Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मिहीर नवीन ऑफिस मध्ये चांगलाच रुळायला लागला होता…एकूण काय…नवीन ऑफिस चांगलंच होत…नवीन ऑफिस,नवीन स्टाफ, कँटिनमधलं रुचकर जेवण मिहीरला खूपच आपलंस वाटू लागलं…मिहीरचा कामाचा डेस्कही अगदी आवडीच्याच जागी होता आवडीचीच जागा म्हणजे…. ‘खिडकी’  मिहीरची आवडीची जागा… त्या खिडकीच्या अगदी समोरच एक उडप्याचं हॉटेल असतं त्या हॉटेलमध्ये जाऊन सकाळी टी ब्रेक मध्ये मस्त नाश्ता करणं मिहीरला खूप आवडायचं…तिथली इडली…डोसा…मेदुवडा मिहीरला खूप आवडायचे…मिहीर नवीन असल्यामुळे मिहीरची कुणाची फारशी ओळख झालेली नव्हती म्हणून मिहीर एकटाच नाश्त्यातही येत होता…मिहीरची ओळख तिथेच असणाऱ्या हॉटेलच्या मालकाशी झाली हॉटेलचा मालकही तितकाच मनमोकळ्या स्वभावाचा…म्हणून मिहीरच्या फर्माईशी नेहमी पूर्ण होतं असत….असेच मिहीरला नवीन ऑफिस आणि हॉटेलच्या सहवासात आता एक महिना पूर्ण झाला होता….नेहमीप्रमाणे टी ब्रेकची वेळ झालेली होती…मिहीर आपल्या आवडीचा नाश्ता करण्यात खूप मग्न होता…तेवढ्यात साधारण विशीतली तरुणी मिहीरच्या शेजारी येऊन बसली….मध्यम पण सुदौल बांधा….गोरा रंग…कंबरेच्या खालीपर्यंत रुळणारी वेणी…घारे पण बोलके डोळे ….आणि मोहक हास्य एवढी सुंदर तरुणी पाहून मिहीर तिच्याचकडे पाहत राहिला…प्लेटमधला नाश्ता करायचा चक्क मिहीरने थांबवलाच कारण तिची ओळख करून घेण्यासाठी मिहीर पुढे सरसावला….पण तेवढ्याच वेळात ती तरुणी तिथून निघून गेली आणि मिहीर चेहरा पाडून आपल्या ऑफिसमधे निघून गेला….

मिहीर नेहमीप्रमाणे घरी आल्यावर जेवण वैगेरे आटोपून आपल्या बेडमध्ये झोपण्यासाठी गेला पण त्या तरुणीचा चेहरा काही केल्या मिहीरच्या डोळ्यासमोरून जात नव्हता…काही करून त्या तरुणीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता मिहीरला वाटू लागली…तिच्याच आठवणीत रात्री कधी मिहीर झोपी गेला त्यालाच समजलं नाही…सकाळी उठून नेहमीप्रमाणे तेच नवीन ऑफिस…तेच नाश्त्याचं ठिकाण आणि तोच आवडता पदार्थ…दोन तीन घास पोटात गेले तर शेजारी पाहिलं तर तीच तरुणी…पण या वेळी ती स्वतःहून मिहीरशी बोलली…

‘ती’ तरुणी – तुम्ही इथे नवीनच जॉईन झालात का…?

मिहीर – आय एम सॉरी…तुम्ही माझ्याशी बोलत आहात का ? [ उगाच लक्ष नसल्यासारखं मिहीर भासवतो आणि तिला विचारतो ]

‘ती’ तरुणी – हो मी तुमच्याशीच बोलती आहे…

मिहीर – हो मी इथे नवीन आहे…दहा-बारा दिवस झाले जॉईन होऊन…तुम्ही इथे नवीन आहात का…

‘ती’ तरुणी – हो मी इथे नवीन आहे…

मिहीर – तुमचं नाव काय..?

‘ती’ तरुणी – मंदाकिनी…!

मिहीर – खूप सुंदर नाव आहे…अगदी नावाप्रमाणेच आहात तुम्ही…!

मंदाकिनी – धन्यवाद…!

असं म्हणून मंदाकिनी जाण्यासाठी निघाली पण मिहीरला तिच्याशी बोलणं वाढवायचं होत म्हणून आणखी बोलण्याचा प्रयत्न मिहीर करतो पण अगदी बिजलीसारखी मंदाकिनी तिथून निघून जाते…शेवटी संपर्क कसा करायचा हा प्रश्न मिहीरला पडतोच…तेव्हाही क्षणिक सुखावल्यासारखा मिहीर त्या हॉटेलमधून निघतो आणि परत आपल्या कामासाठी जातो…थोड्या वेळासाठी का होईना मिहीर सुखावला खरा कारण आज मंदाकिनीने स्वतःहून त्याची विचारपूस केली…असेच मिहीरला आता ऑफिस जॉईन होऊन महिना होत आला…रोज मिहीरला नेमकं ब्रेकफास्टच्या वेळेलाच मंदाकिनी भेटायची…असेच एक दिवस तीच जागा तोच ब्रेकफास्ट आणि तीच मंदाकिनी असेच सोबत बोलत बसले होते…तेवढ्यात मंदाकिनी खूप उतावीळपणे मिहीरला नाश्त्यासाठी मागणी करते…

मंदाकिनी – मिहीर…मला खूप भूक लागलीय…मलाही ऑर्डर कराल का…?

मिहीर – हो करेल पण एका अटीवर…

मंदाकिनी – कुठली अट…?

मिहीर – मला ‘ अहो ‘ आणि ‘ जाहो ‘ करायचं नाही…!

मंदाकिनी – हो चालेन…

मिहीर – अण्णा….एक प्लेट मेदुवडा द्या….!

मिहीर खूप आपलेपणाने ऑर्डर देतो आणि अण्णा म्हणजेच त्या हॉटेलमधला वेटर मिश्कीलपणे हसत टेबलापाशी येतो आणि मिहीरला म्हणतो…

अण्णा – काय साहेब…आत्ता कुणासाठी ऑर्डर करताय…तुमच्यापुढची प्लेट अजून रिकामि झाली नाहीय…

मिहीर – कुणासाठी काय अण्णा…? ह्या काय माझ्या शेजारी ह्या मॅडम आहेत…त्यांच्यासाठी…आणखी कोण…?

मिहीर आपल्या शेजारच्या खुर्चीकडे बोट दाखवून म्हणतो…पण तोही आश्चर्याने आ वासून पाहत राहतो कारण शेजारची खुर्ची रिकामी दिसते…आता मात्र या गोष्टीवर मिहीरला राग येऊ लागतो…कारण मंदाकिनीच असं मधेच तोडून जाणं मिहीरला बिलकुल पटत नाही….कसाबसा राग आवरत मिहीर आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन कामावर लक्ष केंद्रित करायचं ठरवतो…संध्याकाळी घरी आल्यावरही मंदाकिनीचा आणि तिच्या वागण्याचा विचार मिहीरच्या मनामधून काही केल्या जात नाही…मग दुसऱ्याच दिवशी मंदाकिनीला या बाबतीत जाब विचारण्याचं मिहीर मनाशी अगदी पक्के करून ठेवतो…त्याच रात्री आपला मुलगा काहीसा अस्वस्थ दिसतोय ही बाब नीलिमा ताईंच्या नजरेतून सुटत नाही…म्हणून आपल्या मुलासाठी दूध घेऊन त्या त्याच्या रूममध्ये जातात…मंदाकिनीविषयी मिहीर आपल्या आईला सांगून टाकतो…नीलिमाताई आपल्या लेकाला प्रेमळ दिलासा देतात…

नीलिमाताई – मंदाकिनीविषयी तू काहीही न लपवता मला सगळं सांगितलं…खरंच खूप चांगली गोष्ट आहे…कदाचित तिला असं एवढ्या लवकर मैत्री करायला आवडत नसेल…त्यामुळे तू या गोष्टीचा जास्त विचार न केलेलाच बरा…

मिहीर – आई…ठीक आहे मी विचार करत नाही…पण तुला माहिती आहे…तिला ज्यावेळी पहिल्यांदाच पाहिलं त्यावेळी तिच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर मला वाटू लागलाय….म्हणून असं तीच अचानक गायब होणं मला काही पटत नाही…

नीलिमाताई – ठीक आहे…पण तू जेवढा जास्त विचार करशील तेवढा त्रास तुला होईल…ती परत उद्या आली कि प्रेमाने तिला विचार असं का केलंस म्हणून…

आपल्या आईपाशी मन मोकळं केल्याने मिहीर त्या रात्री शांतपणे झोपी गेला….दुसऱ्याच दिवशी मिहीर ऑफिसला गेल्यानंतर नेहमीसारखंच आपल्या आवडीचा नाश्ता घेतला…पण त्या दिवशी काही मंदाकिनी मिहीरच्या शेजारी बसायला आली नाही या गोष्टीच मात्र मिहीरला नवल वाटलं…आणि आपला नाश्ता आटोपून मिहीर नाश्त्याचं बिल देण्यासाठी कॉउंटर पाशी आला तेव्हा अण्णा आणि अण्णांच्या सोबतचे कामासाठी असणारे सगळेच एकदम मिहीरकडे पाहून गालातल्या गालात हसत होते…आपल्याकडे पाहून सगळे हसत आहेत हे मिहीरच्या पटकन लक्षात आलं…म्हणून हॉटेलचे मालक सुदीप अण्णांना मिहीर विचारतो…

मिहीर – मी काहीसा परग्रहावरून आलेल्या माणसांसारखा दिसतोय का…?

अण्णा – नही….ऐसा क्यू लगता है तुम्हे…?

मिहीर – मग सगळे असं हसत का आहेत माझ्याकडे पाहून…?

अण्णा – अरे…कल तुम अकेला किसीसे बात कर राहा था क्या…?

मिहीर – अहो नाही…मी तर काल मंदाकिनीशी बोलत बसलो होतो….विठ्ठल अण्णांनी तर मेदुवडा सांबर ची प्लेट आणूनही दिली होती कि…पण ती मंदाकिनी ना तेवढ्यात निघूनही गेली… ..बघा ना आज मी तिची वाट पाहतोय पण ती काही आलीच नाही…!

विठ्ठल अण्णा – साहेब…तुम्ही एक महिना झालाय एकटेच बोलत असतात…..आसपास कुणीही नसतं तुमच्या…

मिहीर – काहीही…मी ना ती आली ना कि सगळ्यांना बोलावून घेतो बघाच तुम्ही…मी काय बावळट नाहीय एकटाच बोलत बसायला…

विठ्ठल – साहेब…तुम्हाला कोण वेडं म्हणतय…

शेवटी वैतागून मिहीर तिथून निघून गेला….मंदाकिनी आली नाही म्हणून जगातल्या सगळ्या मुलींना नावं ठेवत मिहीर बोलत आपल्या डेस्कपाशी येऊन पोचला सुद्धा…

मिहीर – काय समजत असतात या मुली स्वतःला….काय माहिती…? किती बोलत बसत होती…गोड-गोड बोलून आम्हा मुलांना नादी लावण्यात मोठ्या तरबेज असतात या मुली…आपणच बावळट असतो ना….उगीच त्यांच्यावर भाळून स्वतःला माणसामधून उठवून घेतो आपण….

मिहीरची अशी बडबड जवळच्या डेस्कपाशी असलेले वयस्कर म्हणजे वय सांगायचं झालं तर ४५ च्या आसपासचं असेल ….देशपांडे सर असं त्यांचं नाव ते ऐकत होते….ते म्हणाले…

देशपांडे सर – अरे मिहीर…असं वैतागायला काय झालंय…!

मिहीर – काही विशेष नाही…

देशपांडे सर अनुभवी असल्याने ऑफिस आणि सभोवतालचं वातावरन याबद्दल चांगलीच माहिती होती म्हणून मिहीरची चिडचिड पाहून त्याच्या मनातलं त्यांनी जाणून घेण्यासाठी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मिहीरशी बोलण्याचं ठरवलं…मिहीरची पूर्ण कथा ऐकून झाल्यानंतर देशपांडे सरानी आपलं म्हणणं सांगायला सुरुवात केली…

देशपांडे सर – अच्छा…तर तुलाही असाच भास होतोय तर…म्हणजे तुलाच फक्त ती दिसतीय…

मिहीर – तुलाही म्हणजे याआधी असं काही झालाय का आपल्या ऑफिस मध्ये…?

देशपांडे सर – नाही तसं काही नाही मी अगदी सहजच बोलून गेलो…[ देशपांडे सर विषय बदलू पाहतात पण मिहीर रोखून परत त्याच विषयाला हात घालतो ]

मिहीर – सर नेमकं असं काय झालं ती अचानक दिसेनाशी होते…का बरं…?

देशपांडे सर – मनावर थोडा संयम ठेऊन ऐकणार असशील तर ऐक…!

मिहीर – बोला सर…

देशपांडे सर – तुझ्या अवतीभवती ती असते…पण ती माणूस नाहीय…मागे तुझ्या आधी जो इथे मुलगा कामासाठी होता त्यालाही असाच भास व्हायचा पण या त्रासाला कंटाळून त्याने इथला जॉब सोडला…एका दृष्टीने तू तुझं मन माझ्याजवळ मोकळं केलं ते चांगलाच झालं…

मिहीर – म्हणजे…तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे…मंदाकिनी म्हणजे नेमकी कोण आहे…

देशपांडे सर – मंदाकिनी म्हणजे तुला एका पिशाच्चाची बाधा झालीय…तू एवढा तिच्यात अडकत गेलाय कि घरी गेल्यावरती सुद्धा तू तिचाच विचार करत असतोस….

मिहीर – काय…? मी एवढे दिवस जिच्याशी बोलत होतो ती एक पिशाच्च आहे…[ ऐकून मिहीरच अंग थरथरायला लागलं ]

देशपांडे सर – तू घाबरून आणि गडबडून जाऊ नकोस…तुला थोडी हिंमत धरावी लागेल…खूप हुशारीने काम करावं लागेल तुला यापुढे…मी आजच माझ्या ओळखीच्या गुरुजींशी जाऊन बोलतो आणि याच्यावर काही उपाय आहे का ते शोधून काढतो…त्यासाठी तुलापण यावं लागेल…

मिहीर – सर…पण माझा या भुताखेतांवर अजिबात विश्वास नाहीय…मुळात असं काही नसतं मुळी…!

देशपांडे सर – तुला जर खरं कारण माहिती करायचं असेल तर तुला यावंच लागेल…

शेवटी मिहीर कसाबसा येण्यासाठी तयार होतो…दुसऱ्याच दिवशी मिहीर आणि देशपांडे सर गुरुजींकडे जाण्यासाठी तयार होतात….त्याच दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी मिहीर उडप्याच्या त्याच हॉटेलमध्ये जातो…मिहीर काही वेळासाठी शांत बसतो…साधारण दोन मिनिटांनी ऑर्डर देतो तर आदल्या दिवशीचं दृश्य सगळे अण्णा आणि सहकारी मिहीरकडे पाहून परत हसतात…मिहीर दुर्लक्ष करतो…ऑर्डर आल्यावर मिहीर कुणाकडेही लक्ष न देता ब्रेकफास्टवर लक्ष केंद्रित करतो…दोन घास तोंडात पडतात तोच शेजारी पैंजणांचा आवाज मिहीरच्या कानी पडतो…मिहीर इकडे तिकडे न पाहता ब्रेकफास्ट करू लागतो…मिहीर मुद्दाम लक्ष न देता खाण्यावर फोकस करतो…कारण कुठेही पाहायचं नाही हे त्याने

ठरवलेलंच असतं….कारण मंदाकिनी शेजारी येऊन बसलेली असतेच….मिहीर आपला ब्रेकफास्ट संपवून आपल्या कामासाठी निघून जातो…मंदाकिनी मात्र चिडते…दोन दिवस आधी मंदाकिनीसाठी ऑर्डर दिलेली असताना तो राहिलेला ब्रेकफास्ट तिला आज मिहीरबरोबर करायचा असतो म्हणून ती चिडते…मिहीर मात्र अस्वस्थ होऊन देशपांडे सरांबरोबर जाण्यासाठी तयार होतो…मनात एक प्रकारची उत्सुकता आणि घालमेल अशी द्विधा मनस्थिती मिहीरची झालेली असते….

देशपांडे सरांबरोबर मिहीर शाळीग्राम गुरुजींकडे येऊन पोचतात…गुरुजींच्या दिवाणखान्यात पूर्ण  प्रसन्नता शांत आणि मंद समईच्या प्रकाशात शाळीग्राम गुरुजी बसलेले दिसतात…अंगावर पांढरा कुर्ता…डोळ्यांवर चष्मा व चेहऱ्यावर शांत असे भाव…गुरुजींसमोर येताच दोघांनीही वाकून नमस्कार केला…देशपांडे सर आणि मिहीरने आपली संपूर्ण हकीकत शाळिग्रामगुरुजींसमोर कथन केली…गुरुजींनी मग आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली…

गुरुजी – हे एक भस्म्या झालेलं म्हणजेच भूकबळी गेलेलं स्त्री पिशाच्च आहे…कारण उपासमार होऊन जीव जाण्याची वेळ या स्त्री वर आलेली आहे…म्हणूनच नेमकं सकाळच्या नाश्त्याच्याच वेळेला ती येते…

देशपांडे सर – हो पण आजूबाजूच्या ठिकाणी तिचे काही नातेवाईक राहत आहे…मिहीरला असा भास होऊ लागला म्हणजे त्याने जेव्हा मला नेमका प्रॉब्लेम सांगितला तेव्हा मी कसून चौकशी केली…मंदाकिनी नावाची नवविवाहित अशी स्त्री काही वर्षांपूर्वी मृत झाली तेव्हा आम्ही ऐकून होतो की त्या मुलीला आपल्या सासूकडून खूप छळ सोसावा लागलाय….नवरा आणि बायकोने एकत्र येऊ नये असा विचार मंदाकिनीच्या सासूबाई नेहमी करायच्या….कामाच्या नावाखाली खाण्यापिण्याचे हाल-हाल करून सोडायच्या…उपाशीपोटी काम करवून शरीरात शरीरात एवढी कमजोरी आली की त्यातच तिचा मृत्यही झाला असं लोक म्हणतात…ते कितपत खरंय हे मला माहित नाही…पण यावर काही उपाय असला तर तातडीने सांगावा एवढीच विनंती आहे गुरुजी…

गुरुजी – खरं तर…भूकबळी गेल्यामुळे त्या स्त्रीचा मृत्यू झालाय…खाण्याची इच्छा अपुरी राहिली म्हणून ती नेमकं ब्रेकफास्टच्या वेळेला येते…आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे खाण्यासाठीही मागणी तिने केलेली होती…पण तीही अपूर्ण राहिली म्हणून तिचा संतापही झाला…अगदी तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे….बाकी कुठलाच त्रास तिने दिलेला नाहीय…

मिहीर – नाही गुरुजी…!

गुरुजी – जवळच्या चौकात किंवा जिथे तीन रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी एक पंचपक्वान्नाचे ताट करून ठेवायचे आहे तेही येत्या पौर्णिमेला…आणि हे अभिमंत्रित पाणी त्यावर शिंपडून ठेवायचं आहे…या पाण्याने ती पुन्हा त्रास देणार नाही… .या पाण्याने ती पुन्हा त्रास देणार नाही…

सांगितल्याप्रमाणे येत्या पौर्णिमेच्या दिवशी मिहीरने पंचपक्वान्नचे ताट करून आणि त्यावर अभिमंत्रित पाणी शिंपडून ठेवले….घडतोय हा प्रकार टिपून घेण्यासाठी चौकाच्या एका बाजूला झाड असलेल्या ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरा लावून हा प्रकार पाहण्याचं ठरवलं…बारा वाजून पंचवीस मिनिटांनी झाड हलू लागली त्याच सुमारास एक पांढरी पण विचित्र आकृती त्या वाढलेल्या ताटाभोवती फिरू लागली….पांढरी आकृती त्या ताटात शिरकाव करण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यातच जोरदार झटका त्या आकृतीला बसतो आणि आकृतीमधून विचत्र पण भेसूर असा आवाज येऊ लागतो….” काय….इच्छा होती माझी…माझ्या नवऱ्यासोबत बसून एकदा तरी सुखाचे पण प्रेमाचे घास खावे…! नाही होऊ शकत माझी इच्छा पुरी…एकवेळ गोड धोड नसेलही पण प्रेम शोधायचे मी नव्हतं नशिबात माझ्या…” हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झाला होता….दुसऱ्याच दिवशी सकाळी मिहीर उत्सुकतेपोटी लवकर ऑफिसला जाण्यासाठी तयार होतोही…कामात लक्ष नसत फक्त आणि फक्त ब्रेकफास्टचाच विचार त्या हॉटेलमध्ये गेल्यावर मिहीर फक्त इकडे तिकडे पाहत राहतो….त्याची अस्वस्थता पाहून अण्णा त्याला विचारतात….

अण्णा – काय भाऊ….आजचा नाश्ता आवडला नाहीय का…?

मिहीर – नाही छान आहे…नाश्ता भरपेट असला ना कि बाकीची कामं आपसूकच होतात  बुद्धीला आणि मेंदूला गती मिळते….म्हणूनच….

पुढचं वाक्य मिहीर न बोलताच निघून जातो…आपल्या डेस्कपर्यंत जातंच असताना पैंजणांचा आवाज मिहीरच्या कानी पडतो आणि गोड आवाजात मंदाकिनी म्हणते….” मिहीर…माझ्यासाठी रोज असंच पंचपक्वान्नाचं ताट घेऊन येशील….! ” मिहीर आवाज ऐकताच थबकतो…आणि डेस्कच्यापाशी जाऊन बसतो एकदम सुन्न अशी अवस्था मिहीरची झालेली असते….

[ भयकथा लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे…लिखाणात काही त्रुटी असल्यास जरूर प्रतिक्रियेमार्फत मांडाव्यात ]