरी झाली.

गाडीतून उतरल्यावर जानकी गेस्ट हाऊजकडे वळली. राघवला तिला घरात न्यावसं वाटत होतं. चिनूला उचलून घेऊन तो घरात आला.

चिनूला झोपवून परत सज्ज्यात गेला. जानकी काय करत असेल..पहायचं होतं त्याला पण अंधुक प्रकाशात काही दिसत नव्हतं.

जानकी मात्र बेडवर पडून विचार करत होती,”राघवना पहावसं वाटतं..ते दिसले नाहीत तर बेचैन व्हायला होतं..त्यांनी कपाळावर ठेवलेला हात..त्यांचा पाठीवर फिरत असलेला हात..त्यात काळजी होती..वासना मुळीच नव्हती.

राघवसारखा जोडीदार मिळाला तर..पण मग दुसरं मन तिच्यावरच कावलं..अविवाहित पोटुशी बाई तू का नको त्या मोहात अडकतेस!” जानकीने डोळे गच्च मिटून घेतले तरी राघवची प्रतिमा डोळ्यासमोरुन जाईना.

एकापाठोपाठ एक दिवस ,महिने सरत होते..राघव आता जानकीच्या तब्येतीची चौकशी करु लागला होता. तिच्यासाठी फळं आणू लागला होता.

प्रसुतीची तारीख जवळ आली तसा तो अधिकच काळजी करु लागला होता. वत्सलाबाईंना त्या दोघांचं अव्यक्त प्रेम लक्षात येत होतं.

एका सकाळी जानकी नेहमीप्रमाणे फुलं वेचत होती. बागेत काहीतरी सळसळत गेलंस तिला वाटलं नि तिने पाय सखल भागात टाकला, मधे निसरडा धोंडा आल्याने ती पडली. राघव वरुन बघतच होता. तो धावतच खाली आला.

झालं काय..ते बघायला मावशीही त्याच्या पाठोपाठ गेल्या. जानकीला उठताही येत नव्हतं. राघव व तांबेंनी तिला उचलून कारच्या सीटवर झोपवली. सोबतीला मावशीही होती. आठव्या महिन्यातच ब्लिडिंग सुरु झालं होतं.

मावशी घाबरली . तिला निलूचा अपघात..शेवटचे क्षण..सारं काही आठवलं..ती अधिकच भयभीत झाली  नि श्रीकृष्णाचा धावा करत बसली. वत्सलाबाई चिनूजवळ थांबल्या. त्याच्या प्रश्नांची उत्तरं देणं त्यांना अवघड जाणार होतं. त्या फोनवरून राघवच्या संपर्कात होत्या.

डॉक्टरांनी रक्त लावावं लागेल असं सांगितलं. सुदैवाने राघवचा रक्तगट जुळला. राघवचं रक्त जानकीला चढवण्यात आलं.

बाळ प्रीम्याच्युअर बेबी असल्याने तिला काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं होतं. जानकीला मावशी,राघव दोघेही धीर देत होते.

वत्सलाबाई मावशीला घरी पाठवून जानकीसोबत थांबल्या. मावशीने आराम करणं गरजेचं होतं.

जानकीचं दूध काढून नर्स बाळाला पाजायच्या. आठ दिवसांनी ती इवलुशी परी जानकीच्या ओटीत ठेवली तेव्हा अतीव आनंदाने जानकीला रडूच आलं.

चिनूने परीला पाहिलं..आपल्या मांडीवर घेतलं. आता मला भावंड आलं म्हणू लागला.. पण त्याच्या या म्हणण्याचा आता राघवला राग येत नव्हता..राघव बदलला होता..जानकीच्या प्रेमाने त्याच्यात बदल घडवला होता..हा बदल खूप साजिरा होता.

निलांबरीची आजीही जानकीसाठी येऊन थांबली.

अम्मा,छम्मो,शबनम सगळ्या जानकीच्या परीला बघायला आल्या. त्यांनी परीसाठी आंगडीटोपडी आणली होती. जानकीसाठी लाडू  आणले होते.

छम्मो तर परीला म्हणाली,”ऐसी देखती क्या रे..पहेचानती नही क्या..मै मौसी हूँ तेरी मौसी.” चिनू पटकन म्हणाला,”और मेरी भी ना.” “हां रे मेरे लल्ला,” म्हणत छम्मोने त्याची दुष्ट काढून हाताची बोटं गालावर मोडली.

————

परी  चार महिन्याची होत आली. एका संध्याकाळी जानकी अंगाई गात परीचा पाळणा हलवत होती..

नीज राजकन्ये आता
चांदोबा करितो गाई
आज छकुलीच्या स्वप्नी
येणारसे लाडकी आई
धरा करि आर्जव सारी
विनवती दिशा सारी
नीज राजकन्ये आता
तुझ्यासाठी ही अंगाई
नीज राजकन्ये आता..

राघव नुकताच कंपनीतून आला होता. नकळत त्याची पावलं गेस्ट हाऊसकडे वळली. जानकीचं गाणं ऐकत तो दाराशीच उभा राहिला..त्या खोलीत..उदाधुपाचा दरवळ, जानकीचे स्वर यांचा उत्तम मिलाफ झाला होता.

जानकीचं लक्ष दाराकडे जाताच ती उठून उभी राहिली.
राघवसाहेब तुम्ही..या..या ना आत, म्हणत तिने त्यांना बसायला जागा करुन दिली. खाटीवरचे छोटीचे कपडे बाजूला करुन ठेवले.

“जानकी, रागावणार नसाल तर एक विचारु?”

क्रमशः

काय विचारणार असेल राघव? भेटू पुढच्या भागात. प्रतिक्रिया देत रहा.🌹🌹🌹🌹🌹

–सौ.गीता गजानन गरुड.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *