Ritbhatmarathi

Search
Close this search box.

‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग १

शरदराव एकसारखी बडबड करत अस्वस्थपणे खोलीत फेऱ्या मारत होते आणि निताताई त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या.

“अहो, आपलीच लेक आहे. समजून सांगायला हवे तिला. असं तिच्या अंगावर ओरडून नाही चालायचं.”

“हेच ते. म्हणे प्रत्येक गोष्ट समजून सांगायला हवी. बघा तुमच्या लाडाने कशी बिघडली आहे ती! अगं एक बाप म्हणून काय नाही केलं मी तिच्यासाठी? सगळी सुखं आणून ठेवली तिच्या हातावर. जे मागेल ते सगळं दिलं आणि काय करायला हवं होतं मी?” शरदराव जास्तच भडकलेले पाहून नीताताई आतून पाणी घेऊन आल्या.

“अहो, हे घ्या आणि शांत व्हा. जास्त चिडचिड केल्याने त्रास होतो तुम्हाला.”

शरदरावांनी गटागटा पाणी पिऊन तो पेला बाजूला ठेवला. तशा नीताताई म्हणाल्या, तुम्हाला जरा काही विचारले की तुमचा पारा चढतो. बघेल तेव्हा स्वर चढलेलाच असतो तुमचा. काही बोलायची सोय नाही राहिली घरात.” नीताताईंनी डोळ्याला पदर लावला.

“झालं का सुरू? आता तुम्ही का रडत आहात?” शरदराव वैतागून म्हणाले.

“तुम्हीही ऐकत नाही आणि तुमची लेकही. दोघांचाही स्वभाव हट्टी. जरा शांतपणे विचार करा. मुलगा चांगला आहे. उत्तम कमावतो. बाकी घरदार चांगलं आहे. शिवाय आपल्या माहितीचा आहे. अहो, प्रेम काही ठरवून होतं का? मन जुळली की हृदयाच्या तारा आपोआप जुळतात. पूर्वजन्मीचे काही बंध असतात. तुमच्याशी बोलायला अजूनही घाबरते ती. आपली पोर आपल्याला परवानगी विचारते आहे, हे काही कमी आहे का?” नीताताई

“म्हणजे तुम्हाला सारं माहीत होतं तर? मग आता तुमचीच फूस आहे म्हंटल्यावर मला विचारण्यात काय अर्थ आहे? ते काही नाही. मी जिथं म्हणेन तिथंच तिचं लग्न झालं पाहिजे. या घरात प्रेम वगैरे असली थेर चालायची नाहीत. लग्नानंतर आपोआप होतं ते. आपलं लग्न ठरलं तेव्हा आपण पाहिलं तरी होतं का एकमेकांना?” शरदराव पुन्हा आवाज चढवत म्हणाले.

रेवती आपल्या खोलीत बसून सारे काही ऐकत होती. ‘तात्या आमच्या लग्नाला परवानगी देणार नाहीत आणि शंतनू म्हणतो, तुझ्या तात्यांची परवानगी असल्याविना मी तुझ्याशी लग्न करणार नाही. मी करायचं तरी काय? जीवापाड प्रेम करते मी शंतनूवर. त्याच्याविना दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही मी. तात्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली नाही तर काय होईल?’

रेवती अचानक खोलीतून उठून बाहेर आली.
“तात्या, माझं आणि शंतनूच एकमेकांवर खरंच खूप मनापासून प्रेम आहे आणि आम्हाला एकमेकांसोबत लग्न करायचा आहे.” रेवती
कशीबशी म्हणाली खरी, पण तिला शरदरावांच्या नजरेला नजर मिळवणे कठीण जात होते.

“या..तुमचीच कमी होती इथे. करायचं आपण आणि निस्तरायचं आम्ही. त्या साठेंच्या मुलात काय पाहिलंस एवढं? अगं कितीतरी चांगली स्थळं हातची गेली. त्यांना नकार देताना अक्षरशः नाकी नऊ आले माझ्या. बाहेर लोक कुजबुज करायला लागलेत आता. तुमच्या मुलीतच काहीतरी कमी आहे म्हणून. का असा छळ मांडला आहेस आमचा? तुझ्या मागे तुझी बहीण श्वेता अजून लग्नाची आहे म्हटलं. निदान याचा तरी विचार कर.” शरदराव त्राग्याने बोलत होते.
“तात्या, तुमची परवानगी नसेल तर आम्ही लग्न करणार नाही. पण हेही तितकंच खरं आहे ,मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकत नाही .” रेवती.

“शिकवा आता आम्हाला. जर वेडावाकडा काही विचार केलास ना, तर या घराचा दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. एक लक्षात ठेव रेवती. आई -वडील आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करत असतात. माझी परवानगी नाही या लग्नाला. आता हा विषय इथेच संपला. पुन्हा त्या साठ्यांच्या मुलाचा विषय माझ्यापुढे अजिबात नको आणि त्याला आता भेटशील तर याद राख.” असे म्हणत शरदराव बाहेर निघून गेले.

रेवती आपल्या आईकडे अपेक्षाने पाहत राहिली.
“मी समजावले तुझ्या तात्यांना. पण त्यांचा स्वभाव माहित आहे ना तुला. आता ते काही आपला निर्णय बदलायचे नाहीत. रेवती तू विसरून जा शंतनूला. तेच योग्य होईल.” आई रेवतीला जवळ घेत म्हणाली.
“कसं विसरु गं आई? मी नाही राहू शकत त्याच्याविना आणि हेही तितकंच खरं आहे, जर माझं लग्न दुसऱ्या कोणासोबत झालं तर मी ते निभावू शकेन की नाही माहीत नाही.” रडतच रेवती आपल्या खोलीत गेली.
स्वतःला तिने पलंगावर झोकून दिले. शंतनूच्या आठवणीत ती कितीतरी वेळ रडत राहिली. अचानक तिला कसलीशी आठवण झाली नि तिने उठून आपली डायरी बाहेर काढली. शंतनूसाठी स्वतः लिहिलेल्या साऱ्या कविता तिने पुन्हा पुन्हा वाचून काढल्या.

‘आठवणीत तुझ्या खूप रडावसं वाटतं
रोजच तुला भेटावसं वाटतं
उदास होते मन कधी तेव्हा
तुला डोळे भरून पहावसं वाटतं..’

“रेवती किती छान कविता करतेस! मी खरचं खूप मोठा चाहता आहे तुझ्या कवितांचा. त्या आपल्या कॉलेजमधल्या बोर्डवर लावलेल्या तुझ्या कविता मी नेहमी वाचतो. इतके दिवस रेवती कोण हे माहीतच नव्हतं मला. पण आज आपली भेट झाली आणि हो.. तू तशीच सुंदर आहेस जशा तुझ्या कविता सुंदर असतात.” शंतनूचे बोलणे ऐकून रेवती थोडीशी लाजली.
या पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांना आवडले. नंतर ओळख वाढली आणि दोघांत छान मैत्री झाली आणि मैत्री ते प्रेमाचा प्रवास कसा झाला हे दोघांनाही उमजले नाही.

कॉलेज संपलं आणि शंतनूला नोकरी मिळाली. इतक्यात लग्नाचा विषय नको म्हणून घरच्यांशी नंतर बोलू असे दोघांनी ठरवून टाकले. मात्र शरद रावांनी आता रेवतीसाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. पण सगळ्याच उत्तम स्थळांना रेवती नकार देत होती. त्यामुळे शरदराव तिच्यावर चिडून होते. “नकार द्यायचे कारणच काय? असे किती दिवस चालणार?” शेवटी आईच म्हणाली, ‘तुझ्या मनात दुसरे कोणी आहे का? तसं सांगून टाक. म्हणजे हा स्थळं पाहायचा घाट नको घालायला.’
तेव्हा कुठे रेवतीने आईला सगळे सांगितले.

पण शरदराव या लग्नाला मान्यता देणार नाहीत हे आईला माहीत होते. तरीही एक प्रयत्न म्हणून आईने ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. आपली शांत, सोज्वळ मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली हे ऐकून शरदरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ‘मी संस्कार करायला कमी पडलो.’ असे म्हणत त्यांनी खूप आकांड- तांडव केला.

रागारागाने बाहेर गेलेले शरदराव काही वेळातच गडबडीने घरी आले.
“उद्या जोश्यांकडची मंडळी आपल्या रेवतीला पाहायला यायची आहेत. तिला तयार राहायला सांगा. उत्तम स्थळ आहे. हातचं जायला नको. बरं काही सामान आणायचे असेल तर यादी करून द्या. मी घेऊन येतो.”
“मी काय म्हणते, त्यांना चार दिवसांनी बोलावले तर चालणार नाही का? अहो, रेवतीला थोडा वेळ द्या सावरायला. नाराज झाली आहे पोर.” नीताताई समजुतीच्या स्वरात म्हणाल्या.

“सगळं ठीक होईल. तुम्ही नका काळजी करू. जोश्यांचा मुलगा लाखात एक आहे. हळूहळू रेवती विसरेल त्या साठ्यांच्या मुलाला.”

नीताताईंनी दिलेली सामानाची यादी घेऊन काही वेळातच शरदराव पुन्हा घराबाहेर पडले.
तशा नीताताई रेवतीच्या खोलीत आल्या. “बाळा, झाले गेले विसरून जाणे तितकेसे सोपे नाही हे कळते मला. प्रेम म्हणजे काही खेळ नव्हे, तो आपल्या भावनांचा एक सुंदर असा मिलाफ असतो. खरं प्रेम सर्वांच्याच नशिबी नसतं गं. प्रेमाची आणखी एक बाजू म्हणजेच विरह. कदाचित आणि तुझं एकत्र येणं नशिबाला ही मान्य नसेल. उद्या तुला पाहायला मंडळी यायची आहेत. तेव्हा तुला बाबांनी वेळेत तयार राहायला सांगितल आहे.”

“आई, तात्यांना मन नाही का गं? काय कमी आहे शंतनूमध्ये? हसत- खेळत, भरलेलं घरदार आहे. चांगली नोकरी आहे. मला खूप सुखात ठेवेल तो.”
रेवती आईच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली.

“एक गोष्ट मात्र मला कळत नाही. शंतनूने आम्हाला भेटायला यायला हवे होते. तुला रीतसर मागणी घालायला हवी होती. सगळं काही रीतीला तिला धरून झालं असतं तर तुझ्या तात्यांनीही थोडा विचार केला असता.” नीताताई रेवतीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

“हेही खरेच होते. लग्न करण्याचा निर्णय आम्हा दोघांचा होता. शंतनू एका शब्दानेही म्हटला नाही मी तुझ्या आई -वडिलांना समजावायला येईन किंवा रितसर त्यांच्याकडे तुझा हात मागेन. तो केवळ इतकेच म्हणाला, तुझ्या तात्यांची परवानगी असेल तरच आपण लग्न करू.
पण आई माझे मलाच कळले नाही गं, मी त्याच्या प्रेमात कधी पडले? त्याचा स्वभाव माझ्या स्वभावाहून अगदीच निराळा. समोरच्याला झटक्यात आपलंसं करणारा आणि मी शांत, गप्प राहणारी, आपल्याच विश्वात रमून जाणारी. पण त्याच्या सानिध्यात माझा स्वभाव खूपच बदलला. भरभरून प्रेम केलं गं आई मी त्याच्यावर आणि स्वतःवरही.” शंतनूच्या आठवणीत रेवती खूप काही बोलत राहिली.
“आई तात्यांनी मला समजून घेतले नाही तरी काय झाले? मी सारं काही विसरून जाईन. तात्यांना सांग, मी तयार आहे लग्नाला. येईल त्या स्थळाला होकार देईन मी आता. पण त्या आधी एकदा मला शंतनूला भेटू दे..फक्त एकदाच.” रेवती आपले डोळे पुसत कसल्याश्या निर्धाराने म्हणाली.

“ठीक आहे. एकदा भेटून घे त्याला आणि जाताना श्वेताला सोबत घेऊन जा. फक्त हे तात्यांना कळता कामा नये.” नीताताई

“काय कळता कामा नये?” श्वेता आत खोलीत येत म्हणाली. “आणि हे काय? ताईचा चेहरा असा का दिसतोय?” आई परत तात्या काही बोलले का? की शंतनू..?”

“ते सांगते नंतर. आधी हात -पाय धुवून ये आणि दोघीही जेवायला चला. तात्या आले की मागाहून वाढते त्यांना.” असे म्हणत निताताई स्वयंपाक घरात गेल्या. तशी श्वेता रेवतीच्या गळ्यात पडली.
“तायडू अगं झाले तरी काय? तो शंतनु पुन्हा काही बोलला नाही ना तुला? तसं असेल तर चांगलाच कान पिळते त्याचा.”
हे ऐकून रेवतीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण आईची हाक आल्याने दोघी पट्कन उठून जेवायला गेल्या.

क्रमशः
©️®️सायली

========================

पुढील भाग

https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag2/

========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *