Ritbhatmarathi

Search
Close this search box.

वेडे बनून पेढे खाणे कधीही चांगले…

घरातल्या प्रत्येक समंजस सुनेसाठी खास लेख…आपण कितीही चांगले वागत असलो तरीही समोरच्याचे त्यात समाधान नसते, म्हणून प्रत्येक वेळी समंजसपणा दाखवणं हाही एक प्रकारे चांगल्या असणाऱ्या व्यक्तीवर झालेला अन्यायच असतो…मग हा अन्याय असाच मुकाट्यानं सहन करणं हा त्यावरचा उपाय नक्कीच नसतो…मग उपाय नेमका काय…हे मयुरीची गोष्ट वाचल्यावर वाचकांना नक्कीच कळेल…म्हणून वाचक मंडळीहो हा लेख आवडला तर नक्कीच लाईक करा…शेअर आणि कंमेंट करायला विसरू नका…           

मयुरीने दुपारी सगळी काम आवरून नुसतं अंग टाकलं होत…मुलांची शाळा दुपारी असल्याने दुपारी बराचसा वेळ मयुरीला रिकामा मिळत असे, म्हणून मयुरी जरासा आराम मिळावा म्हणून आपल्या बेडवर आराम करत होती…आणि मनात खूप साऱ्या विचारांचं काहूर माजलं होत…’मी अविनाशशी लग्न करून चूक तर नाही ना केली? मी आर्किटेकचर ची पदवी उगाचच घेतली…आपण खूप मर-मर मरतो सगळ्यांसाठी…. पण कुणाला काहीच किंमत नसते आपली…आपण सगळ्यांच्या मनाचा विचार करतो..पण आपल्या मनाचा विचार कुणीच कसं करत नाही…तोंडात घास आणि मानात बुक्की असं आयुष्य आपण जगत आहोत. एकेकाळी कॉलेज मध्ये असताना अविनाश माझ्या नेहमी मागे-मागे करायचा..आता माझ्याकडे मी पाय घसरून पडले तरीही पाहत नाही…उलट मलाच म्हणतो सरळ चालता येत नाही का म्हणून…लग्नाआधी तुला नोकरीची काय गरज असं बजावून सांगितलं….. मी पण अविनाशचाच विचार पहिला केला…पण माझ्या शिक्षणाची साधी किंमत असू नये अविनाशला…एकेकाळी मला सगळे ब्युटी क्वीन म्हणायचे ….आता अविनाश साधी क्वीनही म्हणत नाही…’ दमलेल्या…खंगलेल्या…खजील मयुरीच्या मनात असे असंख्य प्रश्न घर करून उभे होते…शेवटी मयुरीला कधी गाढ झोप लागली हे कळलंच नाही…

झोपेत असताना मयुरीला आपण स्वतः एका चिखलात पडलेलो आहे असं भासलं आणि आपला नवरा अविनाश आपल्या बायकोला काढायला पुढेही येत नव्हता…उलट आणखीनच खिजवत म्हणत होता…

अविनाश  – सांगितलं होत ना खड्ड्यात जाऊ नकोस…आता अडकलीस ना…मी नाही काढणार तुला बाहेर…

मयुरी   – अविनाश….अरे बुडेल मी या गाळात…ये ना…पकड ना मला…

अविनाश  – नाही. तुला याची शिक्षा मिळालीच पाहिजे…

मयुरी – अविनाश तू तरी असं बोलू नकोस…मी लग्नाची बायको आहे तुझी…बरोबर आहे शिक्षाच आहे माझ्यासाठी…हा संसार म्हणजे या गाळा सारखाच आहे..त्यात मी अडकून बसलीय…ना मला कोणी सावरायला येतंय…ना कुणी हात द्यायलाही…आता मला या गाळातून एकटीला बाहेर यावंच लागेल…नाहीतर हा चिखल माझाही एक दिवस घात करेल…

इतक्यात मयुरीला सासूबाईंनी आवाज दिला आणि मयुरी जागी झाली…पाहते तर आजूबाजूला गाळ नव्हताच मुळी आपला बिछानाच होता…घामाने ओलीचिंब झाली होती मयुरी…

मालतीबाई – अगं…मयूरीबाई…चहा मिळणार आहे की नाही आज….की..जोशीकाकूंकडे जाऊ चहासाठी…तुझा गाढवाच्या मुतासारखा चहा नको नाहीतर..त्या जोशीकाकू बरा चहा करतात…

मयुरी   –  आई…आधण टाकतेचं चहासाठी…

          चहा टाकता-टाकताच मयुरी मनाशीच ठरवते…चहाचा कप घेऊन मयुरी हॉलमध्ये येते आणि आपल्या सासूबाईंना म्हणते…

मयुरी  –  आई…एवढं काय हो चहाचं  !…एक दिवस मीही जाणार आहे जोशीकाकूंकडे…चहा घ्यायला…नाहीतरी एरवी येतातच की चहा घ्यायला आपल्याकडे…आज तुम्ही गेल्या असत्या चहासाठी तर काही वावगं झालं नसतं…तेवढीच कसर भरून निघाली असती…म्हणजे उसनं फेडलं गेलं असतं…

मालतीबाई  – चहाचं…सोड…आज उपास होता दिवसभर माझा…मग संध्याकाळीही खास बेत असू देत जेवणाचा..१०-२० फुलके..अळूच्या वड्या..घट्टसर वरण..पुलाव भात..राजम्याची भाजी..आणि मस्त बासुंदी कर..

मयुरी    – आई…तुम्हाला म्हणे बासुंदी..अळू वडी..खूपच मस्त जमते..असं माझी आई सांगत होती..खूप दिवस झाले खाल्लीच नाही तुमच्या हातची..माझ्या हाताला कसली आलीय चव…तुमच्या सुगरणीची थोडीच सर येणारे माझ्या हाताला…नाही म्हणजे आज तुमचा उपास आहे तर..देवालाही मस्त नैवेद्य दाखवता येईल तुमच्याच हातचा..घरातले सगळे खुश…हे खुश…नातवंड खुश…आणि विशेष म्हणजे देवघरातले देवही खुश…

असे म्हणून…मालतीबाईंना खूपच स्वतःविषयी कौतुक वाटायला लागतं…सुनबाई कौतुक करतात हे पाहून मूठभर मांस चढत मालतीबाईंच्या अंगावर…तशा लगबगीनं सासूबाई स्वयंपाकघरात शिरतात व मस्तपैकी जेवणाचा बेत करतात….विशेष म्हणजे एरवी स्वयंपाक घरात एकटी राबणारी मयुरी आपल्या सासूबाईंनाही स्वयंपाक घरात नकळतपणे घेऊन आली…दृश्य पाहण्यासारखंच होत…दोघी सासू-सुना  स्वयंपाकघरात…इतक्यात अविनाशही ऑफिसमधून येतो…तसा आपल्या बायकोला सांगतो…

अविनाश  –  मयुरी…चहा टाक ना…

मयुरी – आई…चहा कराल आज??..कारण माझ्या चहाला पाण्याची चवही नसते…उगाच बिघडलेला चहा मी करेल..यांना देईल आणि सगळं घर डोक्यावर घेतील हे..नाहीतर मला सांगा कसा करायचा मी टाकते चहा..

मालतीबाई – नको…नको …मीच करते चहा..तू पाणी घेऊन जा त्याला…

मयुरीला मनो-मनी खूप आनंद होतो…काही वेळाने सगळेजण जेवायला बसतात…मयुरी सगळ्यांची ताट वाढते…अन जेवता-जेवता अचानक अविनाश मयुरीला टोकतो…

अविनाश – मयुरी…वाह…फुलके मस्त झालेत…त्याहीपेक्षा मस्त…राजमा आणि अळूवडी झालीय..

मयुरी – अहो…आईनी आज खूपच मनावर घेतलं भाज्या करायचं…विशेष म्हणजे आईंच्या हातची चव म्हणजे  अजून तशीच आहे…माझ्या हातून तरी भाजी करायची म्हटलं तर डावं…उजवं होईल…पण आईंच्या हातून असं कधी म्हणजे कधी होत नाही…

अविनाश  – हो…मग काय…आई कुणाची आहे..? आई…उद्यापासून माझ्या डब्याला भाजी तूच करून देत जाशील …मयुरी तू फक्त पोळ्या करून माझा टिफिन पॅक करून देशील…

मयुरी   – म्हणजे काय…मी काय तुमच्या शब्दाबाहेर आहे की काय..?

दुसऱ्या दिवसापासून अविनाश आपल्या आईच्या हातची भाजी नेऊ लागला म्हणून मयूरीचं काम खूप हलकं झालं…विशेष म्हणजे मयुरीला इतर कामांसाठी जास्तीचा वेळ मिळू लागला…अविनाश ९ वाजता घराबाहेर पडत असे…आणि मुलांची शाळा सकाळी ११-०० वाजता. मुलं एकदा कि शाळेत गेली कि तासाभरात मयुरी उरलेली सगळी कामं उरकून घेत, मग रिकाम्या वेळात आपल्या आर्किटेक्चर या पदवीचं काय करायचं म्हणून विचार करू लागली…आपल्या काही मैत्रिणींच्या ओळखीने मयुरीने लवकरच एका कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून नोकरी करण्याचा विचार केला…आपला मनसुबा नवरोबाला कसा सांगावा म्हणून मयुरीने वेगळीच अक्कल लढवली…एक दिवस…सुट्टी असल्याने अविनाश घरीच होता…मयुरी फाटकी ओढणी घेऊन बसली होती…ही गोष्ट अविनाशच्या लक्षात आली…सासूबाईंसमोर बोलू नये म्हणून…फाईल सापडत नाहीय हे निमित्त काढून…अविनाशने आपल्या बायकोला बेडरूममध्ये बोलावलं अन मयुरीला शब्दाने फटकारले….

अविनाश – मयुरी…काय ही ओढणी…केवढी फाटलीय ती…तुला चांगलंच माहिती आहे…की मला असे फाटके-तुटके कपडे अंगावर चढवलेले आवडत नाही…

मयुरी – अहो…काय हे…ही..ओढणी ना…आता बाल्कनीतल्या खिळ्याला अडकून फाटली…जाऊ देत ना…कपडे थोडीच फाटलेत…ओढनीच आहे ना…

अविनाश – तू वेडी आहेस का ग…फाटके कपडे घालू नये..हे कित्येकदा तू मला सांगत आलीय…घरात घालते इथपर्यंत ठीक आहे…उद्या पाहुण्यांसमोर अशी फाटलेल्या कपड्यांची लक्तर दाखवणारेस का..?

मयुरी – अहो…राहू द्यात ना…तुमचा पगारही अगदी जेमतेम आहे…एवढ्याशा पगारात कसं काय माझ्या हौशी-मौजी पूर्ण करू..पुढे आईंचं गर्भाशयाच्या पिशवीचं ऑपरेशन आहे…परत मुलांच्या फीस..कमी व्याप आहेत का…एक तर…

अविनाश  – अगं बोल..

मयुरी  – नाही…काही नाही..

अविनाश – नाही…कसं काय नाही…कळू देत ना तुझ्या मनांत काय आहे हे…

मयुरी   – मी माझ्या आर्किटेक्चर ची प्रॅक्टिस परत करायचं ठरवलंय…म्हणजे फार काही नाही…पण कॉलेज मध्ये लेक्चररशिप करेल…तेही घर सांभाळून जमेल..

अविनाश  – तुला खरंच असं वाटत…जमेल असं..?

मयुरी – प्रयत्न करायला काय हरकत आहे…? एक तर…घरासाठी हात-भार लागेल…निदान भाजीपाला…कपडे लत्ते याचा खर्च तर मॅनेज होईल…तुझ्या एकट्यावर भार नको…बाकीचे पैसे उरतील त्याची एफ .डी करून टाकू…

अविनाश   – ठीक आहे…घर पाहून करावं लागेल मग…

मयुरीने होकारार्थी मान हलवली…आणि मग मनातून खूपच खुश झाली…अन आपल्या फाटलेल्या ओढणीचे आभार मानू लागली …आपण वेड्यासारखी फाटलेली ओढणी नवऱ्याला दाखवली..खरं…तर मयुरी मुद्दाम फाटकी ओढणी घेऊन बसली होती…आपला नवरा या प्रकाराला शुद्ध वेडेपणा म्हणेल याची कल्पना मयुरीला होतीच…म्हणून आपल्या  थोड्याशा वेडेपणाने मयुरीला अशक्य गोष्टी शक्य करता आल्या…मैत्रिणीच्या ओळखीने मयुरीने एका कॉलेज मध्ये मुलाखत दिली…मुलाखतीला यशस्वीरीत्या सामोरं गेल्यानंतर साधारण ४-५ दिवसांनी नोकरीसाठी जॉईन होऊ शकता का ? असा कॉल मयुरीला आला…मयुरीनेही क्षणाचाही विलंब न लावता दुसऱ्याच दिवसापासून लेक्चररशिप करण्याचं ठरवलं…आणि ते कृतीतूनही साध्य केलं..

नोकरीत हळू-हळू चांगला जम बसू लागला…आपली आई नोकरीला लागली याच कौतुक मुलांच्या कृतीतूनही दिसायला लागलं…मालतीताईंनाही आता सुनबाईंची किंमत कळू लागली..घरात एकूणच वातावरण प्रसन्न झालं …मयूरीही चार-चौघींसारखी उठून दिसायला लागली,दुपारी आपली सून झोपा काढते हा गवगवाही सासूबाईंचा अगदी बंद झाला…अविनाशही बोलताना विचार करू लागला…सुनबाईंच्या एका नोकरी करण्याने सगळ्या कुटुंबाला शिस्तच लागली…एक दिवस अविनाश सुट्टी असल्याने आपलं मन मयूरीबरोबर मोकळं करत होता…

अविनाश  – मयुरी…काहीच कळत नाही गं…

मयुरी  – कसलं…काय झालंय का ?

अविनाश  – काही नाही गं…ऑफिस मध्ये मी एवढं मर-मर मरतो…पण माझ्या बॉस ला त्याच काहीच नाही…बिनधास्त मला मूर्ख म्हणून वेड्यात काढतात आणि क्रेडिट दुसऱ्याच कुणाला तरी देतात…

मयुरी  – अहो…मग त्याने काय होणारे…आपण मूर्ख तर मूर्ख…असं समजायचं जास्त दमायचं नाही…चालवू देत की त्यांनाही डोकं थोडं…

अविनाश – अगं…पण मी पगार घेतो त्याबदल्यात…आणि मी कसं स्वतःला मूर्ख समजू…माझ्याकडं मेकॅनिकल इंजिनीरिंगची डिग्री आहे गं…

मयुरी – ते बरोबर आहे, ते तुम्हाला मूर्ख म्हटले वेडा म्हंटले तर..तुम्ही थोडीच तसे आहात याचा सारखा-सारखा विचार केलात तर तुमचं मानसिक खच्चीकरण होईल …पण आपण मर-मर करून जर समोरचा सॅटिसफाईड नसेल तर…कधी-कधी वेडे बनून पेढे खाल्लेलं कितीतरी पटीनं चांगलं असत…

मयुरीच्या या वाक्यावर…अविनाश तिच्याकडेच पाहत बसला आणि घरात अमुलाग्र बदल कसा घडला याचा सारासार विचार करू लागला…थोडा आणखी विचार केल्यावर अविनाशला घरातल्या बदलाचं खरं गुपित आपल्या बायकोकडे आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.  

इकडे मयुरी पतिदेवास “वेडे बनून पेढे खाण्याचा” मूलमंत्र देऊन मनातल्या मनात हसायला लागली कि आपणही अशीच शक्कल लढवली आणि त्यात सगळ्यांचं भलंच झालं आणि हो मुख्य म्हणजे स्वतःच्या मनाचं खच्चीकरण बंद झालं.

दुसऱ्याला दोष देऊन स्वतःच्या मनाचं खच्चीकरण करण्यापेक्षा सुखी आणि टेन्शन फ्री राहण्यासाठी वेडे बनून पेढे खाणे कधीही चांगले!!!!!

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *