Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® सौ. गीता गजानन गरुड.

रात्रीचा प्रहर ओसरला तसा धुक्याचा पदर दूर करीत पहाट अवतरली. कोंबड्याने अंग ताठ करत बांग दिली. काही वेळातच, सुर्यनारायण पुर्व क्षितीजावर अवतरले. त्यांची कोवळी रेशमी किरणं शिरपाच्या झोपडीवर विसावली.

शिरपा आळोखेपिळोखे देत बाहेर आला. पाणचुलीत लाकडं सारुन अंबुने आग केली नि पाण्याने भरलेलं तपेलं इवल्याश्या हातांनी उचलून चुलीवर ठेवलं.

शेळकुंडाची राखाडी शिरपाने तळहातावर घेतली नं तो खसाखसा दात चोळू लागला. तोवर बाला पाणी लागणार आचवायला म्हणून सवयीने अंबुने पितळी तांब्या भरुन पाणी त्याच्यासमोर ठेवलं व त्याच्या बाजूला बसली.

अंबु दोन वर्षाची असताना तीची माय भरल्या पोटाची होती. आठव्या महिन्यातच प्रसवली. अतीरक्तस्त्रावानं माय दगावली नि जन्माला आलेला पोरगाही गेला.

शिरपाला कैक जणांनी पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला.  अगदी त्याच्या तासगावच्या मेहुण्याने अंबुला त्यांच्या घरी न्यायची तयारी दाखवली.

शिरपाचा सासरा पोटची पोरगी गेल्याचं दु:ख काळजात दाबून ठेवून जावयासाठी स्वर्गत शोधण्यास तयार झाला पण शिरप्याने सासऱ्यापुढे हात जोडले. “मामा, माझी दुरपदी सोडून दुसऱ्या कनच्याबी बाईचा मी बायको म्हून इचार करु शकत न्हाई नि माझ्या अंबुला मला सावत्र आई आणायची न्हाय.” असं काकुळतीला येऊन सांगितलं.

डोळ्यातली पाण्याची तळी धोतराच्या शेवाने निरपीत शिरपाच्या सासऱ्याने शिरपाच्या पाठीवरनं हात फिरवला. “जशी तुमची मर्जी जावयबापू. कंदीबी कायबी लागलं तरी अर्ध्या रातच्यालाबी साद घाला. धावत इन.”असं सांगून सासऱ्याने नातीला उचलून तिचे गालगुच्चे घेतले नं पुन्हा डोळ्यात जमा झालेलं पाणी गालावर ओघळायच्या आधी झपझप पावले टाकत कातर मनाने निघून गेला.

दोन वर्षांच्या अंबुला काही कळत नव्हतं. शिरपा तिचा माय नं बा दोन्ही झाला. शिरपाच्या वसरीला लागून राधाक्काची झोपडी होती. राधाक्का शिरपाच्या मदतीला धावून आली. ते लेकरु तिने काखेला मारलं नं शिरपाला म्हणाली,”शिरपा, असा किती दिस घरात बसून र्हाशील रं . पोटाची खळगी भराया व्हयी नि या पोरीलाबी शिकूनसवरून डाक्दरीन करायची बघ म्हंजे तिच्या मायसाऱ्या बायाबापड्यांची सेवा करील आपली अंबी. जातोयास न्हवं..”

शिरपा जणू आपलं काळीजच राधाक्काच्या हवाली करुन काम शोधायला निघाला. तो पहिले ज्या दुकानात कामाला होता तिथे नवीन गडी कामाला राहिला होता, ओझी उचलीत होता तरी शिरपा दुकानाबाहेर येरझारा घालत राहिला.

काही वेळातच मालक आले तसे त्याने मालकापुढे कामासाठी तोंड वेंगाडलं पण मालकाला शिरपाची कौटुंबिक परिस्थिती ठाऊक होती. आईविना पोरगी वाढवणारा शिरप्या दुकानाच्या कामात किती लक्ष देणार..पोरगी शीक पडली की हा सारखा दांड्या मारणार हा सगळा विचार करुन शिरपाची ब्याद आपल्या गळ्यात नकोच असा मालकाने निश्चय केला व शिरपाचा मागचा हिशेब चुकता करुन त्याला निरोप दिला.

दुकानात आलेले श्रीधरपंत हे सारं पहात होते.त्यांनी शिरपाची नड जाणली व त्याला वाड्यावर यायला सांगितलं.

जुन्या काळातला वाडा तो. दिंडी दरवाजा, आत अंगण, अंगणात सुबकसं तुळशीव्रुंदावन,  कोरीव काम केलेले सागवानी खांब. श्रीधरपंत झोपाळ्यावर बसून पानाला चुना लावत होते. शिरपाने त्यांना वाकून नमस्कार केला.

श्रीधरपंतांनी शिरपाला कामं समजावून सांगितली. दोन वेळचं पाणी शेंदायचं, परसवातली, अंगणातली झाडलोट करायची, झाडांना पाणी घालायचं, बाजारात जाऊन काय सामान सांगतील ते आणून द्यायचं, त्यांच्या मुलीला,छबुला शाळेत न्हेऊन सोडायचं,आणायचं आणिक बरीच कामं होती. शिरपाने होकार दिला.

श्रीधरपंतांची पत्नी शारदा अगदी मायेचा झराच जणू. चापुनचोपून विंचरलेल्या केसांचा भरगच्च आंबाडा, त्यात खोवलेलं बागेतलं अनंताचं फुल, हळदुवी चाफा, केतकी कांती, भाळावर शोभणारं ठसठशीत कुंकु, आल्यागेल्यांची विचारपूस करणारी शारदा..लोकं तिला मानाने वैनीबाय असं संबोधत.

वैनीबायने शिरपाला बसवून चहा दिला, बटाटेपोहे दिले. बायको गेल्यापासनं पहिल्यांदाच शिरपाने कुणा माऊलीच्या हातचा घास मुखी लावला नि दुरपदीच्या आठवणीने त्याच्या डोळ्यांना धारा लागल्या.
“काय रं शिरपा, आरं रडाया काय झालं? मिरची लागली की काय? वैनीबायने त्याच्या हाती पाण्याचा तांब्या दिला.
शिरपाने पटक्याने अश्रु पुसले नि बाजुच्या केळीच्या पानात ते पोहे बांधू लागला.

“का रं आसं. खा की दोन घास.”

“वैनीबाय, घरला लेक हाय माझी, अंबु. तिच्यासोबत खाईन.”

“मंग थांब वाईच. आजून दोन घास बांधून देते,” म्हणत वैनीबायने त्याला अधिकचे पोहे बांधून दिले. त्यादिवसापासनं वहिनीबायची छत्रछाया शिरपा व त्याची लेक अंबु यांवर राहू लागली.

राधाक्काच्या देखरेखीखाली अंबु मोठी होत होती. तिलाही बासोबत वाड्यावर जायचं होतं. बा सांगत असलेली वाड्याभोवतालची  बाग बघायची होती. निळ्याजांभळ्या कृष्णकमळात हरवायचं होतं, बकुळफुलं वेचायची होती, ओच्यात भरुन घेऊन दोरात ओवायची होती.

बाने वर्णिलेल्या वैनीबायचं तिनं मनोमन चित्र रेख़ाटलं होतं. तशीच असेल का वैनीबाय याची तिला उत्सुकता लागली होती. शिरपा मात्र अंबुला वाड्यावर न्हेलं तर  आपण तिच्याभोवती घुटमळत राहू नं आपलं कामावर नीट लक्ष लागणार नाही म्हणून तिला न्यायघी टाळाटाळ करत होता.

वैनीबायच्या छबुचा वाढदिवस होता. छबुचे सवंगडी येणार होते. वैनीबायने रव्याचा खरपूस केक केला होता, चैत्र चालू असल्याने कैऱ्यांचं वेलचीयुक्त थंडगार पन्हं केलं होतं. रस्त्याकडेला फुललेल्या बहाव्याची पिवळीधम्म तोरणं दाराला लावली होती.  दिवाणखान्यातल्या शोभेच्या घंगाळात पाणी ओतून त्यात गुलमोहर, ताम्हण, कृष्णकमळ ही नेत्रसुखद रंगांची फुलं आकर्षकरित्या मांडली होती.

वैनीबायच्या आग्रहानुसार शिरपाने अंबुला वाड्यावर न्यायचं ठरवलं होतं. कित्तीकित्ती खूष होती अंबु! तिने राधाक्काच्या सुनेकडनं दोन वेण्या बांधून घेतल्या.त्यांना जत्रेतनं आणलेल्या नवीन लालचुटूक रिबिनींची फुलं बांधली.

निळ्याजांभळ्या इवल्या इवल्या फुलांचा लिंबूकलरचा परकरपोलका घातला. खाकी पावडर गालांना चोळली. गंधाच्या डबीतलं गंध लावलं. राधाक्काने तिच्या डोईत जुईचा गजरा माळला. तिची अलाबला केली. अवघी सात वर्षाची अंबू. वयाच्या मानाने लवकर उमज आली होती तिला. परिस्थिती माणसाला लवकर मोठं करते तसंच काहीसं होत होतं अंबुच्या बाबतीत.

बाचा हात धरुन अंबु तुरुतुरु चालत होती. शेतातले कुणगे पायांआड करत होती. नदीच्या कोरड्या पात्रांतून ती दोघं चालू लागली.आज तिला नेहमीपेक्षा वेगळं जग दिसणार होतं. आपल्या भोकर डोळ्यांनी ती आजुबाजूचा परिसर न्याहाळत होती. तोंडाने प्रश्नांची सरबत्ती चालू होती.

मधेच मधुप्पाच्या परड्यातनं हाक ऐकू आली. शिरपा अंबुला पेरणीखाली उभी करुन जमावातनं पुढे सरला.  मधुप्पाचं घर मातीच्या चौथऱ्यावर उभारलं होतं. त्या चौथऱ्याला वाळवीने भगदाड पाडलं होतं नि त्यात जनावर जाऊन लपलं होतं.

शिरपा येताक्षणी बघे बाजूला झाले. मधुप्पाने शिरप्याकडे काठी दिली. काठी हापटीत,हापटीत त्याने जनावराचा अंदाज घेतला  व आपलं सारं कौशल्य पणाला लावून तीसेक मिनटात ते भलंमोठं पिवळंधम्म धुड बाहेर काढलं तसं ते फणा काढून फस्सकन अंगावर आलं.

बघ्यांची काळजं लकाकली. वीजेच्या चपळाईने शिरपाने त्या धुडाला गायरीत भिरकावलं. बरणीत भरुन जंगलात न्हेऊन सोडण्यासाठी पोरांच्या हवाली  केलं.
शिरपाने हातपाय धुतले,चूळ भरली. मधुप्पा त्याला पैसे देऊ लागला तसा शिरपा म्हणाला,”मुकं जनावर ते. त्याला पकडून रानात सोडलं ते पैशासाठी नव्हं. कंदीबी गरज लागली तर साद घाला. इन मी.”

आपल्या बाचा केवढातरी अभिमान वाटला,अंबुला. वाटेत चालताचालता ती बाकडून घडला प्रसंग ऐकत होती, भितीने शहारत होती, कौतुकाने डोळे विस्फारत होती.

शिरपाने घरी जाताच अंबूची व वैनीबायची गाठभेट घालून दिली. वैनीबायला ही भोकर डोळ्यांची,इवल्या जिवणीची अंबु खूपच आवडली. आईविना पोरगी पाहून वैनीबायचं काळीज हळहळलं.

शिरपा जळणासाठी लाकडं फोडायला गेला. अंबु वैनीबायच्या मागनं फिरत होती. हळूहळू तिचा धीर चेपला. ती वैनीबायसोबत हसू लागली, तिला गप्पा सांगू लागली. वैनीबायने तिला खरवडीचा टोप दिला. ही दुधाची खरवड अंबुला खूपच आवडली आणि त्याहून आवडली ती वैनीबायची दाट सायीची माया.

वैनीबायच्या सांगण्यावरुन शिरपा अंबुला सुट्टीला वाड्यावर न्हेऊ लागला. वैनीबाय तिला छबुचे जुने फ्रॉक द्यायची. वैनीबायच्या छबुचं मात्र अंबुशी पटत नसे. अंबु वाड्यावर आली की छबुला आपल्या प्रेमात वाटेकरी आल्यासारखं वाटे.

वैनीबायने कितीही समजावलं तरी छबु, अंबुला तिच्या चुलबोळक्यांना, इतर खेळण्यांना हात लावू देत नसे. अंबु बिचारी एका कोनाड्यात बसून मोठ्या कुतुहलाने छबुची भातुकली पहात राही. छबुने कधी एखादं भांड घासण्यासाठी म्हणून दिलं तर ते घासल्यासारखं करुन, धुऊन देई.

एकदा गंमत झाली. छबुची मावशी आली,मुंबईवरनं. छबुचे किती किती लाड करत होती! अंबुला वाटलं का बरं अशी प्रेमळ आई,मावशी मला नाहीत. राधाक्का नि बा सोडून कोणीच जीवाभावाचं नाही. इतक्यात वैनीबाय अंबुला शोधत आली नं अंबुच्या तळहातावर तिने नारळाची वडी ठेवली. “वैनीबाय हाय नं मायेची आपल्या.” नारळसाखरेचा गोडवा जीभेवर अनुभवत अंबु स्वत:शीच गोड हसली.

छबुची मावशी तिच्या ब्यागेतून छबुसाठी आणलेल्या भेटवस्तू बाहेर काढत होती. चिऊताईचं चित्र असलेलं गुलाबी दप्तर, कंपासपेटी, रंगपेटी,  चुण्यांचा घेरदार फ्रॉक, चॉकलेट बॉक्स….आणि बरंच काही. अंबुची नजर त्या वस्तूंवरून भिरभिरत एका प्लास्टिकच्या वेस्टणात असलेल्या उभ्या बाहुलीवर खिळली. राधाक्काच्या गोष्टींतली परीच जणू बाहुलीच्या रुपात अवतरली होती.

गळ्यापासून पायापर्यंत सिल्कचा आकाशी पायघोळ झगा, एका हातात म्याचिंग पर्स, गळ्यात निळ्या खड्यांचा नेकलेस, कानात तसेच डुल, पायांत म्याचिंग सँडल्स, सोनेरी केस, निळे डोळे, लालचुटूक ओठ, गुलाबी गाल, डौलदार भुवया, पायात काढताघालता येण्याजोगे सँडल्स.”कित्ती कित्ती सुरेख!’ अंबुच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.

“ए अंबु नाही हं. तू माझ्या बाहुलीकडे बघायचंसुद्धा नाहीस. आधीच सांगते.” छबु बाहुलीला छातीपाशी घेत फणकारली. मावशी छबुला म्हणाली,”असं बोलू नये छबू. लहानै नं ती तुझ्यासारखी.”

त्यावर छबु उत्तरली,”तुला ठाऊक नाही मावशी. ही अंबु हल्ली रोजच येऊ लागलेय आपल्याकडे. गप्प बसावं तर नै. सारखी माझ्या खेळाकडे बघत असते. अस्सा राग येतो मला!”इतकयात मावशी वैनीबायने अंघोळीस बोलावले तशी उठून गेली.

अंबुचं मन मात्र खट्टू झालं. चुलबोळकी, बाहुली अंबुलाही हवीशी वाटू लागली. ‘किती ते अंतर आपल्यात नं छबुत. आपल्याला का नै बरं वैनीबायसारखी आई, दुरुन आपल्यासाठी खास काहीतरी आणणारी मावशी.”अंबु हिरमुसून अंगणात पाहू लागली.

पेळेवर तिला आपला बा दिसला..उन्हात लाकडं फोडताना त्याच्या छातीचा भाता हलत होता..प्रत्येक घावासरशी त्याच्या तोंडातनं ध्वनी उमटत होता, कपाळावरनं घामाच्या धारा वहात होत्या.  अंबुने मग छबुच्या बाहुलीकडे पाहिलंच नाही. ती तिच्या बाकडेच बघत राहिली.

दुसऱ्या दिवशी अंबुला बाने वाड्यावर न्हेण्यासाठी उठवलं पण ती पाय छातीपाशी दुमडून झोपून राहिली. आठवडा झाला तरी वाड्यावर अंबु गेली नाही तशी वैनीबायने स्वतः तिला बोलावणं पाठवलं.

वैनीबायकडे चैत्रातलं हळदीकुंकू होतं. तू आली नैस तर मीच येईन तुला न्यायला असा सज्जड दम शिरपाकडे पाठवल्याने अंबू मनात नसताना शिरपासोबत वाड्यावर गेली. दाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावलं होतं. अंगणात चैत्रांगण रेखाटलं होतं. अंबू आत येताच वैनीबायने आपल्या भरजरी साडीची पर्वा न करता अंबुला छातीशी धरलं. तिची हनुवटी वर करत विचारलं,”अंबू रागावलीस वैनीबायवर? का नाही येत वाड्यावर?” अंबू थोडसं हसली नं सतरंजीवर जाऊन बसली.

पितळेच्या पाळण्यात चैत्रगौरी झुलत होती. मोगऱ्याच्या गजऱ्यांनी व चाफ्याची फुलांनी  सजलीधजली गौर फार देखणी दिसत होती. लाडू, करंज्या, अनारसे,चकल्या अशा विविध व्यंजनांची चैत्रगौरीपुढे आरास केली होती. जमा झालेल्या बायांची, कुमारिकांची वैनीबायने फळांनी,हरभऱ्यांनी ओटी भरली, त्यांना हळदकुंकू लावलं. थंडगार पन्हं, वाटली डाळ व खिरापत दिली. मोगऱ्याचे गजरे दिले, गुलाबपाणी शिंपडलं, त्यांच्या हातांवर अत्तर लावलं. नाही म्हंटलं तरी अंबुचं लक्ष त्या बाहुलीकडे जात होतं.

छबु वैनीबायकडे येत म्हणाली,”आई, ही बाहुली नक्कोच मला. हिचा एक डोळा बघ आत गेला. कशी तिरळी दिसतेय.”जमलेल्या सगळ्या मुली बाहुलीच्या डोळ्याकडे पाहून हसू लागल्या. आपण आमच्या छबुसाठी नवी बाहुली मागवू म्हणत श्रीधरपंत छबुला घेऊन जायला आत आले.

अंबुने सगळा धीर एकवटून विचारलं,”मी घेऊ का ही बाहुली?”

“घे तुझ्यासारखीच आहे ती. मी नवीन घेईन.” म्हणत छबुने फणकारत बाहुली अंबुला दिली. वैनीबायला छबुचा हा अहंकारीपणा अजिबात आवडत नसे पण श्रीधरपंतांपुढे छबुला काही बोलण्याची सोय नव्हती.

अंबुच्या डोळ्यांतला आनंद पाहून वैनीबाय सुखावली. अंबुने बाहुलीला आंजारलंगोंजारलं. बाहुलीच्या आत गेलेल्या डोळ्याला चाचपलं. त्या डोळ्यामुळे तर छबुने अंबुला ती बाहुली दिली होती.

आता अंबुला आई नसली तरी ती बाहुलीची आई होणार होती. तिला न्हाऊमाखू घालणार होती, लुटूपुटूचा स्वैंपाक करुन तिला भरवणार होती,तिची वेणीफणी करणार होती. तिच्यासाठी बाळअंगाई गाणार होती.

वीसेक वर्षानंतर..

वैनीबायला मुंबईच्या मोठ्या इस्पितळात नेण्यास सांगितलं होतं. श्रीधरपंत तिला घेऊन छबु जी आता सौ. लतिका आठवले झाली होती तिच्या घरी गेले. प्रकुती अस्वास्थ्यामुळे आईचा काळवंडलेला चेहरा, हातापायाच्या काड्या पाहून छबुला रडूच आलं. छबुच्या यजमानांनी दुसऱ्या दिवशी सकाळी वैनीबाय, श्रीधरपंत व छबुला त्या इस्पितळात न्हेलं. सरकारी इस्पितळ म्हणून छबु नाराजच होती पण इलाज नव्हता.

आईच्या आजाराशी संबंधित निष्णात डॉक्टर हे तिथेच कार्यरत होते. केबिनमध्ये वैनीबायला न्हेलं तेंव्हा त्या एप्रनमधल्या डॉक्टरणीने स्वतः उठून वैनीबायचे पाय धरले. डॉक्टरणीच्या डोळ्यांतल्या आसवांच्या थेंबांनी वैनीबायचे पाय ओलावले.

वैनीबायने तिला हातांनी वर घेतलं..हनुवटी उचलून तिचा चेहरा न्याहाळला..आणि वैनीबायच्या डोळ्यांत क्षणात आनंदाचं चांदणं साचलं.
वैनीबाय गालांवर हात ठेवत म्हणाली,”अग्गो बाई, ही तर आमची अंबु..”
अंबु म्हणाली,”अहं..बाहुलीची आई आणि तिने शोकेसमधे ठेवलेल्या बाहुलीकडे बोट दाखवलं..ती तीच बाहुली होती जिचा डोळा आत गेला म्हणून छबुने तुझ्यासारख्यांनीच अशी वापरायची म्हणत तिला दिली होती.

डॉ.अंबिकाने त्यांना बसवलं. चहाकॉफी मागवली व आपली कहाणी सांगितली. नेहमी साप आला की शिरपाला बोलावलं जायचं. शिरपाही क्षणाचाही विलंब न करता जायचा पण एकदा घात झाला. शिरपावरच उलटा वार झाला.

गावात सोयी नसल्याने शिरपा वाचू शकला नाही. अंबु तेंव्हा आठवीत होती. तिचा मामा तिला आजोळी घेऊन गेला. मामाच्या मुलांसोबत अंबुचं पुढचं शिक्षण झालं. तिची तीक्ष्ण बुद्धिमत्ता व मामाचा भाचीला डॉक्टर बनवायचा ध्यास याचं फलित डॉ. अंबिकात झालं.
सरकारी इस्पितळात दीनदुबळ्यांची सेवा करायची, त्यांचे प्राण वाचवायचे हाच ध्यास तिने घेतला.

छबुच्या डोळ्यांत अपराधाची छटा उमटली होती. अंबुने तिचे हात हातात घेत म्हंटलं,”छबु, तुझ्या जागी दुसरी कोणी असती तरी तशीच वागली असती किंवा त्याहून वाईट पण परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवते, मीही आलेल्या प्रसंगांतून तावूनसुलाखून निघाले. तू काळजी करु नकोस. वैनीबाय माझ्याजवळ आलेय नं. बघ कशी खडखडीत बरी होते ते.”

शोकेसमधली बाहुली जणू जीवंत होऊन भूतकाळ व वर्तमानकाळाचा विलक्षण  संगम पहात होती, डॉक्टरी पेशातल्या तिच्या कणखर आईला पहात होती.

समाप्त

==================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *