Ritbhatmarathi

Search
Close this search box.

‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 7

“नीता माझंही चुकलचं. आपली मुलगी परस्पर लग्नाचा निर्णय घेते, म्हणून दुखावलो होतो मी. वाटायचं हे प्रेम वगैरे सारं काही खोटं असतं. आपल्यावेळी असं होतं तरी कुठे? आई -बापानं लग्न ठरवलं की गुपचूप बोहल्यावर चढायचं. मग विचारायचं देखील नाही..मुलगा किंवा मुलगी दिसायला काळे की गोरे आहेत म्हणून? तेव्हाही संसार होत होते. मनं जुळत होतीच ना? मग आत्ताच असे काय झाले? आपल्याच पोरी आपल्याच बापाला धारेवर धरतात, जाब विचारतात!” तात्या खिडकीतून कुठेतरी लांबवर पाहत आपल्याच तंद्रीत नीताताईंशी बोलत होते.

“अहो आता काळ बदलला आहे. मुलं स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. पूर्वी वडील आणि मुलांत किती अंतर असायचे? धाकाने आपण आपल्या वडिलांशी एक शब्दही पुरता बोलू शकत नव्हतो. आता पोरी आपल्याशी संवाद साधतात, मनातलं बोलतात. थोडं स्वातंत्र्य त्यांनाही हवचं. त्यांनाही इच्छा आहेत, स्वतंत्र अस्तित्व आहे.
खरंतर मला कोणाची बाजू घ्यायची हेच कळत नाही. तुम्हीही माझे आणि पोरीही माझ्याच.” नीताताई समजावणीच्या सुरात म्हणाल्या.

“तेही खरेच. पण हा साठयांचा मुलगा असा काही निर्णय घेईल असे वाटले नव्हते. मान्य आहे, मी चांगलेच सुनावले होते त्याला. मला वाटले विसरून जातील पोरं एकमेकांना. पण तसे झाले नाही. माझं माझ्या मुलींवर खूप प्रेम आहे. पण त्यांचही कुणावर प्रेम असू शकतं, हा विचार देखील माझ्या मनात आला नव्हता. एक भावना शून्य बाप म्हणून त्या पाहत असतील का माझ्याकडे? आता झालं गेलं बदलू शकत नाही मी.
आपल्या रेवूने शब्द पाळला. केवळ माझ्या शब्दाखातर ती लग्नाला तयार झाली.
पण आपल्या श्वेताला जोडीदार निवडायचे पूर्ण स्वातंत्र्य देईन मी. मात्र सारं काही पारखून घेऊनच. पोरं सडेतोड आहे, तशीच समजूतदारही आहे.” तात्या.

“अहो मग रेवतीवर हा अन्याय नाही का होणार?” नीताताई.
“नाही. ती समजून घेईल. मात्र माझ्यासाठी हे परिस्थितीतून आलेले शहाणपण समजा हवं तर. कधी कधी स्वतःला जेवढे कठोर समजतो तेवढे नसतोच आपण. शांतपणे विचार केल्याने सारा गुंता आपोआप सुटतो. परिस्थिती खूप काही शिकवून जाते आणि भोवतीची माणसंही.” एवढे बोलून तात्या समाधानाने हसले.

काही दिवसांतच सारंगची बदली दुसऱ्या शहरात झाली. बढतीसाठी बदली असल्याने जाणे तर भागच होते. मालतीबाई नको म्हणत असताना सारंगने ही बढती स्वीकारली. मग आता रेवतीलाही सोबत घेऊन जा म्हणून मालतीबाई त्याच्या मागे लागल्या. “तिथे नोकरी करेल ती आणि नाही केली तरी असा काही फरक पडणार नाही. तिला घरचं सारं पाहावं लागेल. मग दगदग, धावपळ होईल. शिवाय तू एकटा राहशील का तिच्याविना? इथे आम्ही आहोतच. पण ती इथे एकटीच राहील. आत्ताशी कुठे सहा महिने झाले तुमच्या लग्नाला. जा घेऊन तिला.” मालतीबाई मागेच लागल्या सारंगच्या.

“तिथली परिस्थिती पाहून मी व्यवस्था करतो,” म्हणून सारंग निघण्याच्या तयारीला लागला. पण रेवती मात्र अस्वस्थ झाली, का ते तिलाच कळत नव्हतं.

चार -पाच दिवसांनी सारंग निघून गेला आणि रेवती चलबिचल झाली. इतके दिवस सहवास होता, तेव्हा काही वाटत नव्हते. पण आता तिला सारंगची कमी जाणवू लागली. त्याची आठवण येऊ लागली. हे काय होतयं आपल्याला?
रेवतीला उमजतच नव्हते. सारंग आजूबाजूला असण्याची तिला खूप सवय झाली होती. त्याचं नसणं तिला सहन होईना. दर दोन दिवसांनी ती त्याला पत्र लिहू लागली. तिकडे कधी येऊ म्हणून विचारू लागली. सारंगला रेवतीची येणारी पत्र पाहून खूप आनंद झाला. तो तिला वेळ मिळेल तशी उत्तर पाठवत राहिला. त्यालाही तिची खूप आठवण येत होती.

महिना गेला आणि एक दिवस अचानक तात्या घरी आले. मालतीबाईंना म्हणाले, “उद्या श्वेताला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत. तर रेवतीला पाठवून द्या आणि जमलचं तर तुम्हीही या. तिचा पहिलाच पाहण्याचा कार्यक्रम आहे. कोणीतरी हवेच सोबतीला.”
“आम्ही दोघीही येऊ मदतीला,” म्हणत
मालतीबाईंनी येण्याचे कबूल केले.

पाहुण्यांच्या स्वागताची तयारी सकाळपासूनच सुरु होती. रेवती आधीच घरी आली होती, तर मालतीबाई मागाहून येणार होत्या. तात्यांची नेहमी प्रमाणे धावपळ सुरू होती आणि नीताताई नाश्त्याची तयारी करत होत्या.

काही वेळातच रेवतीने श्वेताला छान तयार केले. उंचपुरी श्वेता मोरपंखी साडीत खूप छान दिसत होती. लांबसडक केसांची वेणी, त्यावर माळलेला गजरा..रेवतीने आपल्या बहिणीची दृष्टच काढली.
इतक्यात मालतीबाई आल्या. त्या नीताताईंना मदत करायला स्वयंपाकघरात गेल्या.

“ताई तुमच्या दोन्ही मुली अगदी गुणी आहेत. कामातही तरबेज आहेत.” मालतीबाई श्वेता आणि रेवतीचे कौतुक करत म्हणाल्या.

“अहो, मोठी म्हणून रेवती सारे काही शिकली. पण श्वेता स्वयंपाक करायचा म्हंटलं की पळ काढते. तुम्हीच सांगा असं करून कसं चालेल? पोरीच्या जातीला चारीठाव स्वयंपाक यायला हवा की नको?” नीताताई थोड्याशा रागानेच म्हणाल्या.

“एकदा का जबाबदारी अंगावर पडली की सारे काही निभावते. शिकतात हळूहळू पोरी. आता रेवतीच पाहा, नोकरी करून घरही सांभाळते. आम्ही तिला कसलीही जबरदस्ती केली नाही. पण तिने स्वतः सारी जबाबदारी अंगावर घेतली.” मालतीबाई रेवतीचे कौतुक करत म्हणाल्या.

“खरंच आमच्या रेवूच भाग्य म्हणून असं सासर तिला मिळालं. सुनेचं कौतुक करायलाही सासू तेवढीच मनमोकळी हवी..तुमच्यासारखी.”
नीताताई मालतीबाईंना म्हणाल्या.

‘आता आमच्या धाकटीलाही असं चांगलं सासर मिळू दे.’ असे मनातल्या मनात म्हणत तात्या बाहेर बैठकीच्या खोलीत बसून दोघी विहिणींचा सुख -संवाद ऐकत राहिले.

ठरल्यावेळी सामंतांची पाहुणे मंडळी घरी आली. मुलाकडील आणि मुलाकडील माहितीची देवाणघेवाण झाली. चहा-पोह्यांचा कार्यक्रम झाला. एकंदर मुलगा, “संकेत” चांगला होता. श्वेताला शोभेल असा. नोकरीही चांगली होती. एकत्र कुटुंब होते. घरात सात -आठ माणसे होती. पण ‘लग्नानंतर मुलीने नोकरी करू नये’ ही एकच अट होती त्यांची. त्यामुळे ‘विचार करून निर्णय कळवू’ म्हणून तात्यांनी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य श्वेताला देऊन टाकले.
मात्र दोन दिवसांनी मुलाकडील मंडळींचा होकार आला आणि मुलीला नोकरी करायची असेल तर आमची काही हरकत नाही, असा निरोपही आला. तर श्वेताने मुलाची दुसऱ्यांदा भेट घेऊन त्याला होकार दिला. तात्यांना खूप आनंद झाला. दोन्ही मुली चांगल्या घरात पडल्या म्हणून.

आता श्वेताच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. तिकडे सारंगला भाडे तत्वावर एक घरही मिळाले. तो आता रेवतीला तिकडे बोलवू लागला. पण इकडे लग्नाची तयारी करायची असल्याने रेवतीची माहेरी, घरी आणि ऑफिस अशी त्रिस्थळी यात्रा चालू होती. सरते शेवटी तिने आपल्या कामाचा राजीनामा देऊन टाकला. कारण महिन्याभराने पुन्हा मोठ्या शहरात जायचे होते. मग तशीही नोकरी सोडावी लागणारच होती.
सारंगला रेवतीने पत्र पाठवून बोलावणे धाडले. पण काम वाढल्याने त्याला यायला जमणार नव्हते. त्यामुळे रेवती नाराज झाली.
लग्न जवळ आले तशी निमंत्रणे धाडली गेली.

अचानक एक दिवस मानपानाचा विषय घेऊन सामंतांची मंडळी घरी आली. ‘आमचा योग्य तो मानपान व्हायलाच हवा,’ असे म्हणू लागली. मग हळूच त्यांनी हुंड्याच्या विषय काढला. इतका वेळ जमलेले लग्न मोडू नये, म्हणून तात्या नरमाईची भूमिका घेत होते. पण मागण्या वाढू लागलेल्या पाहताच श्वेता भडकली. या अशाच मागण्या असतील तर ‘हे लग्न होणार नाही.’ श्वेताने अगदी ठणकावून सांगितले. तसे तात्या घाबरले आणि सामंतांची चलबिचल वाढली. मग ते हळूच म्हणाले, “तुमच्यापेक्षाही उत्तम स्थळ आहे आमच्या बघण्यात, आमच्या अटीत बसणारे!”

हे ऐकून तात्याही चिडले. “हे जर असेच होते तर पसंती दाखवलीच कशाला? आधीच नकार द्यायचा. आम्हाला तुमच्या अटी मान्य नाहीत. काय करायचे ते करा.” सारं फिस्कटलेलं पाहून नीताताई रडू लागल्या.
“अहो पत्रिका वाटून झाल्या. सगळी तयारी झाली. आता लग्न मोडायचे का? लग्न मोडल्याने मुलीचे नाव खराब होते तसेच मुलाचेही होतेच ना? जरा विचार करा. संकेतराव तुमचे काय म्हणणे आहे यावर?” नीताताई संकेत समोर उभ्या राहिल्या. संकेत आपल्या आई -वडीलांकडे आळीपाळीने पाहत राहिला. आता तो काय उत्तर देतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले.

“खरंतर मी माझ्या आई -बाबांच्या शब्दाबाहेर जात नाही. पण श्वेता मला मनापासून पसंत आहे. मला हुंडा वगैरे काही नको आणि मानपान कसले घेऊन बसलात? सारं रीतीप्रमाणे सुटसुटीत असलं म्हणजे झालं.” संकेत श्वेताकडे पाहत म्हणाला.

“समजा, हे लग्न झालंच तर लग्नानंतर तुम्ही आमच्या मुलीला त्रास देणार नाही कशावरून? आम्ही विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर?” तात्या संकेतला म्हणाले.

“लग्नानंतर कशाला कोण त्रास देईल? तुम्ही फक्त आमच्या मागण्या पूर्ण करा, झाले तर मग.” संकेतच्या आई मध्येच म्हणाल्या.

“मग हे लग्न मोडले म्हणून समजा. तुमच्या मागण्या पूर्ण करणे आम्हाला जमणार नाही. आम्ही विश्वासाने आमची मुलगी तुमच्याकडे सोपवणार आणि जीवात जीव असेपर्यंत आमच्या जीवाला घोर लागून राहिल तो निराळाच. पुढे काय करायचे ते आमचं आम्ही पाहू. या तुम्ही आता.” नीताताई रागावून म्हणाल्या.

“आई परत एकदा विचार करा. कशाला या मागण्या आणि हुंडा वगैरे? जुन्या झाल्या त्या गोष्टी. मी घरातून निघताना तुम्हाला बजावले होते ना? हा विषय नको म्हणून!” संकेत आपल्या आईला म्हणाला.

“गप्प बस. तुला काय कळते यातले? बघू दुसरं एखादं चांगलं स्थळ. बघ किती मुली उभ्या राहतील लग्नाला!” संकेतच्या आई तावातावाने बोलत म्हणाल्या.

सामंत मंडळी गेली आणि तात्या डोक्याला हात लावून बसले. “आपल्या नशिबापुढे आपले काही चालत नाही आणि वेळ आल्याशिवाय काही घडत नाही हेच खरं. आता करायचे तरी काय?” तात्यांना काही समजतच नव्हतं.

क्रमशः

==================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag6/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag8/

===================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *