Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रात्रीच्या अंधारात मेनरोडवरुन वत्सलाबाईंची गाडी चालली होती. कचकन ब्रेक दाबले गेले.
“ड्रायव्हर, काय झालं ओ!”

“बाईसाहेब.. एक बाई.”

“कुणीतरी तिला ठोकर देऊन पसार झालंय वाटतं.”

ड्रायव्हर व वत्सलाबाई खाली उतरले.

“रक्तही बरंच निघालंय. हेड इंजुरी वाटते. आपण हिला इस्पितळात दाखल करु.”

बाजुने जाणाऱ्या एका बाइकस्वाराची मदत घेऊन तिला सीटवर घातलं. काही वेळात ते इस्पितळात पोहोचले.  पोलीस केस झाली. पोलीसांनी वत्सलाबाई व ड्रायव्हरची जबानी घेतली. ती बाई बेशुद्धच होती. बाई चांगल्या घरची दिसत होती. बाई कसली..वीशीच्या आसपासचीच ती.

वत्सलाबाईंना डॉक्टर म्हणाले,”तुम्ही घरी जाऊन आराम करा. पेशंट शुद्धीवर आल्यावर कळवतो तुम्हाला.”

“डॉक्टर काही सिरियस नाही नं.”

“नो,शी इज आऊट ऑफ डेंजर नाऊ पण शुद्धीवर आल्यावरच मी सांगू शकेन.”

डॉक्टरांचा निरोप घेऊन वत्सलाबाई घरी आल्या.

“आजी..आजी तू कुठे होतीस..लवकर येणार होतीस नं,” वत्सलाबाईंनी सोफ्यावर अंग टाकताच नातू चिन्मय त्यांना बिलगला.

“थोडं काम निघालं बाळा. आज मी खूप थकलेय. बरं,तू जेवलास का?”

“नाही,आजी..तूच मला भरवलं पाहिजेस तरच जेवणार मी.”चिनू हट्ट करु लागला.

वत्सलाबाई कंबरेतून येणारी कळ सहन करत होत्या..इतक्यात मंदा मावशी किचनमधून बाहेर आली.
“चिनू,आज आजी थकलेय नं, मग माझ्याकडून भरवून घे.  आजीला आराम करू दे.”

“आजी थकते. बाबा ऑफिसातनं लेट येतात नैतर टुरवर जातात. माझ्यासोबत खेळणार कोण?”

चिनू आईच्या फोटोजवळ जाऊन रडू लागला. “कट्टी तुझ्याशी..का गेलीस मला टाकून. मलापण घेऊन जायचं ना सोबत.” चिनू हुंदके देत बोलू लागला तशा वत्सलाबाई दुखऱ्या कंबरेकडे दुर्लक्ष करत उठल्या नि मंदा मावशीने आणलेलं ताट त्यांनी आपल्या हातात घेतलं. चिनूला मांडीवर घेऊन ती गोष्ट सांगतसांगत त्याला घास भरवू लागली. चिनूही  गोष्टीत रंगून गेला.

सतरांदा प्रयत्न केले होते वत्सलाबाईंनी तो फोटो आत कपाटात ठेवायचे पण तो फोटो दिसला नाही की चिनू मोठमोठ्याने रडायचा. शेवटी बालहट्टापुढे त्यांनी हार पत्करली होती. चिनू शाळेतल्या गमतीजमती जशा मावशीआजीला सांगायचा तशाच फोटोतल्या त्याच्या आईला सांगायचा. ते पहाणाऱ्याचं काळीज गलबलायचं खरं. वत्सलाबाई मनात म्हणायच्या,”देवा, का रे मायलेकरांची अशी ताटातूट केलीस..त्याऐवजी मलाच का नाही उचललंस..”

वत्सलाबाई रात्री दोनपर्यंत जाग्या होत्या. दोन वाजता राघव आला. राघव अष्टपुत्रे..अष्टपुत्रे फ्याक्टरीचा भावी मालक..वत्सलाबाईंचा एकुलता एक सुपुत्र..सहा फुट उंच, राजबिंडा,मजबुत बांधा..पण त्याच्या या देखणेपणाला ग्रहण लागलं होतं.

वत्सलाबाईंना आठवलं..द्रुष्ट लागेल असा संसार होता त्यांचा. त्यांचे यजमान उल्हास यांनी शुन्यातून विश्व निर्माण केलं होतं.

बिझनेस नावारुपाला आला होता. एका विमान अपघातात उल्हासराव गेल्यानंतर वत्सलाबाईंनी बिझनेसची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. एकुलत्या एका मुलाला घेऊन त्या माहेरी जाऊ शकल्या असत्या. हा उद्योग,गुडविल सहज इनक्याश करता आली असती. गुजराती व्यापारी तर टपून बसले होते पण वत्सलाबाईंना चांगलच ठाऊक होतं की उल्हासराव फ्याक्टरीमधल्या प्रत्येक नोकराला आपला पुत्र मानायचे. सगळ्या मजुरांचे संसार धोक्यात आले असते.

युनियन लीडरने साऱ्या मजुरांच्या वतीने वत्सलाबाईंना फ्याक्टरीचा कार्यभार उचलण्याची विनंती केली आणि आशेने असणाऱ्या उद्योजकांच्या हाती निराशा आली.

कंपनीचे विश्वस्त श्री. अग्निहोत्री यांनी बाईसाहेबांना पदोपदी मदत केली. त्यांच्या विश्वासक हाताखाली वत्सलाबाई बिझनेसमधील खाचखळगे ओळखू लागल्या.  समस्यांवर तोडगे काढू लागल्या

एक बाई एवढा मोठा कारभार काय सांभाळणार म्हणणारे भले भले बिजनेसमन वत्सलाबाईंच्या धोरणावादी कर्तृत्वाकडे पाहून तोंडात बोटं घालू लागले. हे पाणी वेगळं आहे याची त्यांना चांगलीच प्रचिती येऊ लागली.

उल्हासरावांचं गावच्या घरी कुणी राहिलं नव्हतं तरी वत्सलाबाई गावी जाऊनयेऊन असायच्या. गावात त्यांनी शाळेसाठी देणगीही दिली होती.
वत्सलाबाई एकदा देवीच्या गोंधळाला गावी गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी न्हाणीजवळ स्नानासाठी गेल्या असता आपल्या आईला शेणी थापायला मदत करणारी माया त्यांना दिसली.

मायाची  कहाणी ऐकून वत्सलाबाईंचं मन द्रवलं. त्या तिला शहरात घेऊन आल्या. शहरात स्त्रीरोगतज्ञा़कडे तिला दाखवलं पण हाती निराशा आली. मायाला जन्मतःच गर्भाशय नव्हतं.

वीसेक वर्षाची माया वत्सलाबाईंसोबत राहू लागली.  स्वैंपाक करु लागली. चोवीस तास माया घरी असल्याने राघवला तिचा लळा लागला. मायालाही स्वत:चं बाळ हवं होतं पण ते शक्य नसल्याने तिने तिचं सारं ममत्व राघवला दिलं.

वत्सलाबाई राघवच्या चिंतेतून सुटल्या. काही वर्षांतच त्यांनी हितशत्रूंच्या नाकावर टिचून मोठी झेप घेतली. महिला उद्योगरत्न पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं.

राघव मोठा होत होता. त्याने एमबीएची डिगरी प्राप्त केली. नोकरीसाठी कुठे धूळ झाडायची त्याला गरजच नव्हती. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन तो जन्माला आला होता..तरीही राघवला वत्सलाबाईंनी डायरेक्ट खुर्चीवर बसू दिलं नाही. सगळी बारीकसारीक कामं त्याला शिकायला लावली. इतर लेबर्सप्रमाणे त्याला मेहनतानाही दिला.

आपल्या पहिल्या कमाईत राघव मायामावशीसाठी दोन साड्या घेऊन गेला होता.
मायामावशीने त्याची द्रुष्ट काढली..आईसाठी काय आणलंस,विचारलं तसं तो म्हणाला..वत्सलाबाई फार मोठ्या उद्योजिका आहेत. त्यांना मी पामर काय देणार! दिलं तरी त्यांच्या स्टेटसला ते शोभणार नाही.”

वत्सलाबाई घणाचे घाव सोसावे तसे निमुटपणे राघवचे कटू शब्द झेलत होत्या. दिवसेंदिवस राघव अधिकाधिक तुसडा होत चालला होता.

काय कमी केलं होतं त्याला वत्सलाबाईंनी? महागडी शाळा, शाळेत न्यायलाआणायला गाडी, घरी सांभाळण्यासाठी मावशी,शिकवण्यासाठी टिचर,मागेल ती उंची चॉकलेट्स,मिठाई..सारं सारं देत आल्या होत्या..बापाविना लेकरु म्हणून का काय वत्सलाबाई त्याच्याबाबतीत अधिकच भावनाविवश होत्या.

खरं तर मुलांना याहीपलिकडे जाऊन आईची कुस हवी असते. ती मायेची उब मात्र त्यांना राघवला इच्छा असुनही देता आली नव्हती. हजारो कामगारांच्या पोटासाठी त्या स्वतःच्या दु:खाला गाडून उभ्या राहिल्या होत्या. तरी आईचं मन कुठेतरी राघवला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही म्हणून अपराधी वाटून घेत होतं..आतल्या आत टोचत होतं.

अग्निहोत्रींच्या मार्गदर्शनाखाली काम करता करता वत्सलाबाईंचे त्यांच्याशी प्रेमाचे धागेदोरे नकळत विणले गेले आणि काही निवांत क्षणी दोघं एकमेकांजवळ आली. अग्निहोत्री विवाहीत असतानाही दोघं एकमेकांत गुंतत गेली.

क्रमशः