Ritbhatmarathi

Search
Close this search box.

”काही ताळतंत्रच राहिलेलं नाहीय या मुलीच्या वागण्याला…किती वाजलेत? काय ग वेळ कितीची सांगितली होतीस..?” दौलतराव बाहेरच्या गॅलरीत येरझाऱ्या घालत होते आणि आपल्या बायकोला जाब विचारत होते….रीमाताई मात्र शांतपणे ऐकून घेत होत्या…रीमाताईंची शांतता खूपच खायला उठत होती म्हणून दौलतरावानी आणखी जाब विचारायला सुरवात केली…

दौलतराव  – सगळ्यात लहान म्हणून तुम्हीच शेफारून ठेवलीत…काय तर म्हणे शौर्या…जरासं मुलीच्या जातीला साजेस नाव तरी ठेवायचं ना…लग्न झाल्यावर काय अशीच भटकत राहणार की काय..?

रीमा    – नावात काय आहे…चांगलंय नाव…नावाप्रमाणेच आहे ती धाडसी…

दौलतराव – चांगलं ऐरोबिकस….कूकिंग चे क्लासेस घ्यायचे…तर कराटेचे वर्ग घेतीय… होणाऱ्या नवऱ्याला काय सांगणार…आमची मुलगी लोकांना झोडपण्याचे ट्रैनिंग सेंटर चालवते..त्यांना कसं झोडपायचं याचे धडे देते…

रीमा      – खूप बोललात हा…वाईट लोकांना कसा धडा शिकवायचा याचं प्रशिक्षण देते माझी पोर…गरज आहे त्याची सध्या…कुणी वाईट नजरेनं पाहत नाही माझ्या मुलीकडं…

दौलतराव  – गल्लीतलं कुत्रही नाही पाहणार तिच्याकडे…एवढ निगरगट्ट झालीय ती…आजकालच्या मुलांना अशी निगरगट्ट बायको नाही चालत…आई बरोबर आहे ना…

सुनिताआजी – अगदी बरोबर बोललास पोरा…स्वयंपाक शिकव की तिला…शिकण्यासारख्या इतरही गोष्टी आहेत..घर कस चालवायचं, नवऱ्याला कस बांधून ठेवायचं हे महत्वाचं संसाराला…

घरात सगळ्या भावंडात सगळ्यात धाकटी असलेली शौर्या…आपल्या आईची म्हणजे रीमाताईची खूप लाडकी… शौर्याला कधीही स्वयंपाकात आवड नव्हती, नटणं-थटणं तर लांबचीच गोष्ट…काकूबाईचा वेष न आवडणारी म्हणून कायम जीन्स आणि टॉप असा मॅडम चा वेष….घरात सगळ्यांची बोलणी सुरूच होती…जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकेल तसतसं दौलतरावाच्या बोलण्याला उधाण येत होत…फायनली..घड्याळात ११ वाजले…दारात रॉयल इन्फिल्डचा आवाज येताच..रीमाताई घराबाहेर येतात…आपल्या लेकीला घरातलं वातावरण तापलंय याची पूर्वकल्पना देतात…तशी शौर्याला खूप चांगली समज असते आलेली सिच्युएशन कशी हाताळायची ते…अंगात सैलसर टॉप, हातात मोबाईल, केसांची घट्ट वेणी गुंफलेली आणि जीन्स असा मॅडमचा पेहराव…हातात चावी फिरवत शौर्या दिवाणखान्यात प्रवेश करते आणि आपल्या आजीला मीठी मारते…

शौर्या  –  सुनीआज्जी….काय ग…केवढी रागाने पाहतीस माझ्याकडं…तुला माहितीय मी आज कुठला डाव शिकवला…समोरचा आपल्याला पाठीमागून वार करत असेल तर त्याला कस चीत करायचं त्याचं ट्रैनिंग देत होते मी आज…तुझ्यावर कसा वार करू….

दौलतराव – मारा…मारा बाहेरच्यांना मारत होतीस तेवढ ठीक होतं..आता घरातल्यानाही सोडू नका…घरी उशिरा येऊन ही टिप्पलबाजी नकोय…

रीमा  – अहो…तिला नीट जेवण तर करू द्यात…शौर्या जा हात-पाय स्वच्छ धुव…लगेच जेवायला बस…चिंचगुळाच्या आमटीचा बेत आहे आज…

दौलतराव – करा…करा…फर्माईशी पूर्ण करा यांच्या…लग्न झाल्यावर काय नवरा करेल का यांच्या फर्माईशी पुऱ्या ? यांना तर अजून स्वयंपाकाचा ‘स’ माहिती नाहीय…कठीण आहे…[इतक्यात शौर्या आपलं आवरून जेवायला बसते ]

शौर्या   –  म्हणजे काय…नवराच पूर्ण करेल माझ्या फर्माईशी…

सुनिताज्जी –  अरे…दौलत…ते नेमळेकरांचं स्थळ आलं होत…काय म्हटली ती माणसं…

दौलतराव  – आई…त्यांना शौर्याचा फोटो आवडलाय…पाहण्याचा कार्यक्रम उरकला की मग दिवाळीपर्यंत बार उडवून टाकू लग्नाचा…

सुनिताज्जी – ते बरं झालं…केली पसंत एकदाची…फोटो आवडला ना…तेवढ रुपडं घेतलंय आईसारखं…तसे बाकीचे गुण घेतले असते तर…बरं झालं असत…

शौर्या – काय…ग आजी सारखं स्वयंपाक…स्वयंपाक…करत असतेस…एवढा महत्वाचा आहे का स्वयंपाक…बाईच्या जातीला कसं सगळं माहिती पाहिजे,  तरच जग पुढे जाईल…आणि काय मिळतं रांधून…शिव्याच खाव्या लागतात ना तुमच्या…मीठ जास्त झालं, भाजी सपकच झाली असं…गोडाचे शब्द तरी असतात का तुमचे..एवढं सगळं करून… मी तर सरळ सांगेन जमलं तर खा…नाहीतर मार कल्टी इथून…

रीमाताई – काय ही भाषा तुझी…कराटेपर्यंत ठीक आहे…जिभेला लगाम खेच ग तुझ्या..

शौर्या – कूल मम्मा…तू नको काळजी करुस…मी दुसरा नवरा करेल…[मोठ्याने हसते]

दौलतराव  – काय हे बोलणं…दुसरं लग्न म्हणे…आपल्या अक्ख्या खानदानात दुसरं लग्न कुणी केलं नाही…

शौर्या  – त्यात माझी काय चूक…?

दौलतराव – तोंड वर करून बोलू नकोस…हा तुला पाहायला येणारा मुलगा आहे…नीट तयार व्हायचं…दोन दिवसात येईलच इथं…त्याच्यासमोर नीट वाग म्हणजे झालं…नाहीतर शोभा करशील आमची… [शौर्यापुढे इन्व्हलप्स आपटतात आणि निघून जातात]

शौर्या – हम्म…काय आहे यात…नाव…संग्रामराव साहेबराव नेमळेकर …नोकरी….मेडिकल रेप्रेझेन्टेटिव्ह इन सिप्ला फौंडेशन…वय…२७…घरचा व्यवसायही आहे की…मग माझ्या कराटे ट्रैनिंग इन्स्टिटयूट बद्दल याच काहीच म्हणणं नसेल…म्हणजे मी लग्नानंतर कराटे शिकवू शकते…वाह….आवडला आपल्याला…मम्मा…चल गुड नाईट…बाय

दोन दिवसांनी शौर्याचा रीतसर बघण्याचा कार्यक्रम पार पडतो..त्यादिवशी तर शौर्याचं सौन्दर्य अगदी खुलून दिसत होतं…किरमिजी रंगाची साडी, त्यावर सुंदर असा राणीहार, केसांचा मस्त अंबाडा बांधलेला..खूपच सुंदर दिसत होती….सुनिताआजी तर नातींकडे पाहतच बसते आणि म्हणते..

सुनीताआजी  – आज पहिल्यांदाच मुलगी दिसतेस ग…असंच राहत जा ना..अशी राहिली असतीस तर केव्हाच लग्न झालं असत तुझं…

शौर्या  – आजी…बस झालं माझ्या सुंदरतेच कौतुक…हे सौन्दर्य काय आज आहे उद्या नाही…

रीमाताई     – काय हा टाइमपास लावलाय..चल बाहेर पाहुणे आलेत…

रीतसर बघण्याचा कार्यक्रम उरकून जातो. दोन दिवसांनी मुलगी पसंत असल्याचा निरोप येतो..घर कस आनंदून जात… ठरवल्याप्रमाणे शौर्याचं लग्न दिवाळीत थाटामाटात होऊनही जातं…नव्या सुनेचा गृहप्रवेश झाला…सगळीकडे चैतन्यच पसरलं जणू …शौर्याच्या सासरी खूपच प्रफुल्लित वातावरण झालं…दुसऱ्याच दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली…साधारण ४-५ दिवसांनी देवदर्शनाला जाण्याचं ठरलं…सकाळी लवकर आवरून सगळेजण देवदर्शनाला जाण्यासाठी निघाले…देवदर्शनही रीतसर पार पडलं…रात्री घरी परतायला खूप उशीर होणार होता म्हणून शौर्याचे दीर..खूप घाईत रस्ता कापत होते..पण रस्ता संपता संपत नव्हता..खूप घाईही करता येणार नव्हती कारण रात्रीचा प्रवास असल्याने खूप सावकाश जाणं भाग होतं..पण पुढे काहीतरी विपरीत वाढून ठेवलं होतं…शौर्या ज्या गाडीत बसली होती ती गाडी…

काही मुंडासेवाल्या भामट्यांनी अडवली आणि सोन-नाणं देण्यासाठी धमकावलं…” ए….चुपचाप बाहर निकलो सबके सब…और जो कोई पैसा है…सब का सब हमारे हवाले दे डालो..नही तो एक-एक कुत्ते की मौत जैसा मर जायेगा…निकलो सब के सब ” अशी तंबी ऐकताच गाडीमध्ये बसलेल्यांचे हात-पाय गळून पडले…कुणीही बाहेर निघेचना…कारण धारदार शस्त्र हातात असलेली ती माणसं होती…तेवढ्यात शौर्याला राहवलं नाही…ती बाहेर येऊ लागली…इतक्यात संग्रामने शौर्याला टोकले…

संग्राम  – शौर्या…वेड लागलंय का तुला..बाहेर जाऊ नकोस…त्यांच्याकडं शस्त्र आहेत…तू निःशस्त्र आहे…

शौर्या   – संग्राम…अहो…जायला पाहिजे मला…

संग्राम – तुला काही झालं..तर आम्ही तुझ्या वडिलांना काय उत्तर देऊ..आम्हाला दारात उभा करतील का तुझे वडील…कृपा करून कुठेही जाऊ नकोस…

शौर्या  –  त्यांना काय फरक पडणारे…मी असले काय…नि नसले काय…मी बाकी आज माझं नाव सार्थकी लावणार आहे….कृपा करा आणि ऐका माझं…

शेवटी शौर्याने आपल्या नवऱ्याचही काही एक ऐकलं नाही….गाडीबाहेर निघताच मुंडासेवाल्याना एकटी सामोरे गेली…मुंडासेवाल्याने तिच्या समोर वार केला…तसं…शौर्याने एका हाताने शस्त्र पहिले खाली पाडले…कारण शौर्याला कराटे चॅम्पियन असल्याने माहित होत…की जर समोरचा शस्त्राचा धाक दाखवत असेल तर त्याला निःशस्त्र करणं हे महत्वाचं असतं…शौर्याने अगदी तसंच केलं…मग मुंडासेवाल्याचा एक हात पकडून त्याला जमिनीवर पाडलं…फटका इतका जोरात बसला की मुंडासेवाल्याचं डोकं जोरात आपटलं…नंतर दूसरा मुंडासेवाला शौर्याच्या मागून वार करू पाहत होता…शौर्याने क्षणाचाही विलंब न लावता मुंडासेवाल्याचा गळा एका हाताने पकडला…तर दुसऱ्या हाताने जोरात मुष्टिप्रहार करू लागली…गळा दाबल्याने मुंडासेवाल्याला श्वास घ्यायला अडथळे आले…म्हणून तो लगेच बेशुद्ध पडला…आपली बायको एकटीच त्या भामट्यांबरोबर झुंज देतीय..हे पाहून संग्रामही गाडीबाहेर पटकन आला…डिकीत असलेल्या चाकूचा धाक दाखवून उरलेल्याना पळून जायला भाग पाडलं…गाडीमधून सगळेच शौर्याच्या पराक्रमाने चकीतच झाले..काही तासाने शौर्या पाणी प्यायली..मगच गाडीत बसली..घामेघूम झालेल्या शौर्याला कधी झोप लागली हे कळलंच नाही..आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन शौर्या निवांत झोपली…

देवदर्शन करून आल्यावर दुसऱ्या दिवशी शौर्याच्या शौर्याचे किस्से नेमळेकरांच्या घरातून ऐकू येऊ लागले…सगळीकडं शौर्याच कौतुक झालं….पाहता-पाहता ही बातमी शौर्याच्या माहेरी जाते…जिथे कधीही शौर्याच कौतुक होत नसे…ज्यावेळी शौर्याची बातमी कळली तेव्हा मात्र रीमाताई  बोलल्या…”पाहिलंत…शौर्याच्या चांगल्या गुणांचं कधी कौतुकच केलं नाहीत तुम्ही…कायम तिला तिरसटसारखी वागणूक मिळाली या घरात..म्हणतात ना…ज्याचे हाल होतात त्याच्या नशिबात नेहमी चांगलंच होत असत..तसंच माझ्या धाकट्या लेकीच्या बाबतीत झालंय…सासरचे सगळे आता तिला उचलून धरत असतील…स्वयंपाक येणंच प्रत्येक वेळी जरुरी नसत..स्वयंपाक येऊन काय होणारे…डोळ्यात पाणी गाळत राहिली असती…आपल्या आर्या आणि वीरा सारखं…बाईच्या डोळ्यात पाणी दिसलं की समोरचा तिला कमी लेखतो…आणि आयत कोलीत सापडते बाई..म्हणूनच मी समोरच्याशी दोन हात करू शकेल इतकी धमक तिच्यात निर्माण केली…पुढे त्याचा उपयोगचं झाला की तिला..आता यापुढे तिच्याविरुद्ध एकही अवाक्षर मी ऐकून घेणार नाही…म्हणून समोरच्याला कमी लेखताना हजारवेळा विचार करायचा..”

आपल्या बायकोचं असं बोलणं ऐकून पुढे कुणीही काहीही बोललं नाही…सगळे अपराध्यासारखा ऐकून घेत होते…रीमाताईंची कॉलर आपोआपच ताठ झाली…आणि आपलं वर्चस्व सिद्ध केलं…

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories