Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©®राधिका कुलकर्णी.

अंब्याच्या झाडात सळसळ ऐकु आली तसे चारूहासने कान टवकारले. नुकतीच सकाळ झालेली. तोंड धुवुन तो हातच पुसत होता तेवढ्यात झाडावरच्या पानांच्या हालचालीने तो सवयीने त्या डेरेदार वृक्षाखाली उभा ठाकला. ही त्याची रोजचीच सवय. तोंड धुतले की अंब्याजवळ घुटमळायचे आणि भारद्वाजाचे दर्शन करूनच दिवसाची सुरवात करायची. 

चारूहास चिपळूणकर. दिसायला फार काही देखणा म्हणता येईल ह्या कॅटॅगेरीत मोडणारा नव्हता पण तरीही त्याच्या चेहऱ्यात एक आकर्षण होतं.दिसायला काळा सावळा परंतु अतिशय तरतरीत ,बोलके डोळे आणि मधूर वाणी. आपल्या बोलण्याने तो समोरच्याला जिंकून घेत असे. पण मुळातला बुजरा स्वभाव त्यात चिपळूण सारख्या लहान गावात वाढलेला. त्यामूळे मनावर तसेच बाळबोध संस्कार. पूढे भरपूर शिकून प्रगती करून चांगल्या एमएनसी मधे जॉबला लागला तरीही मन तसे पापभिरूच. 

लहानपणापासून घरातल्या वडीलधाऱ्यांच्या तोंडून ऐकून ऐकून त्याला हे पाठ झाले होते की सकाळी उठल्याबरोबर जर भारद्वाज पक्षाचे दर्शन घडले तर तो विलक्षण शुभ योग असतो. मग ती सवयच जडली शरीराला. सकाळी उठल्याबरोबर आधी अंगणात जायचे आणि लिंबाच्या, आंब्याच्या नाहीतर इतर कोणत्याही झाडांवर ह्या पक्षाची जोडी जिथे कुठे फिरत असेल ती शोधून त्याचे दर्शन घेऊनच बाकी कामांची सुरुवात करायची.. ह्या सगळ्यात लहानपण सरून तो कधी तरूण झाला हेही कळले नाही. काळानुरूप माणसाच्या आचार विचार आणि कृतीमधे अनेक बदल घडतात  पण चारूहासच्या बाबतीत त्याची ही सवय मात्र तशीच त्याच्या तारूण्याला चिकटून पुढे सरकली. आज एका मल्टी नॅशनल कंपनीत कामाला असूनही ही त्याची जूनी खोड जराही बदलली नाही.

आजही नेहमी प्रमाणेच सकाळी सकाळी तो त्याचसाठी अंगणात आला होता. खूप बारकाईने निरीक्षण करूनही त्याला फक्त लाल डोळा चमकताना दिसला. भारद्वाजाचे दर्शन काही झाले नाही. मन खूप हिरमुसले आणि तो तसाच माघारी फिरला. त्याची पाठ वळताच प्रचंड फडफड जाणवली तसे तो गरकन वळला पण पून्हा सामसूम. पक्षीराजांचा आज काही दर्शन देण्याचा मूड दिसत नव्हता. त्याचा साधा मागमूसही दिसत नव्हता.

तेवढ्यात आईचा आवाज कानी आला..

“चारूऽऽ अरे किती वेळ अंगणात घुटमळशील आता? ऑफीसला जायचे नाही का आज?”

“आलोऽऽ …. आलोऽऽ.”

असे म्हणत नाईलाजाने चारूहास घरात परतला.

ऑफीसला जायची घाई तर होतीच. त्यात आज एक इम्पॉर्टंट मिटींगही होती.बॉसने कालच सगळ्यांना वेळेत येण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्यामूळे पक्षी दर्शनाचा नाद तिथेच सोडून तो न्हाणीघरात गेला.गावाकडे अजूनही मोठमोठ्या न्हाणीघरात बंबावरच पाणी तापवतात कारण लाकूड फाटा तसा सहज उपलब्ध होतो.आणि तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याने स्नान शरीराला उपयुक्त असे आयुर्वेदात सांगितलेले असल्याने चारूच्या घरात अजूनही बऱ्याच पारंपरिक गोष्टी तशाच पुढच्या पिढीने टिकवून जतन करून ठेवल्या होत्या.

 घंगाळात बंबातील गरम पाणी सोडून तिथेच दगडी चौरंगावर बसुन चारूने स्नान उरकले. घाईघाईत पूजाही आटोपली. आईने दूपारच्या जेवणाचा डबा तयारच ठेवला होता तो गाडीच्या डिकीत ठेवुन त्याने गाडीला किक मारली. गाडी सुरू करून आता निघणार तोच कडूलिंबावर तोच लाल ठिपका पानातून डोकावताना दिसला. चारूची जाणारी पावले पुन्हा नव्या आशेने थांबली. भारद्वाजाचे दर्शन घडले नाही तर दिवस खराब जातो ही त्याची समजूत इतकी पक्की झाली होती की त्यासाठी जीवाचे रान करून तो भारद्वाजाचे दर्शन घेई म्हणजे घेईच. पानातली सळसळ ऐकून तो पून्हा सावरला. गाडीचा आवाजही न होऊ देता तो लिंबाखाली आला. सभोवार नजर फिरवली परंतु पुन्हा तीच निराशा. भारद्वाज आताही कुठे तरी दडी मारून लपंडाव खेळत होता चारूहास बरोबर.

रोजचे दर्शन केल्याखेरिज दिवसाची सुरवात होत नसलेला चारूहास आज खट्टू होऊन काहिशा निराशेनेच ऑफीसला पोहोचला.

गाडी पार्क करून आत आला. आज ऑफीसमधे वेगळीच लगबग चाललेली. मिटींग्ज तर ह्या आधीही व्हायच्याच की पण आजची तयारी मिटींगसाठीची वाटत नव्हती. मग काय कारण! 

चारूहास जरा विचारात पडला. आपल्या स्केड्यूल चार्टला आपण चेक करायला विसरलो तर नाही ना? मनात विचार येताच खात्री करायला त्याने आजच्या कामाचा सगळा प्लॅन चेक केला. मिटींग सोडता त्यात नवीन काहीच अपडेशन झालेले नव्हते.

इकडे जो तो एकदम अपटूडेट अवस्थेत आपापल्या जागी अलर्ट पोझिशनमधे स्थानापन्न झालेला. चारूहासने नेहमीच्या ड्रॉवरमधे लंचबॉक्स आणि सॅक टेकवून आपल्या क्युबिकल मधे बसला. पासवर्ड टाकुन लॉग इन होतोय तोच वसंताने गरमागरम चहा आणला. सगळ्यांना सर्व्ह करत शेवटी चारूहासच्या टेबलावर आला. वसंता चहा सर्व्ह करतच होता की चारूने त्याला हळू आवाजात विचारले

वसंता ऽ आज कुछ स्पेशल है क्या ? ऑफिस में इतनी रौनक किस बात की..?

वसंता….. ऑफिसमधले एक इरसाल कॅरेक्टर. अधेड उम्र वयाचा शिपाई कम् सगळ्यांचा ‘ऑल टाईम ॲव्हेलेबल ‘ चा अदृश्य बोर्ड कपाळावर घेऊन मिरवणारा हरहुन्नरी प्राणी. तसा खूप मुरलेला त्यामुळे ऑफिसात चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीची ह्याला खडानखडा माहिती असे. बॉसचा मूड आज कसा आहे पासून तो आज कुणावर चिडणार आहे,आज कुणाला प्रमोशन,इन्सेटीव्ह डिक्लिअर होणार ,कुणाची चंपी कोणाचे कौतुक इथपासून कोणती फाईल कुठे, इथपर्यंतची त्याला इत्यंभूत माहिती असे… पणऽऽ…पण… पण..  त्याची एकच वाईट खोड होती. कुठलीही इन्फर्मेशन तो फुकट देत नसे. प्रत्येक माहितीची एक किंमत असे.

कोणी जर सांग ना ‘पैसा बाद मे दुंगा’ म्हणाले की तो लगेच म्हणायचा ‘फिर इन्फर्मेशन भी बाद मे ही लेना।’ त्याच्या ह्या उत्तरावर नाईलाजाने लोक त्याच्याकडची गूप्त माहिती तो सांगेल ती गोष्ट देऊन मिळवत असत.

त्याचा एक अनुभवातून तयार झालेला फेमस डायलॉग होता

 ‘ महंगी चीजे खैरात मे नहीं बॅंटती। फोकट मे दी हुई चीज का मोल झीरो होता है । ‘  

म्हणुनच एखादी माहिती त्याच्याकडून हवी असल्यास त्याचेही इन्सेटीव्ह्ज द्यावे लागायचे त्याशिवाय त्याच्याकडून बातमी काढणे म्हणजे ‘शेर के मुॅंह से निवाला छिनने’ के बराबर मुश्किल था।

आताही तेच झाले. चारूच्या प्रश्नावर छद्मीपणे हसत टेबलावर चहा टेकवत काही न बोलता तिकडून निघून गेला. त्याच्या ह्या कृतीने चारु समजून चुकला की नक्की काहीतरी आहे पण हा सांगणे टाळतोय. आज चारूहासचा मूडही फारसा बरा नव्हता. पण सगळ्या ऑफीसला माहिती ते आपल्याला नाही म्हणजे ही न्यूज काही एकट्या वसंतालाच माहिती आहे असेही नव्हते. तो कुणाकडूनही हे जाणून घेऊ शकणार होता. त्यामूळे वसंताला जास्त भाव द्यायचे त्याने टाळले. चहा संपवून आपल्या इतर कलीग्जंना तो विचारायला जाणार इतक्यात वसंता मोठ्यांदा ओरडला.

” भारद्वाज आया। “

चारूहासचे कान एकदम खडे झाले.

 ” कहाँ है? ” 

काहीशा आश्चर्यातच त्याने इकडे तिकडे नजर फिरवत वसंताला विचारले.

“वो देखो गेट के पास।” 

बोलता बोलताच लगबगीने वसंता गेटकडे गेला. 

उत्सुकतेपोटी चारूहासही वसंताच्या मागोमाग गेला. सकाळी निसटलेले दर्शन आता होणार ह्या कल्पनेने हुरळलेला चारूहास गेटकडे येऊन सभोवार नजर फिरवला. परंतु भारद्वाज तर दिसतच नव्हता कुठेही.

गेटच्या दिशेने बघताच बॉस गाडीतुन उतरत असताना त्याला दिसले. बॉस बरोबर अजून एक तरूण तडफदार साधारण चारूहासच्याच वयाचा एक युवक वर चालत येत होता. .पण भारद्वाज…….???

तो कूठे होता??

अधिरतेने चारूहासने पून्हा बाजूलाच उभ्या असलेल्या वसंताला विचारले, 

“कहाँ दिखा तुम्हे भारद्वाज?मुझे तो नही दिखाई पड रहा!!”

काहीशा विचित्र नजरेने आपादमस्तक चारूहासला न्याहाळतच वसंता उत्तरला,

“वो क्या ब़ॉस के बगल में।” 

बॉसच्या आजूबाजूला तर असा कोणताही पक्षी दिसत नसताना वसंता का आपली मस्करी करतोय? खिन्न मनाने तो आपल्या क्युबिकलकडे गेला. तोपर्यंत बॉसने ऑफिसमध्ये प्रवेश केला.

सोबत एक नवीन तडफदार तरूणही सुटाबुटात बॉसच्या बाजूला उभा राहिला.

सगळ्यांनी टाळ्या वाजवून ग्रीट केले.चारूहासनेही काही समजत नसतानाही सामूहिक कृती करत टाळ्या पिटल्या. टाळ्यांचा ओघ ओसरल्यावर बॉसने सोबत आलेल्या तरूणाकडे अंगूली निर्देश करत सांगितले.

” Hey guys, meet our new boss Mr. Suhas Bhardwaj. He wl be new incharge of this office and your immidiate boss onwards. 

कल से सारा काम येही देखेंगे. उनको भी सपोर्ट करना जैसे मुझे किया।”

आत्ता कुठे चारूच्या डोक्यात ट्यूब पेटली.म्हणजे वसंता खरे बोलत होता तर!

कधी नव्हे ते त्याने कोणत्याही अपेक्षेविना खरी माहिती दिली होती.चारूचे मन प्रसन्न झाले.असे नाही तसे भारद्वाजचे दर्शन तर चूकले नाही आपले.. आणि आता रोजच काही नाही तरी ह्या भारद्वाजाचे दर्शन तरी नित्यनेमाने घडणार.

आपल्या विचारांवर चारू मनातच हसला.

पुन्हा एकदा सगळे टाळ्या वाजवताना ऐकून चारू भानावर आला. सगळा स्टाफ चारूहासकडे प्रसन्नतेने बघत होता.

चारू बुचकळ्यात पडला. माझ्याकडे का बघताहेत हे? मी चुकून मनातला संवाद मोठ्याने बोललोय का?

त्याची अस्वस्थता बघून बॉस त्याच्याजवळ येवून म्हणाला.

डोंण्ट गेट कनफ्युज्ड यंग मॅन. यू डिझर्व्ह दिस प्रमोशन!

किप इट अप! ऑल द बेस्ट!

लेट्स सेलिब्रेट …..!

त्याचा त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. जाता जाता जून्या बॉसने ह्या वर्षीचे जे प्रमोशन्स डिक्लीअर केले त्यात चारूचा पण समावेश होता.

काही अंशाने का होईना त्याची श्रद्धा आज खरी ठरली होती. ह्या भारद्वाजाचा शकून त्याला खरच लाभला होता.

मनाशीच हसत शकुनाची परडी उचलत चारूहास आपल्या क्युबिकलकडे वळला.

———————–(समाप्त)—————————

समाप्त

©®राधिका कुलकर्णी.