Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️सायली

सुमित बाथरूममधून बाहेर पडला आणि ओला टॉवेल त्याने तसाच बेडवर टाकून दिला. इतके दिवस “ओला टॉवेल बेडवर का टाकतोस?” म्हणून ओरडणारी त्याची बायको श्रुती, आज शांत राहून कपाटात काहीतरी शोधत होती.
सुमितचे आवरून झाले, तरीही श्रुतीचे आवरले नव्हते. ‘आज आपल्या बायकोला, बेडवर टाकलेला ओला टॉवेल दिसला कसा नाही? नाहीतर रोज घर डोक्यावर घेते ही..आज काय झाले हिला?’ सुमितला प्रश्न पडला.

“श्रुती, माझा डब्बा?” सुमित मुद्दाम ओरडत म्हणाला.

“डब्बा भरून ओट्यावर ठेवला आहे. तुझा तू घे आणि पाण्याची बाटली मात्र तेवढी भरून घे.” श्रुती शांतपणे म्हणाली.

इतक्यात बेल वाजली. सुमितने दार उघडले.
“कोण?”
“दादा मी इस्त्रीवाला. ते ताईंनी आज बोलावलं होतं.”
“सुमित त्यांना थांबायला सांग. आलेच मी.” श्रुती आतून ओरडली.

काही वेळातच ती सुमितच्या कपड्यांचा ढीग घेऊन बाहेर आली.
“दादा हे इस्त्रीचे कपडे. इथून पुढे दर आठवड्याला येऊन घेऊन जायचे आणि तयार करून आणून द्यायचे काम तुमचे.”
तशी इस्त्रीवाल्याने हसून मान डोलावली आणि कपडे घेऊन तो निघून गेला.

“अगं पण तू करतेस ना इस्त्री कपड्यांना? मग याला का बोलावले?” सुमित बाहेर पडत म्हणाला.
“मी एकटी काय काय करू? मीही तुझ्या सारखाच जॉब करते रे. सगळं एकटीनेच करायचं म्हंटल की मला टेन्शन येतं.”

हे ऐकूनही न ऐकल्यासारखे करत सुमित निघून गेला. तसे श्रुतीच्या डोळ्यात पाणी आले.

दहा वाजले, तसा श्रुतीने आपला लॅपटॉप उघडला. मीटिंगचा मेल आला होता, साडे दहाची मीटिंग होती. तिने थोडे प्रिपरेशन केले आणि ठीक साडे दहाला मीटिंग सुरू झाली, ती थेट बारा वाजता संपली.
आता भूक लागली म्हणून श्रुतीने पटकन उठून दोन पोळ्या लाटल्या आणि जेवायला बसली. जेवण झाल्यावर बेसिनमधला भांड्याचा ढीग पाहून तिला रागच आला. भराभरा भांडी घासून ती पुन्हा कामाला बसली.

एक वाजून गेला तरी, अजून श्रुतीच्या फोन कसा काय आला नाही? म्हणून सुमित वाट पाहत होता. ‘जेवलास का?’ म्हणून एरवी ठीक एक वाजता फोन करणारी श्रुती आज दोन वाजले तरी फोन करत नाही, म्हणून शेवटी सुमितनेच आज तिला फोन लावला.

“काय गं ठीक आहेस ना?” आज आठवणीने फोन केला नाहीस?” सुमित काळजीने म्हणाला.

“काही नाही रे. आज विसरले मी.” श्रुतीने तुटक उत्तर देऊन फोन ठेऊन टाकला.”

पुन्हा फोन वाजला. तसा सुमितनेच केला असावा म्हणून तिने वैतागून फोन उचलला.

“श्रुती, आज चार वाजता मीटिंग आहे. ती तू हॅण्डल करावीस अशी माझी इच्छा आहे. मी डिटेल्स पाठवून देतो, तू एकदा चेक करून घे.” बॉसचा आवाज ऐकून तिच्या डोक्यात तिडीक गेली.

“सॉरी सर. पण आज तब्येत ठीक नाही. खूप थकल्यासारखे झाले आहे. आजची मीटिंग आणखी कोणाला तरी द्या प्लीज.” आपला आवाज शक्य तितका नॉर्मल ठेवत श्रुती म्हणाली.

“हे असं करून कसं चालेल? तुम्ही ऑफिससाठी काम करता हे विसरता की काय?” बॉस थोडे चिडून म्हणाले.

“सॉरी सर. पण आज मी मीटिंग हॅण्डल करू शकत नाही..” श्रुतीने फोन कट करून टाकला आणि ती सोफ्यावर पडून राहिली.

‘खरंच जॉब करणे गरजेचे आहे का? सुमित बक्कळ कमावतो. तशी पैशांचीही गरज नाही. मग इतकी ओढा ताण कशासाठी?’ या विचाराने श्रुतीला रडू येत होतं.

थोड्या वेळासाठी काम बंद करून तिने आईला फोन लावला.

“श्रुत्या, अगं दिवाळीला येताय ना दोघे? या वर्षी तरी या. सासुबाईंना हवं तर मी सांगेन.” आई.

“बघते गं आई. सुट्टी मिळेल तसे येऊ आम्ही. श्रुती आईला म्हणाली.
मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तिने फोन ठेऊन दिला. आईशी बोलल्यावर तिला थोडं बरं वाटलं.

ती पुन्हा काम सुरू करणार इतक्यात सासुबाईंचा फोन आला.
“श्रुती, अगं कधी येताय गावाकडे? अजून फराळाचे पदार्थ करायचे आहेत. खरेदी बाकी आहे.”
“आई, यावेळी मला यायला जमणार नाही. ऑफिसला सुट्टी नाही. तुम्ही वहिनींना बोलावून घ्या. तसंही त्या दरवर्षी दिवाळीच्या पहाटेच उगवतात. या वर्षी थोडं काम केलं म्हणून काही बिघडत नाही. मला खूप थकल्यासारखे वाटते आहे आई. नाही तर तुम्हाला जमेल तेवढे करा. मी आल्यावर राहिलेले करेन.” श्रुती.

“अगं, असं कसं चालेल? आता तुम्ही दोघी नोकरीवाल्या. आता आम्ही काय बोलणार? यायचे तर या. नाहीतर तुमच्याविना सण साजरा व्हायचा राहणार तर नाही ना? काय करायचे ते करा.” सासुबाईंनी चिडून फोन ठेवला.

‘वहिनी दरवर्षी असेच करतात. सुट्टी असली तरीही अगदी दिवाळीच्या तोंडावर पाहुण्यासारख्या गावी येतात आणि दोन दिवसांनी माहेरी निघून जातात आणि मी मात्र सुट्टी काढून फराळाचे पदार्थ करण्यापासून, झाडलोट करण्यापर्यंत सगळे करायचे! कधीतरी मलाही बदल हवाच की.’ श्रुती मनातल्या मनात विचार करत राहिली.

तिचे ऑफिस एरवी सातला संपायचे. आज सहाला काम झाले, तसे श्रुतीने लॉग आऊट करून टाकले. बाहेर जाऊन फिरून आली तेव्हा जरा तिला रिलॅक्स वाटले.

आठ वाजता सुमित घरी आला. “श्रुती, अगं राहुल आणि प्रीती जेवायला येत आहेत. काहीतरी छानसे कर ना जेवायला. तेवढाच तुझा मुडही चांगला होईल.” सुमित उत्साहाने म्हणाला.

“आज मी जेवण बनवणार नाही. हवं तर बाहेर जाऊ जेवायला.” श्रुती चिडून म्हणाली.

श्रुती चिडलेली पाहून सुमितने आपल्या मित्राला फोन लावला. राहुल, “श्रुतीची तब्येत थोडी बरी नाही. आपण आजचा प्लॅन कॅन्सल करू या का?” सरतेशेवटी राहुल आणि प्रीती जेवायला आलेच नाहीत.

दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने श्रुती जरा उशीरा उठली. सुमित बाहेर हॉलमध्ये बसून पेपर वाचत चहाची वाट पाहत होता.

“अगं किती उशीर? चहाची वाट बघतो आहे मी.”

“अरे, मग एक दिवस तू चहा केलास तर काही बिघडले नसते. बरं, मी नाष्टा आवरून पार्लरला जाईन म्हणते. जेवायच्या वेळेपर्यंत परत येईन तर तू डाळ -भाताचा कुकर लावून ठेव. श्रुतीने जवळ त्याला जवळ ऑर्डरच सोडली.

“मी कुकर लावू?” सुमित प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला.
“हो.. लाव ना एक दिवस. रोज मी करतेच. आज तू कर.” श्रुती चहा करून आवरायला पळाली.

थोडया वेळाने पार्लरला गेलेली श्रुती फेशियल, हेड मसाज आणि छान हेयर कट करूनच सुमारे दोन तासानंतर पार्लर मधून बाहेर पडली.

ती घरी आली तेव्हा सुमित कुकर लावण्याचा प्रयत्न करत होता.
“अरे अजून कुकर नाही का लावलास?” श्रुती सुमितला वैतागून म्हणाली.
“अगं, मला कुठे येत कुकर लावायला? यु ट्यूब वर पाहिलं, तरी जमेना.” सुमितने कुकर श्रुतीकडे सोपवला.

“आत्ता मी शिकवते. पण उद्यापासून मात्र तू लावत जा.” श्रुती.

“किती छान दिसते आहेस..आणि केस किती कट केलेस?” सुमितचे बऱ्याच वेळाने श्रुतीकडे लक्ष गेले.
“हो.रे.. चेंज म्हणून काहीतरी तेवढेच वेगळे.” श्रुती.

“बरं आईचा फोन आला होता. तिने तुला आठवणीने फोन करायला सांगितला आहे.” सुमित.

“आता काय? मी कालच सांगितले आईंना. मी या वर्षी काही करणार नाही म्हणून.” श्रुती वैतागून म्हणाली.
“अशी का वागते आहेस? काही बिनसलं आहे का?” सुमित श्रुतीला जवळ घेत म्हणाला.

“नाही रे. या धावपळीतून मला थोडा ब्रेक हवा आहे. रोज उठा, कामं करा, जेवण करा आणि उद्याची चिंता करत झोपून जा. घरी जरी असले ना तरी मीही नोकरी करते. सगळ्यांना वाटतं घरून काम केले म्हणजे काय..निवांत काम आहे. पण तसे नसते. उलट जादाचे काम करावे लागते. शिवाय ऑफिस सांभाळून एकटीने घरचे सारे करायचे म्हणजे शरीरावर लोड येतो, तसाच मनावरही लोड येतो. शिवाय ऑफिसचे टेन्शनही असतेच जोडीला. मला थोडा बदल हवा आहे रे सुमित.” श्रुती सुमितच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.

“मग जॉब सोडून दे आणि नुसतं घर सांभाळ. माझे काही म्हणणे नाही.” सुमित तिला समजावत म्हणाला.

“नुसते घरी बसून काय करू? आणि कामाची इतकी सवय झाली आहे वेळही जाणार नाही माझा.” श्रुती रडायच्या बेतात आली.

“अगं रडतेस कशाला? हे घे रुमाल आणि पुस बघू डोळे. आत्ताच पार्लरला जाऊन आलीस ना? चेहरा खराब होईल मग..” सुमित तिला चिडवत म्हणाला.
“जा..तुझं वेगळंच काहीतरी.” श्रुती लटक्या रागाने सुमितला म्हणाली.

इतक्यात दार वाजले. धुणं भांडीवाल्या मावशी आत आल्या.

“ताई, काम होतं ना? त्या शेजारच्या साने आजींनी पाठवलं तुमच्याकडे म्हणून आले.”

हो. आम्ही दोघे ऑफिसला जातो, म्हणजे मी माझे काम घरूनच करते. सकाळी स्वयंपाक आवरतो, तर तुम्हाला दुपारी यायला जमेल का? भांडी आणि धुणं..एवढच काम आहे. बाकी झाडलोट आम्ही करू.” श्रृतीने सारी माहिती पुरवली आणि पैसे ठरवून मावशींना उद्यापासून यायला सांगितले.

“सुमित, उद्यापासून आपण कामाचे वाटप करून घेऊ. तू थोडी मदत करत जा मला. म्हणजे माझे काम हलके होईल आणि आता आमचे ऑफिस नियमित सुरू झाले की, मग जास्तच धावपळ होईल.”
इतक्यात श्रुतीला सासुबाईंचा फोन आला. “अगं तुझ्या मोठ्या जावेला मी मदतीला इकडे, गावाकडे बोलावून घेतले आहे. थोडी कुरकुर केली तिने, पण शेवटी येते म्हणाली. तुम्ही दोघेही इकडे जरा लवकरच या आणि तुझ्या आईचा फोन आला होता, भाऊबीजेला सुमितला आणि तुला तुझ्या माहेरी बोलावले आहे. दरवर्षी तुझी जाऊ जाते तिच्या माहेरी. पण या वर्षी तू जा. मी सांगेन तिला. तू नको काळजी करू आणि हो…तुझे सासरे म्हणतात, दिवाळी नंतर एखादी सहल काढा. कुठे गेलो नाही बऱ्याच वर्षात, तर सगळे मिळून जाऊया.”
सासुबाईंचे बोलणे ऐकून श्रुतीला खूप बरं वाटलं.

“आई, मी सुट्टी काढणारच आहे. येऊ आम्ही लवकर आणि दादा -वहिनींना विचारुन ट्रीपला कुठे जायचे हे निश्चित करून बुकिंग सुद्धा करू आम्ही. पण तुम्ही दोघीच फराळाचे पदार्थ करू नका हा..मी ही येते मदतीला.” असे म्हणत श्रुतीने फोन ठेवला.

“अगं आत्ता तर म्हणालीस ना, मला ब्रेक हवा आहे म्हणून? मग लगेच सुट्टी काढून येते म्हणून का सांगितलेस आईला?” सुमित गोंधळून म्हणाला.

“आईंनी मला समजून घेतलं ना, तेच खूप होत माझ्यासाठी. यावर्षी मला माहेरी जायला मिळेल. शिवाय आपण सारे मिळून ट्रीपला जाऊ..हा ब्रेक मिळेलच की! “श्रुती.

“तुम्हा बायकांना समजून घेणं म्हणजे कठीण काम आहे. घटक्यात तुम्ही स्वतःचे मत बदलता, खरचं अवघड आहे बाई!” सुमित.

“हो तर, आम्ही आहोतच तशा. आम्हाला समजून घेतलं की दुपटीने काम करतो. पण कधी छोटासा ‘ब्रेक’ हवा असतो आम्हाला.” श्रुती म्हणाली आणि तिने हसत हसत आपल्या जाऊबाईंना फोन लावला.

समाप्त.

====================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *