Ritbhatmarathi

Search
Close this search box.

बाबा.. एक कल्पवॄक्ष (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२

©️®️ अनुजा धारिया शेठ

दादा साहेब राजेशिर्के भारदस्त व्यक्तीमत्व.. उभ्या पंचक्रोशीत त्यांचा दरारा.. गावासाठी तें देवच.. गावातल्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडणारे न्याय मिळवून देणारे, त्या गावचे पोलिस, वकील, न्यायमुर्ती सारं काही तेच होते. एवढे ऐश्वर्य होते की, डोळे दिपून जातील. त्यांच्या पत्नी म्हणजे राधाताई खूप प्रेमळ, सगळ्यांना हव्या हव्या वाटणा-या.. गावातल्या प्रत्येक माणसांना नावानिशी ओळखणार्या सर्वांच्या लाडक्या माईसाहेब..

कशाची कमी नव्हती.. पण म्हणतात ना जगी सर्व सुखी असा कोण आहे? माईंना लग्नाला १० वर्ष झाली तरी मूल होत नव्हते. बाळासाठी त्यांचे मन आसुसलेल होते. किती नवस बोलून झाले, उपाय करून झाले पण यश येतं नव्हते.

गावातल्या सर्व लेकरांना माया लावायच्या त्या. त्यांच्याकडे काम करणारी गोदाक्काने ह्या वर्षी नवरात्रीचे कडक उपवास करून, माईंना जवळच असलेल्या रंगुमातेला साकडे घालायला लावले.

रंगुमाता अतिशय कडक, माई मनातून घाबरत होत्या. काही चुकभूल झाली तर.. पण गोदाक्काने त्यांना समजावून सांगितलं. रंगूमाता प्रसन्न झाली, दिवाळीतच गोड बातमी समजली.

राजेशिर्के यांच्या वाड्यात चिमूकली पावल फिरकणार.. दादा आणि माई यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. महिन्या मागून महिने जात होते. कितीतरी बायका माईंच्या दिमतीला होत्या. त्यांच्या हक्काची, प्रेमाची माणसेच एवढी होती की प्रत्येकाला त्यांची काळजी घ्यायची होती. आपआपसात भांडायच्या काही जणी.. माई त्यांची ही गोड भांडण सोडवायच्या आणि काम वाटून द्यायच्या.

गोदाक्का खूप अनुभवी.. त्यांनी दादासाहेंबांना सांगितलं जी तयारी कराल ती दोघांची करा.. डॉक्टरांना दाखवण्यात आले, त्यांनी सुद्धा जुळे असल्याच सांगितलं. आनंदाला उधाण आले, डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पण दणक्यात झाला.

नववा महिना लागला तशा माई थकल्या होत्या, वय थोडे जास्त त्यात जुळे.. एकेक दिवस अगदी मोजत होत्या. गुरुपौर्णिमेचा चंद्र अगदी झळाळत होता. माईंनी एक मुलगा आणि एक मुलगी यांना जन्म दिला. दादासाहेब आनंदाने बेभान झाले. सा-या गावाला मिठाई वाटण्यात आली..

मुलांची नाव पण गुरुनाथ आणि पोर्णिमा ठेवण्यात आले.. त्यांच्या रडण्याने, हसण्याने वाडा बोलका झाला होता. त्यांचे ते दूडदूड धावणे, बोबडे बोल ऐकताना दादा आणि माई अगदी भान विसरून जायचे..

हळूहळू मुले मोठी होत होती. रंगूमातेचा प्रसाद म्हणून तिचा नवस पूर्ण केला. दरवर्षी तिच्या दर्शनाला मुलांना घेऊन जायचे. पोर्णिमावर खूप जीव होता दादांचा तसेही बाप-लेकीच नातं वेगळेच असते नाही का? कायम ताई म्हणून हाक मारायचे दादा.. ताई आणि भाई.. तसेही घरातल्या प्रत्येकाला आदराने हाक मारायची पद्धतच होती त्यांची.

दादा आता थकत चालले होते. भाईने हा कारभार सांभाळावा अशी त्यांची इच्छा होती. भाईची तयारी होती, पण त्याचे शिक्षण बाकी होते. भाईंनी वकील व्हायची इच्छा दाखवली.. दादा खुश झाले.. ताईने सुद्धा आपले शिक्षण पूर्ण करून गायनाचा छंद जोपासला.

पुढील शिक्षणासाठी त्यांना शहरात पाठवण्यात आले. ताईला मात्र आपल्या जवळच ठेवले, अहो उद्यां लग्न होऊन तुम्ही गेलात की ह्या कल्पवॄक्षाची छाया कशी मिळेल तुम्हाला? असे म्हणत दादांचा आवाज कापरा व्हायचा.

सारं काही छान चालु होते. भाई वकील झाले, त्यांनी अनुभवासाठी जगदाळे वकीलांकडे काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. अगदी घरोब्याचे संबध होते वकीलांशी, लगेचच सुरुवात झाली कामाला. एक वर्ष गेले, आता ताईंसाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती दादांनी. भाई आता लवकर तुम्हीही कामाची धुरा तुमच्या हाती घ्या.. आम्हाला नाही होत हो आता.. ताई पण जातील आता लग्न होऊन.. माईसाहेब, आता जाणवतय आम्हाला तुमच्या वडिलांचे दूःख.. एवढी वर्ष हा काळजाचा तुकडा आम्ही सांभाळला आणि आता… दादा गहिवरले, माई म्हणाल्या अहो जनरीत आहे ही.. राजा-महाराजांना, देवाधिकांना तें सुटले नाही तर आपल्याला कशी सुटेल हो?

भाईंचा फोन आला, दादा एकच केस आहे. थोडी महत्वाची ती झाली की माझी प्रक्टिस मी आपल्या वाड्याचे काम बघत स्‍वतंत्र सुरु करतो. तेवढ्यात कसला तरी आवाज झाला. पुढे काहीच समजले नाही. मोबाइल तेव्हा नव्हते त्यामुळे वाट बघण्याखेरीज काहीच पर्याय नव्हता.

जवळच असलेल्या गावात भाई रहात होते, दादासाहेबांनी काही माणसांना लगेच तिथे पाठवले. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. माणसे परतून आली पण बोलायची हिम्मत कोणालाच नव्हती. भाईंवर हल्ला केला होता काही दरोडेखोरांनी, भाई सोडून गेले. दादा- माई तिथेच खाली बसले. ताईसाहेबांनी मोठ्या हिम्मतीने या प्रसंगाला तोंड दिले.

ताईच आता त्यांचे सर्वस्व होती. दादांच्या खांद्याला खांदा लावून सारा कारभार बघत होती. भाईंच्या खून्याचा तपास चालू होता. ताई लग्नाचा विषय टाळत होती. वय झाल्यामुळे दादा-माई थकत चालले होते. त्यांना ताईंची काळजी वाटत होती.

दादांनी ताईला लग्नाचे मनावर घ्यायला सांगितलं, पण त्या काही तयार होत नव्हत्या. पैसे बघून कॊणी लग्नाला तयार झाले तर.. असा प्रश्न त्या विचारत.. मला नाही करायचं लग्न..

भाईंचा खुनी पकडला गेला. ज्यांची केस तें लढवत होते त्यांच्या विरोधकांनी हे घडवून आणले होते. त्या खुन्याला शिक्षा होईपर्यंत ताईने त्या केसचा पिच्छा पुरवला. दादासाहेबांना कौतुक वाटले, आपल्या लेकीचे.

ही वेळ चांगली आहे हे बघूनच दादांनी विषय काढला,

आपल्या आक्कासाहेबांचा धाकटा लेक आहे, घरातच सोयरीक करू, असे म्हणतं त्यांनी ताईचे मन वळवले. आत्याच सासू झाली. प्रसादराव समंजस होते. लग्नानंतर सारा कारभार ताई बघत होती. दादासाहेंबाची एवढी ईस्टेट तिने सल्ला मसलत करून काही सामाजिक संस्था चालू करायचे ठरवले. प्रसादने आधीच सांगितले होते आम्हाला ह्यातले काही नको. पोर्णिमा आणि प्रसाद यांच्या लग्नाला वर्ष होतोय तोच दादा गेले. माई आणि ताई यांना हा फार मोठा धक्का होता.

आता दादांनी उभा केलेला हा कल्पवॄक्ष ताईंना सांभाळायचा होता. तशी ताई धीराची होती तिने त्यांनी उभारलेला हा कल्पवॄक्ष अगदी गरजूंसाठी वापरला.. सगळ्यांची ताई होऊन दादासाहेबांप्रमाणे सर्वांना जीव लावला..

दादासाहेबांची वर्षपूर्ती होती आज. वर्षश्राद्धाची सर्व तयारी झाली. पूजा आवरून झाल्यावर त्यांच्या स्मरणार्थ गरजूंना जीवनावश्यक गोष्टींचे वाटप केले. आणि गावात त्यांच्या नावाने हॉस्पिटल काढायचा निर्णय जाहीर केल्यावर जमलेल्या सर्व ग्रामस्थ आणि माईंनी केलेल्या आग्रहामुळे ताई साहेबांनी एक गाणे सादर केले खास दादासाहेबांसाठी…

त्यांना खूप गहीवरून आले, आपले दादा म्हणजे कल्पवृक्ष होते.. कल्पवृक्षाचा जसा प्रत्येक भाग दुसऱ्याच्या उपयोगी येतो तसेच दादा त्यांचे आयुष्य त्यातला क्षण नि क्षण दुसऱ्यांसाठी जगले.. म्हणूनच माझ्या दादांसाठी हे गाणे मी म्हणते..

खूप दिवसांनी ताईसाहेबांनी सुर लावला.. अगदी आतून गाणे म्हणत होत्या. प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.

कल्पवॄक्ष कन्येसाठी लावुनियां बाबा गेलां

वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला

तुम्ही गेला आणिक तुमच्या, देवपण नांवा आले

सप्तस्वर्ग चालत येतां, थोरपण तुमचे कळले

गंगेकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले

तुम्हावीण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला

सुर्य चंद्र तुमचे डोळे, दुरुनीच हो बघतात

कमी नाहिं आम्हा कांही, कृपादॄष्टीची बरसात

पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यांत

पाठिवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळां..

शेवटला त्यांना अनावर झाले, खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ताई आज कोलमडल्या.. रडून मोकळ्या व्हा ताई.. माई आणि आक्का दोघी सोबत त्यांना आधार देत म्हणाल्या.. पण ताईसाहेबांचे डोळे उघडत नव्हते.. ग्लानी आल्या सारखे झाले त्यांना.. प्रसादराव त्यांना घेऊन दवाखान्यात गेले.

पाठोपाठ माई साहेब आणि आक्का साहेब सुद्धा गेल्या.. डॉक्टरांनी चेकअप करून गोड बातमी दिली. तें सुद्धा दादासाहेबांच्या वर्षपूर्तीच्या दिवशी म्हणून माई साहेब आणि आक्का साहेब खूप खुश झाल्या..

आमचे दादासाहेब येणार असे म्हणत गोदाक्काने ताईंची दृष्ट काढली. ताईंनी घरी येऊन दादांच्या फोटो समोर उभे राहून नमस्कार केला. फोटो मधूनच हा कल्पवृक्ष हसत होता..

कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली  असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका…. साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

® अनुजा धारिया शेठ.

======================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *