Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ गीता गरुड.

गोदाक्काच्या पोटी जन्माला आलेलं एकुलतं एक पोर म्हणजे बेंबट्या.

बेंबट्या जन्मायच्या अगोदर चार दिवस गोदाक्काला बारीक बारीक कळा येत होत्या. डॉक्टरच्या दवाखान्यात सिझर करून बेंबट्याला वर काढलं असत पण गोदाक्काचं बाळंतपण घरीच झालं. गोदाक्काच्या सासूची जळगावला दिलेली सख्खी बहीण गोदाक्काच्या सासूने मुद्दाम बोलवून घेतली होती.

गोदाक्काच्या मावससासूने सहाणेवर कसल्याकसल्या औषधी मात्रा उगाळून गोदाक्काला बळेबळे चाटवल्या. तिला धीर देत राहिली,”थोडाच वेळ बाये, झालं झालं..आलंच बघ बाळ बाहेर.”

बाळ बाहेर निघेस्तोवर कळा देऊन देऊन गोदाक्का अगदी अर्धमेली झाली होती. “मेले गं मावशी मेले. आता नाही मी जगत यातून,” असं चित्कारत असताना एकच जोराची कळ आली नं गोदाक्काच्या तोंडाचा आ तसाच राहिला.

बाळ बाहेर आलं होतं. कुणाला महिनाभराचं वाटेल इतकं गब्दुल, हाडापेडाने मजबूत. मावशीने बाळाची नाळ कापली. बाळाला आईच्या दुधाला धरवलं. “सुटलीस ग बाई,” असं म्हणत गोदीचं घामेजलेलं तोंड आपल्या पदराने तिनं पुसलं.

बाळ अगदी सराईतासारखा दूध ओढत होता. “किती दिवसांचा उपाशी होतास रे बाबा,” गोदेची सासू त्याचं आईचे बोंब पटापटा ओढणं बघत कौतुकाने म्हणाली. बाळ छातीशी लागताक्षणी गोदा तिच्या वेणांच्या यातना क्षणात विसरली, मोगरीच्या फुलागत समाधानाने फुलली.

पहिले दहाबारा दिवस बाळाच्या दूध ओढण्याचं कौतुक झालं खरं पण बाळ दर अर्ध्या तासाने दुधासाठी रडायला लागलं. दोन्हीकडचं दूध पुर्ण ओढूनच गप्प व्हायचं.

गोदीला दूध होतं पण बाळाची भूकच जबरदस्त. गोदी तरी किती पुरी पडणार! शेवटी गोदीच्या सासूने बाळासाठी म्हणून म्हैस विकत घेतली.

म्हशीचं दूध खरं लहान बाळाला पचायला जड पण गोदीचा बाळ तेही पचवायचा.  धारा काढून दूध पातेल्यात उकळत ठेवलेलं असायचं. ते न्हिवेपर्यंत बाळ आजुबाजूची वस्ती गोळा होईल इतक्या मोठ्याने रडायचा.

एखादं म्हातारं काठी टेकत यायचं, म्हणायचं,”काय आईस हैस की कैदाशीन, न्हानग्या बाळाला माराया हात वर उचालतो तरी कसा!”

गोदीची सासूच मग बाळाच्या भुकेचं गणित त्या म्हाताऱ्या खोडासमोर मांडायची. बाळाची दिष्टबिष्ट काढून झाली. सगळे उपाय झाले तशी गोदीची सासूही हरली.

” रड काय हवं तितकं रड,” म्हणायची. रडूनरडून बाळाचं बेंबाट वर आलं फुगा फुगवून त्याला गाठ बांधली की वरची गाठ दिसते तसं उसकल्यागत ते दिसायचं म्हणून मग पाळण्यातलं नाव बळवंत ठेवलं असलं तरी पुऱ्या गावाचा तो बेंबट्याच झाला.

बेंबट्या मोठा झाला तसा शाळेत जाऊ लागला. आपल्या वयाच्या पोरांपेक्षा दोनअडीच वर्षांनी मोठाच वाटायचा तो.

शाळेत जून महिन्यात सरकार गणवेश द्यायची पण बेंबट्याला ते व्हायचे नाहीत. गोदाक्का स्वतः कापडं आणून बेंबट्याच्या मापाचे कपडे शिवायला टाकायची.

बेंबट्या खायचा जेवढा जास्ती तेवढीच अधिक मस्ती त्याच्या अंगात होती. शाळेतून येताना कुणाची पपई तोड, ती चोरून खा, कुणाचे पेरू झाडावरनं नाहीसे कर असे उद्योग करुन अर्ध पोट भरूनच तो घरी यायचा आणि मग त्याच्यामागोमाग त्याच्या तक्रारी यायच्या तसा बेंबट्याचा बापू बेंबट्याला हाताला मिळेल त्या वस्तूने फोडून काढायचा की मग बेंबट्या बापूला शिव्या घालतघालत मोठमोठ्याने रडत शेताच्या बांधावर पळायचा.

बेंबट्याचं नि अभ्यासाचं तितकसं सख्य जमलं नाही. मास्तरांच्या क्रुपेने तो एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जात होता इतकंच पण बेंबट्या कामाला मात्र वाघ होता. एकट शेतातली सगळी कामं करायचा, बैलांना, म्हसरांना सुट्टीच्या दिवशी नदीवर न्यायचा. दगडाने त्यांची चामडी चोळायचा, मग सुर्याची किरणं म्हसरांच्या पाठीवर पडली की त्यांच्या ओल्या पाठी चमकायच्या. एखाद्या म्हशीवर आरुढ होऊन सगळ्या गुरासोरांना घराकडे घेऊन यायचा.

गावातले लोक बेंबट्याच्या कामाचं कौतुक करायचे. कुणी त्याला पत्रावळी बनवायला बोलवायचे तर कुणी माडाची अळी घालायला तर कुणी पिकलेली रातांबी झोडायला.

बेंबट्या कधी कोणाला नाही म्हणायचा नाही. जिथे कामाला जाईल त्या घराचे मालक आधीच घरवालीला, बेंबट्याला बोलावलय अशी सूचना देऊन ठेवीत मग चार माणसांच्या अंदाजाने बेंबट्यासाठी तांदूळ वैरले जात. तेवढीच आमटी, भाजी.

माशांच जेवण असलं की माशाचा सार,सारातल्या तुकड्या नं उकडा भात यावर बेंबट्या एक शब्दही मधे न बोलता ताव मारत सुटायचा. घरातली लहान मुलं डोळे विस्फारून त्याच्या जेवणाडे पहायची. घरातलं मुल रडू लागलं तर बेंबट्या येतोय हं कोण रडतय ते बघायला, असं म्हणताच दुसऱ्या सेकंदाला ते मुल पुतळ्यासारखं गप्प होई. बेंबट्याला समोर बघताच काही मुलं चड्डी ओली करत.

बेंबट्या कामाला वाघ होता. कोणतही काम सांगा, न कंटाळता करायचा. गोदाक्का त्याच्यासाठी एका खेपेला वीसतरी भाकऱ्या भाजायची, तितकंच कोरड्यास लागायचं.

जळणाची व्यवस्था बेंबट्या करायचा. लाकडं फोडायची म्हणजे त्याच्या हातचा मळ होता. घरची शेती, घरच्या म्हशीचं दूध,तूप,लोणी,दही म्हणून बेंबट्याच्या खाण्याचं गोदाक्काला विशेष वाटत नव्हतं. पण आता तिचंही वय व्हायला लागलं.

सासू तर अंथरुणाला टेकलेली. तिचंही बघावं लागायचं म्हणून मग बेंबट्या  तेवीसेक वर्षाचा होताच त्याच्या लग्नाचा विषय घरात सुरु झाला नि बेंबट्या कधी नव्हे तो लाजला. स्वप्नात त्याला आंघोळीचा साबण उघड्या अंगाला लावीत गाणं गुणगुणत न्हाणारी सुंदरी दिसू लागली.

बेंबट्याचं लग्न काढलय म्हणताच बेंबट्याचा चुलत मामा आपल्या मुलीची मंदाकिनीची स्वर्गत घेऊन बहिणीच्या घरी आला. मंदाकिनी एकुलती एक लाडावलेली पोरगी. पण नजरेखालची म्हणून गोदाक्काने पसंत केली.

बघण्याचा कार्यक्रम झाला नि थाटामाटात लग्न लागलं. बेंबट्याची मंदाकिनी काय माहेरून निघेना. मोठमोठ्याने रडू लागली. “आई मी नाय जाणार नवऱ्याच्या घरला,” म्हणू लागली.

बेंबट्या वैतागला. आधीच तो भुकेजला होता. त्याने तिला दोन्ही हातांनी उचलली नि बोचकं कोंबावं तशी गाडीत कोंबली. मंदाकिनी रडतरडत त्याच्याकडे मारक्या म्हशीवानी पाहू लागली.

लग्नाची पूजा झाली नि सासूने मंदाला भाकऱ्या करायला बसवलं नं आपण शेतात गेली. मंदानेही लाजतमुरडत प्रत्येकाला दोन दोन अशा दहाएक भाकऱ्या थापल्या.

बेंबट्या शेतातनं आला. पायबीय धुतले नि त्याने भाकरीची चळत पुढ्यात घेतली, भाजी आमटी घेतली नि हाणू लागला. त्याचं पोट अर्धच भरलं.

भाकऱ्या दे गं मंदे..तो हाकारू लागला. मंदा पाठल्यादारला म्हशींना वैरण घालत होती ती हात धुवून पदराला पुसत आली.

भाकऱ्यांची रिकामी टोपली बघून मंदा बुचकळ्यात पडली. भुतचेष्टा झालीशी तिला वाटले. तिने गळाच काढला. वास्तविक त्याची भूक किती हे सासूने तिला सांगायला हवं होतं.

बेंबट्या परत वैतागला. गोदाक्का शेतातून येऊन गरम पाण्याने न्हाली आणि मग भाकऱ्या करायला घेतल्या. भाकऱ्या नि बुडकुल्यातलं दही तिनं बेंबट्याला खाऊ घातलं.

मंदा एका कोपऱ्यात बसून नवऱ्याचं खाणं बघत होती. पुरा जन्म आता भाकऱ्या बडवण्यातच जाणार हे तिच्या मनाने हेरलं. बेंबट्याच्या खाण्याचा तिने असा धसका घेतला की बेंबट्याच्या जवळ जाणं दूर ती तापानं सणकू लागली.

गोदीने सुनेची दिष्टबिष्ट काढली, डॉक्टराला बोलावलं तरी ताप उतरेना तशी बेंबट्यासोबत तिला माहेरी धाडून दिली. बेंबट्याला गाडीत बायकोचं डोसकं मांडीवर घ्यावसं वाटत होतं पण मंदाचा जणू पुतळाच झाला होता. ती  अगदी अंग आखडून घेऊनच सीटवर बसली होती.

घराकडे जाताच मंदा आईच्या गळ्यात हात टाकून मोठमोठ्याने रडायला लागली. बायको रडते बघताच बेंबट्यालाही रडू फुटलं, तो तिच्याहून वरच्या पट्टीत सूर धरू लागला. बेंबट्याचा सासरा जाम वैतागला. कसंबसं त्याने त्या नवराबायकोला गप्प केलं.

मामाच्या घरात खूप काम पडलं होतं. नारळ काढायचे होते, शेत नांगरायचं होतं, गडी नेमका आजारी पडला होता नि मामा गड्याच्या शोधात होता. बेंबट्याने न लाजता सगळं काम हाती घेतलं. एका  इरडीत नांगरणी पुरी केली.

मामा खूप खूष झाला त्याच्यावर. सासूबायने मुलीने सांगितल्याप्रमाणे वीसपंचवीस भाकऱ्या नि आंबटचिंबट सार करून जावयाच्या पुढ्यात वाढला. बेंबट्या मनसोक्त जेवला. सारातले दोन मोठाले रावस त्याने गिळंकृत केले, चारेक तळलेली पापलेटं खाल्ली. चणेफुटाणे खातात तशी अर्धा किलोची फ्राय चिंगळं अधेमधे तोंडात टाकली तसं  बेंबट्याच्या सासऱ्याला लेकीच्या नाराजीचं कारण कळलं.

बेंबट्या नि मंदा घरी परतताना मामाने म्हणजे बेंबट्याच्या सासऱ्याने त्यांच्यासोबत भाकरी करण्यासाठी त्याच्या घरगड्याच्या लेकीला, चंपाकळीला पाठवलं. चंपाकळी दिसायला नाजूक अगदी उमलत्या चाफेकळीसारखी होती पण कामाला वाघीण होती. एका दमात पन्नास भाकऱ्या बडवायची, तेही न कंटाळता.

मंदाला आता सुटका झाल्यासारखं झालं. तीही भाजी, आमटी करू लागली. नवऱ्याशी गोडगोड लाडे लाडे बोलू लागली पण बेंबट्याला आता भाकऱ्या करुन घालणारी भोकर डोळ्यांची, ओठांखाली ठळकसा तीळ असणारी नि केसांची बट गालावर रुळवणारी चंपाकळीच जास्त आवडू लागली. तो तिच्याशीच जास्ती बोलू लागला. तिला काय हवं नको ते विचारुन आणून देऊ लागला. अगदी वेणीला लावायच्या रिबीनी नि पिनाही आणून देऊ लागला.

जळता निखारा पदरात घेतल्यासारखी मंदाकिनीची गत झाली. बेंबट्या दिवसेंदिवस लैच चेकाळत होता. पुरुषच तो. चंपाकळीला तिने दमात घेऊन बघितलं पण आपलंच माणूस धडात नै तर लोकाला दोष देऊन काय फायदा. बरं माहेराहून तिने स्वत:च ही धोंड आणल्याने सासूसासऱ्यांकडेही तक्रार करू शकत नव्हती.

दोन महिन्यांनी ती परत माहेराला गेली तेंव्हा मात्र तिने चंपाकळीचं बेंबट्याच्या खांद्यावर रेंगाळणारं डोसकं बाजूला केलं. आपण स्वतः त्या दोघांमधे बसली नि बेंबट्याच्या मांडीवर हक्काने डोकं ठेवलन.

माहेराहून पाहुणचार करुन परतणार तेंव्हा चंपाकळीही त्यांच्यासोबत येऊ लागली तशी मंदाकिनीने तिला घरीच रहा म्हणून तंबी दिली.

“मंदे, माझ्यासाठी भाकऱ्या कोण बडीवणार वीस पंचवीस?”

“मी हाय की बडवायला. वीसाचे पन्नास खावा. मी घालीन करून. टोपभर झणझणीत आमटी करून घालीन. हवे तेवढे मासे भाजून, सार करून घालीन. माझ्यात तेवढी धमक हाय. बायको हाय मी तुमची लग्नाची.” असं चंपाकळीकडे बघत ती टेचात बोलली तशी बेंबट्याचा सासरा नि बेंबट्या मिशीतल्या मिशीत हसले.

रोज उठून मंदाकिनी बेंबट्याला हव्या तितक्या भाकऱ्या थापून घालू लागली आणि बेंबट्याही वाघासारखा कामं करीत राहिला. दोघांनी मिळून नंदनवनागत संसार फुलवला. पुढे पोरंबाळं झाली, ती मोठी झाली, सुनाजावई आले, बेंबट्याचंही वय उतरणीला लागलं तसं बेंबट्याचं खाणं आपसूक कमी आलं.

मंदाकिनी मात्र सुनांना आपल्या कारभाऱ्याचं पुर्वीचं खाणं सांगून तोंडाला पदर लावून हसत बसू लागली. बेंबट्याही मग पिकल्या  मिशीतनं हसत नि मिशीला पीळ घालत मंदाच्या बोलण्याला दुजोरा देऊ लागला नि हळूच मनाच्या कप्प्यातली चंपाकळी आठवून तिच्या ओठांखालचा ठळकसा तीळ मनाच्या नजरेने निरखू लागला तसा मग कधीकधी तीळ निरखताना त्याला ठसका लागायचा नि मंदाकिनीचा जीव खालीवर व्हायचा.

“काय झालं ओ धनी..कुनी सटवीनं आठवन काढली बिढली का काय,” असं म्हातारीनं म्हणताच सुना सासऱ्याकडं बघत खिक्कन हसायच्या नि बेंबट्याबी भोळ्यागत गप पाणी प्यायचा पण मनात मात्र तो चंपाकळीच्या तीळावर ओघळलेला पाण्याचा थेंब साकारायचा.. तिची बारक्या वाटीगत निमुळती हनुवटी धरायचा नं तिच्या डाळींबासारख्या लालचुटुक ओठांना गुदमरून टाकायचा.

त्याचवेळी कधी नातू येऊन बेंबट्याच्या मांडीवर बसायचा नि आज्याच्या लालचुटुक झालेल्या ओठांकडे पहात विचारायचा,”आजा तुझं व्हट रं कशान लालेलाल झालं? तू चोरून हायस्रोट खाल्लस ना.”

बेंबट्याआजा मग नातवाला खांद्यावर घेऊन त्याच्यासाठी हायस्रोट(आईसकँडी) आणायला बाहेर पडायचा नि मंदी चंपाकळीला..सटवीचा मुडदा बसिवला तो, दिसाढवळ्या म्हाताऱ्याला नजरेसमोर दिसत र्हाती नि म्हातारा र्हातोय गुळावानी पाघळत अशा शिव्या घालत बसायची. सुना एकमेकींत आपली सासू डोक्यार पडलीय, तिची चवली सांडलीय हसं कुजबुजत खिदळत रहायच्या.

समाप्त

=================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *