Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सकाळी सकाळी उठून दूध तापवणे, ब्रेकफास्टची तयारी करणे, वल्लरीचं आवरणं तोपर्यंत कामाच्या बाई आल्या की त्यांना सूचना देऊन स्वयंपाक करून घेणं आणि मग वल्लरीला डबा भरून देऊन शाळेच्या बसमध्ये बसवून येणं. संध्याकाळी ऑफिस सुटलं की जवळच्याच एका मावशींकडे पाळणाघरातून वल्लरीला घेऊन येऊन मावशींनी सकाळी केलेला स्वयंपाक ओव्हनमध्ये गरम करून दोघांची जेवणं आणि रात्री दहाला पाठ टेकणे या रुटीनचा श्रीरंगला आता अगदी कंटाळा येऊ लागला होता. बरं इतकं करून वल्लरीच्या चेहर्‍यावर तो समाधान आणू शकत नव्हता याची त्याला खंत होती.

ना वल्लरी चिडचीड करायची ना आरडाओरडा, पण तिच्या चेहर्‍यावर कधीही आनंद, समाधानही नसायचे. ती सदानकदा एखाद्या मलूल फुलासारखी असायची कोमेजलेली.

श्रीरंगपण बिचारा हैराण होऊन जायचा, कधी चिडायचा, कधी तिच्यावर मोठ्याने ओरडायचा, पण परत त्यालाच वाईट वाटायचे मग तिला जवळ घेऊन खूप रडायचा, बिचार्‍या वल्लरीला आईचे प्रेम नाही, पण निदान वडिलांचे तरी प्रेम मिळुदे या भावनेने तो प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता, पण वल्लरी त्याला म्हणावी तशी साथ देत नव्हती, तिच्या मनात काहीतरी होते ते त्याला कळत नव्हते. ती त्याला मदत करायची, त्याच्याविषयी कोणतीही तक्रार करायची नाही, पण तरीही इतर मुलं-मुली जशी वडिलांशी आत्मीयतेने बोलतात तशी ती बोलत नव्हती. तिच्या स्पर्शात त्याला खूप माया जाणवायची, पण ती शब्दातून व्यक्त होत नव्हती. याचे कारण एकच तिच्या मनावर झालेला आघात.

वल्लरी पहिलीत असतानाच तिची आई देवाघरी गेली होती. देवाघरी जाणं म्हणजे काय हे सगळं समजण्याच्या पलीकडे तिचं वय होतं. पण जेव्हापासून आई गेली तेव्हापासून वल्लरी खूप भेदरलेली दिसायची. सहसा बाबाच्या जवळ पण जायची नाही. जेवढ्यास तेवढंच बोलायची.

काय करावं या मुलीचं? हिला कुठच्या तरी मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवुया असं श्रीरंगने ठरवलं, पण नोकरी आणि घरच्या कामाच्या व्यापात त्याला ते शक्य होत नव्हतं आणि कशाला उगाच मानसोपचार तज्ज्ञांकडे जरा मोठी झाली की होईल सर्व नीट हाही एक विचार असायचा.

वल्लरीचं आणि श्रीरंगचं रुटीन सुरू होतं, कामवाल्या मावशी, पाळणाघरातील आजी वल्लरीशी प्रेमाने बोलत असत, पण वल्लरीच्या वागण्यात काहीच बदल होत नव्हता, ती दिवसेंदिवस एकलकोंडी होत चालली होती.

एक दिवस मात्र वेगळाच अनुभव श्रीरंगला आला. वल्लरी शाळेतून आल्यावर तिच्या चेहर्‍यावर जरा प्रसन्न भाव होते. ती अगदी मोकळेपणाने नाही, पण तिच्या वागण्यातलं नेहमीचं अवघडलेपण जरा कमी वाटत होतं. ती श्रीरंगशी आपणहून एखाद-दुसरा शब्द बोलत होती. श्रीरंगला हायसं वाटलं. वल्लरीच्या आईच्या फोटोकडे पाहून त्याने हलकसं स्मित केलं. पोरगी सुधरेल आता असं त्याला वाटू लागलं. त्या आठवड्यात तिच्या वागण्यात बराच फरक दिसत होता. एक दिवस श्रीरंग ऑफिसमधून आल्यावर वल्लरीने श्रीरंगला सांगितले, ‘‘उद्या त्याला शाळेत तिच्या मॅडमनी बोलावलं आहे.’’

श्रीरंगला महत्त्वाच्या मिटींग्ज होत्या. ‘‘तू काही मस्ती केलीस का?’’ असं वैतागूनच श्रीरंगने वल्लरीला विचारलं. बिचारी वल्लरी एवढंसं तोंड करून बसली. तिच्या प्रफुल्लित चेहर्‍यावर दु:खाचे ढग जमा झाले. आणि आता त्या ढगातलं पाणी अश्रूरुपान तिच्या डोळ्यांतून वाहणार असं श्रीरंगला वाटलं. उगाच ओरडतो आपण या छोट्याशा जिवावर असं वाटून तो मनातल्या मनात खजील झाला.

‘‘वल्लरी ऽऽ’’ त्यानं प्रेमाने हाक मारली. ‘‘अगं मला मिटींग होती महत्त्वाची, पण येईन मी तुझ्या शाळेत म्हणत त्याने वल्लरीला जवळ घेतले. ती त्याच्या मिठीत विसावली आणि खुदकन हसली तिला मॅडमचे शब्द आठवत होते,

‘‘बोलावच उद्या तुझ्या बाबाला त्याला चांगलं खडसावते…’’ बाबाला कोणीतरी ओरडणार या कल्पनेनेच ती सुखावली होती, पण तसं ती सांगू शकत नव्हती.

सकाळी सकाळी वल्लरी आणि तिचे बाबा लवकर आवरून शाळेत गेले. शाळेत जाताना वल्लरी आपल्या नवीन आलेल्या मॅडमबद्दल खूप काही बोलत होती तिचा उत्साह ओसंडून वाहात होता. या मॅडम किती चांगल्या आहेत, आपल्याशी किती प्रेमाने बोलतात असं सगळं ती श्रीरंगला सांगत होती, श्रीरंगला त्यातलं कितपत कळत होतं देवास ठाऊक, पण एरवी जराही न बोलणारी आज कशी चुरूचुरू बोलत होती याचं त्याला आश्‍चर्यच वाटत होतं. आणि त्याला आठवलं परवाच स्वयंपाकाच्या मावशीनी सांगितलं होतं,

‘‘आजकाल वल्लरी जरा आवडीने जेवते, हसते, खेळते पहिल्यासारखी बुजत नाही.’’ तसंच पाळणाघरातल्या मावशींनीही सांगितलं होतं,

‘‘वल्लरी आता अगदी शहाणी मुलगी झाली आहे हा. पहिल्यासारखी गप्प गप्प राहात नाही, खूप बोलते शाळेत.’’ मग त्याने डोक्यावर हात मारून घेतला, आपल्या कामाच्या व्यापात आपल्याला हा बदल लक्षातच नाही आला. पण असो. आता त्याच्या चेहर्‍यावर आनंद पसरला होता.

शाळेच्या पटांगणातून ती दोघं वल्लरीच्या क्लासरूममध्ये आली. वल्लरीला तिथे सोडून श्रीरंग स्टाफरूमकडे वळला. तेव्हा त्याला तिथे एक प्रौढशी व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीला पाहताच श्रीरंगला काय बोलावं सुचेचना. त्यानं एकदम बाई म्हणून त्यांना नमस्कार केला.

‘‘श्रीरंग कसा आहेस तू?’’ त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आज कितीतरी दिवसांनी कुणीतरी मायेने त्याची चौकशी केली होती.

‘‘मी छान आहे, पण तुम्ही कुठे होतात? मला विसरलात का?’’ वल्लरी क्लासरूममध्ये न जाताच बाबांकडे आणि आपल्या नव्या मॅडमकडे पाहात तिथेच उभी राहिली होती. बाबा रडतो आहे असं वाटताच ती पळत बाबाकडे आली. मॅडमनी तिला समजावून परत वर्गात पाठवलं आणि मी बोलावलं की ये असं सांगितलं.

श्रीरंग एका अनाथ आश्रमात वाढलेला मुलगा होता. त्याने अनाथ आश्रमातील एका मुलीशीच लग्न केलं होतं या लग्नाला आश्रमातून विरोध होता कारण वल्लरीच्या आईची तब्येत पहिल्यापासूनच नाजूक होती. पण प्रेम आंधळं असतं म्हणतात ते असं. श्रीरंग आणि वल्लरीच्या आईने लग्न केलं.

सुकन्या मॅडम तिथली व्यवस्था पाहात असत आणि मुलांना चित्रकलाही शिकवत असत. श्रीरंगवर त्यांचा विशेष जीव होता. श्रीरंगचं लग्न झाल्यावर काही वर्षांनी त्यांनी तो जॉब सोडला आणि अलीकडे काही दिवसांपूर्वी या शाळेत त्या काही कालावधीसाठी आवड म्हणून रुजू झाला. वल्लरीला बघताच त्यांना श्रीरंगची आठवण झाली कारण चेहर्‍यात साम्य होतंच. मग तिचं नाव, गाव त्यांनी प्रेमाने विचारून घेतलं आणि त्यांना कळलं की, ही आपल्या श्रीरंगचीच मुलगी आहे. काही दिवसांतच वल्लरी आणि त्यांच्यात मायेचे बंध निर्माण झाले. त्यांच्या प्रेमळपणाने आणि त्यांनी तिला नीट समजावून घेतल्याने वल्लरीच्या वागण्यात बदल झाला होता, पण एकदा श्रीरंगला भेटणंही त्यांना आवश्यक वाटलं.

त्या श्रीरंगला सांगत होत्या की, ‘‘वल्लरीच्या मनाच्या कप्प्यात कुठेतरी आपल्या वडिलांबद्दल अशी भीती बसली होती की, आपले वडील आईला कुठेतरी घेऊन गेले आणि परत आणलंच नाही आता ती हरवून गेली आहे. भीतीमुळे तिने आई का दिसत नाही हेही तिने विचारायचं धाडस केलं नाही. आपल्यालाही एक दिवस बाबा असंच कुठेतरी नेऊन सोडेल अशी सततची चिंता तिच्या बालमनाला सतावत होती आणि म्हणून ती गप्प गप्प होती.’’

आज श्रीरंगला बोलावून मॅडमनी वल्लरीच्या मनातली ही भीती सांगताच तो एकदम आवाकच झाला.

आता त्याला वल्लरीच्या वागण्यातला बुजरेपण का होतं ते कळलं आणि अलीकडे तिच्यात आलेला मोकळेपणा जाणवला. मॅडमच्या प्रेमळ सहवासाने ती थोडीशी आश्‍वस्त झाली आणि तिच्या मनातली भीती तिने प्रथमच फक्त त्यांनाच बोलून दाखवली हे श्रीरंगच्या लक्षात आले.

श्रीरंगचे डोळे अश्रूने भरले होते. मॅडमनी वल्लरीला बोलावून घेतले होते. वल्लरी पळत येताच श्रीरंगने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला,
‘‘बाळा, मी तुला कुठेही दूर नेऊन सोडणार नाही. तू फक्त माझी आहेस.’’

वल्लरीने आपल्या चिमुकल्या हाताने बाबांच्या गळ्याला मिठी मारली आणि तिने इतके दिवसांची मनातली भीती अश्रूंद्वारे बाहेर फेकली आणि वडिलांचा हात मोठ्या विश्‍वासाने धरला. तिच्या मलूल चेहरा आता प्रफुल्लित दिसू लागला होता.

‘‘बाबा, बाबा मीही तुला सोडून कुठे जाणार नाही.’’

त्या पितापुत्रांची भेट पाहून मॅडमची डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहात होते.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *