Search
Close this search box.

‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 10

रेवतीच्या डोहाळ जेवणाची तारीख ठरल्याने नीताताई खूप आनंदात होत्या. मालतीबाईही उत्साहाने कामं करत होत्या. त्यांच्या मदतीला श्वेता आली होती. दोघींनी मिळून सारे अंगण सजवले. सुंदर रांगोळी काढली होती. झोपाळा फुलापानांनी सजवला होता. त्याच्या बाजूला मोठ्या आकाराची चंद्राची प्रतिमा, फुलाफुलांनी सजवलेले धनुष्यबाण, कमळ ठेवले होते. समोरच रेवतीच्या आवडीचे खाण्याचे पदार्थ एका टेबलावर मांडून ठेवले होते. सारी तयारी पाहून मालतीबाई आणि नीताताईंनी समाधानाने मान डोलवली. इतक्यात कुणीतरी म्हंटले, “मालतीबाई एका वाटीत पेढा आणि बर्फी ठेवायला विसरू नका हं, शकुन असतो तो! त्यावर ठरते मुलगा की मुलगी होणार ते.”

“अहो शकुनाचं काय घेऊन बसलातं? मुलगा असो वा मुलगी..आपल्याला दोन्ही सारखेच. शेवटी स्त्रीचं आईपण सजतं हो अशा कार्यक्रमातून. तिला आनंद मिळतो. तिच्या आवडीचे चार पदार्थ पोटात जातात. रेवती एकुलती एक सून आमची. तिची हौसमौज आम्हीच पुरवायला हवी. नाही का?”
मालतीबाईंचे हे विचार ऐकून नीताताईंना समाधान वाटले.

इतक्यात श्वेता रेवतीला घेऊन बाहेर आली. हिरव्या रंगाची साडी नेसलेली रेवती खूपच गोड दिसत होती. गळयात फुलाफुलांचा हार, कानात फुलांचे हलकेसे झुमके, हातात फुलांच्या बांगड्या, या साऱ्याला साजेशी केशरचना.. मालतीबाईंनी तिची दृष्ट काढून तिला झोपाळ्यावर बसवले.
काही वेळातच आजूबाजूच्या स्त्रिया जमल्या.
प्रत्येकीने रेवतीची ओटी भरली. तिला छान छान वस्तू भेट म्हणून दिल्या. नंतर साऱ्याजणींनी मिळून डोहाळ जेवणाची गाणी गायली. तिला आवडीचे पदार्थ खाऊ घातले.

थोड्या वेळाने खास फोटो काढण्यासाठी बोलावलेला माणूस आला. चंद्रावर बसलेले, हातात धनुष्यबाण घेतलेले, कमळात उभारलेले, शिवाय सारंग सोबत असे वेगवेगळ्या प्रकारचे रेवतीचे फोटो काढले.

डोहाळ जेवणानंतर रेवती पुन्हा माहेरी आली, तर सारंग नोकरीच्या ठिकाणी निघून गेला.

नीताताई रेवतीची नीट काळजी घेत होत्या. श्वेताही अधून मधून येत -जात होती. तर रेवतीला सारंगची आठवण अस्वस्थ करत होती. आता सारंगने आपल्या सोबत असावे, असे तिला वाटत होते. पण काम असल्याने त्याला जाणे भागच होते.

तात्या खूप आनंदात होते. आपल्या दोन्ही मुली संसारात सुखी आहेत, हे पाहून त्यांना समाधान वाटत होतं. ‘कधी कधी आपण ठरवतो एक आणि घडते वेगळेच. आता कुठे डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतं आहे..’ तात्या स्वतःच्याच विचारात अंगणात फेऱ्या मारत होते. कधी आपण ठरवतो एक आणि घडते वेगळेच. आता कुठे डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतं आहे..’ तात्या स्वतःच्याच विचारात अंगणात फेऱ्या मारत होते.

इतक्यात रेवती तिथे आली. ती काही म्हणणार, इतक्यात तिला घेरी आली.

“अगं काय होतंय?” असे म्हणत तात्या तिला सावरायला धावले. तात्यांचा आवाज ऐकून नीताताईही बाहेर आल्या.

रेवतीची अशी अवस्था पाहून त्यांनी शेजारच्या पिंट्याला सांगून डॉक्टरांना बोलावले.
दहा मिनिटांतच डॉक्टर आले. रेवतीला तपासत म्हणाले, “काही धावपळ, दगदग झाली का? आधीच त्यांची प्रकृती नाजूक आहे. आता पूर्णपणे विश्रांती घ्यावी लागेल. काही औषध देतो ती आठवणीने घेऊ दे. बाकी तसं काळजी करण्यासारखं काही नाही.” हे ऐकून तात्या आणि नीताताईंचा जीव भांड्यात पडला.

दुसऱ्या दिवशी मालतीबाई रेवतीची विचारपूस करायला आल्या. रेवतीची तब्येत बिघडली असल्याने त्या काळजीत पडल्या. त्यांनी सारंगला जास्त सुट्टी काढण्यासाठी पत्र लिहून कळवले.

आता आठवा महिना सरत आल्याने, श्वेताही मदतीला माहेरी येऊन राहिली. बाळंतपणाची तारीख जशी जवळ येऊ लागली, तशी रेवतीला भीती वाटू लागली. पण सारे काही नीट होईल म्हणून नीताताई तिला धीर देत होत्या, जपत होत्या.

नववा महिना संपला आणि सारंग सुट्टी घेऊन परतला. तेव्हा रेवतीला थोडं बरं वाटलं, आधार वाटला.

अचानक एक दिवस पोटात दुखू लागलं म्हणून दाखवायला गेलेल्या रेवतीला डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतलं. आता डिलिव्हरी कोणत्याही क्षणी होणार होती. बाळ- बाळंतिणीची सुखरूप सुटका होऊ दे, म्हणून नीताताईंनी देवापुढे हात जोडले, सुखरूप सुटका होऊ दे, म्हणून नीताताईंनी देवापुढे हात जोडले,

बऱ्याच वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तसा साऱ्यांना आनंद झाला. रेवतीने एका गोड मुलीला जन्म दिला. बाप झाल्याचा आनंद सारंगच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जेव्हा तो छोटासा जीव त्याच्या कुशीत आला, तेव्हा आपलाच कोवळा अंश पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाने अश्रू उभे राहिले.

“डॉक्टर, रेवती कशी आहे? ठीक आहे ना?” मालतीबाई पुढे होत म्हणाल्या.

“हो. त्या एकदम बऱ्या आहेत. थोड्या वेळाने तुम्ही भेटू शकता त्यांना.” असे म्हणत डॉक्टर आपल्या केबिनमध्ये गेले.

काही वेळाने रेवती शुध्दीवर आली. कुशीत आपलं इवलंसं बाळ पाहून हरखून गेली, आपल्याला होणाऱ्या साऱ्या वेदना विसरली. आई झाल्याचा आनंद आता तिच्या डोळ्यातून वाहू लागला.

दवाखान्यातून मालतीबाई रेवतीला आपल्या घरी घेऊन आल्या. तेराव्या दिवशी बाळाचे बारसे अगदी थाटामाटात पार पडले. बाळाचे नाव ‘सुरभी’ ठेवले.

असेच दिवस जात होते. सुरभी हळूहळू मोठी होत होती. तिच्या बोबड्या बोलांनी आता सारं घर हसू लागलं होतं. सारंगने खटपट करून पुन्हा इकडे आपली बदली करून घेतली.

रेवतीचा संसार आता फुलला होता.

श्वेता आणि संकेतही आपल्या संसारात रमले होते. आता साऱ्यांना प्रतीक्षा होती ती, श्वेताच्या गोड बातमीची.

पण या सुखाला गालबोट लागेल, असे अचानक तात्या आजारी पडले. काळजी घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. तसे तात्यांनी आपल्या दोन्ही मुली, जावयांना बोलावून घेतले. त्यांनी आपलं राहतं घर सारंगच्या आणि रेवतीच्या नावे केलं आणि थोडी शेती होती ती संकेत आणि
श्वेताच्या नावे केली.

“संकेतराव रागावला तर नाही ना?” घर जरी
सारंगरावांच्या नावे केलं असलं, तरी तुमचाही तितकाच हक्क आहे त्यावर.” तात्या संकेतला म्हणाले. ते पुढे सारंगकडे पाहून म्हणाले, आता तुम्ही थोरले म्हणून ही सारी जबाबदारी सांभाळायची.”

“तात्या आम्ही सारे सांभाळू. पण तुम्ही आधी बरे व्हा. ही निरवा निरवीची भाषा कशाला?” सारंग तात्यांच्या जवळ बसत म्हणाला.

“आयुष्यात सारं काही मिळालं. माझ्या दोन्ही मुली सुखी आहेत, हे पाहून आता कसलेच मागणे नाही देवाकडे. फक्त काळजी वाटते ती नीताची. ती मला सोडून कधीच कुठे गेली नाही. सतत सावली सारखी माझ्या मागे राहिली. तिची काळजी घ्या, बस् इतकेचं माझे मागणे आहे.” तात्या साऱ्यांना म्हणाले.
तशा रेवती आणि श्वेता तात्यांना बिलगून रडू लागल्या.
“रडू नका पोरींनो. येणारा एक दिवस जातोच. पुसा बघू डोळे. बापाला असा निरोप देणार आहात का?” तात्या गहिवरून म्हणाले. थोडं थांबून पुढे तात्या म्हणाले,
“आपल्या नात्यांचे, प्रेमाचे बंध साऱ्यांनी असेच जपून ठेवा. कायम एकत्र रहा. हे ऐकून साऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

नीताताई एका कोपऱ्यात मूकपणे अश्रू ढाळत उभ्या होत्या. हे पाहून तात्या म्हणाले, “अहो, इकडे या. अशा रडू नका बरं. आपली साथ कधीतरी सुटणार होतीच. मला एक वचन द्या पाहू, माझ्या पश्चात तुम्ही अजिबात डोळ्यातून पाणी काढणार नाही आणि कायम आनंदी राहणार?”
नीताताईंचा हात आपल्या हातात घेत तात्या म्हणाले. तसा नीताताईंनी काहीच न बोलता तात्यांचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला.

नंतर तात्यांची तब्येत थोडी सुधारली. पण अचानक एक दिवस तात्या साऱ्यांना सोडून निघून गेले. रेवती आणि श्वेता त्यांच्या आठवणीत खूप रडल्या आणि त्या दिवसापासून नीताताई जास्तच हळव्या बनल्या. तात्यांना सोडून राहायची कधी सवय नव्हती त्यांना. सतत त्यांची आठवण काढू लागल्या.
काळ पुढे जाईल तशा हळूहळू नीताताई सावरल्या आणि सारंगने स्वतः त्यांची सारी जबाबदारी घेतली. आपल्या घराजवळ त्यांना नवे घर घेऊन दिले. आता नीताताई कधी श्वेताकडे, तर कधी नव्या घरी राहू लागल्या.

काही दिवसांनी श्वेतालाही बाळाची चाहूल लागली. तिची काळजी घेण्यात नीताताईंचा सारा वेळ जाऊ लागला. नऊ महिन्यानंतर श्वेताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बारसेही पार पडले. मुलाचे नाव ‘आशिष’ असे ठेवले.

श्वेता आणि रेवती आपापल्या संसारात मग्न होत्या. आता वेळ जावा म्हणून नीताताईंनी आपल्या जुन्या घरी पाळणाघर सुरू केले आणि त्यातच त्या रमून गेल्या.

कधीतरी तात्यांची आठवण त्यांना अस्वस्थ करे. जुन्या आठवणी त्यांच्या मनात फेर धरून नाचू लागत. मग त्यांचे मन म्हणे, “आज तुम्ही इथे हवे होतात. आयुष्याच्या या उतार वयाच्या प्रवासात तुमची सोबत हवी होती मला. या साऱ्या आठवणी मागे सोडून तुम्ही अचानक निघून गेलात..मी अगदी एकटी पडले. सोबतीला आहेत सारेजण. पण तुमची कमी जाणवते. जीव नकोसा करून टाकते.
मात्र तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मी रडत नाही, मुलींकडे पाहून पुन्हा ताकदीने उभी राहते, तुम्ही जी जबाबदारी मागे ठेऊन गेला आहात ती सांभाळायला आणि आपल्या आठवणी जपायला.”

अशावेळी त्यांना तात्यांचे बोल आठवत..’आपले जुळेलेले प्रेमाचे, नात्यांचे बंध कायम जपून ठेवा..अगदी जीवात जीव असेपर्यंत.’

समाप्त.

===================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag9/

===================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *